Saturday, December 31, 2011

नागरहोळे-कुट्टा-वायनाड ट्रीप


    सध्या कामाची, घरातली  अशी थोडी धावपळ चालू असल्याने डिसेंबर एंडला कितपत सुट्ट्या घेता येतील ह्याची आम्हाला आधी कल्पना येत नव्हती. पण ऑफिसमiध्ये बऱ्याच जणांनी सुट्टी घेतल्याने तिथेही अचानक वर्कलोड कमी झाले आणि घरातली कामेही अनपेक्षितपणे मार्गी लागली. त्यामुळे दोन दिवस तरी सुट्टी घेता येईल असे एकदम लक्षात आले. कुठेतरी मस्त फिरून यावे असे वाटू लागले. लागलीच 'बंगलोरजवळील २७८ पर्यटन स्थळे' (एक्सेल शीट) उघडून जागांचा अभ्यास सुरु झाला. हातात दोनच दिवस आहेत म्हणल्यावर जागा २००-२५० किलोमीटर्सच्या टप्प्यात असणे गरजेचे होते. लिस्ट स्कॅन करता करता नजर नागरहोळे अभयारण्यावर येऊन थांबली. २-४ ब्लॉगपोस्ट्समध्ये नागरहोळेचे चांगले वर्णन दिसले तेव्हा नागरहोळेला जायचे नक्की केले. ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणाल्यावर अभयारण्यातले जंगल लॉजेस आधीच बुक झालेले असणार हे सरळ दिसत होते. त्यामुळे होम स्टे शोधायला सुरवात केली. नागरहोळेजवळच्या कुट्टा गावी चांगले होम स्टेज आहेत अशी माहिती नेटवर मिळाली. कुट्टातील बऱ्याच होम स्टेजना फोन लावले, पण सगळे आधीच बुक्ड होते.शेवटी १-२ ब्लॉग्समध्ये नमूद केलेल्या विमला इस्टेटला फोन केला. तिथे राहण्याची सोय होऊ शकते हे कळले आणि आम्ही "ट्रीप-ए-नागरहोळे" साठी सज्ज झालो.
    आम्ही सकाळी ६.३० च्या सुमारास घरून निघालो. वाटेत कदंबमला मस्त गरमागरम ब्रेकफास्ट केला. तिथून मैसूर, मैसुरहून हुणसूर असा प्रवास झाला. हुणसुरहून कुट्टाला जायला दोन रस्ते आहेत. एक गोनिकोप्पलहून आणि दुसरा नागरहोळेच्या जंगलातून. आम्ही जंगलातून जाणार्या रस्त्याने जायचे ठरवले. ह्या रस्त्यावरून जाताना फार मजा आली. वाटेत मुक्तपणे भटकणार्या हरणांचे आणि शांतपणे गवत खात बसलेल्या एका हत्तीचे दर्शन झाले. नागरहोळेतून बाहेर पडल्यावर २ की.मी.चे अंतर कापल्यावर लगेच विमला इस्टेट लागले.
विमला इस्टेट ही मुळात कॉफीची बाग आहे. इस्टेटचे मालक श्री.पट्टू हे बागेतच घर बांधून राहतात. इस्टेटच्या आवारातच पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या बांधलेल्या आहेत. आम्हाला दिलेली खोली एकदम मस्त होती. बेडवर अंथरलेली ब्लॅंकेट्स थंड हवेमुळे एकदम टेम्प्टिंग वाटत होती. गॅस गिझर असल्याने २४ तास गरम पाण्याची सोय होती. खोलीत सामान ठेऊन आम्ही कॉफीची बाग पहायला गेलो. कॉफीच्या बागेत फिरण्याचा अनुभव वेगळाच होता. बागेत कॉफीबरोबरच सुपारी, नारळ, पपनस, मिरे, मिरची, इडलिंबू, रामफळ इत्यादीची झाडे होती. पट्टून्नी  घरासमोर अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची झाडे लावलेली होती. वेगवेगळ्या रंगांच्या जास्वंदी, बोगनवेल, बाल्सम,  गुलाब आणि नावे माहिती नसलेलीही कित्येक झाडे! अंगणात झोपाळे बांधलेले होते. खेळायला बास्केट बॉल, बॅडमिंटन  इत्यादीचीही सोय केलेली होती. थंड हवेत झोपाळ्यावर बसून कोवळ्या सूर्यकिरणांशी मारलेल्या गप्पा वेगळाच आनंद देऊन गेल्या.
