परवा आजोबांकडे गेले होते. खूप वर्षांनी गेले. ज्या घरात माझे  सगळे बालपण गेले त्या घरात कॉलेज, आय. आय. टी. अन मग लग्न ह्या गोष्टींमुळे  कित्येक वर्षात पाऊलच ठेवता आले नव्हते. नानांना खूप आनंद झाला होता मी  गेल्यामुळे... पण मी मात्र जुन्या आठवणींनी घायाळ झाले..
     हेच घर..नाना-आजी रिटायर व्हायला आल्यावर त्यांनी हे घर घेतले. आधी  भाड्याची अनेक घरे, मग २ खोल्यांचे छोटेसे घर असा प्रवास करत करत पेशाने  शिक्षक असलेले नाना-आजी आज रिटायर झाल्यावर स्वतःच्या सुटसुटीत अशा तीन  खोल्यांच्या घरात आले. मुळातच आहे त्यात मजेत राहण्याचा स्वभाव असलेल्या  आजीने आता रिटायर होणार म्हणल्यावर तर आणखीच वेगवेगळे प्लान बनवले. घर छान  सजवले. संध्याकाळी बाल्कनीत बसून मोकळ्या हवेचा आस्वाद घेण्यासाठी झोपाळा  बांधून घेतला. घरात मांजरे पाळली. 
     ह्याआधीही आजीकडे काही कमी मजा असायची असे नाही. २ च खोल्यांचे घर होते पण  आनंदाने पूर्ण भरलेले. शनिवारी शाळा सुटली की घरी येऊन जेवायचे न कपड्यांचे  बोचके बांधून सायकलवर बसून सुसाट वेगाने आजीकडे जायचे. एकदा आजीकडे गेले  की काहीही करा, कसेही वागा, कोणी ओरडायला नाही की काही नाही. 
दुपारी आजोबा सगळ्या दारे-खिडक्या-पडदे बंद करून झोपायला जायचे. त्यांच्या घोरण्याचा आवाज एकदा सुरु झाला की आम्ही आमचे उद्योग करायला मोकळे. आजी, मावश्या, मी अन असेल तर दादा असे ओळीने पांघरूण घेऊन आडवे व्हायचो. थोड्या वेळाने आजी झोपली की आमची हळू आवाजात बडबड सुरु व्हायची. फालतू विनोद, पाचकळ गप्पा- गोष्टींना ऊत यायचा. कधी कधी खिदळणे कंट्रोल न झाल्याने हसण्याचा मोठा आवाज ऐकून आजोबांची झोपमोड व्हायची. "झोपा की रे आता का मारू दोन फटके..." असे उगाचच ऐकवून ते परत झोपी जायचे. आमचे उद्योग परत चालू व्हायचे. डोक्यावर पांघरूण ओढून रिमोट कंट्रोलची वेगवेगळी बटणे दाबत लाल दिवा कसा लुकलुकतोय ते पाहत बसणे, एकमेकांना चिमटे काढणे, कागदावर खेळ खेळणे ह्यात अख्खी दुपार निघून जायची. मध्येच भूक लागली की फ्रीजमध्ये डोके खुपसून डोळ्यांना दिसेल तो खाऊ खायचा. आजीच्या फ्रीजमध्ये सरबते, काजुकंद, चॉकलेट्स ह्यांची रेलचेल असायची. अशा पद्धतीने दुपार घालवल्यावर आजी-आजोबांची उठायची वेळ व्हायची. मग उठल्यावर आजी मस्त चहा करायची. मग मावशीने straw ची बाहुली बनवण्यासाठी आणलेल्या straw ढापून त्यांनी चहा पिणे, बशीत चहा ओतून मांजरीसारखे चाटत चाटत दूध पिणे आदि प्रकार निवांतपणे चालत राहायचे.

     संध्याकाळ झाली की आजीचा ठराविक प्रोग्राम सुरु होई. आधी आजी स्वच्छ  हात-पाय-धुवायची. मग खुर्चीत बसून आधी चेहऱ्यावर, मानेवर पावडर चोपडायची.  मग केसांना काजळ लावून त्यांना काळा रंग आणायची. मग मस्त पेपर-पुस्तके वाचत  बसायची. तिचा हा कार्यक्रम चालू झाल्यावर आम्ही खेळायला जायचो. परत येऊन  हात-पाय धुवून, शुभंकरोती म्हणेस्तोवर जेवायची वेळ यायची. आजीची आमटी मस्त  असायची. सर्व पदार्थ स्वैपाकघरातून हॉल मध्ये आणायचे, ताटे-वाट्या-भांडी  घ्यायचे न मग जेवायला बसायचे. हसत-खेळत-गप्पा मारत जेवण व्हायचे. मग  झोपायची तयारी... गाद्या घालायच्या  न लोळायला लागायचे. दिवे मालवले की आजी  भुताच्या गोष्टी सांगू लागायची. भीती वाटून मावशीच्या कुशीत डोके खुपसून  लपून बसल्यावर कधी झोप लागायची ते कळायचे नाही. 
     आजीकडे सकाळी लवकर उठायचे वगरे काही नियम नव्हते. तेव्हा लवकर जाग आली की  लोळत पडायला भरपूर वाव होता. मुळात जाग यायची तीच आजोबांच्या "राजी-मंजी  उठा आता...किती वाजले पहा जरा!" (राजी-मंजी ही माझ्या मावश्यांची टोपण  नावे)...आजोबा ही वाक्ये अनेक वेळा त्याच आवाजात रिपीट करत राहायचे कारण  ज्याला त्याला मनापासून इच्छा झाल्याशिवाय कोणीही उठणार नाही ह्याची  त्यांना खात्री होती. पण अमुक एक वेळ झाली तरी गजर करायचे काम जसे घड्याळ    करते तसे हे वाक्य म्हणण्याचे काम आजोबा दिवसें-दिवस, वर्षानुवर्षे करीत  असत. 
     झोपेतून उठले की आवारा-आवर, स्वैपाक सुरु व्हायचे. Background ला  जुनी गाणी, बहुधा गीता दत्तची, चालू असायची. सैया मिलने आना रे, बाबूजी धीरे चलना, मूड  मूड के ना देख इत्यादी गाणी ऐकली की अजूनही माझ्या डोळ्यासमोर तेव्हाचे वातावरण उभे  राहते. अशा प्रकारे हसत-खेळत-कामे करत पुढचा दिवस सुरु व्हायचा. 
     नंतर नानी-नाना नव्या घरी आले. तिकडे आधी म्हणाले तसा झोपाळाही होता.  मांजरे होती. नवनवीन मित्र-मैत्रिणी होते. मजाच मजा. नानी ही एक फार रसिक  व्यक्ती होती. तिला नाटक-सिनेमे ह्यांची भयंकर आवड होती. अनेक  नाटक-सिनेमांच्या कॅसेटस तिच्याकडे होत्या. ते पहायलाही मजा यायची. तिच्या  ह्या रसिकतेला काळाची मर्यादा नव्हती. जुने सिनेमे, जुनी गाणी, जुने डान्स  जेवढे तिला आवडायचे तेवढेच नवेही. मला आठवतंय तिला प्रभू देवाचा डान्स फार  आवडायचा म्हणून मावश्या, नानी-नाना, मी, दादा आणि आई-बाबा असे डेक्कन  थेटरला जावून "हमसे हे मुकाबला" हा पिक्चरही पहिला होता....
    आजोळी अशीच मजा करत  गेलो. मधल्या काळात माझ्या एका मावशीचे लग्न झाले. तिला मुलगा (अमित) झाला. तिचे  बाळंतपण आजीकडेच झाले. घरात भरपूर खेळणी आली. अमितचे कौतुक करण्यात आणि  काळजी घेण्यात काही काळ गेला. खूप आनंदात दिवस चालले होते. 
     पण सगळेच छान होत राहिले तर ते आयुष्य कसले. तापाचे निमित्त होऊन तब्येतीने  एकदम व्यवस्थित असलेली आजी पंधरा दिवसात गेली. आजोबांचा धीर पूर्ण खचला.  घरात आजोबा न धाकटी मावशी असे दोघेच जण उरले. ज्या घरात लाड करून  घेण्यासाठी जात होते तिथे आजीचे मरणोत्तर संस्कार करण्यासाठी न नंतर  मावशी-आजोबांना मानसिक आधार द्यायला म्हणून राहायला जाण्याची वेळ आली. नंतर  धाकट्या मावशीचेही   लग्न झाले. घरात आजोबा एकटे राहू लागले. घरातली एकेक वस्तू  घराबाहेरची वाट धरू लागली. शो-केस मध्ये तोर्यात मिरवणाऱ्या वस्तूंवर धुळीचे थर  बसू लागले. घर सुने वाटू लागले. 
     आजोबांच्या घरी परवा पाउल टाकल्यावर एवढा सगळा काळ डोळ्यासमोरून झरझर येऊन  गेला. गळा दाटून आला, डोळ्यातले पाणी कधी एकदा बाहेर यायला मिळते याची वाट  पाहू लागले. लग्न झाल्यावर सासरी जाताना रडायचे नाही असे मनाशी पक्के केले  होते तेव्हा ह्या अश्रूंना बांध घालण्याची कला अवगत झाली ती  आज कमी पडली.  हसत-हसत आजोबांना निरोप देऊन बाहेर पडले तशी मात्र डोळ्यातून अश्रूंच्या  धारा वाहू लागल्या. आत्ता मस्त मजेत असलेल्या हिला एकदम झाले तरी काय हे  मात्र अभिजीतला कळले नाही...