परवाच 'Marley and Me' वाचून झाले. मार्ली ह्या खोडकर, खट्याळ (मार्लीच्या मालकाच्या भाषेत वाया गेलेल्या) कुत्र्याची आणि त्याच्या मालकाची ही गोष्ट अतिशयच रंजक आहे. पुस्तक वाचताना मी मार्लीत पूर्णपणे गुंतून गेले. पण पुस्तक संपले तशी मन मार्लीतून बाहेर पडून सोनीच्या आठवणीत शिरले. सोनी, माझी लाडकी मांजरी!
संध्याकाळची वेळ होती. दाराची बेल वाजली. आईने दर उघडले. दारासमोर बिल्डींगमधली समस्त बच्चेकंपनी हजार होती. "काकू काकू, पार्किंगमध्ये ना आम्हाला मांजराचे छोटेसे पिल्लू सापडले आहे. तुम्ही त्याला सांभाळाल?", पाठ केल्यासारखी एका सुरात पोरे म्हणाली. ह्याआधी आम्ही ३-४ छोटी पिल्ले पाळली होती. पण ती कधी कुत्री मागे लागून, कधी काही आजार होऊन अशी लहान असतानाच मेलेली होती. प्रत्येक पिल्लू येणे, त्याला सांभाळणे, त्याचा आमच्या घरातील वावर ह्यांनी रंगलेले आमचे आयुष्य त्यांच्या मृत्यूने एकदम उदासवाणे व्हायचे. त्यामुळे आता मांजर पाळायला नको असे आम्ही ठरवले होते. त्यामुळे आईने "नको रे! आता नाही पाळत आम्ही मांजरे!" असे सांगून टाकले. "काकू खूप छोटे पिल्लू आहे. आणि फारच घाबरल्यासारखे दिसते आहे. तुम्ही नाही म्हणालात तर त्याचे काय होईल? त्याची आईही दिसत नाहीये कुठे!" मुले म्हणाली. एवढेसे पिल्लू, तसेच पार्किंगमध्ये राहू दिले तर कुत्री तरी मारतील नाहीतर गाडीखाली येऊन तरी मारेल ही कल्पना सहन न होऊन "आत्ता घेऊन या त्याला, पुढचे पुढे बघू", असे आई पोरांना म्हणाली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन पोरे लगेच पिल्लाला घरी घेऊन आली.
थोड्याच वेळात हाताच्या ओंजळीत मावणारा, मिचमिच्या डोळ्यांचा, करड्या रंगाचा, 'फर'चा तो गोळा आमच्या दिवाणखान्यातल्या सोफ्याखाली स्थानापन्न झालेला होता...भाटी आहे पाहून आईने पिल्लाचे नाव सोनी ठेवले. सोनी १-२ दिवसात आमच्या घरात रुळली. दिवसभर जमिनीवर पडलेल्या छोट्या वस्तूंशी, स्वतःच्याच शेपटीशी खेळणे, घरभर धावपळ करणे इत्यादी कसरतीने दमलेली सोनी रात्री आमच्या पायात, उशाशी येऊन बसायची. तिथे बसून तिचे छोटे मोठे चाळे चालूच असायचे.
मांजरांना सुकी मच्छी खाऊ घातली की त्यांचे आरोग्य चांगले राहते असा कोणीतरी दिलेला सल्ला ऐकून आईने सोनीला मच्छी खाऊ घालायला सुरवात केली. सकाळी आणि संध्याकाळी ठरलेल्या वेळी सोनीला आम्ही मच्छी देत असू. तिलाही लवकरच हे माहीत झाले. सकाळी आणि दुपारी आई झोपून उठली की सोनी आरडा ओरडा करून "लवकर मच्छी दे", अशी डिमांड करायची.
सोनीला खाऊ पिऊ घालणे, तिच्याशी खेळणे सगळ्यांना आवडायचे. शाळेतून आल्या आल्या दप्तर जागेवर ठेऊन सोनी कुठेय ते शोधणे आणि तिच्याशी खेळणे हा आमच्या दैनंदिनीतला एक महत्त्वाचा कार्यक्रम झाला होता. दोरीच्या टोकाला कागदाचा बोळा बांधून तो जमिनीवर सोडायचा आणि गाडीसारखे बोळा ओढत घरभर धावायचे. सोनी बोळा पकडायला मागे धावायची. आमची ही अशी पकडा पकडी बराच वेळ चालू राहायची. रात्री झोपण्याआधी आई-बाबा शतपावली करू लागले की त्यांच्या पायापायात करणे हा सोनीचा एक आवडता टाईमपास होता.
इतर मांजरांप्रमाणेच कानामागे, गळ्याला खाजवलेले सोनीला खूप आवडायचे.अंग चाटून पुसून स्वच्छ करायचे आणि कोवळ्या उन्हात जाऊन बसायचे हा तिचा आवडता कार्यक्रम दिवसातून २-३ वेळा होत असे. अंघोळ करायची, उन्ह खायचे आणि सोफ्यावर किंवा दिसेल त्याच्या मांडीत जाऊन झोपून जायचे! अभ्यास करताना सोनी जवळ बसलेली असली की छान वाटायचे, सोबत वाटायची. पण कधी कधी हात पाय ताणून देऊन मस्त झोप काढणऱ्या सोनीला पाहून तिचा फार हेवाही वाटायचा. "खायचे, प्यायचे, लाड करून घ्यायचे आणि झोपायचे, काय मस्त आयुष्य आहे...असे आयुष्य पाहिजे!" असे वाटायचे.
मिचमिच्या डोळ्यांच्या त्या फरच्या गोळ्याचे काही महिन्यातच एका सुंदर, रुबाबदार मांजरीत रुपांतर झाले. काही काळाने तिला पिल्ले झाली. आमच्या कुटुंबात दोन मेम्बर्सची भर पडली. सोनी आणि तिच्या पिल्लांच्या तुम्हाला सांगाव्यात अशा अनेक आठवणी माझ्या माझ्या मनात रंग लावून उभ्या आहेत. तुमच्याशी त्या शेअर करण्यासाठी लवकरच मी पुढची पोस्ट लिहीन. तोवर अलविदा!
(टीप: Marley and Ме हे पुस्तक प्राणी आवडणाऱ्या लोकांनी जरूर वाचा. तुम्हाला नक्की आवडेल.)
0 comments:
Post a Comment