Showing posts with label fun. Show all posts
Showing posts with label fun. Show all posts

Monday, June 10, 2013

लहानग्यांच्या गंमती-जंमती

  ऑफिसमध्ये कलीग्स नेहमी आपापल्या मुलांच्या मज सांगत असतात. श्रेयाला बागेत घेऊन जाते तेव्हासुद्धा बिल्डींगमधल्या मुलांशी गप्पा मारायला मिळतात. त्यामुळे छोट्या छोट्या मुलांच्या अनेक गंमती-जंमती ऐकायला आणि पाहायला मिळतात.त्यातले थोडेसे अनुभव तुमच्यासोबत शेअर करते.
   एकदा  मी आणि श्रेया बागेत बसलेले असताना अक्षता नावाची एक तीन-चार वर्षाची मुलगी माझ्याशी गप्पा मारायला लागली. इतक्यात अभिजीत ऑफिसहून परत आला. माझ्याजवळ येऊन काहीतरी बोलू लागला. तोच अक्षता म्हणाली, "हे कोण आहेत?" मी म्हणाले, "हे श्रेयाचे बाबा आहेत." मी असे म्हणाल्याबरोबर अक्षता तिथून पळून गेली. दुसऱ्या दिवशी दिसली तेव्हा मी तिला आदल्या दिवशी पळून जाण्याचे कारण विचारले. मला म्हणाली, "मला हे बाबा लोक आवडत नाहीत." मी म्हणाले, "तुला कोणाचेच  बाबा आवडत नाहीत का?" तर म्हणाली, "मला फक्त माझेच बाबा आवडतात, बाकी कोणाचेच नाहीत."  आता बाबा आवडण्याची ते शक्तिमान आहेत, किंवा माझ्याशी खूप खेळतात, किंवा छान गोष्टी सांगतात वगैरे कारणे ऐकली आहेत. पण अक्षताचे कारण फार वेगळे होते. ती म्हणाली, "हे बाबा लोक चेहरा स्वच्छ ठेवत नाहीत. माझेच बाबा फक्त ऑफिसमधून आल्या आल्या चेहरा स्वच्छ धूतात म्हणून मला आवडतात!" 
   एकदा मी श्रेयाला बाबागाडीत बसवून फिरवत होते. दोन-तीन मुले सायकलवर फेऱ्या मारत होती. अधून मधून श्रेयाला हाका मारत होती, आमच्याशी शर्यत लावत होती. काही वेळाने ती पिझाच्या दुकानाचा खेळ खेळू लागली. त्यांचे खोटे खोटे पिझाचे दुकान, कोणीतरी ऑर्डर देत होते, कोणी घेत होते, कोणी पिझा तयार करत होते, कोणी डिलिवरी करत होते. सहज काहीतरी बोलायचे म्हणून मी त्यांना म्हणाले, "श्रेयाला पिझा देणार का?" तर एक मुलगा म्हणाला, "आम्ही काही खरा खरा पिझा नाही बनवू शकत. श्रेयाला पिझा द्यायचा असेल तर तुम्हाला शेजारी डॉमिनोजला ऑर्डर द्यायला लागेल. " 'एवढे कसे कळत नाही ह्यांना?' अशाप्रकारचे भाव चेहऱ्यावर आणत पोरे आपल्या खेळत परत मग्न झाली.
   सारंगी नावाची एक तीन-चार मुलगी एक दिवस माझ्याशी खूपच गप्पा मारायला लागली. त्याही इंग्लिशमधून…"माझा भाऊ! सारखी आईची बोलणी खातो. मुद्दाम करतो असे नाही. पण त्याला रिस्पॉssन्सिबिलिटी  कळत नाही. त्याला त्याची रिस्पॉssन्सिबिलिटी कळली तर किती बरे होईल. मी कालच त्याला म्हणत होते की रिस्पॉssन्सिबिलिटीने वाग." घरी कोणीतरी भावाला बहुतेक रागावले असेल. त्यातला रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द तिला आवडला असेल. आवाजात गंभीरता आणत, टिपिकल साऊथ इंडिअन पद्धतीने हेल काढत सारंगी कितीतरी वेळ रिस्पॉssन्सिबिलिटी, रिस्पॉssन्सिबिलिटी हा शब्द वापरत माझ्यासोबत बडबड करत बसली होती. आता एवढ्याशा चिमुरडीला रिस्पॉन्सिबिलिटी ती काय कळणार?