कॉफी
काही वेळातच पट्टून्नी जेवणासाठी बोलावले. जेवणात घी राईस, साधा भात, कोशिंबीर, सांभार, रसम, कच्च्या केळ्याची भाजी, पापड, लोणचे, पायसम असा टिपिकल साऊथ इंडिअन मेनू होता. अंगणातच टेबल लावून  जेवायला वाढलेले होते. कोकणाची आठवण आली. गुलाबी थंडी, कोवळे उन्ह आणि गरमा गरम जेवण, आयुष्यात मजा अशी अजून काय पाहिजे? जेवण झाल्यावर उरलेल्या वेळात कोणत्या स्थळांना भेटी देता येतील त्याची पट्टून्कडे चौकशी केली.
    कुट्टा कर्नाटक आणि केरळच्या बॉर्डरवर आहे. काही की.मी. कुट्टापासून काही अंतरावरच केरळमधील वायनाड लागते. त्यामुळे जवळच 'वायनाड अभयारण्य' आणि तिरुनल्लीचे देऊळ अशा दोन पाहण्यासारख्या जागा आहेत. वायनाड अभयारण्यातर्फे जंगल सफारीची सोय केलेली आहे. सकाळी ६ ते ८ आणि दुपारी ३ ते ५ अशा दोन वेळी सफारीसाठी जीप्स मिळतात. ३ वाजता सफारी करायची आणि मग तिरुनल्ली मंदिर पाहून परत यायचे असा प्लान ठरला. 
    २.४५ ला निघालो, १० मिनिटांत वायनाड अभयारण्याला पोचलो. पाहतो तर तिथे सफरीच्या तिकिटासाठी आधीच मोठी रांग लागलेली. रांगेत अर्धा-पाऊण तास उभे राहिल्यावर नंबर आला तेव्हा "तिकिटे संपली" असे उत्तर मिळाले. आणखी चौकशी केली असता लक्षात आले की दुपारच्या वेळेला फक्त २० जीपच सोडल्या जातात. सकाळच्या वेळी मात्र ४० जीप्स असतात ही माहिती कळली तेव्हा दुसऱ्या दिवशी पहाटे उठून रांगेत उभे राहायचे असे ठरवून आम्ही तिथून देवळाकडे प्रस्थान केले.
    तिरुनल्लीचे देऊळ छान आहे असे पट्टून्नी सांगितले होते. देवळाकडे जाणारा रस्ता अतिशय भयंकर होता. धक्के खात खात कसे बसे देवळाच्या पायथ्याशी पोचलो. पायथ्याहून देवळाकडे जायला काही पायऱ्या आहेत.
वर गेलो तर देवळाचे दार बंद दिसले. ५ वाजता देऊळ दर्शनासाठी उघडले जाईल असे कळले. आता देऊळ बंदचे म्हणल्यावर आम्ही आजूबाजूच्या पाट्या वाचायला सुरवात केली. ह्या देवळाला दक्षिण भारतीय लोकांमध्ये धार्मिक दृष्ट्या फार माह्त्त्व आहे असे पाट्या वाचून कळले. देवळाजवळील तीर्थात स्नान केले असता पापनाशन होते असेही वाचनात आले. त्याच्या पुढे देवळात जाताना पाळण्याच्या नियमांची भली मोठी यादीही लिहिलेली होती. हिंदू नसलेल्या माणसांना प्रवेश निषिद्ध होता. पुरुषांनी देवळात शर्ट घालून गेलेले चालणार नाही इत्यादी नियम त्यात होते. "भलताच स्पेशल देव आहे!", मनात विचार आला. अशा स्पेशल देवाला आपल्यासारख्या ऑलमोस्ट नास्तिक माणसाला दर्शन द्यायलाही नकोसे वाटत असावे ह्या विचाराने आम्ही देवळाच्या आत जाऊन त्याला त्रास न द्यायचे ठरवले.
