Showing posts with label animals. Show all posts
Showing posts with label animals. Show all posts

Monday, March 26, 2012

अ वॉक टू रिमेंबर

    शनिवारचा दिवस होता. आदल्या दिवशी झोपायला उशीर झाला होता. घडाळ्यात सातचा अलार्म लावला होता. सात वाजले, घड्याळ आरवले, आळस देत देत आम्ही उठलो.  "ए वॉकला जाऊया?", मी अभिजीतला विचारले. आश्चर्यकारकरित्या तोही लगेच "हो" म्हणाला. १५-२० मिनिटात आवरून घराबाहेर पडलो. लेकला जायचे म्हणले तर बर्यापैकी उशीर झालेला होता. मागच्याच गल्लीतून निघून गोल चक्कर मारून येता येता  भाजी घेऊन येऊ असे ठरले.
   सूर्य केव्हाच उठून तयार होऊन बसला होता. त्यामुळे रस्त्यावरून चालणे काही विशेष रिफ्रेशिंग वाटणार नव्हते. पण आळसात सकाळ घालवण्यापेक्षा नावाला का होई ना जरा फिरून आलेले बरे म्हणून निघालो  होतो एवढेच! चालता चालता घराजवळच्या एका बेकरीजवळ पोचलो. सहज बेकरीच्या टेबलाखाली नजर गेली तर तिथे एक मांजरीचे पिल्लू बसलेले दिसले. बेकरीच्या पायरीजवळच बसलेले एक कुत्रे ह्या पिल्लाकडे रोखून पाहत होते. पिल्लू कुत्रे अंगावर आलेच तर कुठे पळायचे ह्याचा कानोसा घेत होते. पावले आपोआप बेकरीकडे वळली. आम्ही बेकरीशी जाऊन आधी कुत्र्याला पळवले. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी तोंडाने च-च आवाज काढत पिल्लाला हाक मारायला सुरवात केली. अपेक्षेप्रमाणे पिल्लाने माझ्यापासून 'सुरक्षित अंतर ठेवण्याचे' धोरण अवलंबले. दुसरे एखादे मांजर असते तर मीही ते लांब पळतेय म्हणाल्यावर नाद सोडून दिला असता. पण हे पिल्लू फार गोड होते आणि दुसरे  म्हणजे मी बेकरीसमोर उभी होते त्यामुळे बिस्किटाची लाच दाखवून पिल्लाला जवळ यायला लावायचा प्रयत्न करून बघायला काही हरकत नव्हती. शक्यतो दुकानदार मांजरांना थारा देत नाहीत. त्यांच्या दुकानात मांजरांशी खेळलेलेही त्यांना आवडत नाही. पण ते पिल्लू बहुदा त्या बेकरीवाल्याने पाळलेले असावे. मी पिल्लाला हाक मारल्याबद्दल बेकरीवाल्याने कोणतीही नापसंती दर्शवली नाही. मी बेकरीतून रुपयाचे बिस्कीट घेतले आणि पिल्लापुढे धरून त्याला परत हाक मारली.
    जुन्या मुवीमध्ये मुलीला पाहायला लोक आलेले असताना ती जशी घाबरत, लाजत पुढे यायची तसे ते पिल्लू "जाऊ की नको, जाऊ की नको" असा विचार करत दबकत दबकत पुढे येऊ लागले. पण पहिल्याच दमात माझ्या एकदम जवळ यायची तर हिम्मत त्याच्यात नव्हती. मग मी बिस्किटाचा छोटा तुकडा पायरीवर ठेवला. बिस्किटाचा खमंग वास आल्यावर मात्र त्याच्याने रहावले नाही आणि ते पुढे येऊन बिस्कीट खाऊ लागले. त्याला बरीच भूक लागल्याचे दिसत होते. दुष्काळातून आलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याची जी तऱ्हा होईल तसे ते भराभरा बिस्कीट खाऊ लागले. तुकडा संपत आला की तोंडात बिस्कीट असतानाच ते "अजून बिस्कीट दे" असे म्हणत आवाज काढत होते. अर्धे बिस्कीट संपवल्यावर मात्र ते जरा शांत झाले. मग पुढला तुकडा त्याने शांतपणे खाल्ला. त्याच्या पुढचा तुकडा मी हातात धरल्यावर तो तोंडात घेण्याऐवजी जेव्हा ते पंजाने त्याच्याशी खेळू लागले तेव्हा मात्र त्याची भूक भागल्याची मला खात्री झाली.
   लहान मुलांना आवडतीचा खाऊ दिला की कशी ती सगळी भीती सोडून, नवखेपणा विसरून ती जवळ येतात तसेच ह्या पिल्लाचे झाले. ते एकदम ओळखीच्या माणसासारखे अभिजीतच्या मांडीवर जाऊन बसले आणि  तिथून माझ्याकडे पाहू लागले. दोन मिनिटे माझे निरीक्षण केल्यावर "आपल्याला खाऊ घालणारी ही नक्की कोण आहे?" असा प्रश्न त्याला बहुतेक पडला. ते माझ्या तोंडाकडे पाहून प्रश्नार्थक स्वरात ओरडू लागले. मी "काय..काय?" असे विचारल्यावर अभिजीतच्या मांडीवरून उतरून माझ्याजवळ आले. माझ्याशी दोन मिनिटे  खेळले, परत अभिजीतकडे गेले. "ही अचानक आलेली माणसे नक्की कोण आहेत? ती कुठून आली आहेत? आता आपण ह्यांच्यासोबत काय करणे अपेक्षित आहे?" असे प्रश्न त्याला बहुदा पडलेले असावेत. ५-१० मिनिटे अशीच इकडून तिकडे करण्यात गेली. मध्येच ते मगाचचे कुत्रे परत आले. तेव्हा हे पिल्लू आमच्या दोघांच्या मधोमध अगदी विश्वासाने बसले. थोडा वेळ वाट पाहून कुत्र्यालाही कंटाळा आला, ते परत निघून गेले. पिल्लू परत खेळायला लागले. पिल्लाचा खाणे-ओरडणे-खेळणे इत्यादी कार्यक्रम पूर्ण झाला. आम्हालाही घरी लवकर जायचे असल्याने आम्ही निघायचे ठरवले. पिल्लू मागे येऊ लागले पण दुकानाच्या शेवटच्या पायरीवरून मात्र ते आपल्या मालकाकडे परत गेले.
    मला मांजरे फार आवडतात.  पण आमच्या बिल्डींगवर "Pets Strongly Discouraged" अशी पाटी लावलेली आहे. भाड्याने राहत असल्याने उगाच कोणाच्या भानगडीत पडायला नको म्हणून आम्हीही ह्या डिस्करेजमेंटला विरोध करायला जात नाही. त्यामुळे मांजर पाळणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे "तू दर शनिवारी इथेच बसत जा. आम्ही तुला बिस्कीट द्यायला आणि तुझ्याशी खेळायला दर शनिवारी इकडे येत जाऊ", असे डील त्याच्याशी करून आम्ही त्याला बाय केले.
   पाऊण बिस्किटातच पिल्लाचे पोट भरल्याने उरलेला पाव तुकडा अजून माझ्या हातातच होता. वाटेत एखादे कुत्रे दिसले तर त्याला घालू असे आम्ही ठरवले. एके ठिकाणी एकदम तीन कुत्री दिसली. त्यांच्यापैकी एकाला हा तुकडा दिला तर एवढ्याश्या तुकड्यासाठी त्यांच्यात भांडाभांडी होईल आणि ज्यांना तुकडा नाही मिळाला त्यांचा हिरमोड होईल असा विचार करून आम्ही बिस्कीट न देता पुढे गेलो. पुढच्याच चौकात गेल्याच शनिवारी दिसलेले एक काळ्या रंगाचे ढोले, बुटके कुत्रे दिसले. मागच्या शनिवारी त्याला हक मारून जवळ बोलावल्यावर ते फार आशेने माझ्याकडे आले होते, शेपटी हलवत हलवत! पण माझ्याकडे त्याला द्यायला काहीच नव्हते. दोन मिनिटे वाट पाहून ते निराशेने निघून गेले होते. आज त्याला बोलावल्यावर ते अजूनच उत्साहात संपूर्ण अंग हालवत हालवत माझ्याजवळ आले. मी पटकन हातातला तुकडा त्याला दिला. ते इतके उत्साहात होते की तो तुकडा चावायच्या नादात जमिनीवर पडला. ते वास घेत घेत जमिनीवरचा तुकडा शोधायला लागले. आपण फार काळ इथे उभे राहिलो तर हे "अजून खाऊ दे" म्हणून नक्की आपल्या मागे लागेल असा विचार डोक्यात क्लिक झाल्यावर मी क्षणाचाही वेळ न दवडता तिकडून कल्टी मारली. कुत्रेही आधी तुकडा शोधण्यात आणि  मग तो खाण्यात बिझी झाल्याने, मी निघाले आहे ह्याकडे त्याचे लक्ष गेले नाही.एका मिनिटात आटोपलेल्या ह्या प्रोग्राममध्ये इतकी मजा आली की काही विचारू नका.
   आम्ही घराकडे परत निघालो. भाजी घेतली. जाताना बेकरी परत लागली. साहजिकच नजर माऊला परत शोधू लागली. माऊ तिकडे दिसत नव्हते. मनातल्या मनात "पुढच्या शनिवारी माऊची भेट नक्की होऊ देत" अशी इच्छा व्यक्त करत, माऊसोबत घालवलेल्या १५-२० मिनिटातल्या आठवणींना मनात साठवत आम्ही घरी गेलो.