   माझ्या ऑफिसमधल्या एका कलीगच्या, म्हणजे अमरिंदरच्या मुलाचे नाव आहे आरुष! आरुषच्या घरी जेवण तयार करायला रोज कूक येत असे. आपले आई-बाबा कूकला रोज काय तयार करायचे ते सांगतात हे तो नेहमी पाहत असे. एक दिवस अमरिंदर आरुषला घेऊन मित्राकडे जेवायला गेला होता. अमरिंदरचा मित्र स्वयंपाकघरात काहीतरी पदार्थ तयार करत होता. त्याला कूक समजून आरुष त्याला म्हणाला "काका, आज जरा पाव-भाजी बनवा."
   रोज श्रेयाला घेऊन जाते तेव्हा, कलीग्सच्या बोलण्यातून रोजच असे मजेदार अनुभव येत असतात. त्यातले निवडक तुम्हाला सांगितले. प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीतील मुले कशी स्मार्ट ह्याबद्दल बोलत असते. आता आपल्या पुढच्या पिढीबद्दल हे म्हणायचे आपले दिवस आलेत असे दिसतेय.

 

Monday, March 26, 2012

अ वॉक टू रिमेंबर

    शनिवारचा दिवस होता. आदल्या दिवशी झोपायला उशीर झाला होता. घडाळ्यात सातचा अलार्म लावला होता. सात वाजले, घड्याळ आरवले, आळस देत देत आम्ही उठलो.  "ए वॉकला जाऊया?", मी अभिजीतला विचारले. आश्चर्यकारकरित्या तोही लगेच "हो" म्हणाला. १५-२० मिनिटात आवरून घराबाहेर पडलो. लेकला जायचे म्हणले तर बर्यापैकी उशीर झालेला होता. मागच्याच गल्लीतून निघून गोल चक्कर मारून येता येता  भाजी घेऊन येऊ असे ठरले.
   सूर्य केव्हाच उठून तयार होऊन बसला होता. त्यामुळे रस्त्यावरून चालणे काही विशेष रिफ्रेशिंग वाटणार नव्हते. पण आळसात सकाळ घालवण्यापेक्षा नावाला का होई ना जरा फिरून आलेले बरे म्हणून निघालो  होतो एवढेच! चालता चालता घराजवळच्या एका बेकरीजवळ पोचलो. सहज बेकरीच्या टेबलाखाली नजर गेली तर तिथे एक मांजरीचे पिल्लू बसलेले दिसले. बेकरीच्या पायरीजवळच बसलेले एक कुत्रे ह्या पिल्लाकडे रोखून पाहत होते. पिल्लू कुत्रे अंगावर आलेच तर कुठे पळायचे ह्याचा कानोसा घेत होते. पावले आपोआप बेकरीकडे वळली. आम्ही बेकरीशी जाऊन आधी कुत्र्याला पळवले. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी तोंडाने च-च आवाज काढत पिल्लाला हाक मारायला सुरवात केली. अपेक्षेप्रमाणे पिल्लाने माझ्यापासून 'सुरक्षित अंतर ठेवण्याचे' धोरण अवलंबले. दुसरे एखादे मांजर असते तर मीही ते लांब पळतेय म्हणाल्यावर नाद सोडून दिला असता. पण हे पिल्लू फार गोड होते आणि दुसरे  म्हणजे मी बेकरीसमोर उभी होते त्यामुळे बिस्किटाची लाच दाखवून पिल्लाला जवळ यायला लावायचा प्रयत्न करून बघायला काही हरकत नव्हती. शक्यतो दुकानदार मांजरांना थारा देत नाहीत. त्यांच्या दुकानात मांजरांशी खेळलेलेही त्यांना आवडत नाही. पण ते पिल्लू बहुदा त्या बेकरीवाल्याने पाळलेले असावे. मी पिल्लाला हाक मारल्याबद्दल बेकरीवाल्याने कोणतीही नापसंती दर्शवली नाही. मी बेकरीतून रुपयाचे बिस्कीट घेतले आणि पिल्लापुढे धरून त्याला परत हाक मारली.
