Saturday, February 5, 2011

ನಮ್ಮಬೆಂಗಳೂರು (नम्म बेंगळूरू), अर्थात आमचे बेंगळूरू


(टीप: बेंगळूरू इथे  नीट लिहिता येत नसल्याने मी पोस्टमध्ये बेंगलोर असे लिहिणार आहे...)
    मला बेंगलोरमध्ये येऊन आता सहा महिने होऊन गेले आणि ह्या सहा महिन्यांमध्ये बेंगलोरने मला अनेक रंगीबेरंगी आठवणी दिल्या. ह्या रंगांनी बेंगलोरचे रंगतदार चित्र तुमच्यासमोर उभे करावे असे आज वाटले...
सगळ्यात आधी मी बेंगलोरला आले ते लग्नानंतर अभिजीतला भेटायला २-३ दिवसांसाठी. बस स्टॉप वर उतरल्या उतरल्या बेंगलोरने मला सुखद धक्का दिला. मी एका फ्रूट-प्लेट घेतली, त्या माणसाने अतिशय आपुलकीने "फ्रूट-प्लेट आवडली का?" असे मला हावभावांनी, खाणा-खुणान्नी विचारले. एकतर ती फ्रूट-प्लेट होती, वाईट लागायचा विशेष प्रश्नच येत नाही तरी त्याने विचारले. दुसरे म्हणजे एखाद्या दुकानदाराने आपल्याशी आपुलकीने बोलण्याची सवयच पुणेकर असल्याने राहिली नाहीये. कोणत्याही ठिकाणी आलेला पाहिला अनुभव त्या ठिकाणाबद्दलचे इम्प्रेशन मनात सोडून जातो. बेंगलोर मला पहिल्याच काही भेटीत आवडले. त्या ट्रीपमध्ये अजून एक गोष्ट लक्षात राहिली ती "सेट डोसा" आणि "चाउ-चाउ बाथ"...उडुपी उपहार मध्ये खाल्लेला सेट डोसा अविस्मरणीय होता..३ छोटे डोसे...वरून तूप...सांबार...चटणी...खल्लास...५ मिनिटात डोश्याचा फन्ना उडालेला होता. दुसरा नंबर चाऊ-चाऊ बाथचा. नावावरून एखादा चायनीज पदार्थ  आहे असे जर तुम्हाला वाटले असेल तर तुम्ही चुकलेले आहात. चाऊ-चाऊ बाथ म्हणजे १ मूद उपमा आणि एक मूद शिरा. शिऱ्यासारख्या असणार्या पदार्थांना इथे बाथ म्हणजे भात असे म्हणतात. जो शिरा होता तो होता केसरी बाथ. केसरी बाथ हा मी आजपर्यंत असंख्य वेळा खाऊनही त्याचा मला कंटाळा आलेला नाही...हा तुपातला शिरा असतो ज्यात लवंग घातलेली असते, कधी कधी अननस...आहाहा...बेंगलोर कधी आलात तर ना विसरता केसरी बाथ खाऊन पहा (मी नेहमी उडुपी उपहार, कोरमंगला इथे हा खाल्लेला आहे, इतर ठिकाणी कसा मिळतो मला कल्पना नाही.) तर एकदा खायला छान मिळतेय म्हणल्यावर 'मेरा दिल खुश हुवा...' इथे जागो-जागी फ्रूट-डिशेस आणि जुसेस च्या गाड्या आणि दुकाने असतात. कॉर्नर-हाउसचे आईस-क्रीम युनिक असते. भुट्टे आणि शहाळ्यांची रेलचेल असते. पाणी-पुरीच्या गाड्याही दिसतात. बेंगलोरमध्ये काही चटक-मटक खायची इच्छा झाली तर फक्त पाणी-पुरीवालेच तुमच्या कामी येऊ शकतात. पाणी-पुरी बरी असते. बाकी भेळ वगरे स्वतःच खून अनुभव घ्यावा. इथे भेळेत चिंचेचे पाणी वगरे घालायची भानगड नसते. लिंबाचा रस आणि चाट मसाला हेच काय ते चवीला घालतात. बाकी काकडी आणि गाजर हे  भेळेतले  महत्त्वाचे पदार्थ आहेत असे बेंगलोरमध्ये जन्मास आलेल्या प्रत्येक माणसाचे ठाम मत असणार कारण भेळेत काकडी-गाजर नाही असे पाहायला मिळणे अशक्य आहे. तेही काही वाईट लागत नाही. पण भेळेसारख्या चटकदार पदार्थात काकडी-गाजरासारखे सभ्य-गुणी सदस्य शोभूनच दिसत नाहीत. असो. बेंगलोरमध्ये पाव-भाजी, सामोसा, वडा-पाव असले चमचमीत पदार्थ मिळण्याची अपेक्षा जिभेने अजिबात ठेऊ नये...हे पदार्थ घेतलेच तर ते इतके पथेटिक लागतात की का घेतले असे वाटते.
    बेंगलोरला माझ्या मते दोनच ऋतू असतात पावसाळा किंवा अ-पावसाळा. बाकी इथे प्रत्येक दिवशी थंडी आणि उन्ह ह्यांचा खेळ चालू असतो. वर्षाचे अनेक महिने पाऊस थोडा-थोडा पडत असतो. आत्ता सूर्य दिसतोय, जरा उबदार वाटतंय तर ५ मिनिटांनीही तसेच वाटत असेल ह्याची खात्री नाही. हवामान असे आहे की पंखा तसा इथे लागतच नाही पण इकडे सर्दी-खोकला-ताप हे चारी ठाव पाव्हणे असतात.
