Wednesday, November 16, 2011

बंगलोरचे घरमालक

    तसे बंगलोरमध्ये नव्याने राहू लागलेल्या माणसाला बंगलोरचे लेक, बंगलोरचे लोक, बंगलोरचा आय.टी. व्यवसाय, बंगलोरमधील भ्रष्टाचार, बंगलोरचे ट्राफिक हे आणि ह्यासारख्या असंख्य विषयांवर तासंतास बोलता येईल! इन फॅक्ट, गेल्या वर्षी कधी तरी 'नम्म बंगळूरू' नावाची पोस्ट लिहिली होती त्याच आधारावर बंगलोरचे नवनवीन, वेगळे, मजेदार अनुभव अजून एका पोस्टमध्ये नमूद करून ठेवण्याचा माझा विचारही आहे. पण, बंगलोरमध्ये अशी एक जमात अस्तित्त्वात आहे जिच्याबद्दल लिहायचे तर एक अख्खी पोस्ट लिहिल्याशिवाय तिला योग्य तो न्याय मिळणार नाही म्हणून इतर सगळे सोडून मी लिहायला घेतीये बंगलोरच्या घरमालकांबद्दल! 
    घर शोधायला लागलो तेव्हा घराचे लोकेशन, एरिया, हवा-पाणी-वारा, भाडे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या इथपर्यंतच ह्या विषयावरचे आमचे ज्ञान सीमित होते. पण ह्या सगळ्यांपेक्षाही घरमालक नावाचा प्राणी निरखून घेणे हे किती महत्त्वाचे आहे हे आमच्या पहिल्या भाड्याच्या घराने आम्हाला शिकवले. ते घर आम्हाला मिळाले होते सुलेखातून. तीन मजली घरात मालक मधल्या मजल्यावर आणि भाड्याने द्यायचे घर त्यावरती अशी रचना होती. घर दाखविले ते घरमालकांच्या मुलाने. त्यानेच त्यावेळी करारातले मुद्दे, राहताना कोणत्या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे  कल्पना दिली. मुलगा सेन्सिबल वाटला. त्याने सांगितलेल्या गोष्टीही अगदी सहज पाळण्यासारख्या होत्या. घर छान होते, भाडे पटेलसे होते. घरावर शिक्कामोर्तब केले आणि ठरलेल्या तारखेला राहायला गेलो. "घरमालक बाई" हा काय प्रकार असेल ही कल्पना आम्हाला तेव्हा नव्हती.
     घरात गेलो तेव्हा आमच्याकडे १ गादी, १ कॉम्पुटर, १ टी. वी., कपडे, एखादे पाणी पिण्याचे भांडे-वाटी-ताटली एवढेच सामान होते. बाकीचे सामान अजून यायचे होते. पहिल्या फेरीत इंदोरहून पाठवलेले समान आले. दुसर्या फेरीत पुण्याहून. हे समान म्हणजेही मुख्यतः भांडीच होती. थोडेच सामान होते, बाई खुश होती. पहिल्या दिवशी आमच्याकडे भांडी-कुंडी काहीच नाही हे पाहून तिने आम्हाला जेवणही पाठविले.
थोड्या दिवसांनी आम्ही टी. वी. आणि फ्रीज घेतला. बाईने आम्हाला आधी जेऊ घातल्याने म्हणले जाऊन तिला मिठाईतरी देऊ. बाईच्या हाती मिठाई ठेवतो तोच म्हणे 'इथली मिठाई नका खात जाऊ हा! चांगली नसते, तब्येत बिघडेल.' म्हणालो असेल बुवा आला अनुभव एखादवेळी. परत आलो. आपला आनंद दुसर्याला वाटावा म्हणून मिठाई द्यायला गेलेलो आम्ही स्वतःच्या तब्येतीची चिंता करत परत आलो.
