Thursday, August 26, 2010

दोन तासांची पाहुणी

आज एक खूप वेगळीच गोष्ट घडली. कम्पनीतून घरी आले न पाय धुवायला म्हणून बाथरूममध्ये गेले. पाहते तर कमोडच्या कडेवर एक काळा लांब पुंजका दिसला. माझ्या हृदयाचा ठोका चुकला...अभिजीतला हाक मारली पण तो गच्चीवर कपडे आणण्यासाठी गेलाय हे लक्षात आले. आता मात्र काय आहे त्याचा छडा आपल्यालाच लावायला हवा हे मी समजून चुकले (एरवी ही कामगिरी मी घरातील पुरुषावर सोडून मोकळी होते.) आणखी जवळ गेल्यावर ती कोणत्यातरी प्राण्याची शेपटी आहे हे लक्षात आले. "अरे बापरे! काय असेल?" छातीत धस्स झाले. तरीही धारिष्ट्य करून आणखी पुढे गेले. तर कमोडमधून २ डोळे वरच्या दिशेने पाहात असलेले दिसले. "उंदीर आहे की काय? अरे देवा!" असा विचार मनात आला. नीट निरखून पाहिले तर लक्षात आले की ती खार होती आणि ती खालच्या पाण्यात तरंगत होती. "ही मेली वगरे आहे की काय?" अजून एक विचार! पण तेवढ्यात तिची हालचाल दिसली. ती वर यायचा प्रयत्न करत होती पण कमोडच्या स्मूथ सर्फेसमुळे ती वर येऊ शकत नव्हती. हे इतके सगळे निरीक्षण होईस्तोवर अभिजीत आला. त्यानेही खार पाहिली. "आमचे घर पूर्ण बंद असताना ही आली कुठून?" हा प्रश्न होताच! बहुधा सकाळी मी निघाल्यावर २ मिनिट दार उघडे होते तेव्हाच ती घरात आली असावी असा निष्कर्ष निघाला. ती खार पाण्यात राहून न बाहेर पड़ण्याचा प्रयत्न करून अर्धमेली झाली होती. आता हिला बाहेर काढायचे कसे? अभिजीतला म्हणाले तिला काठीने वगरे खालून थोडा आधार दे म्हणजे तिला वर येता येईल. पण तरीही ती घसरताच होती. मग शेवटी एक फडके कमोडच्या कडेवर ठेवले. तेव्हा खारुताई फड़क्यात नखे रुतवून काठावर चढल्या. ती खार एवढे सगळे होईस्तोवर इतकी दमली होती की ५ मिनिटे ती तशीच कमोड्च्या काठावर पडून राहिली. मग तिला थोड़ी तरतरी आली न तिने खाली उडी मारली न बाथरूमच्या कोपर्याकडे धाव घेतली. थंडीने न भीतीने ती कुडकुडत होती. तिला अन्नाची गरज होती. "काय द्यावे बरे?" असा विचार करत असतानाच समोर बीट दिसले. बिटाचा तुकडा तिच्यासमोर धरला. तिने अगदी कार्टूनमध्ये दाखवतात तसे दोन हातात धरून तो खायला सुरुवात केली. असे २-३ तुकडे खाल्ले. मग २-३ शेंगदाणे खाल्ले. ह्यावेळी खारुताईला "आपण कुठे आहोत? हे अन्न आपल्याला कुठून मिळतेय?" असे प्रश्न पडले नसावेत. खाल्ल्यावर तिला जरा तरतरी आली. मग तिने आपले अंग साफ़ न कोरडे करण्यास सुरुवात केली. हा कार्यक्रम काही काळ चालल्यावर तिने थोड़ी विश्रांती घ्यायचे ठरवले. स्वच्छता मग विश्रांती, परत स्वच्छता परत विश्रांती अशा काही राउंड्स झाल्या. खारुताई आणखी आणखी तरतरीत दिसू लागल्या. आधी तिचे आवाजान्कडे लक्ष जात नव्हते, आता ती आवाज ऐकून अंग चोरून बसू लागली. हे सर्व होईस्तोवर आम्ही तिच्याजवळ जाऊन थोड्या थोड्या वेळाने पाहात होतो. हालचालीमुळे तीही शांत बसली होती. आता तिला तरतरी आलीये म्हणल्यावर आम्ही तिला एकटीला सोडले. कोणी आजूबाजूला नाही असे पाहून ती बाहेर आली. स्वयंपाकघरात शिरली. उंच उड्या मारून ओट्यावर, फ्रिजवर चढायचा प्रयत्न करू लागली. पण ते काही तिला जमले नाही. तेवढ्यात मी स्वयंपाकघरात काम करायला गेले. माझी चाहूल लागताच ती फ्रिजमागे लपून बसली. मी कामाला लागले. काही काळाने कुठे गेली म्हणून पाहू लागले तर दिसेना! अभिजीत शोधू लागला. ती गुपचूप दारामागे जाऊन बसली होती. अभिजीतची चाहूं लागताच तिथल्याच झाडूवर झाड असल्यासारखे चढायचा प्रयत्न करू लागली न परत जमत नाही म्हणल्यावर शांतपणे बसून राहिली. परत तिला तसेच बसू देऊन कामाला लागलो. मग परत खारुताईने तिथून पळ काढला न देवघरात शिरली. अभिजीतने पाहिले तर ती मस्त देवाच्या फोटोमागे अंग चोरून बसली होती. अभिजीतने हॉलचे दार उघडून ठेवले. खारीच्या थोडा जवळ जाऊन जरा आवाज केला. फायनली खारीने दाराच्या दिशेने पळ काढला. दाराबाहेर पाऊल टाकताच तिला काहीतरी वेगळे वाटले बहुतेक! ती एक मिनिट थबकली न मग दारापासून लांब गेली न भिन्तिवरून उडी मारून निघून गेली. ती २-२.५ तासच होती पण तेवढ्या वेळात तिने आमच्या घरात वेगवेगळ्या ठिकाणी वास केला होता. तेवढ्यात तिचा इतका लळा लागला होता न सवय झाली होती की ती गेल्यानंतर बराच वेळ आम्हाला दोघांना ती कोपर्यात असल्याचा भास होत होता!
आमच्या दैनंदिन जीवनाच्या पटात "guest appearance" देणारी ही खारूताई आमच्या कायम लक्षात राहिल!

5 comments:

  1. What a descriptive narration! I had fun reading it. And I thought it was really sweet of you guys to miss her :-)

    Ketaki

    ReplyDelete
  2. अगदि डोळ्यासमोर घडयत असं वाटत होतं ... मस्त

    ReplyDelete
  3. Khoop chan, incidence ani narration, donhi. Routine sodun ashya kahi ghadlelya goshti khoop chan lakshat rahtat he kharach.
    Asach ekda Piyush, Sanket kade choti manjar adakli hoti akkhi ratra. Sanket la goshta sangayla sangu kadhitari.

    ReplyDelete