
IPL मध्ये पुढच्या वर्षी पुण्याची टीम भाग दिसणार अशी बातमी आली न काल्पनिक पुणेरी पाटयांसाठी लोकांना एक विषय मिळाला. असेच एक फॉरवर्ड मिळाले, जर्सीचे! कमाल वाटली नएखाद्या पोस्टद्वारे पुणेरी दुकानदार तसेच व्यावसायिक (चितळ्यांना दुकानदार म्हणून कसा चालेल बुवा) ह्यांना आदरांजली वाहण्याची इच्छा मनात आली.
गिर्हाईकांशी कसे वागू नये ह्याविषयीचे फुकटात ट्रेनिंग हवे असल्यास "चितळे बंधू मिठाईवाले" ह्यांच्याकडे जाच. फ़क्त काय निरीक्षण करायचे ते लवकर करून बाहेर पडाल ह्याची काळजी घ्या नाहीतर ट्रेनिंगच्या काही भागात तुमच्यावरच प्रयोग होण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्ही चितळ्यांच्या बाकरावड़ीचे fan असाल तर तुमच्याकडे शिस्त आणि पेशंस असणे आवश्यक आहे. चितळ्यांकडे बाकरवडीसाठी रांग असते. तुम्ही रांगेच्या १ इंच जरी बाहेर दिसलात तरी चितळ्यांचा शिपाई तुम्हाला हटकतो .. जर तुम्ही त्याच्याशी हुज्जत घालायचा प्रयत्न केलात तर चितळ्यांचा सेवक येऊन तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी शिस्तापालन कसे गरजेचे आहे ह्या विषयावर १ लेक्चर देतो. ह्या सगळ्या भानगडीत चितळ्यांचा त्या दिवशीचा बाकरवड्यांचा स्टॉक संपतो न रिकाम्या पिशवीने तुम्हाला घरी जायला लागू शकते...चिताल्यांनी एक शाळा काढली तर ही मानसे मुलांना शिस्त लावण्याच्या कामी उपयोगी पडतील...चिताल्यांची शाळा!
दुसरा नंबर येतो महेंदळे वाद्यवाल्यांचा! तंबोरा, पेटीसारखे जड़ वाद्य रिक्षातून उतारवल्यावर मेहेंदल्यांचा गडी तुमची मदत करायला येईल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मूर्ख आहात. वाद्य घेऊन कसेबसे आत गेल्यावर तातडीने कोणीतरी येऊन त्याबद्दल चौकशी करेल असे तुम्हाला वाटले तर तो अजूनच मुर्खपणा असेल. तुम्ही आत जाल, बर्याच वेळ ताटकळत उभे रहाल, कधीतरी दुकानातल्या माणसांना तुमची दया येईल, माग ती येतील, तुमच्या वाद्याकडे चित्र-विचित्र कटाक्ष टाकतील...काय ही ब्याद आलीये अशा पद्धतीने वाद्याला उचलून जमिनीवर आपटतील.."काय झालय?" म्हणून चौकशी करतील न प्रॉब्लम कुठलाही असे ना एक आठवड्याने चौकशी करा असे ठराविक उत्तर देऊन तुमची बोळवण केली जाइल.
जोशी वडेवाल्यांकडे गेल्यावर तुम्ही फुकट वडे मागत आहात की काय अशी तुमची तुम्हालाच शंका येऊ शकते. काही दुकानांत बराच वेळ वाट पाहिल्यावर आपण इथे नक्की कशासाठी आलो होतो हे तुम्ही विसरून जायचीही शक्यता असते. याशिवाय जनसेवा दुग्धालय, जुने डेअरीवाले, बेकरीवाले, रिक्शावाले, कंडक्टर, टेलर, सोनार हे तुम्ही पुण्यातच आहात हे विसरु नये ह्याची वे ळोवेळी दक्षता घेताच असतात!
गेल्या आठवड्यात दादा-वाहिनीसोबत नवरत्न भेळ इथे भेळ खायला गेले. नेहमीच्या सवयीप्रमाणे १ मीडियम, २ गोड अशी आर्डर दिली प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी (action-reaction) तसा दुकानदार खेकसला "आमच्याकडे एकाच प्रकारची भेळ मिलते. आत तिखट-गोड पाणी ठेवलेले आहे. हवी अशी करून ह्या..". "बापरे, केवढा हा अपराध असे वाटून आम्ही आत जाऊन बसलो." (तिथली भेळ खरच चांगली असते म्हणून नाहीतर पुणेरी स्वभावानुसार दुकानादाराच्या तोंडावर शिव्या घालत तिकडून निघालो असतो..असो). तर १ च प्रकारची भेळ जिच्यात लोकांनी स्वतः पाणी घालून चवीनुसार तिखट बनवावी अशी पद्धत असेल तर दिलेली भेळ कमी तिखट नको का? भेळ खायला लागल्यापासून २ मिनिटात दादा- वहिनीचा चेहरा तिखटामुळे लाल झाला! ह्याच दुकानात अजुन एक मजेदार पाटी दिसली! "नवरंग भेळ होटल च्या गिर्हाईकांनी वाहने अमुक-अमुक ठिकाणी लावावीत!" होटल नवरंग बर का..जागा ८*८ पण नसेल. बाकड़ी गुर्हाळात असतात असली लाकडी...संपला विषय!
मजेचा भाग बाजुला ठेऊ..ही सगळी परिस्थिती पाहता मराठी माणसाच्या हातून सगळे व्यवसाय जात चाललेत, जिथे पाहू तिथे बिहारी, मारवाड़ी, गुजराती, भैये लोक दिसतात अश्या बोम्बा मारण्यात काही तथ्य आहे का? उद्या चितले, मेहेंदले, नवरत्न भेळवाले ह्यांच्या क्वालिटीचे प्रोडक्टस बनवून एखादा मारवाड़ी विकू लागला न स्वभावधर्मानुसार गिर्हाइकानशी गोडीने वागू लागला तर आपण तरी त्यांच्याकडे जाऊ का?
पुण्याच्या मराठी माणसांनी खरेच "जागे" व्हायची गरज आहे. पुण्याची मुंबई व्हायला फारसा वेळ उरलेला नाही...