     ह्या काळात मी घरीच होते.  जॉब सुरु व्हायचा होता, वेळ असायचा, त्यामुळे कामाला बाई लावली नव्हती. जॉब सुरु व्हायची वेळ आल्यावर बाईची चौकशी कोणाकडे बरे करावी असा विचार केल्यावर साहजिकच मालकीण बाईंना विचारावे हे डोक्यात आले. बाईला विचारले. चौकशी करते म्हणाली पण म्हणे 'इथे मोलकरणी चांगल्या नसतात, हजार हजार रुपये मागतात आणि काहीच करत नाहीत, मलापण अजूनही मनासारखी बाई मिळालेली नाही' इत्यादी पाल्हाळ तिने ऐकविले. दोन दिवसानंतर विचारले असता म्हणाली 'नाहीच मिळाली कोणी!' मग मी समोरच्या दुकानदाराकडे चौकशी करायचे ठरवले. सकाळी विचारले, संध्याकाळी त्याने बाई पाठवली. ६०० रुपयात काम करणारी, चांगली अशी बाई मला मिळाली. सेल्वी माझ्याकडे मी त्या घरी असेपर्यंत काम करत होती. नंतर मी घर सोडताना जेव्हा घर तपासायला ह्या बाईने पोराला पाठवले तेव्हा त्याने घर फारच स्वच्छ ठेवलेले आहे असा रिपोर्ट तिला दिला. त्यानंतर मी २ दिवस गावाला गेले असताना मालकिणीने ह्या बाईला परस्पर गाठून 'पुढे येणाऱ्या भाडेकरूंसाठी काम करशील का?'  असे आम्ही त्या घरात राहत असतानाच विचारून ठेवले. हा एवढा सगळा खटाटोप करण्याचे कारण: तिने तिच्या अविश्वासू स्वभावामुळे आजपर्यंत बाई लावलेली नव्हती, चांगली बाई शोधण्याची तिची इच्छा नव्हती, पण आम्ही शोधलीच आहे, काम चांगले आहे, आपले घरही चांगले राहील आणि पैसे पुढेच्या भाडेकरुच्याच खिशातले जातील म्हणाल्यावर फायदाच आहे म्हणल्यावर माझ्याच घरी काम करणाऱ्या बाईशी माझ्या अपरोक्ष मी गेल्यानंतरचे काम करण्याबद्दल चर्चा करायलाही ह्या बाईला काही वाटले नाही.
     पुढे आम्ही घरी ओव्हन आणला. दुकानात डिलिव्हरी बॉय नसल्याने घराच्या पहिल्या पायरीपासून तिसर्या मजल्यापर्यंत अभिजीत तो अवजड ओव्हन कसा बसा वरती नेत होता. एकतर बंगलोरमध्ये जुन्या घरांचे जिने असतात जेमतेम १.५ फुट रुंदीचे. त्यातून त्या ओव्हनसाठी वाट काढत, ओझे सांभाळत वरती जाणारा  अभिजीत आणि मागून त्याचा तो सगळा गोंधळ पाहून जरा जीव मुठीत धरून जाणारी मी अशी आमची वरात दुसर्या मजल्यावर पोचते तोचर बाईच्या घराचे दार उघडले गेले, बाईने डोके बाहेर काढले, म्हणाली, "ओव्हन आणि गिझर एकत्र चालवू नका हा! वायरिंग उडेल!" आता ह्या क्षणी आमच्या मनातल्या ओव्हन सुखरूप घरी पोचण्याविषयीची काळजी, नवीन ओव्हन घेतल्याचा आनंद इत्यादी भावनांची जागा आपल्या ओव्हनमुळे  ह्या बाईच्या घराचे वायरिंग उडायला नको ह्या नवीन काळजीने घेतली. त्या बाईचे बोलणे असे असायचे की अशी काळजी वाटताना आपण इंजिनियर आहोत, असे ओव्हनमुळे वायरिंग उडत नसते हेही आम्ही क्षणभर विसरून गेलो. 
   ओव्हन घेतल्यानंतर ह्या बाईने अजून एक हिट दिली. विजेचे बिल येईस्तोवर थांबली. ओव्हन घेतल्यावरही ह्यांचे बिल जुन्याएवढेच आले आहे  ही खात्री करून घेतली. बिल तेवढेच आहे ह्याअर्थी  ओव्हनचा वापर फारसा करत नाहीयेत. म्हणजे ह्यांच्या ओव्हनचा घराला काही धोका नाही ह्याची खात्री केली. बिल देताना म्हणाली; "बिलमध्ये फरक झालेला नाहीये तुमच्या ओव्हनमुळे, पण कसंय हल्लीच इलेक्ट्रीकल डिपार्टमेंटने नवे नाटक सुरु केले आहे. लोकांच्या घरी चेकिंग केले जाते. वीज बिल कितीही असो, त्यांनी ठरविलेल्या लिमिटच्या पलीकडे तुमच्याकडे जास्त अप्लायन्सेस असतील तर ते दंड लावतात. " मनात म्हणाले "आवरा हिला! पहिलीतल्या मुलाला जाऊन असले बावळटासारखे काहीतरी सांगितले तरी तोही ऐकून घेणार नाही आजकाल." पण घरमालकीण आहे उगाच कशाला कटकट ओढवून घ्यायची म्हणून आम्ही काही बोललो नाही दुर्लक्ष केले.