    जुन्या मुवीमध्ये मुलीला पाहायला लोक आलेले असताना ती जशी घाबरत, लाजत पुढे यायची तसे ते पिल्लू "जाऊ की नको, जाऊ की नको" असा विचार करत दबकत दबकत पुढे येऊ लागले. पण पहिल्याच दमात माझ्या एकदम जवळ यायची तर हिम्मत त्याच्यात नव्हती. मग मी बिस्किटाचा छोटा तुकडा पायरीवर ठेवला. बिस्किटाचा खमंग वास आल्यावर मात्र त्याच्याने रहावले नाही आणि ते पुढे येऊन बिस्कीट खाऊ लागले. त्याला बरीच भूक लागल्याचे दिसत होते. दुष्काळातून आलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याची जी तऱ्हा होईल तसे ते भराभरा बिस्कीट खाऊ लागले. तुकडा संपत आला की तोंडात बिस्कीट असतानाच ते "अजून बिस्कीट दे" असे म्हणत आवाज काढत होते. अर्धे बिस्कीट संपवल्यावर मात्र ते जरा शांत झाले. मग पुढला तुकडा त्याने शांतपणे खाल्ला. त्याच्या पुढचा तुकडा मी हातात धरल्यावर तो तोंडात घेण्याऐवजी जेव्हा ते पंजाने त्याच्याशी खेळू लागले तेव्हा मात्र त्याची भूक भागल्याची मला खात्री झाली.
   लहान मुलांना आवडतीचा खाऊ दिला की कशी ती सगळी भीती सोडून, नवखेपणा विसरून ती जवळ येतात तसेच ह्या पिल्लाचे झाले. ते एकदम ओळखीच्या माणसासारखे अभिजीतच्या मांडीवर जाऊन बसले आणि  तिथून माझ्याकडे पाहू लागले. दोन मिनिटे माझे निरीक्षण केल्यावर "आपल्याला खाऊ घालणारी ही नक्की कोण आहे?" असा प्रश्न त्याला बहुतेक पडला. ते माझ्या तोंडाकडे पाहून प्रश्नार्थक स्वरात ओरडू लागले. मी "काय..काय?" असे विचारल्यावर अभिजीतच्या मांडीवरून उतरून माझ्याजवळ आले. माझ्याशी दोन मिनिटे  खेळले, परत अभिजीतकडे गेले. "ही अचानक आलेली माणसे नक्की कोण आहेत? ती कुठून आली आहेत? आता आपण ह्यांच्यासोबत काय करणे अपेक्षित आहे?" असे प्रश्न त्याला बहुदा पडलेले असावेत. ५-१० मिनिटे अशीच इकडून तिकडे करण्यात गेली. मध्येच ते मगाचचे कुत्रे परत आले. तेव्हा हे पिल्लू आमच्या दोघांच्या मधोमध अगदी विश्वासाने बसले. थोडा वेळ वाट पाहून कुत्र्यालाही कंटाळा आला, ते परत निघून गेले. पिल्लू परत खेळायला लागले. पिल्लाचा खाणे-ओरडणे-खेळणे इत्यादी कार्यक्रम पूर्ण झाला. आम्हालाही घरी लवकर जायचे असल्याने आम्ही निघायचे ठरवले. पिल्लू मागे येऊ लागले पण दुकानाच्या शेवटच्या पायरीवरून मात्र ते आपल्या मालकाकडे परत गेले.