Monday, March 5, 2012

सोनी: अंतिम चरण

    मागे म्हटल्यानुसार सोनीची पिल्ले हळू हळू मोठी होऊ लागली. योग्य वेळ आली तशी ब्लॅकी व्यवस्थित चालू लागली. पण चॉकीच्या पायांत मात्र काहीतरी दोष होता. त्याच्या मागच्या पायांत जीवच नव्हता. त्याचे मागचे पाय मांजरांचा म्हणून जो आपण गुढघा म्हणू शकतो तिथून सरळ दुमडलेच जात नसत. त्यामुळे बेडूक पाण्यात पोहताना जसा दिसतो ना तसा तो पुढल्या दोन पायांवर सरपटत जायचा, मागचे पाय सरळच्या सरळ ओढत. त्याची ही केविलवाणी अवस्था पाहून आम्हाला फार वाईट वाटायचे. आईने त्याचे पाय बरे होण्यासाठी कॉडलिव्हर  ऑईलच्या गोळ्यांमधल्या तेलाने त्याच्या  पायांना मालिश करायला सुरवात केली. आईचा हा उपचार कामी आला आणि हळू हळू चॉकीचे पाय बरे झाले.
    पिल्लांचा दंगा आधी दिवाणातल्या दिवाणात मस्ती करणे, मग दिवाणावर चढून खाली उड्या मारणे, परत चढणे, परत उड्या मारणे, मग खोलीभर धावपळ करणे, मग घरभर धुमाकूळ घालणे ह्या पद्धतीने वाढत गेला. आमच्या घरात दिवसाच्या काही ठराविक वेळी, म्हणजेच सकाळ आणि रात्री जणू मांजरांचे ऑलिम्पिक चालू असायचे. कुस्ती, धावण्याची शर्यत, अडथळ्यांची शर्यत, लांब-उंच उडी, कागदाच्या बोळ्याचा  फुटबॉल, टी पॉय आणि सोफ्यावरचे जिम्नास्टिक्स, रिले इत्यादी खेळांचा आनंद आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळायचा. शिवाय प्रत्यक्ष ऑलिम्पिकमध्ये न पाहता येणारे लपा छापी, पकडा पकडी इत्यादी खेळही त्यांच्या ह्या ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होते. पिल्लांचे हे खेळ पाहून सोनीलाही कधी कधी त्यांच्यात खेळण्याची हुक्की येई. दोन पोरांची ही ढोली आई मोठ्या उत्साहाने त्यांच्या खेळात भाग घेई खरे, पण थोड्याच वेळ थकून भागून प्रेक्षकांत सामील होई.
    पिल्ले लहान असताना सोनी त्यांच्यासाठी वेगवेगळी शिकार घेऊन यायची. कधी उंदीर, कधी पोपट, कधी चिमणी, कधी आणखी काही! आमच्या घराला जाळीचे दर होते. लहानपणी त्याच्या जाळीतून सहजपणे ये-जा करणाऱ्या सोनीला आता त्यात मावत नसल्याने सहज आत येता येत नव्हते. घरातून बाहेर जाताना आणि येताना ती दारासमोर म्याव, म्याव करत बसायची. तिचे येणे-जाणे आमच्या दार उघडण्यावर अवलंबून होते. शिकार तोंडात धरून आणली की मात्र तिला नीट ओरडता यायचे नाही. तोंडात शिकार असताना ती दार उघडण्यासाठी ओरडली की तिचा आवाज वेगळाच यायचा. तिचा तो आवाज आला की पिल्लांना आईने आज आपल्यासाठी काहीतरी खाऊ आणलाय ह्याची कल्पना यायची आणि ती दाराच्या दिशेने धावत सुटायची. पिल्लांपासून शिकार वाचवत सोनी कशीबशी आतल्या खोलीपर्यंत घेऊन यायची आणि दिवाणाखाली जाऊन जमिनीवर ठेवायची. पुढचा अर्धा-एक तास दिवाणाखालून पिल्लांचे एकमेकांवर गुरगुरण्याचे आवाज येत राहायचे. चॉकी बोका असल्याने त्याच्यात जास्त शक्ती होती, त्यामुळे शिकारीतला जास्त वाटा तो फस्त करायचा.
    काही महिन्यांतच पिल्लेही मोठी झाली, वयात आली. त्यांचे आपापले उद्योग सुरु झाले. सोनीलाही आणखी एक-दोनदा पिल्ले झाली. आता मात्र लोकसंख्या नियंत्रणाची मोहीम हाती घ्यायला हवी ह्याची आईला जाणीव झाली. आईने सोनीचे ऑपरेशन करून आणले. हे ऑपरेशन मात्र सोनीला मानवले नाही. ऑपरेशन नंतर तिच्यात एकप्रकारचा सुस्तपणा आला. एकदा तर ती आमच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून खाली पडली. त्यामुळे ती एका पायाने लंगडू लागली. नंतर एकदा डॉक्टरला दाखवले असता तिच्या पोटात सिस्ट झाले असल्याचे कळले. ऑपरेशन करून ते काढावे लागले. एक दिवस नेहमीसारखी घरातून बाहेर पडलेली सोनी कधी घरी परतून आली नाही. खूप शोधाशोध करूनही ती सापडली नाही.
    सोनीच्या पिल्लांची जागा आता  ब्लॅकीच्या पिल्लांनी घेतली. ब्लॅकीच्या बाळंतपणात मात्र तिला एक वाईट सवय लागली. प्रतार्विधींसाठी तिसर्या मजल्यावरून खालपर्यंत जायचे तिच्याने होईना तेव्हा ती आमच्या खालच्या मजल्यावरच्या घरात जाऊन हा कार्यक्रम आटोपू लागली. त्या घरात विद्यार्थी राहत होते. ते दिवसभर घरी नसत. त्यामुळे त्यांच्याकडे हा कार्यक्रम आटपणे ब्लॅकीला सोयीचे वाटू लागले. कुत्र्यासारख्या प्राण्यांना आपण आटोक्यात तरी ठेऊ शकतो, पण मांजराचे काय करायचे? ती हट्टी असतात, त्यांना बांधूनही ठेवता येत नाही. आम्ही वेगवेगळे प्रयत्न करूनही ब्लॅकीने त्यांच्या घरी जायचे सोडले नाही तेव्हा मात्र तिला लांब सोडण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिला नाही. एक दिवस गाडी काढून तिला बावधनजवळ सोडून आलो तेव्हा झालेले सगळ्यांचे खिन्न-हताश चेहरे माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहेत. मध्यंतरी ब्लॅकीची पिल्ले एकेक करून पाळण्यासाठी लोक घेऊन गेले.
   पुढे आम्ही आमचे आनंद नगरचे घर सोडून रामबाग कॉलनीत  राहायला गेलो. चॉकी तेव्हा साधारण दीड वर्षांचा होता. आम्ही चॉकीला ह्या नव्या घरी नेण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न केले. रिक्षातून जाताना आमच्या हातात त्याला धरले तर तो इतकी झटापट करायचा की हातातून सुटून पळून जायचा. एकदा भाजीच्या बास्केटमध्ये ठेवून नेण्याचाही प्रयत्न केला. नखांनी, तोंडानी, नाकाने बास्केटचे झाकण उघडायचा प्रयत्न केल्याने त्याचे हात, तोंड रक्तबंबाळ झाले. अशाच परीस्थित कसेबसे घरापर्यंत नेले. दमलेला चॉकी झोपला, उठून दूध प्यायला आणि शेवटी जाळीच्या दारातून उडी मारून परत निघून गेला. आता मात्र आणखी प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही ह्याची आम्हाला चांगलीच जाणीव झाली. नंतर आनंद नगरमधून येत-जात असताना चॉकी आम्हाला बर्याचदा दिसायचा. हाक मारली की ओळखायचा, जवळ यायचा, थोडा  वेळ आमच्यासोबत घालवून निघून जायचा.
    अशाप्रकारे सोनीच्या वंशाच्या तीन पिढ्या आम्ही पाहिल्या. सोनी, ब्लॅकी, चॉकी आमच्या घरातून एकेक करत बाहेर पडले. सोनीची आमच्या घरातील वंशावळ संपली.  तरी एखाद्या मांजरीच्या पिढ्या न पिढ्या आमच्या घरात नांदण्याची ही काही अखेर नव्हती. ही तर खरी सुरवात होती. बापटांच्या घरातील मांजरांच्या इतिहासात पुढे ३-४ मांजरींनी आपल्या २-२, ३-३ पिढ्यांची भर घातली. प्रत्येक पिढीतली बाळंतपणे, नामकरण सोहळे, पराक्रम आणि मृत्यू इत्यादी घटनांच्या आठवणींच्या रुपात हा इतिहास आम्ही आमच्या मनात जपून ठेवला आहे.

