Monday, September 17, 2012

चित्रकला आणि मी

नमस्कार मंडळी! लेखाच्या शीर्षकावरून जर मी माझ्या चित्रकलेतल्या वेगवेगळ्या प्रयोगांबद्दल लिहिणार आहे असा कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो मला सुरवातीलाच दूर करायला हवा. हा लेख माझ्या चित्रकलेतल्या प्रयोगांविषयी नाही तर मी चित्रकलेत लावलेल्या दिव्यांविषयी आणि चित्रकलेमुळे मला ज्या दिव्यांमधून जावे लागले त्यांविषयी आहे. कुठे ते दीपक राग आळवून महाल दिव्यांनी तेजोमय करून टाकणारे मियाँ तानसेन, आणि कुठे शाळेच्या चित्रकलेच्या वहीत दिवे लावणारी मी. असो...

तशी चित्रकलेविषयीची माझी पहिली आठवण म्हणजे मी सुमारे ४-५ वर्षांची असताना फळ्यावर काढलेली रिक्षा. हवेत उलटी लटकत असल्यासारखी ती रिक्षा पाहून आईने मला विचारले की, "ही अशी का बरे काढली आहेस?" तेव्हा मी म्हणाले की "अगं, हा फळा म्हणजे एक रस्ता आहे आणि ती रिक्षा त्यावरून खाली येते आहे. म्हणून ती अशी उलटी दिसत आहे." आता ह्यावर ती माऊली काय म्हणणार सांगा? बाकी बालवाडीतली माझी कलेची वही माझ्याकडे कित्येक वर्षे होती. ती मला खूप आवडायची. त्यातले स्प्रे पेंटिंग, ठसे काम, चिकट काम इत्यादी गोष्टींवर "छान" असा बाईंनी दिलेला शेरा पाहून मला नेहमीच मस्त वाटायचे. त्यामुळे तशी चित्रकलेविषयी भीती निर्माण होण्यासारखे अजून काही घडले नव्हते.

किंबहुना इयत्ता तिसरीत असताना "सकाळ" तर्फे घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत  "देखावा" हा विषय आला होता. नेहमीचेच ते त्रिकोणी डोंगर, त्यातून निघणारी वाकडी तिकडी नदी, पिझ्झ्याच्या कापासारखा दोन त्रिकोणी डोंगरांच्या मधून डोकावणारा तो सूर्य, एक झाड आणि एक घर असा देखावा काढण्याऐवजी जरा वेगळे काहीतरी करावे असे माझ्या अचानक डोक्यात आले. आणि मी डोंगरावर वेगवेगळी दुकाने काढून त्यांना आमच्या गल्लीतल्या पुना जनरल स्टोअर्स, मातोश्री किराणा मालाचे दुकान, श्री हार्डवेअर, सामंत खाऊवाले अशा दुकानांची नावे दिली. लहान मुलांची बाग काढून त्यात काही मुले वगरे काढली. माझ्या ह्या "आउट ऑफ द बॉक्स" थिंकींगसाठी परीक्षकांनी मला उत्तेजनार्थ बक्षीसही दिले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी असे हे गंमतशीर चित्र लोक अगदी कुतूहलाने पाहत होते. चित्रकलेसाठीचे ते पहिले बक्षीस घेताना मला स्वतःचा फारच अभिमान वाटला होता. 

बाकी इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शाळेत चित्रकला नावाचा वेगळा विषय होता की नाही ते मला आता लक्षात नाही, पण चित्रकलेचा तास आणि त्यासाठी खास नेमलेला शिक्षक हा प्रकार तरी तोवर नक्कीच नव्हता. खरी पंचाईत सुरु झाली ती पाचवीत असताना. पाचवीत चित्रकला नावाचा स्वतंत्र विषय आला आणि माझ्या आयुष्यातले कितीतरी क्षण अतिशय कष्टप्रद व्हावेत ह्याची त्याने पुरेपूर काळजी घेतली.

