Sunday, June 24, 2012

कर्जतची वारी

    फार पूर्वीची गोष्ट आहे. १०-१२ वर्षांची असेन. माझी मावशी तेव्हा कर्जतच्या कॉलेजमध्ये शिकवत असे. कॉलेजला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की कॉलेज सुरु होईस्तोवरचे १-२ महिने तिला अधून मधून नुसती सही करायला कॉलेजला जावे लागायचे. माझ्याही सुट्ट्या चालू असल्याने ती मला कधीतरी सोबत घेऊन जायची. एक दिवस फुल टाईमपास!
    कर्जतला पहिल्यांदा जाताना मावशीने माझ्यासाठी ७ रुपयांचे ट्रेनचे तिकीट घेतल्याचे आठवते. साधे २ की.मी.वरील शाळेत जाण्यासाठी २.५-३ रुपयांचे तिकीट आणि एवढ्या लांब असलेल्या कर्जतला जायला फक्त ७ रुपयांचे हे पाहून मला तेव्हा खूपच आश्चर्य वाटले होते. तसे ट्रेनने आम्ही फार जा-ये करत नसल्याने ट्रेनची भाडी ही अंतरांच्या मानाने अशीच असतात ह्याची मला कल्पना नव्हती.
ट्रेनमध्ये बसले की गिरणी चालू व्हायची. दाणे खा, भेळ खा, सरबत प्या. कर्जतच्या ट्रेनमध्ये एक कुल्फीवाला मावशीच्या ओळखीचा होता. त्याच्याकडे फार मस्त मलई कुल्फी मिळायची. योगायोगाने तिचीही किंमत ७ रुपयेच होती (त्यामुळे अजून लक्षात आहे) आणि चव अप्रतिम होती. इतक्या वर्षांत फार कमी वेळा तशी कुल्फी खायला मिळाली आहे.
    वाटेत येणारी स्टेशने मोजत, त्यांचा क्रम लक्षात ठेवत, काहीतरी कागदावरच खेळ खेळत आमचा वेळ मस्त जायचा. मावशीला ट्रेनची रोजची सवय असल्याने ती आणि मी ट्रेनच्या दारात बसूनही बाहेरच्या देखाव्याची आणि थंडगार वाऱ्याची मजा घ्यायचो. कर्जतच्या स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या दिवाडकरांच्या वड्यावर तव मारायचो. स्टेशनाच्या दाराशीच पानांच्या द्रोणांमध्ये जांभळे, करवंदे, कैरीच्या तिखट-मीठ लावलेल्या फोडी विकणाऱ्या कातकरणी असत. जांभळे-करवंदे मिटक्या मारत खात आम्ही कॉलेजचा रस्ता पकडायचो.
रस्त्याच्या बाजूने छोटी कौलारू घरे, नारळाची झाडे, छोटे नाले, नदी असे एकेक करून पार पडत कॉलेज गाठेपर्यंत गावात मावशीच्या ओळखीचे सोबतीचे शिक्षक, विद्यार्थी, प्यून अशी कितीतरी माणसे भेटायची. मावशीला उत्सुकतेने "ही कोण?" असे विचारायची. आपल्याला अचानक भाव मिळतोय हे पाहून मलाही जरा स्पेशल वाटायचे. कॉलेजमध्ये सही करणे ह्या मुळच्या कामाला जेमतेम ५ मिनिटे लागायची. सही झाली की परत स्टेशनाची वाट धरायचो. वाटेत एक नॉव्हेल्टीचे दुकान होते. तिथून मावशी नेहमी माझ्यासाठी बांगड्या, गळ्यातली, कानातली असे काहीतरी घेऊन येत असे. ह्या ट्रीपलाही माझ्या आवडीची एखादी वस्तू खरेदी केली जात असे. अशाच एका ट्रीपला मावशीच्या मैत्रिणीने जेवायला घरी बोलावून प्रेमाने जेऊ घातल्याचे मला आठवले. ह्यावेळी खाल्लेल्या तिच्या घरच्या काजूंची चव अजूनही माझ्या ओठांवर आहे.
    कसली घाई-गडबड नाही, खर्चाची-वेळेची चिंता नाही, स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल शंका नाही. सर्व प्रकारच्या चिंता सोबतच्या मोठ्या माणसावर टाकून केवळ आयुष्य एन्जॉय करण्याचे सुख लहानपणीच मिळते नाही!