  

Saturday, February 18, 2012

सोनी आणि तिची पिल्ले

    गेल्या पोस्टमध्ये सांगितल्यानुसार सोनीला दोन गोंडस पिल्ले झाली. जन्मतः  ह्या पिल्लांचे डोळे बंद असतात, त्यांना चालता येत नसते. तेव्हा पिल्लांचे डोळे कधी उघडणार, ती चालायला कधी लागणार ह्याविषयी आम्हाला भयंकर उत्सुकता लागलेली असायची. दर तासाला पिल्ले काय करतायत हे पाहण्यासाठी पिल्ले असलेल्या दिवाणाकडे आमच्या चकरा सुरु असायच्या. मांजरी कोणालाही पिल्लांजवळ येऊ देत नाहीत, जवळ जायचा प्रयत्न केल्यास गुराकावतात, नखे मारतात असे आम्ही ऐकले होते. पण सोनीचे तसे काहीच नव्हते. उलट आम्ही पिल्लांना पाहतोय, त्यांना हातात घेतोय ह्याचे तिला कौतुक वाटायचे. किंबहुना ह्यांच्या उपस्थितीत थोडा वेळ तरी आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागणार नाही, थोडा आराम करता येईल ह्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसायचे. पिल्लांना पाहायला गेले की पिल्ले तीनच स्थितींत दिसायची: झोपलेली, दूध पिणारी किंवा भूक लागलीये म्हणून आईला शोधणारी!
    बाकी डोळे बंद असले तरी छोटी पिल्ले जात्याच स्मार्ट असतात, चौकस असतात. नाकाने वास घेऊन, आणि कानाने आवाज ऐकत ती सतत आपल्या आजूबाजूला नव्याने आलेल्या गोष्टीचा वेध घेत असतात. आपल्या आजूबाजूला कोणतीही संशयास्पद हालचाल होत असल्याचे त्यांना वाटले किंवा नवीन गोष्टीचा वास आला की ती फिस्कारतात. सोनीची पिल्ले ह्या बाबतीत एक्स्ट्रा स्मार्ट होती. आम्ही दिवाणाजवळ गेलो की ती आमच्या दिशेने तोंड करून काही वेळ भलते सलते आवाज काढत, उद्देश? आम्हाला घाबरवून. शेवटी त्या प्रकाराने ती दमली की परत तोंड वळवून आम्ही येण्याआधी जे त्यांचे चालू असे ते पुन्हा सुरु करायची. डोळे न उघडलेली पिल्ले आईला शोधण्यासाठी काढत असलेले वेगवेगळे आवाज ऐकणे, चालता येत नसतानाही नाकाने वास घेत आई कुठे असेल  ह्याचा वेध घेत, तिच्यापर्यंत कसे बसे सरपटत सरपटत जाणाऱ्या त्या पिल्लांना पाहणे हे आमच्यासाठी नवीन अनुभव होते.
    अजूनही दिवाणातील सोनी आणि तिच्या पिल्लांची काही दृश्ये रेकॉर्डेड फिल्मसारखी माझ्या डोळ्यासमोर येतात. सोनी कोपर्यात बसलीये. पिल्ले झोपलीयेत. अचानक एखाद्या पिल्लाला जाग येते. झोपेतून नुकतेच उठेलेले बाळ जसे कुरकुरते तसे हे पिल्लू क्षीण आवाजात आईला हाक मारण्याचा प्रयत्न करते. त्याचा आवाज ऐकून बाकीची पिल्लेही जागी होतात. सगळ्यांनाच एकदम आईची आठवण होते. सगळीच आईला हाक मारू लागतात. पिल्ले शांतपणे झोपलेली पाहून आपणही आराम करावा म्हणून थोडी डुलकी काढत असलेली आई ह्या गडबडीने जागी होते. सगळी पिल्ले कशी बशी धडपडत, सरपटत, वास घेत घेत आईपर्यंत पोहोचायच्या प्रयत्नात असतात. आपण बाळांनी  रांगायला लागण्याची जशी वाटत पाहत असतो तशीच ही आई पिल्ले चालायला लागण्याची वाट पाहत असते. त्यामुळे पिल्लांची इतकी धडपड पाहूनही ती स्वतःहून त्यांच्या जवळ जात नाही, पिल्ले तिच्यापर्यंत पोहोचायची आतुरतेने वाट पाहत राहते. शेवटी कशी बशी पिल्ले आईपर्यंत पोहोचतात. आईच्या पोटात डोके खुपसून त्यांचा दूध पिण्याचा कार्यक्रम सुरु होतो. पोटे भरली की तशीच एकेक एकेक करत आईच्या पोटात डोके खुपसून झोपून जातात. शेवटी दमलेली आई हाताच्या एका रेट्यात सगळ्या पिल्लांना आपल्या कुशीत ओढून घेते आणि त्यांच्या भोवती स्वतःला गुरफटून झोपून जाते. हा कार्यक्रम कितीही वेळा पाहिला तरी त्याचा आम्हाला कंटाळा यायचा नाही, उलट छानच वाटायचे.
    ही सगळी गंमत अनुभवत पिल्ले डोळे कधी उघडणार, कधी चालायला लागणार ह्याची वाट आम्ही पाहू लागलो. आधी पिल्लांचे डोळे नुसतेच काळ्या फटीसारखे दिसायला लागले. मग ते आणखी थोडे उघडले. थोडे, थोडे करत दहाव्या दिवशी पिल्लांचे डोळे पूर्ण उघडले. आता त्यांच्या पायातही थोडी ताकद आली होती. नुकतेच चालायला शिकलेले पाय आणि इतक्यातच पाहायला शिकलेले डोळे अशा परिस्थितीत त्यांना जमिनीच्या उंचीचा अंदाज येत नसे. पाहतायत कुठेतरी, जायचेय कुठेतरी, पावले भलतीकडेच पडतायत असा प्रकार. नुकतेच चालायला लागलेले बाळ पाहायला जितकी मजा येते तितकीच मजा आम्हाला त्यांच्या त्या गोंडस हालचाली पाहण्यात यायची. सोनेरी पिलाच्या डोळ्यांचा रंग होता निळा आणि तो बोका होता. सोनेरी रंग आणि निळे डोळे असलेला हा बोका फारच गोंडस दिसायचा. त्याच्या रंगावरून आम्ही त्याचे नाव चॉकी (चॉकलेटसारख्या रंगावरून )  ठेवले. दुसरे पिल्लू सोनीच्याच रंगाचे, हिरव्या डोळ्यांचे होते. ती मांजरी होती. तिचे नाव आम्ही ब्लॅकी ठेवले.
    मांजरी पिल्लांची जागा सात वेळा बदलतात असे म्हणतात. त्यांना पिल्लांची जागा बदलण्याची निसर्गतः सवय असते. त्या दर काही काळाने नवी जागा शोधतात आणि एकेका पिल्लाला पटापट तोंडात पकडून नवीन जागी घेऊन जातात. पण आधी म्हटल्याप्रमाणे सोनी बालसंगोपनात ढ असल्यामुळे तिला पिल्ले हालविण्याची इच्छा झाली तरी ती कृतीत उतरवता येत नसे. कितीतरी वेळ तर तिला पहिल्या पिल्लाला तोंडात पकडण्यासाठी लागायचा. खूप प्रयासांनंतर पिल्लाला तोंडात पकडले की सोनी कसे बसे १० पावले चालायची की ते पिल्लू तिच्या तोंडातून सुटून खाली पडायचे. बिचारे कावरे बावरे होऊन इकडे तिकडे पाहू लागायचे, " मैं कहाँ हूँ?" स्टाईल मध्ये! हा सगळा प्रकार पाहून आई सोनी पिल्लाला कुठे न्यायचा प्रयत्न करतीये ते पाहायची. त्या ठिकाणी जागा करायची, पिल्लांसाठी जुन्या जागी अंथरलेली साडी त्या जागी नेऊन पसरायची आणि स्वतःच पिल्लांना तिकडे नेऊन ठेवायची. ह्या सगळ्या कार्यक्रमाने थकलेली सोनी पिल्लांना घट्ट मिठी मारून झोपून जायची.
    असे करता करता सोनीची पिल्ले मोठी होऊ लागली. छान चालू लागली. भयंकर दंगा करू लागली. मायेने साद घालून बोलावणाऱ्या सोनीचे ती अजिबात ऐकेनाशी झाली, मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष करू लागली. आता आमच्या घरात पाचाच्या जागी सात प्राणी (मनुष्य हाही प्राणीच आहे ह्याला अनुसरून) नांदू लागले. सोनी, चॉकी आणि ब्लॅकीचे पुढचे किस्से पुढच्या पोस्टमध्ये पाहू. तोवर टाटा!