सुरवातीसुरवातीला मला चित्रकला या विषयाबद्दल फार उत्सुकता वाटत होती. जलरंगांची नवीन पेटी, ब्रश आणि छानशी वही, वा काय मजा आहे! पण सगळ्या रंगाचा बेरंग झाला जेव्हा चित्रकलेच्या सरांनी वहीत काढायच्या चित्रांविषयी माहिती द्यायला सुरवात केली. पहिला विषय होता रंगचक्र!  पानावर मोठेसे वर्तुळ काढून, त्यात काही ठराविक पद्धतीने एक त्रिकोण काढायचा. मग तसाच अजून एक उलटा त्रिकोण काढायचा की तयार होते एक चांदणी. तिच्या एक सोडून एक अशा तीन कोनांमध्ये मूळ रंग म्हणजे लाल, पिवळा, निळा भरायचे आणि मग उरलेल्या कोनांमध्ये ह्यातले दोन दोन रंग एकत्र केले की तयार होणारे दुय्यम रंग म्हणजेच केशरी, हिरवा आणि जांभळा भरायचे. अरे बापरे! हे कसले चित्र? आजसारखी त्या जमान्यात तोंड वर करून मनाला येतील ते प्रश्न सरांना विचारायची सोय आणि हिंमत दोन्हीही मुलांच्यात नव्हती. बरे कोणी हिम्मत करून असले प्रश्न विचारले तर त्यांची चांगलीच तासंपट्टी  व्हायची. मला मान्य आहे की ह्या रंगचक्राने कोणते रंग एकत्र मिसळले की काय होते वगरे ह्याची मुलांना ओळख होते. पण ते समजावण्याच्या लहान मुलांना आवडतील अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर तेव्हा केला जात नव्हता. मॉंटेसरी हा शब्द जरी लोकांना माहिती असला तरी मॉंटेसरीबाईंच्या शिकवण्याच्या पद्धतीचा अवलंब मात्र आपल्याकडे फारसा केला जात नसे. असो, तर हे झाले रंगचक्राबद्दल!

असाच अजून एक विषय म्हणजे स्टील लाईफ! ह्यात एका विचित्रशा रंगाचे टेबल क्लॉथ घातलेल्या टेबलावर बादली, तांब्या, सफरचंद अशा एकमेकांशी फारसा संबंध नसलेल्या वस्तू रचून ठेवलेल्या असतात आणि त्यांचे चित्र काढायचे असते. मुळात ह्या अशा वस्तू टेबलवर अशा एकत्र का ठेवायच्या? बादली आणि तांब्या हे दुसरेच काहीतरी सूचित करणाऱ्या वस्तूंसोबत सफरचंद टेबलवर ठेवल्यास आईच मुळात कशी ओरडेल? इत्यादी विचार मनात येऊन माझे मन सर काय सांगत आहेत ह्यापासून विचलित होत असे. आता ह्या स्टील लाईफसारख्या विषयातूनही ज्यांना पुढे जाऊन चांगले चित्रकार बनायचे आहे त्यांना खूप काही शिकता येते हे मी ऐकले आहे, पण ज्यांनी नुकतीच चित्रे काढायला सुरु केली आहेत अशा लहान मुलांना ह्या पद्धतीने कलेविषयी आवड निर्माण होण्यापेक्षा, घृणा निर्माण होऊ शकते ह्याचे मी हे एक जिवंत उदाहरण आहे. पुढे असेच अनेक निरस, चमत्कारिक विषय आले आणि गेले. आणि अशा प्रत्येक विषयासोबत माझी चित्रकलेविषयीची आसक्ती पार निघून गेली. नाही म्हणायला कोलाज, किंवा मनाचे चित्र असे विषय मला जरासा दिलासा द्यायचे तेवढेच काय ते. 

