Friday, March 12, 2010

आनंदोत्सव!

सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण IIT तल्या लोकांसाठी सर्वांत आनंदाचा काल म्हणजे लाईट गेलेले असतात तेव्हाचा काळ! "हा काय प्रकार आहे! ", असे वाटले असेल न एकदम!
IIT त सण वगरे साजरे होत नसतात. मेस वाल्यांनाच दया आली तर ते गोडाधोडाचे करतील तेवढाच काय तो बदल. बाकी सुट्टीचा पूर्ण "आनंद " घेता यावा यासाठी प्रत्येक प्रोफेसर असाइनमेंट देतो. फराळासारखे प्रोब्लेम्स असतात सोडवायला. दिवाळीत एखादी पणती मिणमिणताना दिसते. ती इतकी बिचारी असते कि कधी जीव सोडेल ते सांगता येत नाही. आकाशकंदील नामक प्रकार कॅम्पसच्या बाहेर पडल्याखेरीज दिसत नाही. असो! तर मुद्दा हा कि "सण = आनंद" ह्याची truth value शून्य आहे. बाकी कोणत्याही गोष्टीतून आनंद मिळत असेल तरी अर्ध्या तासापलीकडे (फारतर एक तास...interesting movie असेल तर १.३० तास!) लोक तिच्यात मन लावत नाहीत. IIT चे विद्यार्थी you know!
तर मग लाईट जायचा न आनंद व्हायचा काय संबंध? तर संबंध असा, की आम्ही IIT त यायच्या आधी इकडे लाईट फारसे जात नसत. साहजिकच generators इथे अजिबात आढळत नाहीत. एवढेच काय इथल्या अनेक servers नादेखील backup नसतो. लोकांच्या खोल्यांमध्ये मेणबत्त्या नसतात. त्यामुळे लाईट गेले की कोणालाच काहीच काम करता येत नाही. फार तर ज्यांच्याकडे laptops आहेत ते लोक काही काळ काम करायचा प्रयत्न करून पाहतात! बर मग? ह्यात तर सगळे आहे. IIT तले लोक एकमेकांवर फार लक्ष ठेउन असतात. लोक अभ्यास करत नाहीयेत म्हणाल्यावर कमालीचा आनंद होतो त्यांना (ह्याला अपवाद असतात, न अशा लोकांची सादर माफी मागत आहे). तेव्हा लाईट गेलेत म्हणजे कोणीच काम करू शकत नाहीये, तेव्हा आपण पण टाईमपास करायला मोकळे ह्या कल्पनेने सगळ्यांना एकदम उत्साह येतो. खोलीत अंधार असतो न शिवाय मुंबईची हवा, प्रचंड उकडत असते. धक्का लावल्यावर पोळ्यातून मधमाश्या जश्या भराभर बाहेर पडायला लागतात तशी IIT तली मुले (न मुलीही) रस्त्यावर येतात. लेकसाईडला एकदम COEP च्या बोटक्लबचे रूप प्राप्त होते. फुटपाथ हे चालण्याखेरीज फतकल मारून बसायलाही वापरले जाऊ शकतात ह्याची प्रचीती येते. काही जण घोळक्याने laptop वर सामुदायिक चित्रपट-दर्शनाचा कार्यक्रम सुरु करतात. समस्त महिलावर्ग H11 मधून बाहेर एकदम पडल्याने काही लोकांना तर फारच जास्त आनंद होतो. एकावेळी इतक्या मुली IIT मध्ये! भारीच!! H11 समोर गर्दी जमू लागते. (सर्व मुलींची ह्या वाक्याबद्दल माफी. ही fact आहे. )
काही लोक IIT च्या बाहेर पडतात, हॉटेल्सची चंगळ होते. काही लोक जमून डंब-सी, अंताक्षरी सारखे खेळ खेळायला लागतात. काही लोक गझला गावून मनात साचलेल्या भावनांना वाट करून देतात. तर काही लोक गिटारवर गाणी म्हणतात.