Wednesday, June 6, 2012

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला शिमोगा

     मेमध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कुठेतरी फिरायला जावे असे आमचे ठरले. "कुठे जावे?", विचार सुरु झाला. शिमोग्याबद्दल बरेच ऐकले होते. "शिमोग्यालाच जाऊया मग!", आम्ही ठरवून टाकले. शिमोगा हा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यात जोग फॉल्स, अगुंबे वगरे बरीच पर्यटन स्थळे आहेत. आमच्याकडे दोनच दिवस होते. आधीच्या होम स्टेजच्या सुखद अनुभवामुळे राहण्यासाठी होम स्टेच पहायचा हे नक्की ठरलेले होते. शिवाय फार धावपळ न करता निवांत वेळ घालवावा अशी आम्हा दोघांचीही इच्छा होती. त्यामुळे आधी जागा निवडून मग होम स्टे शोधण्याऐवजी आधी चांगलासा होम स्टे शोधून मग जागा फायनलाइझ  करूया असे ठरले.
नेहमी प्रमाणे ब्लॉग्सच्या मदतीने शिमोग्याचा अभ्यास सुरु झाला. दर, एकंदरीत सोयी, रिव्यूव्ज ह्यांची चाळणी लावून अनेक होम स्टेजपैकी ३-४ होम स्टेजना शॉर्टलिस्ट केले. त्यांच्या मालकांशी झालेल्या टेलिफोनिक इंटरव्यूतून  'कोळवारा हेरीटेज होम स्टे' ची निवड केली गेली. बुकिंग झाले. बंगलोर-कुप्पळ्ळी ह्या रात्री १०.३० ला निघणाऱ्या बसचे बुकिंगसुद्धा झाले.
    पाहता पाहता जायचा दिवस उजाडला. ऑफिसची कामे आटोपून धावत पळत घरी आलो. औक्षणाचा कार्यक्रम पार पडला. जेऊन मॅजेस्टिक गाठले. आमची बस स्लीपर होती. के. एस. आर. सी. टी. च्या इतर बसेसप्रमाणेच ही बसही कम्फर्टेबल होती. छान झोप लागली. सकाळी ६ ला कुप्पळ्ळीच्या अलीकडे असणाऱ्या गडिकलला आम्ही पोहोचलो. तिथून होम स्टेला आम्हाला न्यायला होम स्टेचा मालक निश्चल आला होता. गडिकल  ते कोळवारामध्ये साधारण ७-८ कि. मी. चे अंतर आहे. रस्ता मस्त होता. छोटासा रस्ता, दोन्ही बाजूला नारळ-सुपारीच्या बागा, साहजिकच कोकणाची आठवण झाली.
     'कोळवारा हेरीटेज होम स्टे'  ही जागा अप्रतिम होती. मुळात १०४ वर्षे जुने असलेले हे घर त्या लोकांनी छान जतन केलेले आहे. कौलारू, लाकडी वासे असलेले घर, मध्ये अंगण, बाजूला पडवी, पडवीला लागून खोल्या...पण कुठेही भिंतीला एक पोपडा गेलेला नाही. भिंती पांढऱ्या रंगाने व्यवस्थित रंगवलेल्या, वाश्यांना साजेसे पॉलिश लावलेले! विजेच्या वायर्सही भिंतीवरून  न घेता वाश्यांवरून घेऊन त्यांना वाश्यांच्याच रंगाचे पॉलिश लावलेले असल्याने घराच्या सौंदर्यात कुठेही बाधा येत नव्हती. घरात फर्निचरही जुन्या पद्धतीचे पण चांगले दणकट होते.
कोळवारा हेरीटेज होम स्टे
 
