Showing posts with label IIT. Show all posts
Showing posts with label IIT. Show all posts

Friday, March 12, 2010

आनंदोत्सव!

सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण IIT तल्या लोकांसाठी सर्वांत आनंदाचा काल म्हणजे लाईट गेलेले असतात तेव्हाचा काळ! "हा काय प्रकार आहे! ", असे वाटले असेल न एकदम!
IIT त सण वगरे साजरे होत नसतात. मेस वाल्यांनाच दया आली तर ते गोडाधोडाचे करतील तेवढाच काय तो बदल. बाकी सुट्टीचा पूर्ण "आनंद " घेता यावा यासाठी प्रत्येक प्रोफेसर असाइनमेंट देतो. फराळासारखे प्रोब्लेम्स असतात सोडवायला. दिवाळीत एखादी पणती मिणमिणताना दिसते. ती इतकी बिचारी असते कि कधी जीव सोडेल ते सांगता येत नाही. आकाशकंदील नामक प्रकार कॅम्पसच्या बाहेर पडल्याखेरीज दिसत नाही. असो! तर मुद्दा हा कि "सण = आनंद" ह्याची truth value शून्य आहे. बाकी कोणत्याही गोष्टीतून आनंद मिळत असेल तरी अर्ध्या तासापलीकडे (फारतर एक तास...interesting movie असेल तर १.३० तास!) लोक तिच्यात मन लावत नाहीत. IIT चे विद्यार्थी you know!
तर मग लाईट जायचा न आनंद व्हायचा काय संबंध? तर संबंध असा, की आम्ही IIT त यायच्या आधी इकडे लाईट फारसे जात नसत. साहजिकच generators इथे अजिबात आढळत नाहीत. एवढेच काय इथल्या अनेक servers नादेखील backup नसतो. लोकांच्या खोल्यांमध्ये मेणबत्त्या नसतात. त्यामुळे लाईट गेले की कोणालाच काहीच काम करता येत नाही. फार तर ज्यांच्याकडे laptops आहेत ते लोक काही काळ काम करायचा प्रयत्न करून पाहतात! बर मग? ह्यात तर सगळे आहे. IIT तले लोक एकमेकांवर फार लक्ष ठेउन असतात. लोक अभ्यास करत नाहीयेत म्हणाल्यावर कमालीचा आनंद होतो त्यांना (ह्याला अपवाद असतात, न अशा लोकांची सादर माफी मागत आहे). तेव्हा लाईट गेलेत म्हणजे कोणीच काम करू शकत नाहीये, तेव्हा आपण पण टाईमपास करायला मोकळे ह्या कल्पनेने सगळ्यांना एकदम उत्साह येतो. खोलीत अंधार असतो न शिवाय मुंबईची हवा, प्रचंड उकडत असते. धक्का लावल्यावर पोळ्यातून मधमाश्या जश्या भराभर बाहेर पडायला लागतात तशी IIT तली मुले (न मुलीही) रस्त्यावर येतात. लेकसाईडला एकदम COEP च्या बोटक्लबचे रूप प्राप्त होते. फुटपाथ हे चालण्याखेरीज फतकल मारून बसायलाही वापरले जाऊ शकतात ह्याची प्रचीती येते. काही जण घोळक्याने laptop वर सामुदायिक चित्रपट-दर्शनाचा कार्यक्रम सुरु करतात. समस्त महिलावर्ग H11 मधून बाहेर एकदम पडल्याने काही लोकांना तर फारच जास्त आनंद होतो. एकावेळी इतक्या मुली IIT मध्ये! भारीच!! H11 समोर गर्दी जमू लागते. (सर्व मुलींची ह्या वाक्याबद्दल माफी. ही fact आहे. )
