Tuesday, October 4, 2011

दिवाळी आठवणीतली

    पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होऊ लागलीये. दिवस लवकर मावळायला लागलाय. हवेतला गारवा वाढतोय. हिवाळा हळू हळू आपले अस्तित्त्व जाणवून देतोय. पेपरमध्ये निरनिराळ्या ऑफर्सच्या जाहिराती येऊ लागल्या आहेत. नवरात्र संपत आले आहे, दसरा दोन दिवसांवर आलाय. दिवालीसाठीचा माहोलच जणू हळू हळू तयार होतोय. उणीव आहे फक्त आपल्या भूमीची, आपल्या माणसाची...आपलेपणाची! त्यामुळेच जस-जशी दिवाळी जवळ येत आहे तसतसे लहानपणी साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या आठवणी मनात गर्दी करतायत.
   दिवाळीच्या दोन-चार दिवस आधीपर्यंत परीक्षा चालू असायची. शेवटचा पेपर बाईंच्या हातात दिल्या क्षणीच "आता दिवाळीची सुट्टी सुरु!" ह्या कल्पनेनेच अंगात एकदम उत्साह यायचा. रिक्षातून घरी जाईपर्यंत सुट्टीत काय काय करायचे ह्याचे प्लान्स तयार व्हायचे. घरी पाऊल टाकल्याक्षणीच आई करत असलेल्या फराळाच्या एखाद्या पदार्थाचा खमंग वास यायचा. आता पंधरा-वीस दिवस तरी दप्तर नावाच्या गोष्टीला हात लावायचा नाहीये असा विचार करत त्याला कपाटात कोंडून टाकताना होणारा आनंद शब्दात वर्णन न करता येण्यासारखा! 
   जेवण खाण झाल्यावर आई परत पुढच्या पदार्थाच्या तयारीला लागलेली असायची. अर्धचंद्राकृती करंजी, गोल लाडू, वेटोळे घालून बसलेल्या सापासारखी चकली, चौकोनी शंकरपाळे आईला करताना पाहून आपणही काहीतरी करून पहावे अशी इच्छा व्हायची. कारटी कधी नव्हे तो काहीतरी मदत करायचे म्हणतीये तर करून घेऊ म्हणून आईही सुरवातीला उत्साहाने मदतीला बसवून घ्यायची. पण पहिल्याच चकली-करंजी-लाडवाची झालेली अवस्था पाहून "एक काम धड करेल तर शपथ... चल जा, मीच करते एकटी" असे म्हणत आई स्वयंपाक घरातून पळवून लावायची. नाही म्हणायला अधून मधून चव घेण्याच्या बहाण्याने स्वयंपाक घरात जाऊन एक-एक करत कितीतरी करंज्या-चकल्या-लाडवांना बघता बघता फस्त केले जायचे.  
   टी. व्ही. वर दिवाळी स्पेशल कार्यक्रमांच्या जाहिराती सारख्या चालू असायच्या. पेपरवाल्या काकांकडे आज कोणता नवीन दिवाळी अंक आला ते पाहण्यासाठी रोज एक चक्कर व्हायची. आमच्यासाठी चंपक, ठक-ठक, प्रबोधन आणि मोठ्यांसाठी साप्ताहिक सकाळ, हेर, धनंजय, नवल, लोकसत्ता असे अनेक फराळाइतकेच खुसखुशीत, खमंग दिवाळी अंक घरात यायचे. चंपक, ठक-ठक मधल्या  वेगवेगळ्या  स्पर्धा फार मनोरंजक असायच्या. पानापानावर कोडी, चित्र रंगवा, चित्रातला फरक ओळख, चित्रातील दिलेल्या अक्षरापासून सुरु होणाऱ्या सगळ्या वस्तूंची नावे लिहा अशा मजेदार खेळांची रेलचेल असायची. प्रबोधनमधल्या स्पर्धा, गोष्टी बुद्धीला चालना देणाऱ्या असत. दर वर्षी वेगळ्या प्रकारचा आकाश-कंदील बनवण्याची कृतीही प्रबोधनमध्ये यायची. आकाश कंदिलाचे साहित्य आणण्यापासून तो तयार होईपर्यंतचा प्रत्येक क्षण उत्साहाने भरलेला असायचा. एवढे सगळे लिहिण्यात किल्ला ही महत्त्वाची गोष्ट बाजूलाच राहिली!