     बेंगलोरची तारीफ करण्यासारखी गोष्ट म्हणजे इथली बस सेवा. वेल-कनेक्टेड, वेल-ऑर्गनाईझ्ड! प्रत्येक रूटवर एस-टी, एशिआड, शिवनेरी वगरेसारख्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बसेस धावत असतात. तुमच्या गरजेनुसार, तुमच्या खिश्याला परवडेल अशी बस निवडण्याची सोय तुम्हाला मिळते (पुण्यात गर्दी-उशीर ह्यांमुळे असंख्य लोक बसने जाण्याची हिम्मतच करत नाहीत). 
    पण   पुण्याचे ट्राफिक काय असे बेंगलोरचे ट्राफिक आहे. काही सिग्नल्स मध्ये लोकांना अर्धा अर्धा तास अडवून ठेवण्याची क्षमता आहे. आमच्याच घराच्या इथला सिग्नल एकदा लागला की तो सुटेपर्यंत गाड्या एकामागे एक थांबत जातात त्या पार पाव किलोमीटर पर्यंत उभ्या असतात. १० किलोमीटरचे अंतर पार करायलाही माणसाला १-१.५-२ तास लागू शकतात. शहराच्या आतून पुण्याला जायला बस निघाली की ती किमान २-२.५ तास आधी बेंगलोरमध्येच असते! भरीस बेंगलोरच अवाढव्य आकार. केवढे मोठे आहे बेंगलोर. बेंगलोरसमोर पुणे म्हणजे मला हत्तीसमोर उंदीर वाटायला लागले आहे. बेंगलोरचा  मध्य पकडला तर किमान २५ किलोमीटर त्रिज्येवर (रेडिअस) सर्व बाजूंनी बेंगलोर पसरलेले दिसेल. पुण्याची व्यास (डायमीटर) तरी एवढी आहे का? त्यामुळे बेंगलोरच्या उत्तरेकडील भागात जायचे म्हणजे पुण्याहून मुंबईला जाण्यासारखे होते.
     बेंगलोरला गार्डन सिटी म्हणतात. बेंगलोर हे नाव अगदी सार्थ ठरवते. इथे जागो-जागी छोट्या-मोठ्या बागा आहेत, छान मेंटेन केलेल्या, सुंदर...झाडांचीही संख्याही बरी आहे. गार्डन सिटी बरोबरच बेंगलोरला लेक (तलाव) सिटी म्हणायला हवे. गूगल वरून नकाशा पहा बेंगलोरचा असंख्य तलाव दिसतील तुम्हाला.
     बेंगलोरमध्ये लोकांना मिठाईसाठी वेगळी दुकाने काढणे परवडत नाही बहुतेक. मिठाई ही बेंगलोरमध्ये बेकरीत किंवा फार तर फार हॉटेलमध्ये मिळण्याची गोष्ट आहे. तसेच इथे डेअरीज (जिथे ताजे ताजे दुधाचे पदार्थ मिळतात)  पण फार दिसत नाहीत. एक नंदिनी नावाची कात्रज सारखी मोठ्ठी डेअरी आहे. त्यांचे packed पदार्थ मिळतात. म्हणजे खावा, लोणी वगरे सगळा packed घ्यायचे. एखाद्या मॉलमध्ये कधीतरी एखादी ताजे दुधाचे पदार्थ विकणारी डेअरी सापडते. चक्का तर इथे बहुधा तयार होत नाही. पाव-भाजीचा पाव ही इथे दुर्मिळ गोष्ट आहे. लोकांना पाव-भाजी खायला बोलवायचे असेल तर गणपतीसाठी पत्री गोळा करत हिंडावे तसे वेगवेगळ्या दुकानांतून एक-एक, दोन-दोन पाव लाद्या गोळा करत फिरावे लागते. दूध मसाला आहे का (एवरेस्ट कंपनीचा दूध मसाला महाराष्ट्रात सगळीकडे मिळतो) विचारल्यास मसाला दूध हवे आहे का असे उत्तर मिळते. केशर, मटकीसारख्या गोष्टी आणायला मॉल मध्ये जावे लागते. 
     बेंगलोरमध्ये इंग्लिशमधून शिक्षणाची इतकी क्रेझ आहे की जास्तीत जास्त लोक मुलांना इंग्लिश मिदिम मध्येच घालतात. आमच्या बाईचेच इदाहरण घ्या. नवर्याने सोडलेली, ३ मुलांची आई असलेली न वडलांनी घरात आसरा दिलेली बाई...कसे-भासे पोटभरीला पैसे मिळतात, पण मुलगा इंग्लिश मिडीअम मध्ये शिकतो. मुली कन्नड मिडीअम मध्ये आहेत पण त्यांना स्पेशल क्लास लावलेला आहे इंग्लिशसाठी!
इथले  रस्ते पुण्यासारखेच घाणेरडे आहेत, corruption हे पुण्याच्या थोबाडीत मारेल एवढे जास्त आहे. काही दुकानदारांना चितळ्यानएवढाच माज आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या ही पुण्यापेक्षा कितीअरी जास्त आहे (प्युरीफायर वाल्यांचा धंदा उत्तम चालतो.)
     आधीच म्हणल्याप्रमाणे बेंगलोर हे पुण्याचेच एक मोठे version आहे. त्यामुळे, आपली मराठी, आपली माणसे, आपला वडा-पाव सोडले तर पुण्याला फारसे मिस करायची वेळ येत नाही...म्हणूनच इथून आलेल्या माणसांनाही बेंगलोरला 'नम्म बेंगळूरू:आमचे बेंगळूरू' म्हणावेसे वाटल्यास नवल नाही.