    देवळाच्या दोन बाजूंना पायऱ्या होत्या. एक बाजूने खाली गेलो, थोडे चाललो तरी ती वाट कुठे जात आहे ते न कळल्याने परत आलो. दुसर्या बाजूने गेल्यावर एक हॉटेल दिसले, त्यात देवाच्या भक्तांसाठी स्पेशल प्रसादाची सोय केलेली दिसली. चाफ्याच्या फुलांच्या मंद, मधुर दरवळाने आणि देवळाच्या छपरावर बहरलेल्या, केशरी फुलांनी लगडलेल्या वेलाने मात्र आम्ही रिकाम्या मनाने परत जाणार नाही ह्याची काळजी घेतली. पायऱ्या उतरेस्तोवर अंधार झाला होता. गाडीने होम स्टेला परत आलो.
    पट्टून्नी दिलेल्या गरमागरम कॉफीने संध्याकाळची मस्त सुरवात करून दिली.थंडी जरा जास्तच असल्याने मेंढी कोटाचे डाव खेळून एकावर एक कोट चढवले. साधारण ८ च्या सुमारास पुन्हा खोलीबाहेर पडलो. पाहतो तर सगळीकडे गुडुप्प अंधार होता. खोलीबाहेरचा दिवा तेवढा पाऊलवाट दाखवायचे काम करत होता. आमची खोली ते पट्टून्चे घर अशा फेऱ्या मारायला सुरवात केली. फेऱ्या मारता मारता सहज नजर आकाशाकडे गेली. आकाश इतके सुंदर दिसत होते. शहरातल्या दिव्यांच्या उजेडामुळे , प्रदूषणामुळे आणि भरीत भर म्हणून बंगलोरच्या ढगाळ वातावरणामुळे स्वच्छ , काळेभोर आकाश आणि त्यावरची ताऱ्यांची नक्षी न्याहाळण्याची संधी मिळतच नाही. निसर्गाच्या ह्या अजून एका मोहक रुपाकडे समाधान होईस्तोवर पाहून घेतले.
    ८.४५ च्या सुमारास मध्येच पट्टून्नी जेवणासाठी हाक मारली. जेवण छानच होते. ह्यावेळी त्यांनी पोळी-भाजी-भात वगरे उत्तर भारतीय पद्धतीचा स्वयंपाक केला होता. रात्रीच्या थंडीत अंगणात बसून गरम गरम जेवण जेवताना फार मजा आली. जेऊन खोलीत परत आलो. सकाळपासून प्रेमाने बोलावणाऱ्या ब्लॅंकेट्सना आता मात्र मान द्यायलाच हवा असे ठरवून आम्ही स्वतःला त्यांच्या हवाली करून टाकले.
    सकाळी ५ ला जेव्हा मोबाईलचा अलार्म वाजला तेव्हा मोबाईल फेकून द्यावासा वाटला खरेतर...मस्त थंडी होती, ब्लॅंकेटची ऊब सोडून उठायची अजिबात इच्छा होत नव्हती. पण मग एकदम लक्षात आले की आज जर सफारीची तिकिटे मिळायला हवी असतील तर ६च्या आत काउंटर पोहोचावे लागणार होते. पटापट आवरून तिकिटाची खिडकी गाठली. ह्यावेळी मात्र आमचा अपेक्षाभंग झाला नाही. तिकिटे मिळाली.