Monday, February 13, 2012

सोनीचे बाळंतपण

    मागील पोस्टमध्ये म्हटल्यानुसार सोनीने तारुण्यात पदार्पण केले आणि आमच्या घरासमोर बोक्यांच्या फेऱ्या चालू झाल्या. दिवसभर आमच्या मागे मागे करणारी सोनी घराबाहेर जास्त वेळ रमू लागली. काही काळातच सोनीच्या हालचालीत एकप्रकारचा मंदपणा जाणवू लागला. पण आमच्याकडे आधी सगळे बोके होते आणि ही पहिलीच मांजरी. त्यामुळे एवढ्याशा बदलावरून तिला पिल्ले होणार आहेत हे समजण्याइतके आम्ही एक्स्पर्ट झालेले नव्हतो. काही दिवसांनी तिचे पोट मोठे दिसू लागले आणि ती जास्त लाडे लाडे वागू लागली तेव्हा मात्र तिला पिल्ले होणार ह्याची खात्री झाली.
    एवढेसे पिल्लू असल्यापासून सांभाळ केलेल्या आपल्या पोरीसारख्या मांजरीचे बाळंतपण म्हणजे तिचे किती लाड करू आणि किती नको असे आमच्या आईसाहेबांना झाले. तिच्या खाण्यापिण्याची आणखी काळजी घेतली जाऊ लागली. खिरीचा खुराक सुरु झाला. एकदा आमच्या घरी पाहुणे आले होते. तेव्हा आई मांजर गरोदर आहे म्हणून तिला खीर खाऊ घालतीये हे पाहून त्यांना केवढे आश्चर्य वाटले होते ते मला अजूनही आठवतेय! आधीच लाडोबा असलेल्या सोनीला आपले अजून लाड होतायत हे पाहून आणखीनच लाडे लाडे वागण्याची संधी मिळाली. आपल्याला कसेही वागले तरी कोणी फटके मारत नाही हे तिला चांगलेच कळले. 
   जसजशी पिल्ले व्हायची वेळ जवळ आली तसतशी सोनीची पिल्ले घालण्यासाठीच्या जागेची शोध मोहीम सुरु झाली. काही फार संशयी वृत्तीच्या मांजरी  पिल्ले कुठल्यातरी अडगळीच्या ठिकाणी घालतात जेणेकरून पिल्ले कोणाच्या हाती सहज सहजी लागत नाहीत. पण सोनीचा तसा काही विचार दिसला नाही. आमच्या घरात अडगळ अशी नव्हतीच त्यामुळे तिने त्यातल्या त्यात जागेचा शोध सुरु केला. दिवाणाचे दार, किंवा कपाटांची  दारे उघडी दिसली की सोनी आत जाऊन बसायची. थोड्या वेळ त्या जागेचा 'फील' घेऊन बघायची. 'पिल्ले इथे सुरक्षित राहू शकतील का?' ह्याचे बहुधा ती आडाखे बांधत असावी. थोडा वेळ झाला की आपल्या आपण बाहेर पडायची. कपाटाची तपासणी करायला मात्र तिला थोडा जास्त वेळ लागायचा. प्रत्येक कप्प्यात जाऊन निरीक्षणे करणे म्हणजे केवढे मोठे काम! सोनीची स्वारी कपड्यांच्या कप्प्याच्या दिशेने जाऊ लागली की मात्र आम्ही तिला बाहेर काढून कपाट लावून घ्यायचो.
     म्हणता म्हणता पिल्ले होण्याचा दिवस आला. सोनी बेचैन दिसत होती. अधून मधून वेगवेगळ्या तर्हेचे आवाज काढत होती. आईच्या जवळ जवळ राहण्याचा प्रयत्न करत होती. तिचे हे वागणे पाहून आईला तिला लवकरच पिल्ले होणार आहेत ह्याची कल्पना आली. सोनीला काही सुचत नव्हते. एका जागी बसत नव्हती, जणू काही पिल्ले घालण्याच्या जागेच्या केलेल्या तपासाची सगळी कन्क्लुजंस ती विसरून गेली होती. त्यामुळे कुठे पिल्ले घालावीत हे तिला सुचत नव्हते. शेवटी ही अशीच फिरत राहिली तर भलतीकडेच पिल्ले घातली जातील ह्या काळजीने आईने दिवाणाच्या एका कप्प्यात मोकळी जागा केली, त्यात जुनी सुती साडी पांघरून ठेवली आणि सोनीला त्यावर बसवले. तिने जास्त हालचाल करू नये म्हणून अधून मधून तिच्या जवळ जाऊन आई तिला कुरवाळत राहिली. काही वेळाने सोनीला दोन पिल्ले झाली. 
    शिकारीत पैकीच्या पैकी मार्क मिळवणारी सोनी मुलांचे संगोपन ह्या विषयात मात्र अगदी ढ होती. अगदी १० पैकी २ मार्क्स देऊन नापास करावे इतकी ढ! पिल्ले जन्माला घातल्यावर मांजरी लगेच त्यांना स्वच्छ करतात. पिल्ले घातलेल्या जागी अगदी कसलाही नामोनिशाण उरत नाही इतका उरक त्यांच्यात असतो. पण आमची सोनी, पिल्ले जन्माला घालण्याच्या प्रोसेसमध्येच थकलेली. काही  वेळ गेल्यावर तिला पिल्लांकडे पहायचे सुचले. बाकीचे सोपस्कार आईनेच पार पाडले.
    अर्थात हा सगळा एपिसोड मी शाळेत असताना झाला आणि आईने मला तो नंतर सांगितला. मी पाहिली तेव्हा मला दिसली दोन छोटीशी पिल्ले, अगदी बोटाच्या लांबीएवढी छोटी. एक सोनीच्याच रंगाचे आणि एक सोनेरी! मिटलेले डोळे आणि इवलेसे शिम्पल्यासारखे कान.  त्यांना पाहून आपल्याला छोटी छोटी भाचरंडे झाल्यासारखे वाटले. येता जाता सारखे 'पिल्ले काय करतायत? डोळे उघडले का? चालायला लागली का?' इत्यादीचे निरीक्षण करण्याची सवय लागली. पिल्लांच्या गंमती-जंमती पाहण्यात किती वेळ जायचा ते समजायचे नाही. 
पिल्लांचे नामकरण, त्यांचे बालपण इत्यादीबद्दल गप्पा मारू पुढच्या पोस्टमध्ये. तोवर सायोनारा!

 



Thursday, February 9, 2012

सोनी रीलोडेड

    आधीच्या पोस्टमध्ये सांगितल्यानुसार हाताच्या पंजावर मावणारी एवढीशी सोनी दिसामासाने अंग धरू लागली. काळ्या लोकरीच्या गुंड्या सारख्या दिसणाऱ्या तिच्या अंगावर हळू हळू सोनेरी, पांढऱ्या छटा दिसू लागल्या. सोनीच्या फरवरील केस इतर मांजरांच्या केसांहून जास्त मुलायम आणि लांब होते. शेपटी मस्त झुबकेदार होती. माझ्या मैत्रिणीकडे मांजरांचे एक कॅलेंडर होते. ते एकदा तिने दाखवले. त्यात डिट्टो  सोनीसारखी दिसणारी मांजर होती. त्यावरून सोनी अमेरिकन मांजरांच्या जातीतील होती असे कळले.
    सामान्यतः मांजरी जरा खत्रूड, माणसांच्या जास्त वाटेला न जाणाऱ्या आणि बोके प्रेमळ,  माणसांशी जास्त जवळीक ठेवणारे असे असतात. पण सोनीला आमचा सहवास आवडायचा. जेव्हा तिचे खेळणे संपायचे तेव्हा ती कोणाच्या तरी मांडीत जाऊन बसायची, नाहीतर पायापायात करत राहायची. आई सकाळी गच्चीत फेऱ्या मारायला जायची तेव्हा सोनीपण तिच्यासोबत जायची. किंबहुना आईची गच्चीवर जायची वेळ झाली आणि लोखंडी दार उघडताना कडी वाजली की  कडीचा आवाज ऐकून सोनी जिथे असेल तिथून धावत पळत यायची. दार उघडले की भराभरा पायऱ्या चढून गच्चीसमोर जाऊन बसायची. गच्चीचे दार उघडून आत पाऊल टाकेस्तोवर तर बाईसाहेब गच्चीच्या कठड्यावर जाऊन बसलेल्या असायच्या. मलाही गच्चीत अभ्यासाला जायला आवडायचे. अशा वेळी सोनी काही वेळ स्वतःशी खेळायची आणि दमली की मांडीवर येऊन बसायची. खेळणे आणि दमल्यावर मांडीवर येऊन बसणे  आलटून पालटून चालू राहायचे. 
    सुरवातीचे सोनीचे गच्चीवरचे खेळ म्हणजे छोटे छोटे किडे, फुलपाखरे ह्यांच्या मागे लागणे, त्यांना पकडून त्यांच्याशी खेळत बसणे आणि शेवटी ते खाणे. काही वेळा कठड्यावर किंवा टी. व्ही. च्या antenna वर बसलेल्या पक्ष्यांना पकडायचा प्रयत्नही  चालू असायचा. पण अजून नेम धरण्याचा तितकासा अंदाज नसल्याने त्यात तिला यश मिळायचे नाही. परंतु इतर पिल्लांना आईकडून मिळणारे शिकारीचे शिक्षण सोनीला न मिळताही तिने लवकरच त्यातही प्राविण्य मिळवले. इतर वेळी गळ्यातली मोत्याची माळ मिरवत फिरणारी गोंडस सोनी शिकार करू लागली की मात्र एकदम उग्र दिसायची. तोंडाने वेगवेगळे आवाज काढत, गुरकावत, डोळे शिकारीवर रोखून सोनी आधी दाबा धरायची आणि योग्य वेळ येताच भक्ष्यावर झेप घेऊन त्याला पायाशी लोळवायची.   
    लहान लहान म्हणता म्हणता सोनीने तारुण्यात कधी पदार्पण केले ते कळले नाही.दिसायला गोड, अंगावर असलेल्या लांब केसांच्या फरमुळे जराशी गुबगुबीत वाटणारी सोनी जवळपासच्या बोक्यांना 'सुबक, ठेंगणी..' ह्या जुन्या मराठी गाण्यात वर्णन केलेल्या तरुणीसारखी वाटत असणार ह्यात शंका नाही. आमच्या घराबाहेर नवनवीन बोक्यांच्या चकरा चालू  झाल्या. परिणाम? आमच्या घराची लोकसंख्या वाढली. सोनीचे बाळंतपण, त्या वेळचे तिचे नखरे, नंतर सोनीच्या पिल्लांचा घरातील वावर ह्यांनी आमच्या घराचे वातावरण आणखी बदलले. त्याविषयी पुढच्या पोस्टमध्ये गप्पा मारू. 
    (सोनीचा फोटो पुण्याच्या घरी असल्याने तो काही मी इथे पोस्ट करू शकत नाही. पण सोनीची छबी तुमच्या डोळ्यासमोर उभी राहावी म्हणून एक लिंक इथे देते आहे: http://pusscats.com/Siberian_Cats.htm. ह्या लिन्कवरचा फोटो आणि मांजरीचे वर्णन सोनीशी अगदी मिळते जुळते आहे. त्यावरून ती सायबेरीअन जातीची असायला हवी. पण आधी म्हणल्याप्रमाणे मैत्रिणीने लहानपणी दाखविलेल्या कॅलेंडरनुसार ती अमेरिकन जातीची होती अशी आमची समजूत झाली होती.  निष्कर्ष? काही नाही. शेवटी जातीत काय आहे? असे म्हणून सोडून देऊ.)




