Saturday, June 27, 2009

Morning Raga

एक सुन्दर सकाळ...
लवकर उठले, भराभर आवरलं, आज गाण्याचा क्लास होता ..
hostel मधून बाहेर पाऊल ठेवलं न मन प्रसन्न झालं...
ओल्या मातीचा वास..हिरवगार गवत, झाडं...हवेतला ओलावा...खूप छान वाटायला लागलं...
एकेक पाऊल चालू लागले...कुठेतरी काहीतरी कमी आहे असं मन खुणावायला लागलं...
गेली दोन वर्षं ह्या रस्त्यांवरून चालताना कोणी ना कोणी माझ्यासोबत असायचं...आता सगळे चाललेत एकेक सोडून...लांब...रोज रोज ना दिसण्यासाठी...तशीच चालत राहिले...
एका कोपर्यावर एक धष्टपुष्ट बोका दिसला, सोनेरी रंगाचा. जोर जोरात ओरडत होता. भुकेला होता. रस्त्यात मांजर दिसलं की माझ्या नकळत माझ्या तोंडून त्याला हाक जातेच. त्याने थोडासा भाव खाल्ला न जवळ आला. माझ्या पिशवीचा वास घेतला आणि हिच्याकडे काहीही खायला नाहिये हे पाहून थोडा हिरमुसला झाला. मला थोडंसं वाईट वाटलं पण क्लासला उशीर होत होता त्यामुळे त्याला न त्याच्याशी खेळण्याच्या विचारांना मागे टाकून पुढे निघाले. एकटेपणालाही तिथेच सोडता आलं असतं तर कितीबरं झालं असतं.
५-१० मिनिटांत सरांच्या घरी पोहोचले. तंबोरा हातात घेतला न तारा छेडल्या. सुरांमध्ये काय जादू आहे. एका क्षणात जगच बदलून गेलं. माझे गाण्याचे सर, मी आणि "हिंडोल".. सरांनी अलवारपणे हिंडोल माझ्या मनात, गळ्यात उतरवला. एक तास म्हणता-म्हणता निघून गेला. तम्बोर्याच्या तारांवरचा हात काढला न मन परत त्या सुरेल स्वप्नातून बाहेर पडलं.आता परत तोच एकटा प्रवास..
चालता-चालता IIT च्या गेटपाशी पोहोचले, बस पकडली. बस सुरु झाली. खिडकीतून बाहेर पाहू लागले. मला फार आवडतं चालत्या बसच्या खिडकीतून बाहेर बघत बसायला पण आज सगळच नको वाटत होतं. प्रत्येक जागेशी जुळलेल्या आठवणी. तेव्हा सगळे मिळून केलेली मजा. रुसवे-फुगवे...चिड़वा- चिडवी. काही गोष्टी जगातल्या कोणत्याच दुकानात मिळत नाहीत. काळ त्यांना घेऊन येतो न तुम्हाला न विचारता घेऊन जातो, कायमसाठी...डोळे खिडकीबाहेर पाहत होते न मन कुठेतरी भलतीकडेच...
अचानक लहान मुलांच्या चिवचिवाटाने एकदम दचकले. पाहिलं तर बस शाळेच्या समोरच्या स्टॉपवर थांबली होती. न लहान मुलांचा गोंधळ चालला होता बस मध्ये शिरण्यासाठी... बसमध्ये चढण्यासाठी पास नाहीतर कूपन दाखवावं लागतं. ड्रायव्हरकाकांच्या नकळत आपल्याला बसमध्ये कसं शिरता येईल ह्यासाठी काही मुलांची ख़टपट चालली होती तर काही मुलांची खिड़कीजवळची जागा पकडायला. एक लहान मुलगी खालतूनच जोरात म्हणू लागली "सपना मेरे लिए जगा पकडके रख".. आतून ती सपना ओरडत होती "अरे जगा नाही है तो किधर से पकडू?" एक मुलगा दुसर्या मुलाला टपली मारत म्हणाला "ए आज माझा चांस आहे खिडकीत बसायचा, ऊठ! " दुसरा मुलगा म्हणाला "कुछ भी क्या! आज मेरी बारी है." पहिला म्हणाला "ज्यादा शाणपट्टी की ना तो मैडम को बोल देगा कल की आज तू बेंच के नीचे बैठ के डब्बा खा रहा था क्लास के टाइम!" असा गोंधळ ५ मिनिट अखंड चालू होता न अचानक सगळे आवाज थांबले...बस सुरु झाली. सगळी मुलं एकमेकांच्या कड़े पाहात होती. काही खिडकीची जागा मिळाल्याबद्दल एकदम संतुष्ट दिसत होती. काही ती नाही मिळाली म्हणून खिन्न झाली होती...ही शांतता टिकली २ मिनिट...परत गोंधळ सुरु...
बसच्या शेवटच्या बाकावर बसलेल्या मुलांनी बसच्या ओलसर खिडकीला नाकं चिकटवली न रस्त्याने येणार्या- जाणार्या लोकांना ती वाकुल्या दाखवायला लागली. तेवढ्यात त्यांच्यातला एक म्हणाला "ए बैठो नीचे ...ड्रायव्हरने अभी ब्रेक लगायाना तो गए सब के सब उप्पर!" result=> तो एकटाच खाली बसला न इतर मुलांनी आपला पराक्रम चालू ठेवला.
इकडे मुलींच्या वेगळ्याच गप्पा चाललेल्या होत्या. तुमच्या क्लासटीचर कोण? आज पिंकीच्या नव्या रिबिनी कश्या भारी दिसत होत्या... उद्या डान्सचा क्लास कधी आहे...
मला एकदम माझे शाळेतले दिवस आठवले. अगदी असच चालू असायचं आमचंही..परत एकदा लहान व्हावं असं वाटायला लागलं. ती १०-१५ मिनिटं जीवनाने रसरसलेली वाटली. Techonlogy च्या कोरडेपणाने गंजलेल्या भावनांना परत ओलावा मिळाला न आईचे शब्द आठवले "तुम्ही कितीही शिका, मोठे व्हा..आयुष्यात माणसं लागतातच." घरी होते, सतत कोणाची तरी सोबत होती तेव्हा ह्या वाक्यांचा खरा अर्थ न किम्मत कळली नाही. स्वतःचा अभ्यास, स्वतःचं जग, माज, न त्यात इतर सामान्य माणसांना नसलेली जागा...बास...
IIT ने Technogy शिवाय अनेक गोष्टी शिकवल्या त्यातली ही एक की "Technology/Career हे आयुष्य नाही. माणसं आहात, माणसासारखे वागा. आनंद द्या न घ्या. तेच खरं जीवन!"

