अगदी परवा-तेरवापर्यन्त उकड-उकड उकडत होते. रोज ढग येत होते आणि न बरसताच परत जात होते. शेवटी "येतोय येतोय" म्हणता म्हणता काल पाऊस आला खराच. मातीचा गंध सर्वत्र दरवळू लागला, हवा थंड झाली. ओले रस्ते, ओली झाडे, हवाही ओली! नेहमीच हवाहवासा वाटणारा पाऊस बंगलोरला नेहमीप्रमाणे मेमध्येच दाखल झाला.
सकाळी कॅबने जाताना बाहेर असेच पावसाळी वातावरण होते. खिडकीतून बाहेर पाहता पाहता मन पोचले भूतकाळात, गेले एकदम शाळेच्या दिवसांत.
शाळेची आणि पावसाची सुरवात तशी एकत्रच व्हायची. शाळा सुरु होंण्याआधी पुस्तके, दप्तरे, यूनिफ़ॉर्म रेनकोट वगैरेची खरेदी व्हायची. नव्या कोऱ्या वह्या-पुस्तकांचा, यूनिफ़ॉर्मचा दप्तराचा हवासा वास, पावसाने हवेला आलेला ओलसरपणा, सकाळची शाळा, शाळेत जाता जाता पावसात हलकेसे भिजल्याने वाजणारी थंडी, ओली दप्तरे, ओले बाक, उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीनंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींशी खूप दिवसांनी मारलेल्या गप्पा, सगळे काही पावसात चिंब भिजलेले.
प्रत्येक विषयाच्या सगळ्यात पहिल्या तासाच्या सुरवातीला वहीवर नाव घालणे, श्री लिहिणे हा कार्यक्रम! वर्गशिक्षक कोण असणार, इतर विषयांना कोणते शिक्षक असणार अशा प्रश्नांनी तयार झालेला सस्पेन्स, धडे कोणते, किती अवघड असतील, काय काय शिकावे लागेल ह्याची लागलेली उत्सुकता, आजही हे सगळे जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहते.

प्रत्येक विषयाचे पहिले काही धडे तर जणू पावसातच भिजलेले असायचे. बाई शिकवत असायच्या आणि मागे पाऊस नेपथ्य आणि पार्श्वसंगीत द्यायचा. परीक्षेच्या वेळी अभ्यास करताना हे धडे वाचायला लागले की जणू काही आत्ताही पाऊस पडतोय असा भास व्हायचा. किंबहुना अजूनही, काही धड्यांची, मुख्यतः मराठीच्या, आठवण आली की सोबत पावसाचा भास होतो.
शाळेत जाता-येता पाऊस पडत असेल तर रिक्षावाले काका रिक्षेचे पडदे खाली सोडायचे. पडदे असूनही सगळ्यात कडेला बसणारी मुले ओलीच व्हायचीच . जी आत बसलेली असायची तीही बाकी भिजलेल्या मुलांमुळे, ओल्या दप्तरांमुळे ओली व्हायची. पुस्तकांनाही प्लास्टिकच्या पिशवीचा रेनकोट घालायला लागायचा. सगळे काही ओलेचिंब!
पावसामुळे संध्याकाळी बऱ्याचदा पार्किंगमध्येच खेळायला लागल्याने भेंड्या, दम शराझ आशा बैठ्या खेळांवरच समाधान मानावे लागे. कधी कधी मात्र भर पावसात पळापळीचे खेळही खेळायलाही मजा यायची. कधी बिल्डींगसमोर साचलेल्या डबक्यात होड्या करून सोडण्याचे उद्योग चालायचे. एकदा एका मुलाच्या काय डोक्यात आले, त्याने डबक्यातली गांडुळे पकडून बाटलीत भरून ठेवण्याचा उद्योग चालू केला. तशी सरपटणार्या प्राण्यांची मला येते किळस पण तेव्हा कसे कोण जाणे धैर्य करून एक गांडूळ मीही हातात धरून बाटलीत टाकले. एकानंतर दुसरे, दुसर्यानंतर तिसरे, म्हणता म्हणता गांडुळे पकडून बाटलीत भरून ठेवण्याचा छंदच सगळ्यांना लागला. तो प्रकार आम्हाला अगदी कंटाळा येईस्तोवर आम्ही केल्याचे मला स्मरते.