Sunday, February 5, 2012

सोनी

   परवाच 'Marley and Me' वाचून झाले. मार्ली ह्या खोडकर, खट्याळ (मार्लीच्या मालकाच्या भाषेत वाया गेलेल्या) कुत्र्याची आणि त्याच्या मालकाची ही गोष्ट अतिशयच रंजक आहे. पुस्तक अतिशय वेधक होते, वाचताना मी मार्लीच्या गोष्टीत पूर्णपणे रंगून गेले. पण पुस्तक संपले आणि मन मार्लीतून बाहेर आले, सोनीच्या आठवणींत  शिरले. सोनी, माझी लाडकी मांजरी!
   संध्याकाळची वेळ होती. दाराची बेल वाजली. आईने दार उघडले. पाहते तर काय, दारासमोर बिल्डींगमधली समस्त बच्चेकंपनी हजर होती. "काकू काकू, पार्किंगमध्ये ना आम्हाला मांजराचे छोटेसे पिल्लू सापडले आहे. तुम्ही त्याला सांभाळाल?", डायलॉग पाठ केल्यासारखी एका सुरात पोरे म्हणाली.
    ह्याआधी मांजराची ३-४ छोटी पिल्ले आम्ही पाळली होती. पण कधी कुत्री मागे लागून, कधी काही आजाराच्या  निमित्ताने अशी अगदी लहान असतानाच ती मेलेली होती. प्रत्येक पिल्लाचे घरी येणे, त्याची आम्ही काळजी घेणे, त्याच्या घरातील वावराची आम्हाला सवय होणे आणि त्याच्या मृत्यूने घरास रिकामपण येणे, अवघड होत असे. आणखी मांजरे न पाळायचे आम्ही ठरवले होते. त्यामुळे आईने "नको रे! आता नाही पाळत आम्ही मांजरे!" असे सांगून टाकले. "काकू पिल्लू खूप छोटे आहे. आणि ते फारच  घाबरल्यासारखे दिसते आहे. त्याची आईही दिसत नाहीये कुठे! तुम्ही नाही पाळलेत तर कुठे जाईल ते?" मुले म्हणाली. एवढेसे पिल्लू, तसेच पार्किंगमध्ये राहू दिले तर कुत्री तरी मारतील नाहीतर गाडीखाली येऊन तरी मारेल. ही कल्पना सहन न होऊन "घेऊन या त्याला, बघू काय करायचे ते!", असे आई पोरांना म्हणाली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन पोरे लगेच पिल्लाला घरी घेऊन आली.
   थोड्याच वेळात हाताच्या ओंजळीत मावणारा, मिचमिच्या डोळ्यांचा, करड्या रंगाचा, 'फर'चा एक गोळा आमच्या दिवाणखान्यातल्या सोफ्याखाली स्थानापन्न झाला होता. मांजरी आहे पाहून आईने पिल्लाचे नाव सोनी ठेवले. सोनी १-२ दिवसात आमच्या घरात रुळली. दिवसभर जमिनीवर पडलेल्या छोट्या वस्तूंशी तसेच स्वतःच्याच शेपटीशी खेळणे,  घरभर धावपळ करणे असल्या कसरतींनी दमलेली सोनी रात्री आमच्या पायात किंवा उशाशी येऊन बसायची. तिथे बसून तिचे छोटे-मोठे चाळे चालूच असायचे. तरी आम्हाला ते हवेहवेसे वाटायचे. 
   मांजरांना सुकी मच्छी खाऊ घातली की ती मस्त गुटगुटीत राहतात असा कोणीतरी दिलेला सल्ला ऐकून आईने सोनीला मच्छी खाऊ घालायला सुरवात केली. सकाळी आणि संध्याकाळी ठराविक  वेळी सोनीला आम्ही मच्छी देत असू. तिलाही लवकरच हे लक्षात आले. सकाळी आणि दुपारी आई झोपून उठली की सोनी आरडा ओरडा करून "लवकर मच्छी  दे", अशी डिमांड करू लागली.
   सोनीला खाऊ पिऊ घालणे, तिच्याशी खेळणे सगळ्यांनाच हवेहवेसे वाटे. शाळेतून आल्या आल्या दप्तर जागेवर ठेऊन सोनी कुठेय ते शोधणे आणि तिच्याशी खेळणे हा आमच्या दैनंदिनीतला एक  महत्त्वाचा कार्यक्रम झाला होता. दोरीच्या टोकाला कागदाचा बोळा बांधून तो जमिनीवर सोडायचा आणि गाडीसारखे बोळा ओढत घरभर धावायचे. सोनी बोळा पकडायला मागे धावायची. आमची ही अशी पकडा  पकडी कित्येकदा चालू असायची. रात्री झोपण्याआधी आई-बाबा शतपावली करू लागले की त्यांच्या पायापायात करणे हा सोनीचा एक आवडता टाईमपास होता.
   इतर मांजरांप्रमाणेच कानामागे, गळ्याला खाजवलेले सोनीला  खूप आवडायचे.अंग चाटून पुसून स्वच्छ करायचे आणि कोवळ्या उन्हात जाऊन बसायचे हा तिचा आवडता कार्यक्रम दिवसातून २-३ वेळा होत असे. अंघोळ करायची, उन्ह खायचे आणि सोफ्यावर किंवा दिसेल त्याच्या मांडीत जाऊन झोपून जायचे! अभ्यास करताना सोनी जवळ बसलेली असली की छान वाटायचे, सोबत वाटायची. पण कधी कधी हात पाय ताणून देऊन मस्त झोप काढणऱ्या सोनीला पाहून तिचा फार हेवाही वाटायचा. "खायचे, प्यायचे, लाड करून घ्यायचे आणि झोपायचे, काय मस्त आयुष्य आहे,असे आयुष्य पाहिजे!" असे वाटायचे.
   मिचमिच्या डोळ्यांच्या त्या फरच्या गोळ्याचे काही महिन्यातच एका सुंदर, रुबाबदार मांजरीत रुपांतर झाले. काही काळाने तिला पिल्ले झाली. आमच्या कुटुंबात दोन मेम्बर्सची भर पडली. सोनी आणि तिच्या पिल्लांच्या तुम्हाला सांगाव्यात अशा अनेक आठवणी माझ्या माझ्या मनात रंग लावून उभ्या आहेत. तुमच्याशी त्या शेअर करण्यासाठी लवकरच मी पुढची पोस्ट लिहीन. तोवर अलविदा!  
(टीप:  Marley and Ме हे पुस्तक प्राणी आवडणाऱ्या लोकांनी जरूर वाचा. तुम्हाला नक्की आवडेल.)