               चित्रकलेची वही पूर्ण करणे हा कार्यक्रम मला निबंधाची वही पूर्ण करण्याइतकाच भयंकर वाटे. वर नमूद केलेले चित्रविचित्र विषय वर्गात समजावून झाले की  ते तेव्हाच्या तेव्हा वहीत काढणे अपेक्षित असे. परंतु नावडती कामे पुढे ढकलण्याच्या मानवी प्रवृत्तीला अनुसरून, मी ती वही तपासायला द्यायची तारीख जवळ आल्याशिवाय हातातच घ्यायची नाही. किंबहुना बऱ्याचदा, वही द्यायच्या आदल्या दिवशी मनाचा हिय्या करून मी ती पूर्ण करायला बसत असे. मग त्या दिवशी शाळेतून आल्यावर काढायच्या ४-५ चित्रांची यादी, वही, रंग, ब्रश, पाणी, फडके असा पसारा मांडून बसायचे. प्रत्येक चित्र काढून, जलरंगांनी रंगवायला आणि मग ते वाळवायला, किमान दीड-दोन तास तरी लागायचे. ह्या पद्धतीने ४-५ चित्रे काढायची म्हणजे ८-१० तास तरी लागणार आणि तेवढा वेळ एका दिवसात मिळत नसतो एवढा हिशोब करायची बुद्धीही तेव्हा नव्हती.

साहजिकच एकेका चित्रानंतर, घड्याळाकडे लक्ष गेले की टेन्शनने चेहरा लाल होऊ लागायचा. आधी "अचानक हिला काय झाले?" असे वाटून घरचे चौकशी करायचे. पण मग "चित्रकलेची वही पूर्ण करायची आहे" असे सांगितल्यावर "एवढेच ना? नेहमीचेच आहे" असे म्हणून ते लक्ष काढून घ्यायचे. एखाद्या चित्राला दोनच्या जागी तीन तास लागले की धीर अजूनच खच्ची व्हायचा. तिसरे चित्र पूर्ण होईस्तोवर डोळ्यात पाणी जमा व्हायचे. समोरची वही धूसर दिसायला लागायची. डोकेही काम करायचे सोडून दुसऱ्या दिवशी वर्गात कशी बोलणी खावी लागणार ह्याविषयी विचार करू लागायचे.

दादा चित्रकलेतला चांगलाच जाणकार होता. साहजिकच उरलेल्या चित्रांसाठी मदत करण्यासाठी, त्याच्याकडे गयावया करण्यावाचून गत्यंतर उरायचे नाही. तोही भाव खात, वरती कॉटवर बसून, साहेबासारख्या सूचना देऊ लागायचा. पण त्याच्या आणि माझ्या चित्रकलेच्या आकलनात इतका फरक होता, की तो मदत करायला लागला की दिलासा वाटण्यापेक्षा, तो सांगेल त्या गोष्टी वहीत नीट न उतरवता आल्याने, जास्तच वेळ लागायला लागायचा, जास्तच ताण निर्माण व्हायचा. मग डोळ्यात उभ्या राहिलेल्या गंगा-जमुनांना वाट फुटायची. माझे आणि त्याचे कडाक्याचे भांडण व्हायचे. 'मी सांगितलेले पटत नाही तर मग येतेस कशाला माझ्याकडे रडत दरवेळी...पुढल्या वेळी अजिबात यायचे नाही माझ्याकडे!' असा पेटंट डायलॉग मारून तो दिमाखात खोलीतून निघून जायचा. मग उरलेली चित्रे कशीतरी खरडून चित्रकलेची वही रात्री उशिरा दप्तरात कोंबली जायची.

दर तपासणीच्या वेळी हा प्रसंग देजावूसारखा वारंवार घडायचा. आता ह्या सगळ्या युद्धप्रसंगांना कारणीभूत ठरणाऱ्या चित्रकलेच्या वहीला, मी फार प्रेमाने जपले असते का? नक्कीच नाही. ती माझ्या अभ्यासाच्या सामानात कशीही पडलेली असायची. त्यामुळे ती पोथीसारखी खिळखिळी व्हायची. 'सगळ्यात अव्यवस्थित वही' म्हणून सरांनी माझी वही वर्गासमोर नाचवल्याचे मला अजूनही स्मरते. अशी नामुष्कीची वेळ बाकी कोणत्याच विषयाने माझ्यावर कधीच आणली नाही. त्यामुळे चित्रकलेशी असलेल्या माझ्या वैरात भरच  पडत गेली.