    मला मांजरे फार आवडतात.  पण आमच्या बिल्डींगवर "Pets Strongly Discouraged" अशी पाटी लावलेली आहे. भाड्याने राहत असल्याने उगाच कोणाच्या भानगडीत पडायला नको म्हणून आम्हीही ह्या डिस्करेजमेंटला विरोध करायला जात नाही. त्यामुळे मांजर पाळणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे "तू दर शनिवारी इथेच बसत जा. आम्ही तुला बिस्कीट द्यायला आणि तुझ्याशी खेळायला दर शनिवारी इकडे येत जाऊ", असे डील त्याच्याशी करून आम्ही त्याला बाय केले.
   पाऊण बिस्किटातच पिल्लाचे पोट भरल्याने उरलेला पाव तुकडा अजून माझ्या हातातच होता. वाटेत एखादे कुत्रे दिसले तर त्याला घालू असे आम्ही ठरवले. एके ठिकाणी एकदम तीन कुत्री दिसली. त्यांच्यापैकी एकाला हा तुकडा दिला तर एवढ्याश्या तुकड्यासाठी त्यांच्यात भांडाभांडी होईल आणि ज्यांना तुकडा नाही मिळाला त्यांचा हिरमोड होईल असा विचार करून आम्ही बिस्कीट न देता पुढे गेलो. पुढच्याच चौकात गेल्याच शनिवारी दिसलेले एक काळ्या रंगाचे ढोले, बुटके कुत्रे दिसले. मागच्या शनिवारी त्याला हक मारून जवळ बोलावल्यावर ते फार आशेने माझ्याकडे आले होते, शेपटी हलवत हलवत! पण माझ्याकडे त्याला द्यायला काहीच नव्हते. दोन मिनिटे वाट पाहून ते निराशेने निघून गेले होते. आज त्याला बोलावल्यावर ते अजूनच उत्साहात संपूर्ण अंग हालवत हालवत माझ्याजवळ आले. मी पटकन हातातला तुकडा त्याला दिला. ते इतके उत्साहात होते की तो तुकडा चावायच्या नादात जमिनीवर पडला. ते वास घेत घेत जमिनीवरचा तुकडा शोधायला लागले. आपण फार काळ इथे उभे राहिलो तर हे "अजून खाऊ दे" म्हणून नक्की आपल्या मागे लागेल असा विचार डोक्यात क्लिक झाल्यावर मी क्षणाचाही वेळ न दवडता तिकडून कल्टी मारली. कुत्रेही आधी तुकडा शोधण्यात आणि  मग तो खाण्यात बिझी झाल्याने, मी निघाले आहे ह्याकडे त्याचे लक्ष गेले नाही.एका मिनिटात आटोपलेल्या ह्या प्रोग्राममध्ये इतकी मजा आली की काही विचारू नका.
   आम्ही घराकडे परत निघालो. भाजी घेतली. जाताना बेकरी परत लागली. साहजिकच नजर माऊला परत शोधू लागली. माऊ तिकडे दिसत नव्हते. मनातल्या मनात "पुढच्या शनिवारी माऊची भेट नक्की होऊ देत" अशी इच्छा व्यक्त करत, माऊसोबत घालवलेल्या १५-२० मिनिटातल्या आठवणींना मनात साठवत आम्ही घरी गेलो.