    जंगलात फिरण्याचा अनुभव अनोखा होता. जीप्स जाऊन जाऊन एक कच्चा रस्ता तयार झालेला होता. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूने इतकी घनदाट झाडी वाढलेली होती की पलीकडचे काही दिसत नव्हते. काही ठिकाणी मोकळे मैदान होते, त्यावर बारीकशी हिरवळ वाढलेली होती, झाडांमधून डोकावणारी सूर्यकिरणे हिरवळीवर निरनिराळे रंग भरण्याचे काम करत होती. अगदी परीकथेत वर्णन केल्यासारखे दृष्य साक्षात डोळ्यांसमोर चित्रित झालेले होते. जीपच्या दरवाज्यातून दिसणारी प्रत्येक फ्रेम डोळ्यात साठवून ठेवावी अशी होती. सफरीत कोणते प्राणी दिसले असा प्रश्न विचाराल तर मात्र एकही प्राणी दिसला नाही असा कबुली जवाब द्यावा लागेल. आमचा अगदीच हिरमोड होऊ नये म्हणून असावे बहुधा, काही हरणे, एक साप आणि एक मोर आम्हाला दर्शन देते झाले.
जंगलातील मोहक दृष्य
 सफारी आटोपून खोलीत परत आलो. अंघोळी आटपेस्तोवर पट्टून्नी गरमा गरम कॉफी आणली. कॉफी झाली, सामान आवरले, इतक्यात पट्टून्नी गरमा गरम नाश्ता आणला. नाश्त्यात पुट्टू-चण्याची उसळ, पोहे, केसरी बात (आपल्या भाषेत गोडाचा शिरा) आणि सोबत कॉफी असा मेनू होता.खाता खाता पट्टून्शी त्यांच्या बागेविषयी, कॉफीच्या व्यवसायाविषयी गप्पा झाल्या. त्यांनीही आमची विचारपूस केली. चोपून नाश्ता केल्याने पोटोबा खुश आणि पट्टून्च्या पाहुणचाराने दिल खुश! सुखद आठवणींचा आहेर घेऊन आम्ही विमला इस्टेटला अलविदा केले.
    पुढचे ठिकाण होते इर्पू फॉल्स! इर्पू फॉल्सला पोहोचण्यासाठी गाडी पार्क केल्यानंतर सुमारे अर्धा की.मी. चालत जावे लागते. मग पर्वतीसारख्या पायऱ्या लागतात. पायथ्यापासून येणारा पाण्याचा आवाज सस्पेन्स निर्माण करतो. खूप पायऱ्या चढून गेल्या की धबधबा दिसतो. वाटेत एके ठिकाणी वेगळी वाट धरून ट्रेक पण करता येतो. वेळेअभावी आम्ही ट्रेक केला नाही.
इर्पू फॉल्स
 धबधब्याला पुरेसे पाणी होते. काठाशी उभे राहून दिसणारे दृश्यही फार रमणीय होते. मुख्य म्हणजे दारू पिऊन नाचणारे उघडे पुरुष तिथे नव्हते. त्यामुळे धबधब्याचे पाणी, आवाज ह्यांचा निखळ आनंद घेता आला. धबधब्याचे पाणी प्रचंड गार होते. पाण्यात पाय घालताक्षणीच पायात कळ येत होती.
    पाण्यात पाय सोडून बसलेले असताना पाण्यावर तरंगणारा किडा दिसला. त्याचे नाव मला आठवत नाहीये, पण बारावीच्या फिजिक्सच्या पुस्तकात त्याचा उल्लेख होता. (विकिपीडियावरील माहितीवरून त्याला स्ट्रायडर  म्हणतात असे कळले). हा किडा धबधब्याच्या जोरदार प्रवाहाच्या उलट दिशेला जायचा प्रयत्न करत होता. खूप कष्टाने हात-पाय मारत तो एखाद-दोन से.मी. पुढे जायचा आणि पाण्याच्या जोराने परत तितकाच मागे यायचा. हा प्रकार मी तिथे बसलेली असेस्तोवर चालू होता. ह्या किड्याला नक्की कुठे जायचे होते कोण जाणे? ह्यापद्धतीने तो कुठेच पोहोचण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. पण तरी त्याची धडपड मात्र चालू होती. आपले आयुष्य ह्या किड्यासारखेच असते नाही का?