               तशी माझी चित्रकला फार वाईट नाही. बऱ्याचदा माझ्या चित्रांना सरासरीपेक्षा जास्त गुण मिळायचे. इंजिनीरिंग ग्राफिक्स ह्या अवघड समजल्या जाणाऱ्या, ड्रॉईंगशी संबंध असणाऱ्या विषयातही, माझा मी अभ्यास करून मी चांगले मार्क्सही मिळवले. तुम्हाला पिक्टोरिअल नावाचा खेळ माहितीये का? दम शेराझचा चुलत भाऊ? आलेल्या शब्दावर अभिनय करून दाखवण्याऐवजी ह्यात चित्र काढून दाखवायचे असते. तर ह्या पिक्टोरिअलमध्ये मला नेहमी चांगले पॉईंट्स मिळतात. किंवा मुले गोष्टी सांगताना माझी मला बऱ्याचदा तर्हेतर्हेच्या पात्रांची चित्रे काढून दाखवायला सांगतात. तीही त्यांना पटतील अशा पद्धतीने मला काढता येतात. इतरांनाही ती आवडतात.  ह्या चित्रांमध्ये केसरी चित्रपटातले अक्षय कुमारने केलेले पात्र हविलदार इशर सिंघ, पीटर रॅबिट हा ससा, त्याच्या मागे लागणारे मिस्टर मॅकग्रेगोर हे दुष्ट शेतकरी आजोबा, फ्रँकलिन हे कासव, शार्क्स, डायनासोर्स अशा तर्हेतर्हेच्या गोष्टींचा समावेश असतो.

पण 'रॉक ऑन' मधले 'मेरी लॉन्ड्री का इक बिल इक आधी पढी नॉवेल....टा णा णा णा णा, टा णा णा णा णाह्या गाण्याची सही न सही नक्कल करता आली म्हणजे त्या माणसास गाणे येते हे म्हणणे जितके मूर्खपणाचे ठरेल तितकेच 'मला चित्रकला येते' हे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. शास्त्रीय गाण्याचा कान नसलेल्या माणसाला किशोरीताईन्च्या किंवा भिमण्णान्च्या गाण्याला लोक इतके का मानतात हे समजत नाही. चुकून माकून हे लोक मैफिलींना आले तर गाण्याला नक्की दाद कुठे द्यावी?” हे त्यांना काळत नाही, तसेच चित्रकलेच्या बाबतीत माझे आहे.

'एम. एफ. हुसेनची चित्रे इतकी प्रसिद्ध का?' हे काही आज तागायत मला समजलेले नाही. बरे एम. एफ. हुसेन, हे काही ना काही कारणांनी सतत चर्चेत असायचे त्यामुळे तेवढ्याच एका भारतीय चित्रकाराचे नाव मला माहिती होते! मोनालिसाचे हास्य इतके प्रसिद्ध का हेही मला आजतागायत समजलेले नाही. हेही चित्र माहिती असण्याचे कारण कोणते? ते म्हणजे 'परमसुंदरी' सारख्या आयटम नंबर्समधल्या 'कभी लगे मोना लिसा, कभी कभी लगे लोलिता, और कभी जैसे कादंबरी' ह्या सारख्या मजेदार ओळींमुळे. प्रभुदेवाच्या 'मुकाबला सुभानल्ला' ह्या हिट गाण्यातल्या 'पिकासो की पेंटिंग मेरा पिछा पकड के टेक्सास पे नाचे मिलके' ह्या मला अजूनही अर्थ न कळलेल्या ओळीमुळे पिकासो हा एक चित्रकार असावा आणि त्याची पेंटिंग्स प्रसिद्ध असावीत असे मला माझ्या बालपणी कळले आणि ह्या माणसाविषयी अजूनही मला तेवढीच माहिती आहे.

असो, चित्रकलेविषयीचे माझे हे पाल्हाळ असे कितीही वेळ चालू राहू शकते. पण सांगायचा मुद्दा असा की दहावी झाली तेव्हा, पुढे विज्ञानाकडे जायचे असल्याने इतिहास, भूगोल, मराठी हे विषय सुटल्याचा मला जितका आनंद झाला होता ना, तितकाच आनंद चित्रकला सुटल्याचा झाला. पण आयुष्यातली ५-६ वर्षे कटू आठवणी देऊन गेलेला हा विषय, त्याचे तास, त्याची ती वही, मी आयुष्यात कधीच विसरणार नाही हे मात्र नक्की!