Thursday, August 26, 2010

दोन तासांची पाहुणी

दिवस होता भाद्रपद शुद्ध षष्ठीचा. 'काही विशेष का असते भाद्रपद शुद्ध षष्ठीला?' असा विचार करत असाल तर डोके वापरणे लगेच थांबवा. असेच आपले सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जड शब्द वापरले. असो, दिवस तसा साधाच होता. पण आमच्याकडे त्या दिवशी एक गम्मत घडली.
       तेव्हा घरी अभिजित आणि मी असे दोघेच असायचो. त्या दिवशी संध्याकाळी कम्पनीतून घरी आले आणि पाय धुवायला म्हणून बाथरूममध्ये जायला निघाले. दार उघडता क्षणी कमोडच्या कडेवर एक काळा पट्टा दिसला. 'काय असेल ते?', अशा विचारानेच माझ्या हृदयाचा ठोका चुकला. अभिजीतला दाखवावे तर तो गच्चीवरून कपडे आणण्यासाठी गेला होता. त्यामुळे ते तिथून हालायच्या आतच 'ते काय आहे?' त्याचा छडा आपल्यालाच लावायला लागणार हे मी समजून चुकले. मनाचा ठिय्या करून थोडे आणखी पुढे  गेल्यावर ती कोणत्यातरी प्राण्याची शेपटी आहे हे लक्षात आले. सस्पेन्स सस्पेन्स अजून वाढला. तसेच धारिष्ट्य करून आणखी पुढे सरकले. तेवढ्यात तो प्राणी धडपडत खाली घसरला. पुढे वाकून पाहिले तर दोन डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते. 'अरे देवा, उंदीर आहे की काय?', कल्पनाच भयंकर होती. डोळे प्राण्यावर खिळलेले. नीट निरखून पाहिले तेव्हा लक्षात आले की ती खार होती.  काय करावे सुचेना. माझी हालचाल बंद झालेली पाहून खारीने परत हालचाल सुरु केली आणि ती वर यायचा प्रयत्न करू लागली. तिच्या प्रयत्नांना फळ काही येईना.
       हे सगळे घडेपर्यंत अभिजीत खाली आला आणि त्याने खार पाहिली. "घराच्या दारे खिडक्या पूर्ण बंद असताना ही आत आली कुठून?" हा प्रश्न आम्हाला पडला. बहुधा, सकाळी मी निघाल्यावर २ मिनिट दार उघडे होते तेव्हाच ती घरात आली असावी असा निष्कर्ष निघाला.
       एव्हाना खार कमोडच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करता करता अर्धमेली झाली. आता मात्र तिला बाहेर काढायला हवे होते. खारीशी अशा पद्धतीने पहिलीच गाठ पडल्याने तिला हातात धरून बाहेर काढायची काही हिम्मत होत नव्हती. तिला काठीने खालून थोडा आधार देऊन वर काढता येईल का ते पाहिले. पण काठीने आधार देऊनही ती घसरतच होती. शेवटी एक फडके कमोडच्या कडेवर ठेवले तेव्हा खारुताई फड़क्यात नखे रुतवून काठावर चढली.
       इतके सगळे उपद्व्याप करून खारुताई इतकी दमली की ५ मिनिटे ती तशीच कमोड्च्या काठावर पडून राहिली. मग तिला थोड़ी तरतरी आली आणि तिने टुणकन खाली उडी मारून बाथरूमच्या कोपर्याकडे धाव घेतली. थंडीने आणि  भीतीने हुडहुडी भरू लागली. शक्तीच्या अभावी तिला जागचे हलता येईना, तिला अन्नाची गरज होती. "काय द्यावे बरे?" असा विचार करत असतानाच समोर बीट दिसले. बिटाचा तुकडा तिच्यासमोर धरला. तिने अगदी कार्टूनमध्ये दाखवतात तसे दोन हातात धरून तो खायला सुरुवात केली. दोन-तीन बीटाचे तुकडे खाल्ल्यावर तिने २-३ शेंगदाणे खाल्ले. भुकेमुळे खारुताईला "आपण कुठे आहोत? हे अन्न आपल्याला कुठून मिळतेय?" ह्या कशाचीच शुद्ध नव्हती. खाल्ल्यावर तिला जरा तरतरी आली. मग तिने आपले अंग
चाटून स्वछ आणि कोरडे करण्यास सुरुवात केली. अंघोळीचा कार्यक्रम झाल्यावर ती परत थोडी शांत बसली. स्वच्छता मग विश्रांती, परत स्वच्छता परत विश्रांती अशा राउंड्स काही काळासाठी चालू राहिल्या. खारुताई आणखी आणखी तरतरीत दिसू लागली. आधी तिचे आवाजान्कडे लक्ष जात नव्हते, आता ती आवाज ऐकून अंग चोरून बसू लागली, सतर्क वाटू लागली.
        तिला तरतरी आलीये म्हणल्यावर आम्ही तिला एकटीला सोडले. कोणी आजूबाजूला नाही असे पाहून ती बाहेर आली. स्वयंपाकघरात शिरली. उंच उंच उड्या मारून ओट्यावर, फ्रिजवर चढायचा प्रयत्न करू लागली. पण ते काही तिला जमले नाही. तेवढ्यात मी स्वयंपाकघरात काम करायला गेले. माझी चाहूल लागताच ती फ्रिजमागे लपून बसली. काही काळाने कुठे गेली म्हणून पाहू लागले तर दिसेना! अभिजीत शोधू लागला. ती गुपचूप दारामागे जाऊन बसली होती. अभिजीतची चाहूल लागताच तिथल्या झाडूवर झाडासारखे चढायचा प्रयत्न करू लागली आणि जमत नाही म्हणल्यावर काही काळ परत शांतपणे बसून राहिली. आम्ही परत आमच्या कामाला लागलो. मग परत धैर्य करून खारुताई देवघरात शिरली. पाहिले तर ती मस्त देवाच्या फोटोमागे अंग चोरून बसली होती.
         शेवटी तिला जायला आम्ही हॉलचे दार उघडून ठेवले आणि तिच्या थोडे जवळ जाऊन जरा आवाज केला. आवाजाला घाबरून खारीने दाराच्या दिशेने पळ काढला. दाराबाहेर पाऊल टाकताच तिला काहीतरी वेगळे वाटले बहुतेक! ती एक मिनिट तिथेच थांबली आणि भिन्तिवरून उडी मारून निघून गेली.
         खारुताई २-२.५ तासच आमच्याकडे होती पण तेवढ्या वेळात ती घरभर हिंडली. घरी दोघेच असल्याने ह्या छोट्या आगंतुक पाहुणीचा तेवढ्याच वेळात आम्हाला लळा लागला. गेल्यानंतर बराच वेळ आम्हाला दोघांना ती तिथल्या कोपर्यातच असल्याचा भास होत होता! आमच्या डेली सोपमध्ये "guest appearance" देणारी ही खारूताई कायमची आमच्या आठवणीत राहिलेली आहे.

Tuesday, September 1, 2009

Namesake

जर आमच्या मांजरांच्या नावांची यादी कोणाला सांगितली तर "ही बापट मंडळी सिनेमाची न टी. व्ही. ची कमालीची शौकीन दिसतायत" असा विचार समोरचा माणूस करेल ह्याची मला हजार टक्के खात्री आहे! पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे...पण अशा मजेदार मुहुर्तान्वर त्या-त्या मांजरांनी आमच्या घरी एंट्री मारली की परिस्थितीने त्यांची ती-ती नावे ठेवायला आम्हाला भाग पाडले :D
आमच्याकडे आलेल्या एका पिल्लाचे नाव होते "नन्हे"...वयाने लहान असल्याने ह्या नामकरणाच्या वेळी माझे मत लक्षात घ्यायची तसदी कोणी घेतली नाही...खरे तर हे नाव मला अजिबात आवडले नव्हते....त्यामुळे हे नाव असे का ठेवले हे जाणून घ्यायची माझी इच्छा झाली नाही...
नन्हे नंतर अनेक वर्षे मांजरांची नावे त्यांना शोभतील अशी म्हणजे Sony, Blacky, Chocky आदि ठेवण्यात आली. पुढे Blacky च्या पोटी एका बोक्याने जन्म घेतला :D हा बोका करड्या रंगाचा होता...कधीही जवळ यायचा नाही न खंडणी वसूल करायला आल्याप्रमाणे फ़क्त दूध प्यायला घरी यायचा न जाता जाता घरातील इतर मांजरान्वर गुरगुरत जायचा, म्हणून त्याला लखन असे नाव दिले गेले :D
नंतर काही काळ Blacky, Chocky (Junior) ह्या नावांना मान दिला गेला :D न मग एंट्री मारली ढोलू आणि जादूने :D
ढोलू हा अतिशय furry, पांढराशुभ्र न धष्टपुष्ट असा लाडावलेला बोका होता...न त्याची बहीण जादू ही अतिशय रोड अशी भाटी होती. ड़-जीवन सत्त्वाअभावी मुडदूस झालेल्या बालकाचे चित्र एकदा विद्न्यानाच्या पुस्तकात होते, त्याची आठवण व्हायची तिला पाहिल्यावर...नवजात मूल जर रोगट असेल तर त्याचे नाव ठेवत नाहीत अशी पूर्वी प्रथा होती. ही जादू जगेल असेल वाटत नसल्याने सुरवातीला आम्ही तिचे नावच ठेवले नाही. पण तिने काही महिन्यात ज़रा बाळसे धरले. ह्याच वेळी आम्ही "कोई मिल गया पाहिला". त्यातील जादू ह्या Alien सारखी जादू तेव्हा दिसत असल्याचे सर्वांचे मत झाल्याने न ती आश्चर्यकारकरित्या जगाल्याने तिचे नाव जादू ठेवले :D
ह्याच सुमारास एक बोका आमच्याकडे आला. तो एकदम लाडिकपणे वागायचा ...बाबा पुजेला बसले की त्यांच्या खांद्यावर जाऊन बसायचा. मी अभ्यासाला बसले की मांडीत झोपायचा. तो एकदम लाडका होता आमचा..तो करडा होता.तेव्हाच दूरदर्शनवर "नंदू अपना" नावाचे animation लागायचे. त्यातला नंदू (हत्तीचे पिल्लू) न हा बोका ह्यांच्या character न रंगामध्ये कमालीचे साम्य होते...न त्याचे title song होते "सब का दुलारा नंदू अपना, सब का है प्यारा नंदू अपना " त्यामुळे बोक्याचे नाव नंदू ठेवले :D
जादुला दोन पिल्ले झाली (एक बोका न एक भाटी) तेव्हा "बंटी और बबली" हा सिनेमा गाजत होता ... बंटी न बबलीची जोड़ी आमच्या घरी पण धुमाकूळ घालू लागली... :D
पुढे बबलीला पिल्ले झाली (परत एक बोका न एक भाटी) तेव्हाच आम्ही "लगे रहो मुनाभाई" पाहिला...बोका खूप दंगा-मस्ती करायचा न भाटी दिसायला एकदम गोड न शांत अशी होती...सिनेमातल्या जान्हवी न मुन्नाशी बरोबरच्या त्यांच्या resemblance मुळे त्यांची नावे जानू न मुन्नू ठेवली...
पुढे जानूला एक जाड जूद, दाणगट, खोडकर असे पिल्लू झाले...त्याच्या देहाला मान देऊन त्याचे नाव मोटू ठेवले...
अजून एक अगदी डोळे न उघडलेले, चलाताही न येणारे, पांढर्या रंगाचे पिल्लू कोणीतरी आमच्या इथे सोडून गेले...ते आम्ही साम्भाळले ... ती भाटी होती... त्याच सुमारास आम्ही Black हा सिनेमा पाहिला... त्यातली छोटी Mischel असते तशीच ही मांजरी होती.. म्हणून तिचे नाव Mischel ठेवले..
ह्यानंतर मात्र आमच्याकडे नवीन मांजरांना प्रवेश न देण्याचे धोरण केले गेले....त्यामुळे t v तली पात्रे आमच्या घरी यायची बंद झाली :D