Monday, August 16, 2010

रविवारची कहाणी

गेला रविवार एकदम मस्त गेला होता न त्याबद्दल मला लिहायचेसुद्धा होते पण "ब्रेक के बाद" असे म्हणून जे गेले ते परत ब्लॉगकडे वळायला एक आठवडा गेला न मला जे लिहायचे होते तेच मी विसरून गेले...असो...आजचा दिवस म्हणजे रविवार ही काही कमी happening नव्हता....म्हणले गेल्या रविवारची नाही तर आल्या रविवारची कहाणी तरी लोकांना सांगावीच! (टिप: मी एक सामान्य मुलगी असल्याने माझ्या जीवनात अमिताभच्या शोले, बागबान, सरकार, अजूबा आदी पिक्चरसारखे अद्भुत-रम्य असे काही घडत नाही...अमोल पालेकरच्या चितचोर, हम दोनों, बातों बातों में ह्या पिक्चर्ससारखे माझे आयुष्यही हलके-फुलकेच...नवीन सांगण्यासारखे त्यात काही नाही...तरी देवाने फुकटात काहीतरी खरडायची न लोकांपर्यंत पोहोचवायची सोय केल्याने मी लिहिते...तेव्हा तुम्हाला वैताग आल्यास क्षमस्व...)...असो...गाड़ी रुळावर आणली नाही तर पोस्ट रविवारची न संगता भलतीच कहाणी सांगेल...जाते थे जापान पोहोंच गए चीन समझ गए ना अशी गत होईल...तर सकाळी उठले न एकदम क्लिक झाले की आज स्वातंत्र्य दिवस! शाळेतले दिवस आठवले...सकाळी लवकर उठून आवरून शाळेत जायचो...झेंडावंदन करायचो...त्यावेळी सगळ्यांनी मिळून एका आवाजात, एका सुरात म्हणलेली प्रतिद्न्या, राष्ट्रगीत, देशाभाक्तिपर गीते आजही माझ्या कानांत घुमतात...माग काही कार्यक्रम व्हायचे (जे मला आवडायचे नाहीत त्यामुळे ग्राउंडवरच्या धुळीशी, मैत्रिणीच्या वेणीशी, स्वेटरच्या फुलांशी करत बसलेले खेळ अजूनही आठवतात...)कार्यक्रम संपले की एकदम पळत सुटायचो...अंगात एक चैतन्य संचारलेले असायचे...सोसायटीतले झेंडावंदन असायचेच...पार्ले-जीचा पुडा मिळायचा ते झाले की...ण माग खेळाच्या स्पर्धा...घरी आल्यावर टीवीवर लागलेले कार्यक्रम...miss those days! आज ह्यातले काहीच नव्हते...in fact ह्यातले काहीच नसण्याची सवय झालीये...उठले टीवी लावला...कर्मा लागला होता...
हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए |
दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए ||
"ओळी ऐकण्यापुरत्याच राहिल्या आहेत नाही आपल्यासाठी!", मनात विचार आला...अजून थोडा विचार केला...आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांना मदत करून, अन्धश्रद्धांचा त्याग करून, लाच न देऊन, वाहतुकीचे नियम पाळून , कर भरून आपण खारीचा काही होईना वाटा उचलत आलोय आणि उचलत राहू असे डोक्यात येऊन मनाला थोडेतरी बरे वाटले...इतक्यात खालून ढोलाचा आवाज आला...पळत पळत passage मध्ये गेले...जवळच्या शाळेतल्या मुलांची परेड चालली होती...आवाज ऐकून अभिजीतही आला...५ मिनिटे थाम्बून परेड पाहिली...न दिवसाला सुरवात केली...
रविवारची सकाळ...नाश्ता काय करावा? पुदिन्याची चटणी केली...चटणी सॅंडविच खाल्ली, ब्रेडला तोप लावून त्यावर साखर पेरून खाल्ली आणि गोडमिट्ट कॉफीत ब्रेड बुडवून खाल्ला...मजा आली!
आवरून सुरभीकडे गेलो...गेल्याच आठवड्यात तिची आई आलेली...त्यांच्या हातचा दाण्याचा लाडू खायला मिळाला...आईचे घर सोडले की ह्या गोष्टींची किम्मत काय ते कळते! खूप छान वाटले...मग गेलो केतकीकडे...मी, केतकी, तानपुरा न तबला मशीन, सोबतीला यमन...वाह...एक तास कसा गेला कळलेच नाही....मग केतकी आम्हाला "स्मोकिंग चूल्हा" मध्ये जेवायला घेऊन गेली...नावावर जाओ नका...अतिशय साढ़े, घरगुती न रुचकर असे जेवण होते...पुलाव, दाल, फुलके, बटाट्याची भाजी...सोबतीला मसाला ताक...वाह...इतक्यांदा "वाह वाह" करायला ही काही "ताजमहल चाय"ची जाहिरात नाही न मला भेटायला झाकिर हुसेन येणार नाहिये हे माहिती आहे मला...पण tasty खायला मिळाले की तोंडातून अशी दाद येणारच! असो...
पुढचा कार्यक्रम होता "पीपली लाइव्ह" पाहायचा...शो ३ चा होता...आत्ताशी १ वाजला होता...घरी जाऊ, मशीन ठेऊ न पुढे जाऊ असे ठरवले होते त्याप्रमाणे निघालो...management च्या planning and execution चे धड़े पावासानेही घेतलेत की काय कोण जाणे...आम्ही रस्त्यावर पाऊल टाकले न पावसाने पडायला सुरवात केली...पाऊस जोरात नव्हता तेव्हा पुढे टाकलेले पाऊल तसेच आणखी पुढे रेटले...आम्ही जसजसे पुढे जाओ लागलो तसतसे पावसाला अजूनच चेव चढू लागला....थांबणे भाग होते...जिथे थांबलो तिथेच समोर जूसचे दुकान होते...लगेच "chance pe dance" करावा तसे आम्ही दुकानात शिरलो...मेनू कार्ड उघडले..."1 pomegranate juice" ऑर्डर दिली...टीवी चालू होता..."तारे जमीं पर" लागला होता...बाहेर पाऊस, हातात डाळीम्बाचे जूस, टीवी वर "तारे जमीं पर"....मैफिल चांगलीच रंगली...अधून मधून बाहेर लक्ष जात होते..."आपल्याला भाव देत नाही म्हणजे काय!" असा विचार करूनच की काय पाऊस वाढतच चालला होता...पण मैफिल सोडायला मन तयार नव्हते...दुर्लक्षच झाले...तेवढ्यात डिश टीवी चा सिग्नल गेला...आता मात्र पावासाकडे डोळे लागले (तो येण्यासाठी नव्हे तर थांबण्यासाठी...) पण आधी न दिलेल्या भावाचा बदला घ्यायचा म्हणून तोही वाढतच चालला होता...असे करत करत २ वाजले...आता मात्र निघायलाच हवे होते...अभिजीतला म्हणले "चाल जाउया तसेच! पावसात भिजायला मजा येईल..." आम्ही निघालो...पावसाला ठेंगा दाखवून आम्ही तसेच निघालो...केवढी थंडी वाजत होती...तिला ignore करण्यासाठी तोंडातून वेगवेगळे आवाज काढत निघालो...आम्ही पुढे गेल्यावर लक्षात आले की पुढच्या area त विशेष पाऊस पडलेला नव्हता न आत्ताही अतिशय थोडा पडत होता...चला सुटलो असे म्हणून गाडी हाणली न घरी पोचलो (पण आम्हाला काय माहीत रुसलेला पाऊस आमचा पाठलाग करत आमच्या मागेच येत होता...)...२.१५ ला घरी पोचलो...कपडे बदलले ...२.३५ ला बाहेर पडलो...पाहतो तर काय परत पाऊस! पण आता आमच्याकडे रेनकोट होते...परत निघालो थेटरच्या दिशेने...जवळ जवळ १० मिनिटांचा रस्ता पटापट कापला...साधारण १ की.