मागील एका पोस्टमध्ये म्हणल्याप्रमाणे उन्हाळ्याचे कौतुक मला बंगलोरला आल्यावर वाटू लागले. पण हिवाळा मात्र मला लहानपणापासूनच खूप आवडतो. पहाटेची गुलाबी थंडी, नंतर कोवळ्या उन्हामुळे मिळालेली ऊब, दुपारच्या वेळी रजईत घुसून काढलेली छोटीशी झोप, संध्याकाळी थंडगार हवेतून मारलेली एक चक्कर आणि रात्री एकही फट न राहील अशा पद्धतीने पांघरूण घेऊन, अंग मांजरीसारखे चोरून घेऊन झोपेत रममाण होणे! दिवसाच्या प्रत्येका प्रहराचा आनंद घरबसल्या लुटू देणारा हिवाळा...
तशी हिवाळा मला आवडायची इतरही करणे अनेक! माझा आणि दादाचा दोघांचा वाढदिवस आठवड्याभराच्या अंतराने डिसेंबरमध्ये येतो. त्यामुळे लहानपणी ह्या काळात घरात सतत उत्साहाचे वातवरण असायचे, जवळच्या नातेवाईकांची भेट व्हायची, आवडीचे पदार्थ खायला मिळायचे, भेटवस्तू मिळायच्या. ह्याच काळात शाळा-कॉलेजमध्ये स्नेह-संमेलन, क्रीडास्पर्धा, अल्पोपहार इत्यादी कार्यक्रम असायचे. त्यासाठीच्या तयाऱ्याही बरेच दिवस चालू असायच्या. त्यामुळे अनेक तास फ्री मिळायचे. अभ्यासाला सोयीस्करपणे विसरता यायचे. हे सगळे झाले की येणारी नाताळची सुट्टी म्हणजे हिंदीत 'सोने पे सुहागा' म्हणतात तसलीच गत!
पुण्यातला सवाई गंधर्व महोत्सवही हिवाळ्यातलाच! सबंध भारतातील नामवंत शास्त्रीय गायक-वादकांची कलाकारी सलग ३-४ दिवस कानांवर पडत राहण्यासारखे भाग्य ते रसिकांच्या वाट्याला आणखी कुठून यावे? फराळ-दिवे-फटाके घेऊन येणारी दिवाळी साजरी होऊन काहीच अवधी लोटल्यावर पुन्हा निरनिराळ्या रागांचा फराळ, स्वराविष्काराचे दीप आणि तानांची आतिषबाजी घेऊन येणारा सवाई गंधर्व महोत्सव म्हणजे गानरसिकांसाठी स्वरमयी दिवाळीच..
तिळगुळ आणि गुळाच्या पोळ्यांचा खुराक घेऊन येणारी संक्रांतही हिवाळ्यातलीच...भोगीच्या दिवशी भाकरी-वांग्याची भाजी आणि खिचडी खाताना येणारी मजा न्यारीच. शेतात बसून हुरडा खाण्याची मजाही हिवाळ्यातलीच...बोरे-हरभरे-उसाचे कांडे चुरामुर्यात घालून होणारे पोरांचे बोरन्हाणही हिवाळ्यातलेच...
हिवाळ्यात थंडीमुळे भूकही मस्त लागते. गरमा-गरम जेवणाची काही वेगळीच मजा अनुभवायला मिळते. बाजारातही एकदम ताज्या, टवटवीत भाज्या मिळतात. रसरशीत भाज्यांनी भरलेले भाजीचे दुकान पाहूनच मनाला एकदम समाधान मिळते. निरनिराळ्या फळांचीही रेलचेल असते. सफरचंदे, संत्री मोसंबी, चिकू, डाळिंबे, ताजी केळी अशा रंगीबेरंगी फळांनी फळबाजारही खुलून येतो. फ्रूट -सलाड बनवण्यासाठी सर्वोत्तम ऋतू हाच! गाभुळलेल्या चिंचा, बोरे, आवळे, हरभरे असा मेवाही हिवाळ्यातच मिळतो.
कॉलेजमध्ये गेल्यावर फिरोदिया करंडक हिवाळ्याचा पदर धरून हजर व्हायचा. तालमी सुरु होण्याआधीच्या खुसखुशीत चर्चा, मग दिवस-दिवसभर तालमी, मग फिरोदिया तोंडावर आल्यावर सुरू होणार्या रिहर्सल्स, बॅकस्टेज-वेशभूषा ह्यांसाठी सामानाची जमवा-जमवी, त्यांसाठी मारलेल्या चकरा...आणि प्रत्यक्ष सादरीकरणाचा अविस्मरणीय अनुभव...फिरोदियानंतर अनेक दिवस कॉलेजमध्ये न माहित असलेली लोकसुद्धा येऊन 'काम आवडल्याचे' सांगून जायची. नंतरचे अनेक दिवस तालमींच्या, प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी झालेल्या गंमती-जंमतींच्या आठवणींमध्ये रमण्यात जायचे.
हिवाळा ऋतू हा भटकंतीसाठीही आयडियल! पाऊस नुकताच होऊन गेल्यामुळे जिकडे-तिकडे हिरवेगार असते पण पाऊस पडत नसल्याने जमीन निसरडी असण्याचीही भीती नाही. उन्हाने लाही होण्याची भीती नाही. हवेतही एक प्रकारचा तजेला असतो. दक्षिणेतल्या बर्याच पर्यटन स्थानांची प्रिफर्ड टायमिन्ग्जही सप्टेंबर ते मार्च हीच असतात.
खाद्य, गायन-वादन-नृत्य, पर्यटन अशा चौफेर मजेचा बम्पर धमाका घेऊन येणारा हिवाळा आता सुरु होतोय. बंगलोरमध्ये गेल्या दोन वर्षांत तरी हिवाळ्यात विशेष थंडी पडली नव्हती. आता ह्यावरून मी बंगलोरचे हिवाळे जास्त थंड नसतात असा निष्कर्ष काढून तुम्हाला सांगितला तर नेमकी ह्यावर्षीच कडाक्याची थंडी पडून मला खोट्यात पडेल. त्यापेक्षा कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड, थंडीची वाट पाहत ह्यावर्षीच्या हिवाळ्याचे मी मनापासून स्वागत करते. माझ्याप्रमाणेच हिवाळा मनापासून आवडणाऱ्या स्वर्वांना माझ्यातर्फे 'हिवाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! पुण्यात असलेल्या रसिकांना शास्त्रीय गायनाची मेजवानी मिळो, भटकायला आवडणाऱ्या लोकांना खूप भटकायला मिळो, शाळा-कॉलेजमध्ये असलेल्यांना स्नेह-संमेलनाचा भरपूर आनंद लुटता येवो, ताज्या भाज्या, फळे आणि कडकडीत भूक लागल्याने अन्नावर मारलेला ताव ह्यामुळे सर्वांचे आरोग्य सुधारो, संक्रांतीला भरपूर तिळगुळ-गुळाच्या पोळ्यांचा आनंद सर्वांना लुटता येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...