Thursday, August 13, 2009

सर्कस

स्थळ : बापटांचे घर
वेळ : अनिश्चित

ठळक वैशिष्ट्ये :
* ह्या सर्कशीत बहुतांश वेळा मांजरी न क्वचित कुत्री काम करतात
* सर्व खेळ उत्फ़ूर्तपणे (कोणतीही तयारी न करता) करण्यात कलाकारांचा हातखंडा आहे
* सर्व खेळ फुकट पाहता येतात

तुम्ही म्हणाल की काही निश्चित वेळ ठरलेली नाही तर आम्ही सर्कशीला यायचे कधी? लक्षात घ्या की ही सर्कस पाहण्यासाठी तुम्ही बापटान्चे शेजारी होणे गरजेचे आहे. ' बापटांच्या घरातील लोकांची हातात दोर्या, बादल्या आदि वास्तु घेऊन पळापळ सुरू होणे' हे सर्कस सुरु होणार असल्याचे लक्षण.

काय बोलतीये ही मुलगी? बरी आहे ना? आवरा........असे उद्गार मला ऐकू यायला लागलेत :D
आम्ही आजपर्यंत पाळलेल्या प्रत्येक मांजराने काही ना काही गमतीदार पराक्रम (:-o) केलेले आहेत. न त्यामुळे आमच्या शेजार्यांची, रस्त्यावरून येणार्या-जाणार्या लोकांची भरपूर करमणूक होत आलेली आहे.
आमच्याकडे मीनू नावाचा बोका होता. ३-४ महिन्यान्चाच असेल. आम्ही तेव्हा तिसर्या मजल्यावर रहायचो. मीनू लहान असल्याने कुत्र्यांनी त्याला मारण्याचा धोका होता. म्हणून आम्ही त्याला एकट्याला बाहेर पाठवायचे टाळत असू. पण बहुतेक त्याला असे घरात राहणे हा त्याच्या शौर्याचा अपमान वाटायचा. तो जाळीच्या दाराच्या फटींमधून, खिडकीतून, बाल्कनीतूनजिथून मिळेल तिकडून, गूपचूप खाली जायचा. पण खाली गेला की मग आमच्या ह्या शूरावीराला वाटायला लागायची भीती!
खाली एक गाडी अनेक वर्ष धूळ खात पडली होती. लोकांची ने-आण करण्यापेक्षा विविध प्राण्यांची, पार्किंगमध्ये खेळणाऱ्या मुलांची लपायची जागा बनून आहे तिथेच लोळत बसायला तिला आवडत असावे. ह्या गाडीला खाली इंजिन असते त्या ठिकाणी एक चौकोनी भोक होते (सगळ्याच गाड्यांना असू शकते पण ह्या गाडीला होते हे मिनुमुळे कळले) मीनू खाली गेला की तड़क ह्या भोकातून गाडीच्या इन्जिनात शिरायचा.
अचानक त्या गाडीला मिनूच्या तिकडे बसण्याचा कंटाळा येऊन तिने सुरु व्हायचे ठरवले असते तर? आशा न इतरही अनेक बालभित्यान्मुळे मिनुचे असे इन्जिनात जाऊन बसणे आम्हाला धोक्याचे वाटायचे.
मीनू घरात नाही हे ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी Rescue Operation ची तयारी सुरु होई. सुरुवातीला केवळ हाका मारून (प्रेमाने, धाकाने) काम चालावण्याचा प्रयत्न व्हायचा. पण तेवढ्याने ऐकेल तर तो मीनू कसला! मग दुकानातून एक अंडे आणावे लागायचे. ते उकडायचे, सोलायचे न खाली घेऊन जायचे. मग ते गाडीच्या त्या भोकापाशी नेऊन धरायचे. अंड्याचा वास आला की मिनुच्या तोंडाला पाणी सुटायचे न तो इन्जिनावरूनउतरून खाली येऊ लागायचा. मग अंडे सावकाश गाडीपासून दूर न्यायला लागायचे. मीनू गाडीच्या बाहेर यायचा. पण त्याला कल्पना असायची की हे आपल्याला पकडणार त्यामुळे अंडे चोरून पळ काढायचा तो प्रयत्न करायचा. कधीही आपल्याबरोबर दगाफ़टका होणार अशी जाणीव झाली तर परत गाडीत जाऊन बसायचा. त्यामुळे त्याला गनिमी काव्याने घरापर्यंत आणावे लागायचे. ते अंडे त्याच्या हाती लागणार नाही पण त्याला वास मात्र येत राहील आशा पद्धतीने धरून त्याला तिसऱ्या मजल्यापर्यन्तच्या पायऱ्या चढत वर घेऊन जायचे. अंडे पुढे, मीनू मागे अशी वरात चालायची.
आशा अनेक मनोरंजनात्मक कसरती मीनू (न आम्ही) केल्या...त्या लिहायला आत्ता वेळ नाहीये...परत वेळ मिळाला की अजून गमती सांगेन...
Note: The kitten in the snap is not Minu but he looked like it.

Sunday, July 12, 2009

प्राण्यांनाही मन असतं!

काल Lab ला जात असताना एका ओळखीच्या आवाजाने माझं लक्ष वेधलं. आवाज मांजरीच्या पिल्लाचा होता. आवाजाचा वेध घेत घेत निघाले न StaffC (Canteen) पर्यंत जाऊन पोहोचले. आवाज छपरावरून येत होता. staff C चं छप्पर एकदम बुटकं असल्याने सम्पूर्ण छपराचा एक scan मारला. तिथे अडगळ सोडून आणखी काहीच दिसलं नाही त्यामुळे तिथून निघणार एवढ्यात परत आवाज आला. आता अगदी निरखून पाहिल्यावर छपराच्या कोपर्याताल्या जाळीखाली काही तरी हलत असल्यासारखं वाटलं. अजून जवळ जाऊं पाहते तर एक अगदी छोटं (एखाद्या महिन्याचं असेल) मांजरीचं पिल्लू दिसलं. सुमारे ५ मिनिटं त्याला हाका मारल्यावर त्याला माझ्या सज्जनपणाची खात्री झाली न ते हळुहळू माझ्या जवळ आलं.
ते अतिशय भुकेजलं होतं. त्याच्या आवाजाची स्थिती पहाता ते खूप वेळापासून असंच ओरडत असणार हे स्पष्ट काळात होतं. शिवाय भूक न भीती ह्यांमुळे ते थरथर कापतही होतं. Canteen मध्ये त्याच्यासाठी आणायला गेले तेव्हा तिथले काका म्हणाले "दोन पिल्लांना इथे कोणीतरी दुपारी सोडून गेलं. एका पिल्लाला कुत्र्याने मारलं न आता हे उरलंय. इथे कुत्री येतात, बोके येतात. लोकं कशाला सोडून जातात इथे कोणास ठाऊक?"
दूध घेऊन गेले. बशीत ओतलं न पिल्लापुढे ठेवलं. त्याला बशीत दूध आहे हेच समजेना. शेवटी हाताच्या तळव्यावर चमचाभर दूध घेऊन हात त्याच्यासमोर धरला. आता त्याला दुधाचा वास आला न त्याने हातावरचं दूध चाटायाला सुरवात केली. असे २-३ चमचे दूध प्यायल्यावर त्याची भूक शांत झाली. Glass मधलं उरलेलं दूध पिऊन टाकण्यासाठी त्याच्या शेजारी बसले. तर ते मांडीत येऊन बसलं न एका मिनिटाच्या आत झोपूनही गेलं... त्याला सुरक्षित वाटत होतं. दूध संपवल्यावर ५ मिनिटं तशीच बसून राहिले. मनात विचार येऊ लागले "पिल्लू स्वतःचं संरक्षण करण्याइतकं मोठं नाही? ह्याच्या आईपसून तोडून सरळ आशा अयोग्य ठिकाणी ह्याला आणून सोडण्याचा निर्दयपणा कोणी कसं करू शकतं? शेवटी तो एक छोटासा जीव आहे. एखाद्या माणसाच्या बाळाला इतक्या सहज कोणी आईपसून दूर करू शकेल? मग प्राण्यान्शी माणसं अशी का वागतात? आता ह्या पिल्लाचं काय होईल?"
मी त्याच्यासाठी काहीही करू शकत नव्हते. एवढ्या मोठ्या IIT मध्ये प्राण्यांसाठी एकही जागा नाही. Hostel वर प्राणी पाळले तर मुलींना ते Unhiegienic वाटतं. अरे स्वच्छतेची फिकिर काय माणसांनाच असते?
एकदा एका अशाच एका पिल्लाला H-12 च्या इथे नेऊन सोडलं होतं. बरेच दिवस होतं ते तिथे. एक दिवस त्याला कुत्र्याने मारल्याचं कळलं. त्या पिल्लाबरोबर त्याची आई असती तर त्याच्या जिवाची तिने काळजी घेतली असती.
अजून एक अनुभव म्हणजे आमच्या हॉस्टलच्या पार्किंगमधे एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आसर्याला येऊन बसायला लागलं. त्या गोंडस पिल्लाला पाहून अनेक मुलींनी येता-जाता त्याला खायला घालायला सुरवात केली. हळु-हळू ते आमच्या हॉस्टल मध्येच २४ तास राहू लागलं, मोठं होऊ लागलं. थंडीच्या काळात खाली मांडलेल्या खुर्चीवर हक्काने येऊन झोपू लागलं. कधी मेस मध्ये घुसू लागलं. आता मात्र मुलींमधली स्वच्छता जागी झाली. हॉस्टल कौंसिल ने फरमान काढलं की हॉस्टलच्या आवारात कुत्र्यांशी खेळताना आढळल्यास दंड भरावा लागेल. अचानकपणे त्या कुत्र्याला कोणी खायला घालेनासं झालं. हॉस्टलच्या परिसरात पाऊल ठेवताच त्या कुत्र्यावर Watchman धावून जाऊ लागला. येणार्या-जाणार्या प्रत्येक माणसाकडे ते कुत्र आशेने पाहत असतं. कोणीतरी आपल्याला खायला देइल, पाठीवरून पूर्वीसारखा हात फिरावेल.
रस्त्यातून एकदा जात असताना एका कुत्र्याच्या जिवाच्या आकांताने ओरडण्याचा मला आवाज आला. पाहाते तर Divider च्या समोर ते कुत्रं पडलं होतं. त्याच्या कम्बरेपासूनाचा सगळा भाग रक्ताबम्बाल झाला होता. त्याच्या अंगावरून गाडी गेली होती न गाडीवाला लक्ष न देता निघूनाही गेला होता. कुत्रं मोठं होतं. माझ्या एकटीच्याने उचललं जाणार नव्हतं. शिवाय मला कुत्र्यांची थोडी भीतीच वाटते त्यामुळे त्याला तिकडून हलवून रस्त्याच्या कडेला आणणे माझ्यासाठी अशक्य होतं. पण हेही स्पष्ट होतं की त्याला तसंच तिथे राहू दिलं असतं तर अजून एखादी गाड़ी अंगावर जाऊन ते मेलं असतं. माझा पाय पुढे हालेना. मी हताशपणे त्याच्याकडे बघत तिथेच उभी राहिले. येणारी जाणारी माणसं त्या कुत्र्याकडे बघून शोक व्यक्त करत पुढे जात होती. शेवटी एक रिक्शावाला थांबला. मी कुत्र्याकडे पाहात असलेलं पाहून त्याने माझ्याकडे कुत्र्याविषयी चौकशी केली. मी सगळी हकीकत सांगताच तो म्हणाला "इथे जवळच लिलाताई परुळेकर ट्रस्टचं कुत्र्यान्चं अनाथालय आहे तिकडे आपण ह्याला नेऊन सोडू." तो कुत्र्याला उचलून घेऊन आला. आम्ही त्याला घेऊन ट्रस्टमध्ये गेलो. लागलीच कुत्र्याला उपचार मिळाले.
"प्राण्यांनाही मन असतं" हे आपण का लक्षात घेत नाही? मांजरी आहे म्हणजे पिल्लं होणार. त्यांना तिच्यापासून तोडून वार्यावर सोडण्यापेक्षा एखादवेळेला तिला पिल्लं होऊ देऊन मग १००० रुपये खर्चून तिचे लसीकरण करून आणण्याइतका शहाणपणा माणसं का वापरत नाहीत? aapaN आत्ता ह्या कुत्र्याला खाऊ पिऊ घातले तर ते कायमचे इथे रहायला लागून पुढे त्यालाच इतरांच्या हाताचा मार खायला लागेल, त्यापेक्षा त्याला स्वतःचा दूसरा मार्ग शोधू दे , ही दृष्टी प्राण्यान्बाबत आपण का ठेवत नाही? माणसांच्या अंगावरून गाडी गेली तर त्यांना हॉस्पिटल मध्ये नेलं जातं (तेहि आता कमी होतंय) पण कुत्र्याचा जीव वाचवावा असं मात्र कोणालाच वाटत नाही.
माणसं माणूसकीने वागायला शिकणार का?

Tuesday, June 16, 2009

Animals are beutiful people!


दुपारची वेळ होती. रस्ता उन्हाने तापला होता . अचानक कुत्र्याच्या पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. आवाज स्वयंपाकघराच्या दिशेने येत होता . पाहायाला गेले तर आई आधीच खिडकीतून आवाजाच्या दिशेने बघत होती . तिने एकअगदी छोटसं कुत्र्याचं पिल्लू मला दाखवलं. बिचारं भुकेपोटी जिवाच्या आकांताने ओरडत होतं. आईनी मला त्याला खाली parking मध्ये नेऊन खायला घालायला सांगितलं.
मी खाली जाईपर्यंत ते ट्रकखाली जाऊन बसलं होतं. मी ट्रकजवळ गेले, बसले, त्याला बोलावलं. पण ते खूपच लहान होतं. मी बोलवायचा प्रयत्न करतीये हे त्याला काही केल्या कळेना. शेवटी आपण आता इयत्ता पाचवीत नाही हे विसरून, पाय गुडघ्यावर टेकून, ट्रकखाली रांगत जाऊन त्याला बाहेर काढलं. कडेवर घेऊन घरी आणलं. खरं म्हणजे एखाद्या पिल्लाला (ते कोणत्याही प्राण्याचं असो) कडेवर उचलून आणणे ही किती अवघड, कसरतीची गोष्ट हे तसा प्रयत्न केलेला माणूसच समजू शकतो. पण ते पिल्लू इतकं थकलं न् भुकेजलेलं होतं की त्याने कोणताच प्रतिकार केला नाही.
त्याच्यासमोर आधी पोळी धरली. हा एक खाद्यपदार्थ आहे असं त्याला अजिबात न वाटल्यामुळे त्याने तोंड गच्च मिटून घेतलं. मग दुधाची बशी समोर ठेवली. त्याने वास घेतला न् हे काहीतरी सेवन करण्याजोगं आहे ह्याची खात्री करून एकदम भसकन बशीत तोंड घातलं. दूध नाकात गेलं. दोन-चार शिंका आल्या. मग बशीच्या कडांना तोंडाने चावून त्यातून काही मिळतंय का ते बघण्याचा प्रयत्न झाला. शेवटी अजून २-४ वेळा बशीत नाक बुडवून झाल्यावर बशीतून दूध कसं प्यायचं हे त्याला समजलं. पोटभर दूध पिऊन झाल्यावर जवळच असलेल्या बादलीच्या मागे ते गेलं, मोठा आळस दिला, न् पुढच्या पायांवर डोकं टेकवून ते झोपून गेलं.

हा सगळा घटनाक्रम माझ्यासाठी अजिबातच नवीन नाही. माझ्या लहानपणापासून आम्ही अनेक मांजरं पाळलेली आहेत . प्रत्येक मांजर घरी आल्यानंतर हाच सगळा प्रकार घडताना पाहिलेला आहे!
त्या पिल्लाला पाहून मला प्रत्येक मांजर घरात कसं आलं? त्याचं नाव आम्ही काय आणि तसं का ठेवलं? त्याच्या गमती-जमती असा सगळा इतिहास आठवला न् हा इतिहास ब्लॉगद्वारे इतरांनाही सांगावा असं वाटलं.
ह्या इतिहासातली पात्रं मोजायची म्हणलं तर संख्या २०-२५ च्या वर जाईल! तेव्हा इतिहास प्रचंड मोठा आहे न् मुख्य म्हणजे शालेय इतिहासासरखा तो कंटाळवाणा नाही :D तेव्हा पुढच्या काही पोस्ट्स मध्ये ह्या माझ्या मित्रांच्या गोष्टी सांगेन.
ज्यांना प्राणी आवडत नाहीत त्यांना Sorry न् एक (धमकीवजा) विनंती: त्यांनी त्या पोस्ट्स अजिबात वाचू नयेत (कारण माझ्या मांजरांबद्दल केलेली कोणतीही वाईट comment अजिबात खपवून घेतली जाणार नाही :D )