घराच्या बाजूने कोकणासारखी नारळ-सुपार्यांची बाग. शिवाय घराभोवती असंख्य कुंड्यांतून रंगीबेरंगी फुलझाडे, शोभेची झाडे, बोन्साय कलात्मकतेने मांडलेली.  बागेत छोटी तळी, करंजी, दगडी टेबले आणि त्यांना लावलेल्या गवताने शाकारलेल्या छत्र्या..एका बाजूला जेवणासाठीचा ओपन हॉल. त्यात अनेक टेबले, टी. व्ही., वर्तमानपत्रे, कॅरम, डार्ट गेम,  लहान मुलांची खेळणी इत्यादीची सोय होती. तिथे टेबल टेनिसचीही सोय होती.
वडाचे  बोन्साय

जेवणाची जागा

 बागेत मागच्या बाजूला छोटासा नैसर्गिक तलाव आहे. पुढे जाऊन छोटा धबधबा आहे. पावसाळ्यात तलावात कोरॅकल (एका प्रकारची बोट) राईडची सोय केली जाते. बागेतच कॅम्प फायर ची सोय आहे. कोणाला रात्री तंबूत झोपायचे असेल तर तंबूही बांधून ठेवलेला आहे. अशाप्रकारे जुन्या-नव्याचा सुरेख संगम असलेला हा होम स्टे आम्हाला पाहता क्षणीच फार आवडला.
     आम्हाला मिळालेली खोलीही छान होती. छोटीशी, लाकडी दारे-खिडक्यांची, पुण्याच्या आजीच्या घराची आठवण आली. फ्रेश झाल्यावर गरमा गरम कॉफीवर तुटून पडलो. मग जवळच्याच एका छोट्याश्या टेकडीवर फिरून आलो. त्यानंतर गरमा गरम भरपेट नाश्ता झाला. मग नदीकाठी फिरून आलो. उन्हाळ्यामुळे ह्या नदीला पाणी कमी होते. त्यामुळे चक्क पायी नदीपार जाता येत होते, त्यामुळे पाण्यात न भिजता मस्त मजा घेता आली. होम स्टेवर परत येऊन थोडा वेळ कॅरम  आणि थोडा वेळ टेबल टेनिस खेळलो. आता मात्र पोटात कावळे ओरडायला लागले. परत जाऊन चविष्ट अन्नावर ताव मारला आणि तासभर मस्त झोप काढली.
     उठल्यावर कॉफी घेऊन होम स्टेच्या आजोबांसोबत बागेत एक चक्कर मारून आलो. वाटेत आमच्या जमीन किती आहे, कोणती झाडे आहेत,  बागेत किती लोक काम करतात अशा अनेक गप्पा झाल्या. आजोबांनीही घरची माणसे असल्यासारखी मोठ्या उत्साहाने सगळी माहिती दिली. चक्कर मारून अंगणात परत आलो आणि बागेतल्या टेबलावर बसून आजोबा आणि आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारल्या. मला थोडे फार कन्नड काळात असल्याचे ऐकून आजोबांना बरे वाटले. रात्री जेवण करून गाढ झोपून गेलो.