काही लोक IIT च्या बाहेर पडतात, हॉटेल्सची चंगळ होते. काही लोक जमून डंब-सी, अंताक्षरी सारखे खेळ खेळायला लागतात. काही लोक गझला गावून मनात साचलेल्या भावनांना वाट करून देतात. तर काही लोक गिटारवर गाणी म्हणतात.
काही लोकांना अचानक व्यायामाची महती आठवते न चक्क track pant n sport shoes अशा कडक तयारीत बाहेर पडून मैदानावर पळायला जातात.
तर असा हा आनंदोत्सव पाहून IIT लाही आपल्यामध्ये माणसेच राहतात ह्याची खात्री पटत असेल. लाईट परत कधी येऊच नयेत असे तिलाही वाटत नसेल तरच नवल!
काही लोकांची मात्र भयंकर पंचाईत होते. paper submission, presentations च्या deadlines असतील तर एकेक क्षण एकेका तासासारखा वाटतो. माझ्यावर अशी वेळ फारशी आलेलीच नाही. उलट एकदा माझी परीक्षा होती न लाईट गेले. खूप वेळ वाट पाहूनही आलेच नाहीत. म्हणून मग शेवटी सरांनी सोडून दिले. मग आम्ही खूप मज्जा केली. शेवटी ती परीक्षा रात्री ९-१२ ठेवण्यात आली. फारच मजेदार experience होता तो. दिवस इतका छान गेला होता की परीक्षा कशी झाली ह्याचा डोक्याला विचार न करू देताच सगळ्यांनी आपापले पाय कॅन्टीनकडे वळवले. गरमागरम कॉफी न शांत झोप!
IIT बद्दल मी उपरोधक काहीतरी लिहित असले तरी असे छान छान अनुभव फक्त IIT च देऊ शकते. technology साठी नाही तरी त्यांसाठी तरी प्रत्येकाने एकदा तरी IIT तल्या life चा अनुभव घ्यावाच!
आजच मजा झाली. lab मधून निघाले न वाटेत असताना अचानक लाईट गेले.बाप रे! सगळीकडे अंधार...रस्त्याला आत्ताच पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावल्या आहेत त्या तेवढ्या चमकत होत्या. काहीही दिसत नव्हते. अशा वेळी बिबट्या-साप यांसारख्या कॅम्पसमध्ये राहणाऱ्या प्राण्यांची विशेष आठवण येते..काही अंतर चालल्यावर गाड्यांचा प्रकाश दिसू लागल्यावर कुठे जीवात जीव आला. पटकन होस्टेलवर आले. पण रूमवर जायची सोय कुठे होती! माझा फोन फारच अत्याधुनिक :D असल्याने फारच प्रकाश देतो. त्यामुळे जिना तर अगदीच clear दिसतो. त्यात खोलीत मेणबत्ती नसतेच. passeges भूतबंगल्याची आठवण करून देतील असे न लोक आपापल्या labs मध्ये! बर काही काळ खाली बसावे म्हणाले तर आमच्याइथले डास साधे-सुधे चावत नाहीत तर आपल्याला अजून काही काळ बसले तर त्यांनी रक्त शोषल्याने आपल्याला anemia होईल की काय अशी माणसाला भीती वाटू शकण्यापर्यंत मजल गाठतात. IIT च्या BTECHs न जशी स्पेशल माजुर्डेपणा दिलेला असतो तसे इथल्या दासांनाही परमेश्वराने स्पेशल लांबीची सोंड दिली आहे की काय असा प्रश्न पडतो! jeans मधूनसुद्धा माणसाच्या पायापर्यंत पोचण्याची ability ह्या सोंडान्मध्ये असते. असो! किशोर कुमारच्या "जाते थे जपान पोहोंच गये चीन समझ गये ना" ह्या गाण्यासारखी माझी गाडी "IIT तल्या आनंदोत्सवाकडून" डासबोधाकडे पोहोचण्याआधीच थांबवावी हे बरे!

Friday, February 26, 2010

नवरस (IIT तले)!

श्रृङ्गारवीरकरुणाद्भुतहास्यभयानका:|
बीभत्सरौद्रौ शान्तश्र्च काव्ये नवरसा: मता:||
घाबरू नका! मी संस्कृत, सुभाषिते वगरे यांविषयी मुळीच लिहिणार नाहीये...पोस्ट वाचून मजा नावाची गोष्ट उत्पन्न होणे हाच ह्या पोस्टचा प्रामाणिक हेतू!
तर वर लिहिलेला श्लोक मी सगळ्यात आधी शिकले ते डान्सच्या क्लासला..ह्यात भरतमुनी "शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत" अशा नऊ रसांचा उल्लेख करतात. हा श्लोक अचानक अथावान्याचे कारण की परवा इथे एका कार्यक्रमात "नवरस" नावाचा नृत्यप्रकार सादर केला गेला. त्यात वेगवेगळ्या प्रसंगांची उदाहरणे घेऊन नऊ रसांचा अभिनय केला जातो. (बाप रे! मी डान्सच्या परिक्षेतला पेपर लिहितीये असे वाटत आहे.) त्यावेळी माझ्या डोक्यात कल्पना आली की "ही उदाहरणे सामान्यपणे ऐतिहासिक घटनांमधून घेतलेली असतात. म्हणजे शृंगारासाठी राधा-कृष्ण, रौद्र रसासाठी रावण इत्यादी. जर का लोकांना डान्स आपलासा वाटावा अशी इच्छा असेल तर त्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातले प्रसंग दाखवले तर? हमम...IIT च्या विद्यार्थ्याच्या जीवनावर आधारित नवरस!" मज्जा...
शृंगार....शृंगार रस वगरे सोडा, इथे matching कानाताले, एखादे ब्रेसलेट, छानशी पर्स अशा सौंदर्यात भर घालणार्या (?) वस्तूंचा वापर करण्यावर बंदी आहे. जर का कोणी छान कपडे घातले तर "आज तुझा वाढदिवस आहे का?" असे विचारले जाते.नाही म्हणायला IDC आणि SOM मधल्या आहेत...तोच काय तो IIT च्या मुलांच्या मनांना (डोळ्यांना?) आधार! बाकी MOODI चा काळ म्हणजे IIT तली बहार..मुलांच्या मनातले मोर थुई-थुई नाचून तृप्त होतात...बाकी सगळा दुष्काळ!
वीर रस...एखाद्या मुलाचा वाढदिवस असेल की बाकीच्या मुलांचे मन वीर रसाने ओपप्रोत भरून जाते...लाथा, बुक्क्या, टपल्या इत्यादींचा प्रयोग मनसोक्त केला जातो.
करुण रसाचा आविष्कार तर इथे सारखाच होत असतो...प्रत्येक मास्तर दर आठवड्याला surprize test घेत रहातो न प्रत्येक टेस्टगणिक विद्यार्थ्याच्या मनातील आशेचा एकेक किरण भोपळ्याआडून वाकुल्या दाखवतो...त्या भोपळ्याकडे पाहाणार्या मुलाचा चेहरा कारुण्याने भरलेला असतो...
अद्भूत...काही काही शिक्षकांच्या लेक्चरमधले एक वाक्य जरी समजले तरी जीवनात काहीतरी अद्भुतरम्य घडले असे वाटते. शिवाय आपण पेपरमध्ये लावलेले दिवे अगदीच टाकाऊ नाहीत ( थोड़े मार्कस पाडण्यास उपयोगी आहेत) हे जेव्हा दिसते तेव्हा प्रचंड आश्चर्य वाटते...तसेच मेसचे जेवण किंवा त्यातला एखादा पदार्थ जरी आवडला तरी फार अद्भुत घडल्याचा फील येतो..
हास्य...हास्याचा इथे तुटवडाच...पण तरी Friends, rom-com सारख्या गोष्टी प्रत्येकाला "हसायला मदत" करतात...
भयानक...साप दिसणे, बिबट्या दिसणे, आपल्या खोलीतल्या पलंगावर माकड बसलेले असणे अशा घटना वारंवार भयानक रसाची अनुभूती घडवतात...शिवाय SFML, Graph Theory, Linear Optimization वगरे सारखे विषय (किमान माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या) लोकांच्या मनाला हादरे देण्याचे काम करत असतात ते वेगळेच..
बीभत्स रस...theoretic विषयांमधल्या
α, β, γ

आदि ग्रीक अक्षरांनी भरलेल्या expressions काही लोकांना भेदी वाटल्या तरी माझ्या मनात बीभत्स रस निर्माण करतात,
अतिशय त्याज्ज्य, तुच्छ अशा वाटतात मला त्या...सांगत असतात काहीतरी फालतूच, पण दिसायला किती वाईट असतात...
रौद्र रस...guides ह्या रसाचा घडोघडी साक्षात्कार करून देतात। कारणे अनेक: मुलांनी अनेक दिवस तोंड ना दाखवणे, अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स न येणे, काम न करणे (हे काही वेळी खरे असते न काही वेळी उगाचच असते)...शिवाय उगाच रौद्र रूप धारण करण्यात काही guides चा हातखंडा असतो...लेक्चरमध्ये मुलांनी उशिरा येणे, गप्पा मारणे, झोपणे, अभ्यास न करणे इत्यादी पारंपारिक कारणेसुद्धा रौद्र रसाचे दर्शन घडवून देण्यात महत्त्वाचा role निभावतात. विद्यार्थ्यांनाही ह्या रसाचा वापर करता येतो बरे का...TA ने किंवा प्रोफेसराने पाव मार्कसुद्धा कमी दिला की अचानक रुद्रावतार धारण करून काही मुले त्यांच्यावर चाल करून जातात....
शांत...ह्या रसाचा अनुभव घ्यायचा असेल तर H-1 ला जावे... Ph.D. सुरू झाल्याला अनेक वर्षे (७-९) लोटलेले पण ते संपण्याची वाट पहाण्याच्या पलिकडे पोचलेले हे IIT तले महर्षी...राग, लोभ, मत्सर सर्व प्रकारच्या (मानवी) भावनांना आवर घालण्याची सिद्धी त्यांना प्राप्त झालेली असते. अर्थात त्यांच्या guides चा ह्यात फार मोठा वाटा असतो. ह्यांच्या चेहर्यावर शांत भाव कायमचेच वास्तव्य करून असतात...
म्हणजे IIT च्या जीवनावर आधारित शृंगार, हास्यासारखे जीवन रसपूर्ण करणारे रस सोडले तर इतर रसांवर एखादे नृत्य सादर करणे शक्य आहे तर!