पुढे सायकलने शाळेत जाऊ लागल्यावर मात्र आपण घरी येत-जात असताना पाऊस पडण्यापेक्षा बाकी वेळीच पडावा असे वाटायचे. रेनकोट वगरे घातले तरी भिजायला व्हायचेच, बूट मोजे हमखास भिजायचेच. आणि मग दिवसभर तसेच भिजलेले बसायला अगदी नकोसे वाटायचे.
असाच हा पावसाळा चालू असताना यायचा श्रावण! श्रावण म्हणले की घरोघरी निरनिराळी व्रत-वैखाल्ये आणि पूजा चालू व्हायच्या.सणावाराला पक्वान्ने तयार व्हायची. हाताला मेहंदी लागायची. एका हातात छत्री धरून पूजेला लागणारी फुले गोळा करायचे कसरतीचे काम माझ्याकडे यायचे. अत्तर-उद्बत्यांच्या, पक्वान्नांच्या, मेहंदीच्या सुवासात मातीच्या आणि फुलांच्या सुगंधाची भर घालून पाऊसही आमच्या आनंदात शामिल व्हायचा.
तोतापुरी आंबे, भाजलेली कणसे, गरमा-गरम भजी, वाफाळलेले सूप आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीला पाऊस!!! कल्पनेनेच किती मस्त वाटते. एखाद्या पावसाळी संध्याकाळी, उबदार गादीवर बसून, एकीकडे पुस्तक वाचत, भुरक्या मारत प्यायलेले सूप; बाहेर धो धो पाऊस चालू असताना, अंग भिजल्याने कुडकुडत, सिंहगडवरल्या झोपडीत बसून खाल्लेल्या झुणका-भाकरीची, आणि कांदा भाजीची चव; पाऊस पडत असताना बाल्कनीत बसून मिटक्या मारत खाल्लेल्या तोतापुरी आंब्याच्या फोडी; ह्यांनी दिलेला आनंद कितीही पैसे मोजले तरी न मिळणारा!
पुढे कॉलेजमध्ये पावसाने मजा आणली ती कॉलेजच्या बोट-क्लबवर! लेक्चर्स संपली की मस्त बोट-क्लबवर जाऊन बसायचे. तिथल्या झाडांवरून पाणी टप-टप ओघळणारे थेंब पलीकडे वाहणाऱ्या नदीत गोलाकार नक्षी रेखताना पाहून मन प्रसन्न व्हायचे. अशा चिंब वातावरणात चहा-कॉफी पीत, गप्पा मारत तास-दोन तास कसे सरायचे कळायचे नाही.
पुढे आय. आय. टी. त गेल्यावर पावसाचे वेगळे रूप पाहिले. डोक्यावर बादली ओतल्यासारखा पाऊस अक्षरशः कोसळत असायचा. एकदा आला की जायचे नाव नाही, २-३ दिवस सलग पडत राहायचा. छत्री फक्त शोसाठी म्हणून न्यायची. तिचा उपयोग शून्य होता. पावसात डिपार्टमेंटला जाताना निम्मे शरीर भिजायचेच. तसेच अर्धवट भिजून लेक्चरला जाऊन बसायचे, मग कामासाठी lab मध्येही तसेच ओले बसायचे. सगळी नुसती चिक-चिक! पण cafe shack च्या समोरच्या पायऱ्यांवर बसून गरमा-गरम maggi noodles आणि सूप खायला जी काही मजा यायची त्याला काही तोड नाही! पाऊस पडत असताना लक्ष्मीत बसून आधी मंचाव सूप, मसाला पापड आणि नंतर डाल-खिचडी खायला मस्त वाटायचे.
बंगलोरमध्ये पाऊस आल्हाददायक.. खूप धो-धो वगरे पडत नाही. पण साधारणपणे वर्षातील दहा महिने सतत पडत राहिल्याने "अतिपरिचयात् अवज्ञा" अशी तऱ्हा होते. पण सध्या बोलायचे तर इतर ठिकाणी कडकडीत उन्हाळा चालू असताना बंगलोरमध्ये मात्र मस्त हवामान आहे, एकदम रोमॅंटिक म्हणतात ना तसे! रिमझिम पावसात मस्त सूप, भजी, किंवा गरमा-गरम पॉप कॉर्न खात बाल्कनीत खुर्ची टाकून बाहेर बघत बसावे असे. तेव्हा आता बोलण्यात जास्त वेळ न दवडता पावसाची मजा घेण्यासाठी तुमची रजा घेते. हा पावसाळा सर्वांना मजेचा, गरम-गरम चहा, कॉफ़ी आणि भज्यांचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना!