गेल्या काही दिवसांत मी काही इराणी सिनेमे पाहत होते. हे सिनेमे इतके छान होते की कुठेतरी त्यांच्याबद्दल नमूद करून ठेवावे असे मला वाटले आणि मी ही पोस्ट लिहायला बसले. आर्ट फिल्म्सची आवड असलेल्या लोकांनी हे सिनेमे जरूर पहा.
चिल्ड्रन ऑफ हेवन: ही गोष्ट आहे अली आणि झहरा ह्या अतिशय गरीब कुटुंबातील लहान भावा-बहिणीची. अली चुकून आपल्या बहिणीचे बूट हरवतो. पण वडिलांकडे नवे मागावेत अशी त्यांची परिस्थिती नसते. तेव्हा अलीचेच बूट आलटून पालटून वापरायचे त्यांचे ठरते. झहराची शाळा सकाळची असते आणि अलीची दुपारची. शाळेतून येता येता वाटेत झहरा अलीला बूट द्यायची आणि अली ते घालून शाळेत जायचा. ह्या प्रकारच्या अरेन्जमेंटमध्ये त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते? झहाराला वेगळे बूट कधी मिळतील का की त्यांना कायमच एकाच बूटवर काम भागवावे लागणार का? ह्या प्रश्नांची उत्तरे ही कथा अतिशय वेधक पद्धतीने देते.
कलर ऑफ पॅरडाइझ: महंमद नावाचा एक लहान आंधळा मुलगा असतो. तो अतिशय हुशार, गुणी असतो. तो अंध मुलांच्या निवासी शाळेल शिक्षण घेत असतो. पण महंमदच्या वडिलांना आपल्या ह्या आंधळ्या मुलाची लाज वाटत असते, तो आपल्यावर ओझे बनून राहील आणि शेवटी आपल्या म्हातारपणी तसाही आपल्याला त्याचा काहीच आधार मिळणार नाही ह्या कल्पनेने ते त्याला आपल्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करीत असतात. महंमदच्या आजीचे मात्र याच्यावर फार प्रेम असते. तिला त्याच्या वडिलांनी त्याला असे दूर ठेवणे आवडत नसते. महंमद आपल्या आंधळेपणावर कशी मात करतो? आंधळा असूनही तो आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे कसा पाहतो? त्याचे वडील त्याला जवळ करतील काय? आपल्याला देवाने सगळे काही दिलेले असताना आयुष्याविषयी सतत कुरकुरणाऱ्या आपल्यासारख्या माणसांसमोर त्या निरागस मुलाच्या समस्या मांडून आपले डोळे उघडण्याचे काम हा सिनेमा करतो.
व्हेअर इज द फ्रेंड'स होम?: अहंमदच्या मित्राची गृहपाठाची वही एकदा चुकून अहंमदच्या दप्तरातून घरी येते. दुसर्या दिवशी शिक्षकांनी गृहपाठ पूर्ण करून आणायला सांगितलेला असतो. अहंमदच्या मित्राने त्याच दिवशी गृहपाठ पूर्ण केला नसल्याने परत तसे झाल्यास मित्राला शाळेतून काढून टाकण्यात येईल असे शिक्षकांनी खडसावून सांगितलेले असते. त्याची वही आपल्या घरी आल्याने उद्याही मित्र गृहपाठ पूर्ण करून देऊ शकणार नाही आणि त्यामुळे त्याला शाळेतून काढले जाईल ह्याची भीती अहंमदला वाटते. पण आपल्या मित्राचा पत्ताही त्याला माहिती नसतो. अहंमद वही परत करण्याच्या उद्देशाने घरून निघतो. त्याला मित्राचे घर सापडते का? घर शोधण्याच्या कामात काय काय अडथळे येतात? इत्यादी प्रश्नांची उत्तरे देता देता हा सिनेमा मोठ्या माणसांची लहान मुलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती, लहान मुलांशी मोठी माणसे कशी वागतात इत्यादी गोष्टी हायलाईट करतो. 'मित्राची वही त्याला कशी द्यायची?' हा अहंमदला पडलेला साधासा प्रश्न पूर्ण १-१.५ तास आपल्याला स्क्रीनसमोर खिळवून ठेवतो.
द व्हाईट बलून: सगळीकडे नववर्षाच्या स्वागताची तयारी चालू असते. बाजार विविध आकर्षक वस्तूंनी भरलेला असतो. रझियाला बाजारात गोल्ड फिश दिसतो आणि तो तिच्या मनात बसतो. गोल्ड फिश आणावा म्हणून रझिया भावाच्या मदतीने आईला कसे बसे पटवते. आई रझियाला पैसे देते. पण नुसते पैसे मिळून काही रझियाचे काम होत नाही. वाटेत बर्याच घटना घडतात. त्या पैशाचे काय होते? रझियाला गोल्ड फिश मिळतो का? विषय साधासा, पण आपल्याला सिनेमा संपल्याशिवाय जागेवरून हालावेसे वाटत नाही.
ह्या सर्व सिनेमांमधले कॉमन फॅक्टर्स म्हणजे ते सर्व लहान मुलांशी निगडीत आहेत. सर्व मुले अप्रतिम अभिनय करतात. तशी सर्वच पात्रे सुरेख, नैसर्गिक अभिनय करतात. कोणीच वेगळा आवाज, वेगळी स्टाईल अशा कृत्रिम साधनांचा वापर करायला जात नाही. उगाच गाणी नाहीत. कुठेही भडकपणा नाही. त्यांना कमर्शिअल करायचा कुठेही प्रयत्न केलेला नाही. समाजातील विविध लोक, त्यांचे राहणीमान, त्यांचे आचारविचार, समस्या इत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी सिनेमाचा वापर माजीद माजिदी, जाफर पनाही, अब्बास कियारुस्तमी ह्या दिग्दर्शकांनी इथे फार उत्तम प्रकारे केलाय असे मला वाटते.