बीभत्सरौद्रौ शान्तश्र्च काव्ये नवरसा: मता:||
घाबरू नका! मी संस्कृत, सुभाषिते वगरे यांविषयी मुळीच लिहिणार नाहीये...पोस्ट वाचून मजा नावाची गोष्ट उत्पन्न होणे हाच ह्या पोस्टचा प्रामाणिक हेतू!
तर वर लिहिलेला श्लोक मी सगळ्यात आधी शिकले ते डान्सच्या क्लासला..ह्यात भरतमुनी "शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत" अशा नऊ रसांचा उल्लेख करतात. हा श्लोक अचानक अथावान्याचे कारण की परवा इथे एका कार्यक्रमात "नवरस" नावाचा नृत्यप्रकार सादर केला गेला. त्यात वेगवेगळ्या प्रसंगांची उदाहरणे घेऊन नऊ रसांचा अभिनय केला जातो. (बाप रे! मी डान्सच्या परिक्षेतला पेपर लिहितीये असे वाटत आहे.) त्यावेळी माझ्या डोक्यात कल्पना आली की "ही उदाहरणे सामान्यपणे ऐतिहासिक घटनांमधून घेतलेली असतात. म्हणजे शृंगारासाठी राधा-कृष्ण, रौद्र रसासाठी रावण इत्यादी. जर का लोकांना डान्स आपलासा वाटावा अशी इच्छा असेल तर त्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातले प्रसंग दाखवले तर? हमम...IIT च्या विद्यार्थ्याच्या जीवनावर आधारित नवरस!" मज्जा...
शृंगार....शृंगार रस वगरे सोडा, इथे matching कानाताले, एखादे ब्रेसलेट, छानशी पर्स अशा सौंदर्यात भर घालणार्या (?) वस्तूंचा वापर करण्यावर बंदी आहे. जर का कोणी छान कपडे घातले तर "आज तुझा वाढदिवस आहे का?" असे विचारले जाते.नाही म्हणायला IDC आणि SOM मधल्या आहेत...तोच काय तो IIT च्या मुलांच्या मनांना (डोळ्यांना?) आधार! बाकी MOODI चा काळ म्हणजे IIT तली बहार..मुलांच्या मनातले मोर थुई-थुई नाचून तृप्त होतात...बाकी सगळा दुष्काळ!
वीर रस...एखाद्या मुलाचा वाढदिवस असेल की बाकीच्या मुलांचे मन वीर रसाने ओपप्रोत भरून जाते...लाथा, बुक्क्या, टपल्या इत्यादींचा प्रयोग मनसोक्त केला जातो.
करुण रसाचा आविष्कार तर इथे सारखाच होत असतो...प्रत्येक मास्तर दर आठवड्याला surprize test घेत रहातो न प्रत्येक टेस्टगणिक विद्यार्थ्याच्या मनातील आशेचा एकेक किरण भोपळ्याआडून वाकुल्या दाखवतो...त्या भोपळ्याकडे पाहाणार्या मुलाचा चेहरा कारुण्याने भरलेला असतो...
अद्भूत...काही काही शिक्षकांच्या लेक्चरमधले एक वाक्य जरी समजले तरी जीवनात काहीतरी अद्भुतरम्य घडले असे वाटते. शिवाय आपण पेपरमध्ये लावलेले दिवे अगदीच टाकाऊ नाहीत ( थोड़े मार्कस पाडण्यास उपयोगी आहेत) हे जेव्हा दिसते तेव्हा प्रचंड आश्चर्य वाटते...तसेच मेसचे जेवण किंवा त्यातला एखादा पदार्थ जरी आवडला तरी फार अद्भुत घडल्याचा फील येतो..
हास्य...हास्याचा इथे तुटवडाच...पण तरी Friends, rom-com सारख्या गोष्टी प्रत्येकाला "हसायला मदत" करतात...
भयानक...साप दिसणे, बिबट्या दिसणे, आपल्या खोलीतल्या पलंगावर माकड बसलेले असणे अशा घटना वारंवार भयानक रसाची अनुभूती घडवतात...शिवाय SFML, Graph Theory, Linear Optimization वगरे सारखे विषय (किमान माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या) लोकांच्या मनाला हादरे देण्याचे काम करत असतात ते वेगळेच..
बीभत्स रस...theoretic विषयांमधल्या
α, β, γ
आदि ग्रीक अक्षरांनी भरलेल्या expressions काही लोकांना भेदी वाटल्या तरी माझ्या मनात बीभत्स रस निर्माण करतात,
अतिशय त्याज्ज्य, तुच्छ अशा वाटतात मला त्या...सांगत असतात काहीतरी फालतूच, पण दिसायला किती वाईट असतात...
रौद्र रस...guides ह्या रसाचा घडोघडी साक्षात्कार करून देतात। कारणे अनेक: मुलांनी अनेक दिवस तोंड ना दाखवणे, अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स न येणे, काम न करणे (हे काही वेळी खरे असते न काही वेळी उगाचच असते)...शिवाय उगाच रौद्र रूप धारण करण्यात काही guides चा हातखंडा असतो...लेक्चरमध्ये मुलांनी उशिरा येणे, गप्पा मारणे, झोपणे, अभ्यास न करणे इत्यादी पारंपारिक कारणेसुद्धा रौद्र रसाचे दर्शन घडवून देण्यात महत्त्वाचा role निभावतात. विद्यार्थ्यांनाही ह्या रसाचा वापर करता येतो बरे का...TA ने किंवा प्रोफेसराने पाव मार्कसुद्धा कमी दिला की अचानक रुद्रावतार धारण करून काही मुले त्यांच्यावर चाल करून जातात....शांत...ह्या रसाचा अनुभव घ्यायचा असेल तर H-1 ला जावे... Ph.D. सुरू झाल्याला अनेक वर्षे (७-९) लोटलेले पण ते संपण्याची वाट पहाण्याच्या पलिकडे पोचलेले हे IIT तले महर्षी...राग, लोभ, मत्सर सर्व प्रकारच्या (मानवी) भावनांना आवर घालण्याची सिद्धी त्यांना प्राप्त झालेली असते. अर्थात त्यांच्या guides चा ह्यात फार मोठा वाटा असतो. ह्यांच्या चेहर्यावर शांत भाव कायमचेच वास्तव्य करून असतात...
म्हणजे IIT च्या जीवनावर आधारित शृंगार, हास्यासारखे जीवन रसपूर्ण करणारे रस सोडले तर इतर रसांवर एखादे नृत्य सादर करणे शक्य आहे तर!