मी. च अंतर उरले होते..."आपण वेळेत पोचणार" असे म्हणेस्तोवर समोर ट्राफिक दिसले...बेंगलोरचे ट्राफिक म्हणजे काट असते ते इथे ययूनाच अनुभवावे...२.४५ वाजले होते...आता अर्धा तासाच्या आत काही आम्ही थेटरला पोचत नाही अशी चिन्हे दिसू लागली...आधीच तो "पीपली लाइव्ह" १.३० तासांचा त्यात आपण १५ मिनिटे उशिरा गेलो तर "अब बचा क्या?" अशी म्हणायची वेळ येणार हे स्पष्ट दिसू लागले...ह्याच चिंतनात १० मिनिटे गेली...इतक्यात ट्राफिक अचानक
क्लिअर झाले...श्रीकृष्णास वासुदेव नदीपार नेत असताना पुराचे पाणी अचानक बाजुला गेले होते तसाच दैवी चमत्कार होउन समोरचे ट्राफिक अचानक क्लेअर झाले...आता आम्हाला काही रस्त्यातून पुढे जाऊन कन्सवधासारखे महत्त्वाचे काम करायचे नव्हते...पण फ़क्त कल्याणकारी कामांच्या वेळीच घडवून आणण्यासाठी जर देवाने चमत्कार राखून ठेवले तर आजच्या जगात तोच बिचारा frustrate होईल...थोडक्यात काय तर चमत्कार व्हावा तसे ट्राफिक क्लेअर झाले...बरोब्बर ३ च्या ठोक्याला आम्ही थेटरात पाऊल टाकले...पुढचा १.३० तास डोळ्यापुढे जे काही घडले ते कमाल होते...."पीपली लाइव्ह" हा एक सुंदर पिक्चर आहे...रिपोर्टर्सची थट्टा अनेक पिक्चर्समधून उडवली जाते...राजकारण्यान्चा नालायकपणा अनेक पिक्चर्स दाखवतात...पण ह्या दोन्हींचा एकत्रित परिणाम किती अनापेक्षित होऊ शकतो त्याचा ह्या पिक्चरने दिलेला पञ्च हृदयावर घाव सोडून जातो...
पीपली लाइव्ह संपून निघालो...भूक लागली होती...मोकामध्ये "chocolate fondue" नामक प्रकार खाल्ला (ठीक ठाकच होता...) क्रीम, चोकोलेटचा (कधी नाव्हे तो) overdose झाला...ह्यावर उतारा काय? पाणीपुरी! वाटेत पाणीपुरी खाल्ली..सोबत मसाला पुरी मिळाली...जीभ धन्य झाली...घरी आलो...शांत बसलो..."आपले उद्या joining आहे!" मन म्हणाले..."अरे देवा! सगळ्या documents जागेवर आहेत का..." काय काय न्यायचेय ते पाहण्यासाठी offer letter उघडले...अनेक कागदांच्या zerox हव्या आहेत असे दिसले...परत घराबाहेर पडलो न घेऊन आलो...तेवढ्यात येता येता मराठी गाण्यांचा विषय निघाला...घरी आल्या आल्या laptop चालू केला गेला...ती गेली तेव्हा रिमझिम, तू तेव्हा तशी, सुरमई श्याम, जिवलगा, श्याम सुंदर राजसा, नाविका रे, पाखरा जा दूर देशी, माझे रानी माझे मोगा, गोमू संगतीन एकातून एक अनेक गाणी आठवत गेली तशी ऐकत गेलो...दिवसाचा शेवट सुरेख झाला...
ह्या दिवसाची आठवन म्हणून पोस्ट लिहायला घेतली अणि अशा प्रकारे रविवारचा दिवस सुखात गेला...जसा पाऊस आमच्यावर कोपला तसा तुमच्यावर न कोपो. तरी जसा आमचा हा रविवार मस्त गेला तसा तुमचा पुढचा प्रत्येक रविवार जाओ. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफल सम्पूर्ण! (मला ह्या वाक्याचा नीट अर्थ माहीत नाही तरी जुन्या काहण्यान्च्या style ची ही केलेली नक्कल...तेव्हा काही चूक झालेली असल्यास क्षमा असावी.)