     पुढे आमच्याकडे दिवाण आला तेव्हा ह्या बाईने तो घरी आणताना  तिच्या घराला काही इजा तर नाही ना झाली ह्यासाठी शोधमोहीमच हाती घेतली होती. जसजसे समान वाढू लागले तसतसे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस कशी काही उपयोगाची नसतात, घरात फर्निचर वाढले की धूळ होऊन अस्थमा वागरेची भीती कशी वाढते ह्याविषयी अनेकदा ह्या बाईने मला रस्त्यात गाठून लेक्चर दिले. हे सगळे का तर, घरात फर्निचर वाढवले असते आणि नीट काळजी घेतली नसती तर हिचे घर खराब झाले असते. शिवाय अप्लायन्सेस मुळे वायरिंग जाळायची भीती वेगळी. आम्ही आणत असलेले समान हे आमच्या सोयीसाठी नसून तिच्या घराला नुकसान करण्यासाठीच मुद्दाम घेतोय असे तिच्या वागण्यामुळे कोणालाही वाटावे असे ही बाई वागू लागली
    आम्हाला घर आवडत होते. शिवाय इतर काही प्लान्समुळे केवळ बाईच्या कटकटीमुळे शिफ्टिंग वगरेचे कष्ट घेण्याची तेव्हा आमची इच्छा नव्हती म्हणून आम्ही बाईने कितीही बडबड केली तरी दुर्लक्ष करायचे ठरवले. शिवाय आपण स्वच्छ राहतोय, घर नीट ठेवतोय, वीज-पाणी नीट वापरतोय हे पाहून आपोआपच ती बडबड बंद करेल असेही आम्हाला वाटले. पण नाही. घरात राहून ८-१० महिने झाले तरी बाईची बडबड सुरूच.
कपडे वळत घालण्यासाठी बाईने गच्चीवर दोर्या टाकून दिलेल्या होत्या. तिच्या सांगण्यावरून आम्हीही कपडे तिथेच वळत घालत होतो. पण मार्चमध्ये सततचा पाऊस चालू होता (बंगलोरमध्ये कधीही पाऊस पडतो.) म्हणून काही दिवस आम्ही घरातील स्टॅंडवर कपडे वळत घालत होतो. ह्या बाईने महिनाभर निरीक्षण केले की कपडे गच्चीत दिसत नाहीत, त्याअर्थी घरी वाळत घातले जातायत. ती एक दिवस विचारात आली. आम्ही घरी घालतोय म्हणालो असता म्हणे "घरी कपडे वाळत घालायचे नाहीत. भिंतीला ओल येते. बुरशी लागते." आता हे ऐकून मात्र आम्हाला किळस वाटली. माझ्या मते, दुसर्याचे घर म्हणून नाही तरी किमान आपण राहतोय ते घर आणि आपले आरोग्य पाहून तरी माणूस भिंतीला ओल येईल आणि बुरशी येईल असे काही करणार नाही! किती आणि काय काय ऐकून घ्यायचे ह्याची लिमिट झाली होती. आम्ही घरात काय विकत घेतले, फर्निचर काय आहे, अप्लायन्सेस काय आहेत, आम्ही कपडे कुठे वळत घालतो हे सगळे ही बाई पाहणार, का तर घरमालक आहे. महिना दहा हजार भाड्यात हिने आम्हाला विकत घेतलेय असे मला वाटले. आता मात्र मी तिला म्हणाले, "तुम्ही घर चेक करा. काही ओल आलेली नाही. घराला कुठे काहीही नुकसानही झालेले नाही. आम्ही चांगल्या घरातून आलेले आहोत. तुम्ही सारखी असली विचारपूस, सूचना करत असता ते आम्हाला आवडत नाही. घर कसे ठेवायचे ह्याचे संस्कार आमच्यावर आमच्या आई-वडिलांनी केलेत."   बाईला काही बोलता येईना. पाय आपटत ती खाली निघून गेली. आता आपल्याला ह्या घरातून हलावे लागणार ह्याची आम्हालाही कल्पना आली. अपेक्षेनुसार बाईने वन-मंथ नोटीस धरून पुढच्या महिन्यात घर खाली करण्याचे फर्मान काढले. घर सोडण्याच्या दिवशीपर्यंत आणखीही अनेक मजेदार किस्से झाले ज्यांच्याबद्दल लिहावयास घेतले तर अजून एक वेगळी पोस्ट तयार होईल. पण दुसरी घरे शोधताना सापडलेले घरमालक आणखी मनोरंजक गप्पा मारत असल्याने आपण मोर्चा तिकडे वळवू.