Tuesday, June 16, 2009

Animals are beutiful people!


दुपारची वेळ होती. रस्ता उन्हाने तापला होता . अचानक कुत्र्याच्या पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. आवाज स्वयंपाकघराच्या दिशेने येत होता . पाहायाला गेले तर आई आधीच खिडकीतून आवाजाच्या दिशेने बघत होती . तिने एकअगदी छोटसं कुत्र्याचं पिल्लू मला दाखवलं. बिचारं भुकेपोटी जिवाच्या आकांताने ओरडत होतं. आईनी मला त्याला खाली parking मध्ये नेऊन खायला घालायला सांगितलं.
मी खाली जाईपर्यंत ते ट्रकखाली जाऊन बसलं होतं. मी ट्रकजवळ गेले, बसले, त्याला बोलावलं. पण ते खूपच लहान होतं. मी बोलवायचा प्रयत्न करतीये हे त्याला काही केल्या कळेना. शेवटी आपण आता इयत्ता पाचवीत नाही हे विसरून, पाय गुडघ्यावर टेकून, ट्रकखाली रांगत जाऊन त्याला बाहेर काढलं. कडेवर घेऊन घरी आणलं. खरं म्हणजे एखाद्या पिल्लाला (ते कोणत्याही प्राण्याचं असो) कडेवर उचलून आणणे ही किती अवघड, कसरतीची गोष्ट हे तसा प्रयत्न केलेला माणूसच समजू शकतो. पण ते पिल्लू इतकं थकलं न् भुकेजलेलं होतं की त्याने कोणताच प्रतिकार केला नाही.
त्याच्यासमोर आधी पोळी धरली. हा एक खाद्यपदार्थ आहे असं त्याला अजिबात न वाटल्यामुळे त्याने तोंड गच्च मिटून घेतलं. मग दुधाची बशी समोर ठेवली. त्याने वास घेतला न् हे काहीतरी सेवन करण्याजोगं आहे ह्याची खात्री करून एकदम भसकन बशीत तोंड घातलं. दूध नाकात गेलं. दोन-चार शिंका आल्या. मग बशीच्या कडांना तोंडाने चावून त्यातून काही मिळतंय का ते बघण्याचा प्रयत्न झाला. शेवटी अजून २-४ वेळा बशीत नाक बुडवून झाल्यावर बशीतून दूध कसं प्यायचं हे त्याला समजलं. पोटभर दूध पिऊन झाल्यावर जवळच असलेल्या बादलीच्या मागे ते गेलं, मोठा आळस दिला, न् पुढच्या पायांवर डोकं टेकवून ते झोपून गेलं.

हा सगळा घटनाक्रम माझ्यासाठी अजिबातच नवीन नाही. माझ्या लहानपणापासून आम्ही अनेक मांजरं पाळलेली आहेत . प्रत्येक मांजर घरी आल्यानंतर हाच सगळा प्रकार घडताना पाहिलेला आहे!
त्या पिल्लाला पाहून मला प्रत्येक मांजर घरात कसं आलं? त्याचं नाव आम्ही काय आणि तसं का ठेवलं? त्याच्या गमती-जमती असा सगळा इतिहास आठवला न् हा इतिहास ब्लॉगद्वारे इतरांनाही सांगावा असं वाटलं.
ह्या इतिहासातली पात्रं मोजायची म्हणलं तर संख्या २०-२५ च्या वर जाईल! तेव्हा इतिहास प्रचंड मोठा आहे न् मुख्य म्हणजे शालेय इतिहासासरखा तो कंटाळवाणा नाही :D तेव्हा पुढच्या काही पोस्ट्स मध्ये ह्या माझ्या मित्रांच्या गोष्टी सांगेन.
ज्यांना प्राणी आवडत नाहीत त्यांना Sorry न् एक (धमकीवजा) विनंती: त्यांनी त्या पोस्ट्स अजिबात वाचू नयेत (कारण माझ्या मांजरांबद्दल केलेली कोणतीही वाईट comment अजिबात खपवून घेतली जाणार नाही :D )