काही लोकांना अचानक व्यायामाची महती आठवते न चक्क track pant n sport shoes अशा कडक तयारीत बाहेर पडून मैदानावर पळायला जातात.
तर असा हा आनंदोत्सव पाहून IIT लाही आपल्यामध्ये माणसेच राहतात ह्याची खात्री पटत असेल. लाईट परत कधी येऊच नयेत असे तिलाही वाटत नसेल तरच नवल!
काही लोकांची मात्र भयंकर पंचाईत होते. paper submission, presentations च्या deadlines असतील तर एकेक क्षण एकेका तासासारखा वाटतो. माझ्यावर अशी वेळ फारशी आलेलीच नाही. उलट एकदा माझी परीक्षा होती न लाईट गेले. खूप वेळ वाट पाहूनही आलेच नाहीत. म्हणून मग शेवटी सरांनी सोडून दिले. मग आम्ही खूप मज्जा केली. शेवटी ती परीक्षा रात्री ९-१२ ठेवण्यात आली. फारच मजेदार experience होता तो. दिवस इतका छान गेला होता की परीक्षा कशी झाली ह्याचा डोक्याला विचार न करू देताच सगळ्यांनी आपापले पाय कॅन्टीनकडे वळवले. गरमागरम कॉफी न शांत झोप!
IIT बद्दल मी उपरोधक काहीतरी लिहित असले तरी असे छान छान अनुभव फक्त IIT च देऊ शकते. technology साठी नाही तरी त्यांसाठी तरी प्रत्येकाने एकदा तरी IIT तल्या life चा अनुभव घ्यावाच!
आजच मजा झाली. lab मधून निघाले न वाटेत असताना अचानक लाईट गेले.बाप रे! सगळीकडे अंधार...रस्त्याला आत्ताच पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावल्या आहेत त्या तेवढ्या चमकत होत्या. काहीही दिसत नव्हते. अशा वेळी बिबट्या-साप यांसारख्या कॅम्पसमध्ये राहणाऱ्या प्राण्यांची विशेष आठवण येते..काही अंतर चालल्यावर गाड्यांचा प्रकाश दिसू लागल्यावर कुठे जीवात जीव आला. पटकन होस्टेलवर आले. पण रूमवर जायची सोय कुठे होती! माझा फोन फारच अत्याधुनिक :D असल्याने फारच प्रकाश देतो. त्यामुळे जिना तर अगदीच clear दिसतो. त्यात खोलीत मेणबत्ती नसतेच. passeges भूतबंगल्याची आठवण करून देतील असे न लोक आपापल्या labs मध्ये! बर काही काळ खाली बसावे म्हणाले तर आमच्याइथले डास साधे-सुधे चावत नाहीत तर आपल्याला अजून काही काळ बसले तर त्यांनी रक्त शोषल्याने आपल्याला anemia होईल की काय अशी माणसाला भीती वाटू शकण्यापर्यंत मजल गाठतात. IIT च्या BTECHs न जशी स्पेशल माजुर्डेपणा दिलेला असतो तसे इथल्या दासांनाही परमेश्वराने स्पेशल लांबीची सोंड दिली आहे की काय असा प्रश्न पडतो! jeans मधूनसुद्धा माणसाच्या पायापर्यंत पोचण्याची ability ह्या सोंडान्मध्ये असते. असो! किशोर कुमारच्या "जाते थे जपान पोहोंच गये चीन समझ गये ना" ह्या गाण्यासारखी माझी गाडी "IIT तल्या आनंदोत्सवाकडून" डासबोधाकडे पोहोचण्याआधीच थांबवावी हे बरे!

1 comment:

  1. हाहा! छान लिहिलयेस! ते 699 च्या परीक्षेचं तर सहीच जमलेलं तेव्हा!!

    ReplyDelete