     आम्ही घर शोधायला लागलो. ज्येष्ठ महिना चालू होता (हे आम्हाला आम्हाला नव्याने शोधात असलेल्या घरांच्या मालकांमुळेच कळले!!). सुलेखावरून चौकशी करण्यासारखे एक घर दिसले. फोन केला, घराची चौकशी करायची आहे असे म्हणाले. मालक म्हणे "कधी हवे आहे घर तुम्हाला?" म्हणाले "पुढल्या महिन्यात.." तिकडून आवाज आला "हिंदू ना तुम्ही? (आश्चर्याच्या सुरात)." आता हा प्रश्न ऐकून मी गेल्या वाक्यात काहीतरी भयंकर म्हणाले की काय हे आठवू लागले. मालक म्हणे "अहो आषाढ लागतोय पुढच्या महिन्यात." मी म्हणाले "पण आम्हाला पहिले घर सोडायचे असल्याने पुढच्याच महिन्यात शिफ्ट व्हावे लागणार आहे."  "नाही तुम्ही श्रावण लागला की या!" "अरे! ह्यांनापण आवरा!" असे म्हणावेसे वाटले. आम्हाला पुढच्याच महिन्यात घर हवे असल्याने पुढे बोलण्यात अर्थच नव्हता. नंतर २-४ वेळा अनुभव आल्यावर असे लक्षात आले की इथे आषाढ महिना कोणतीही नवी गोष्ट करण्यास शुभ मानला जात नाही. आता बंगलोरमध्ये घराची जाहिरात दिली की घर जास्तीत जास्त एका महिन्यात जातेच इतकी डिमांड आहे. शिवाय घर ज्याला भाड्याने घ्यायचे असते त्याही माणसाच्या हाती एका महिन्यापेक्षा जास्त बफर नसतो. कारण तो एकतर बंगलोरमध्ये नवा तरी असतो किंवा जुने घर सोडायचे असते त्यामुळे वन-मंथ नोटीस पिरीयडमध्ये तो घर शोधत असतो. ह्या हिशोबानुसार आषाढात घर द्यायचे नव्हते तर ह्या लोकांनी जाहिरातीच द्यायला नको होत्या.
     पुढे आणखी एक घर पाहायला गेलो. मी जीन्स मध्ये होते, कपाळाला टिकली नव्हती. अभिजीतनेही फ्रेंच कटसारखी थोडी दाढी ठेवली होती. घराच्या बाहेर मालकाची वाट पाहत उभे होतो. आम्हाला पाहून लांबूनच मालक म्हणे "हिंदू ना?" परत तेच! आम्ही "हो" म्हणालो. "नाही, ह्या बाईंच्या कपाळावर कुंकू नाही, तुमचीही दाढी वाढलेली. मला वाटले की मुसलमान आहात की काय?" परत "आवरा" असे झाले. "आम्ही असेच राहतो" असे म्हणालो, ह्यावर "असू द्या! हरकत नाही!" असे तो म्हणाला. (म्हणजे आता बंगलोरसारख्या शहरातही आम्ही कसे राहतो हेही मालक तपासणार!) "बाकी तुमचे लग्न वगरे खरेच झाले आहे ना? मी लग्नाचे सर्टीफिकेट वगरे चेक करतो बरे का! आजकाल काही सांगता येत नाही. लोक आपले खोटे खोटे नवरा-बायको म्हणून येतात. कसेही राहतात. उद्या माझ्या घरात नवरा बायकोचा खून करून जाईल. मला प्रोब्लेम येईल ना!" आम्ही परत आवक. आता अशी काळजी वाटणे चुकीचे नाही. पण समोर उभी असलेली माणसे कशी दिसतायत, त्यांच्यासमोर काय बोलावे इत्यादी तरी ताळमेळ राखावा. मागितले असते तर दाखवले असते ना सर्टीफिकेट पण त्यासाठी खून इत्यादी इत्यादी बोलायचे म्हणजे जरा फारच झाले