    सकाळी उठून आवरून झाल्यावर परत खादाडीची वेळ आली. कर्नाटकाच्या ह्या भागास मालनाड असे म्हणतात. त्यामुळे होम स्टेमध्ये मालनाड पद्धतीचे जेवण होते. अतिशय स्वादिष्ट आणि भरपेट असे जेऊन आम्ही अगदी तृप्त झालो. एक दिवसात डोसे, आप्पे, शाविगे (ओल्या शेवया) -नारळाचे गोड दूध, कडबू (भाताच्या गोळ्यासारखा पदार्थ), अक्की रोटी (तांदळाची भाकरी), रसम-हातसडीचा भात, मालनाड  पद्धतीची भाजी, ब्रेडचा अतिशय स्वादिष्ट असा हलवा, गुलाब जॅम, फ्रुट सलाड असे अनेक पदार्थ वात्सल्याने (निश्चलची बायको) आम्हाला प्रेमाने खाऊ घातले.
     आम्ही निघालो तेव्हा आजोबांचे डोळे भरून आले. मला पाहून त्यांच्या मुलीची त्यांना आठवण झाली असे ते म्हणाले. त्यामुळे एखाद्या मुलीची सासरी पाठवण करताना केले जाणारे सोपस्कार पार पाडून, आठवण म्हणून एक उदबत्तीचे घर देऊन त्यांनी आम्हाला निरोप दिला. आम्हालाही अतिशय जवळच्या माणसांपासून दूर जात असल्यासारखे वाटले.
     उरलेला दिवस आम्ही साईट सीइंगसाठी ठेवला होता. सगळ्यात आधी आम्ही कुवेंपू नावाच्या प्रसिद्ध कन्नड कवीच्या २५० वर्षे जुन्या घरास भेट दिली. तिथे त्यांनी वापरलेल्या वस्तूही ठेवलेल्या होत्या. नंतर कविशैल ह्या कुवेम्पुच्या स्मारकास भेट दिली. मग एका पारंपारिक दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या संग्रहालयास भेट दिली. तिथून श्रुन्गेरीच्या देवळात गेलो. नंतर अगुंबे आणि मग कुन्दाद्रीला भेट दिली. ही दोन्ही ठिकाणे सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहेत असे ऐकले होते. पण आम्ही दुपारीच्या तिथे पोहोचल्याने फारशी मजा आली नाही. मग आम्ही तीर्थहळ्ळी ह्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचलो. दुपारचे चार वाजले होते. आमची बस तिथून रात्री १० ला निघणार होती.
कविशैल
पुरातन वस्तूंचे संग्रहालय


 आधी आम्ही रसम मसाला, मालनाड पद्धतीचे कैरीचे लोणचे इत्यादी लोकल गोष्टींची खरेदी केली. मग टाईम पास म्हणून २-४ दुकानात शिरलो. एका दुकानात नारळाच्या काथ्यांच्या टोप्या, पर्सेस, बॅग्स आणि इतर कितीतरी वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या. मग एके ठिकाणी बसून मिल्क शेक प्यायले. एवढे सगळे करूनही तासभराच संपला होता. वेळ तर बराच उरला होता. "काय करावे?" असा वोचार चालू असताना वात्सल्याने इथे एक नदी आहे असे सांगितल्याचे आठवले. चालत चालत नदीकाठी गेलो. ह्या नदीत परशुरामाने आपली कुर्हाड धुतली होती अशी काहीतरी कथा ऐकायला मिळाली.
तुंगा नदीवरील सुंदर पूल
      नदीकाठी वेळ मस्त गेला. फोटो काढले, वाळूत नक्षीकाम केले, भेळ खाल्ली. ७.३० वाजता उठून बस स्थानकाकडे चालायला सुरवात केली. जेवण केले. ८.१५ च वाजले होते. मग काही वेळ स्थानकावरच गप्पा मारत बसलो. मग आईस्क्रीम खाल्ले. तरीही अजून अर्धा तास उरला होता. आता मात्र वेळ जाता जाईना. एकेक मिनिट मोजत अर्धा तास घालवल्यावर शेवटी बस आली. दिवसभर फिरून दमलेले आम्ही मस्त झोपून गेलो. आदल्या दिवशी पक्षांची किलबिल ऐकत जागे झालेलो आम्ही बंगलोरच्या गर्दीच्या, गाड्यांच्या कलकलाटाने जागे झालो. घरी येऊन परत रोजचे राहत गाडगे सुरु झाले. पोस्ट लिहिता लिहिता आठवणी ताज्या होतायत, मनात गाणे रेंगाळते आहे:
दिल ढ़ूंढता है फिर वही फुरसत के रात दिन|
बैठे रहे तसव्वुर-ए-जाना किये हुए|
दिल ढ़ूंढता है ...
(फोटोग्राफी: मी आणि अभिजीत)