   सकाळ झाली की अंघोळ करून बाहेर पडायचे किल्ला तयार करण्यासाठी. किल्ल्यासाठी दगड-विटा गोळा करून आणायच्या, माती आणायची, पोती गोळा करायची, मावळे-प्राणी विकत आणायचे, वरून पेरायला मोहरी, हळीव घेऊन यायचे, कितीतरी कामे असायची. किल्ला करण्यात इतके दंग होऊन जायचो की तहान-भूक विसरून जायची, चिखलात माखून जायचो. बरेच कष्ट केल्यावर दगडा-मातीचा तो ढीग कसा बसा किल्ल्यासारखा दिसायला लागायचा. मग त्यावर बिया पेरायच्या, रस्ता काढायचा, काच लावून एखादे तळे करायचे. वाघ-सिंह, घागर घेऊन जाणारी बाई, मावळे, तोफा ह्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मांडून, किल्ल्याचे टोक सपाट करून, तिथे पोहोचण्यासाठी थोड्या पायऱ्या करून, शिवाजी महाराजांना तिकडे एकदा बसवले की त्यांना तोरणा सर करून नसेल झाले इतके समाधान आम्हाला व्हायचे. 
   दिवाळीच्या गप्पा फटाक्यांशिवाय पूर्ण होतील कशा? लवंगी, ताज-महाल, लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब, अनार, भुईचक्र, रॉकेट, फुलबाज्यांचे वेगवेगळे प्रकार दरवर्षी निघत असत. फटाक्यांची खरेदी करण्याची मजा औरच होती. कार्यानुभवात उटणे करायला शिकवल्यापासून दिवाळीसाठी उटणे घरी करायचो.सुगंधी तेल, साबण, छोटे आकाशकंदील, नवे कपडे, मिठाई ह्यांची खरेदी करायला मजा यायचीबाबांना कंपनीतून मिळालेला मिठाईचा बॉक्स ते आल्या आल्या उघडून पहायची केवढी उत्सुकता असायची. 
   दिवाळीची तयारी करता करता आलेला उत्साह दिवाळी सुरु झाली की शिगेला पोहोचायचा. वसू-बारस, धनात्रायोदशीपासूनच फटाके फोडायला सुरवात केली जायची. नरक चतुर्दशीच्या दिवशी लवकर उठून उटणे लावून अंघोळ केली जायची. नवीन कपडे घालायचे. आकाशवाणीवर लागलेला शास्त्रीय गायनाचा, भजन-कीर्तनाचा कार्यक्रम सुरेख वातावरण निर्मिती करायचा. असंख्य पणत्यांनी आसमंत उजळून निघायचा. रांगोळ्या घातल्या जायच्या. मग पोटभर फटाके फोडून घरी आल्यावर फराळाचे ताट तयार करून त्यावर ताव मारायचो. मग टी.व्ही. वरचे कार्यक्रम पाहत, दिवाळी अंक वाचत संध्याकाळ कधी व्हायची तेच कळायचे नाही. मग लक्ष्मी पूजनाची तयारी केली जायची. पणत्या आकाश कंदील लावायचो. लक्ष्मी पूजन झाल्यावर परत फटाके  फराळ व्हायचा. पाडव्याला आई बाबांना ओवाळायची आणि भाऊ-बिजेला मी भावाला. ओवाळणीत छान छान वस्तू मिळायच्या. 
   हे सगळे भूतकाळात लिहायचे कारण म्हणजे शाळेत असतानापर्यंत भरपूर वेळ मिळायचा आणि ह्या सगळ्या गोष्टींची मस्त मजा लुटता यायची. पुढे दहावी-बारावीत दिवाळीनंतर लगेच प्रिलिम्सची गडबड होती. नंतर घर बदलले. लहानपणीचे मित्र-मैत्रिणी दूर गेले. फटके उडवणेही  कमी झाले. तरीही बाकीची मजा चालू होतीच. आय. आय. टी. तल्या पहिल्या सेममध्ये आम्हाला दिवाळीची भेट म्हणून प्रत्येक प्रोफेसरने भरभरून प्रोजेक्ट, असाईन्मेंट्स दिल्या होत्या. इतर डिपार्टमेंट्सचे लोक घरी गेल्याने होस्टेल,  डिपार्टमेंट सुने वाटत होते. रस्त्यावरच्या दिव्यांचाच काय तो उजेड. दिवस रात्र मेहनत करून निम्मी दिवाळी संपवल्यावर कसे बसे घरी जायला निघाले तेव्हा गळा दाटून आला आणि दिवाळीची खरी किंमत कळली. पुढची दोन वर्षे परत घरी जाता आले आणि मजा करता आली. मग बंगलोरला आले.  गेल्या दिवाळीत आधी घरी दिवाळसण, मग इंदोरला घरची दिवाळी साजरी केली. पण ह्यावेळी मी फराळ चव घेण्याच्या बहाण्याने फस्त करणाऱ्यांच्या यादीत नसून फराळ तयार करणाऱ्यांच्या यादीत होते. पण त्यातही वेगळीच, मस्त मजा आली. मुख्य म्हणजे सोबत घरातली माणसे होती. सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली. ह्या वर्षी बंगलोरमध्येच आहोत, बघू इथे दिवाळी कशी होतेय..
दिवाळीच्या ह्या पोस्टच्या निमित्ताने खूपच आधी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन ठेवते. ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखाची, आनंदाची, भरभराटीची, आरोग्याची जाओ. तुंबा एन्जॉय माडी! शुभ दीपावली!!