नाही का? म्हणजे आधीची मालकीण बाई फक्त तिच्या घरात आम्ही काय नेतोय-आणतोय हे पाहत होती. हा बाबा तर रोज सकाळी संध्याकाळी चेक करेल की आम्ही दोघही जिवंत आहोत ना. ह्या माणसाने पुढे त्याने हे घर कसे बांधले, किती कष्ट आणि विचार त्यामागे आहेत, पूर्वेला पाणी असल्याने इथे राहून यु. एस. ला  जायचा योग कसा येतो, आधी इथे राहून गेलेले लोक कसे सगळे आता यु. एस. ला गेलेत, माझ्या मुलांना मी कसे सगळ्यांसारखे कॉम्पुटरला न घालता वेगळ्या शाखांना घातलेय इत्यादी अनेक गोष्टींवर न विचारताच व्याख्यान दिले. आधीच्या बाईची बडबड ह्याच्यापुढे कमी वाटू लागली. घर खूप छान असून आणि बाकी सगळे पटत असून हा बाबा बडबड करून करून नको जीव करेल ह्या कल्पनेने आम्ही त्या घरावरही फुली लावली.
     ह्या सगळ्या अनुभवांनंतर घराच्या क्रायटेरियामध्ये 'सेन्सिबल घरमालक' हाही नवा मुद्दा आम्ही जोडला. थोड्याच दिवसात अजून एक घर सुलेखावर सापडले. घर पहिले, आवडले. घरमालकाशी बोललो. तोही नशिबाने सेन्सिबल वाटला, साधारण ३०-३५ चा सॉफ्टवेयर इंजिनियर होता. आधीच्या अनुभवावरून आम्हीच त्याला प्रश्न विचारले "घर कसे ठेवावे ह्याबद्दल तुमच्या अपेक्षा काय अपेक्षा आहेत? घर दिल्यावर तुमचा कितपत हस्तक्षेप असेल? " आम्ही विचारलेले हे प्रश्न पाहून तो सेन्सिबल माणूस चाट पडला. "हे लोक असे प्रश्न का विचारतायत?" असे भाव त्याच्या चेहऱ्यावर आले असता आम्ही त्याला आमचा आधीचा अनुभव सांगितला तेव्हा ते सगळे ऐकून तो हसायला लागला. "तुमचेच घर आहे असे समजून तुम्ही माझे घर वापरा, म्हणजे आपोआपच नीट राहील." असे त्याचे उद्गार ऐकून आम्हाला हायसे वाटले. आणि बाकीचे मुद्दे+सेन्सिबल घरमालक असे सगळे क्रायटेरीया पूर्ण झाल्याने आम्ही ह्या घरावर शिक्कामोर्तब केले. आता दर महिन्याला एकदा ऑनलाईन  भाडे भरणे ह्यापलीकडे आमचा घरमालक ह्या प्राण्याशी अजिबात संबंध येत नाही. ह्यासाठी आम्ही परमेश्वराचे आभारी आहोत.
    (पोस्टमध्ये मी जे लिहिले आहे ते माझ्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारित आहे. बंगलोरमध्ये भाड्याने घर शोधणार्यांना माझ्या अनुभवावरून काही शिकता यावे आणि बाकीच्यांना मजेदार अनुभव वाचायला मिळावे हाच ह्या पोस्टचा हेतू आहे. कोणत्याही भाषा-विभाग-धर्मावरून कोणताही मतभेद करण्याचा ह्यामागे कोणताही हेतू नाही.काही लोकांना चांगले घरामालकही इथे मिळतात. शिवाय पुण्याबाहेरून येणाऱ्या लोकांचे पुण्यातील घरामालकांविषयी असे मत असू शकते ही शक्यताही नाकारता येत नाही आणि त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही (ही टीप पुण्याचा राग येणाऱ्या लोकांसाठी)).