8 comments:

  1. "punyala jaast miss karaychi wel yet nahee" +100! kharach! mala hi faar awadate bangalore! (he aata bahutek jagajaaheer zaley :P)

    ReplyDelete
  2. chan .. mast lihalay banglore anubhav. punyachi hi changlich tar udavali ahe .. chitale bandhushi tuza kahitar binsalel distey, he aata ekandarit mazya lakshat aala ahe.

    ReplyDelete
  3. झक्कास !
    मी २००५-०६ मध्ये बेंगळूरू मध्ये होतो, आणि संघकामानिमित्त जवळपास पूर्ण शहर भटकायला मिळाले. तेव्हाच्या आठवणी ताज्या झाल्या .. धन्यवाद !

    शहराच्या आतील बससेवेप्रमाणेच KSRTC ची (त्यांची येष्टी) सेवा पण खूप चांगली आहे. विशेषतः 'ऐरावता'ची स्वारी ! (आपल्याकडेही 'शिवनेरी' सुरु झाली आहे आता).
    खाद्य-संस्कृती बद्दल : काकडी गाजराची भेळ तुला मिळालीच, पण मी बीटरूट घातलेला सामोसा खाल्ला आहे :-)
    'गणेश ज्यूस सेंटर'ची चेन मला खूप आवडली. शहराच्या प्रत्येक भागात त्यांचे दुकान आहे ('आमची कोठेही शाखा नाही' असा प्रकार नाही) आणि खूप कमी दरात खूप उत्तम प्रतीचा व वेगवेगळ्या प्रकारचा ज्यूस तिथे मिळतो.

    ReplyDelete
  4. मुग्धा खूपच छान लिहिलं आहेस... बंगलोरच्या माझ्या गेल्या २ वर्षांमधल्या सगळ्या आठवणी ताज्या केल्यास!

    बंगलोरच्या हवामानाचं वर्णन एकदम चपखल!

    आम्ही दोघेही इकडे आल्यापासून खूप मिस करतो बंगलोरला... आणि आमच्यासाठी ते अजूनही "नम्म"च आहे आणि कायम तसेच राहील! :)

    अजून काही गोष्टी:
    - रिक्शावाले अकदी पुण्यासारखे किंवा त्याहून बेकार!
    - कुठल्याही बेकरीत मिळणारा एग पफ...मस्त!

    ReplyDelete
  5. muggu...a bit of critic...dont mind kay...cheshta kartoy...

    "ek tar ti fruit plate, wait lagnya cha wishesh prashnach yet nahi, tari tyani wicharla..." he ek typical puneri wakya ahe... :P

    once again muggu(and others too)...dont mind...me agdi cheshtet mhanat ahe...

    ReplyDelete
  6. Mugdha, khup masta lihilays 'tumm belaluru' baddal....(kanadi bhashet 'tumchya' sathi konta shabda ahe te mala mahit nahi mhanun 'namm' la ek bhaau milavun dila 'tumm' :D). Ya janmaat tari bengluru madhe rahayala jaave lagel ase vaatat nahi pan tujhya blog varun tithalya general life chi masta idea ali... I have been to Bangalore a couple of times pan arthatach itake details kalat nahit 1-2 divasanchya stay madhe...

    Ani मध्यगा mhanje 'median'...डायमीटर la 'व्यास' ase grand naav ahe! :)

    Cheers
    Lalit

    ReplyDelete
  7. @Sumedh, this is the reason why I although being a proud Punekar, keep critisizing it :)
    @Lalit, thanks for the corrections. I am updating the blog accordingly.

    ReplyDelete
  8. "भेळेसारख्या चटकदार पदार्थात काकडी-गाजरासारखे सभ्य-गुणी सदस्य शोभूनच दिसत नाहीत" :D :D :D

    पुढचा लेख बेंगलोर मधील घरे आणि घरमालक यांच्या वर होऊ शकतो.:P

    ReplyDelete