    धबधब्याच्या पायथ्याशी एक देऊळ आहे. रम्य, शांत, साधे! आत जाऊन छान वाटले. दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागलो. कॉफीच्या बागांमधून जाणारा रस्ता छानच दिसत होता. गाडी कुट्टामधून निघून परत नागरहोळे अभयारण्यात शिरली. सफारीत प्राणी न बघायला मिळाल्याने आलेल्या निराशेची तीव्रता नागरहोळेतल्या प्राण्यांनी थोडीफार कमी केली. जाता जाता आम्हाला गवा दिसला, माकडे दिसली आणि पुन्हा अनेक हरणे दिसली.
   पुढचा थांबा होता मैसूर. मैसूरला जेऊन आम्ही वृंदावन गार्डनचा संध्याकाळचा म्युझिकल फाउंटनचा शो पाहिला गेलो. वृंदावन गार्डनमध्ये  खूप जास्त गर्दी होती. एक वेगळा अनुभव म्हणून शो छान वाटला. शो पाहण्यासाठी आत जायला जेवढी फाईट मारावी लागली तेवढीच बाहेर यायलाही लागली.
    आता मात्र आम्ही पुरते दमलो होतो. गाडीत बसलो आणि जे डोळे मिटले ते डायरेक्ट घर आल्यावरच उघडले.दोन दिवसात कॉफीची बाग, चांदण्यांनी भरलेले आकाश, अभयारण्यातले प्राणी, जंगलातील सफारी, धबधबा,  म्युझिकल फाउंटन अशा वैविध्यपूर्ण गोष्टींची सफर घडवून आणणारी अचानक ठरलेली ही ट्रीप आमच्या कायम लक्षात राहील!
(Photography by Abhijeet)

Tuesday, December 13, 2011

उन्हाळा

    पुण्याचा रखरखीत आणि मुंबईचा दमट उन्हाळा सोसल्यावर उन्हाळ्याविषयी मी फार प्रेमाने लिहीन असे काही मला बंगलोरला येण्याआधी वाटले नव्हते. माणसाला कोणत्या गोष्टीची किंमत कधी समजेल काही सांगता येत नाही. गेल्या वर्षी कांद्याचे भाव ६०-७० झाल्यावर आणि अजिबात कांदा न घातलेले जेवण जेवल्यावर जशी कांद्याची किंमत कळली तसे बंगलोरमध्ये आल्यावर मला उन्हाळ्याची किंमत कळली.
उन्हाळा म्हणले की माझ्या डोक्यात आंबा, सरबते, कलिंगडे, द्राक्षे, करवंदे, जांभळे, कैऱ्या, वाळवणे (कुरडया, पापड, लोणची), माठातले पाणी, वाळा, पांढरा कांदा, पिवळ्या फुलांनी लगडलेली टबूबियाची झाडे, थोडे दिवस परीक्षा; मग उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवसभर मजा (फक्त शाळेत असेपर्यंत) असे वेगवेगळे शब्द येतात. उन्हाळ्याची सुट्टी तर माझ्यासारख्या घोडीला आता कोणी देणार नाही पण बंगलोरमध्ये उरलेल्यापैकीही एकही गोष्टीची मजा उन्हाळ्यात अनुभवता आली नाही.
     उन्हाळा सुरु होऊन बरेच दिवस होत आल्यावर दशेहरी, नीलम, रसपुरी, बदामी अशा नावांचे आंबे बंगलोरमध्ये दिसू लागले. ह्यातला बदामी सोडून कुठलाच आंबा आधी चाखलेला नसल्याने आंब्याकडे बोट दाखवून हा ०.५/१ किलो द्या (हे आंबे किलोवर मिळतात) असे सांगून आंबे घेतले आणि खाल्ले. पण हापूसची सर एकालाही नाही. त्यामुळे पुण्यात असतानासारखी सकाळ-संध्याकाळच्या जेवण्यातली आंब्याच्या रसाची मजा काही इकडे घेता आली नाही. "काळी मैना डोंगरची मैना", "काळे काळे जांभूळ, लय गोड जांभूळ" अशी हाक कानावर आल्याक्षणी पळत पळत जाऊन करवंदे, जांभूळ घरी आणून मिटक्या मारत खाण्यातली गम्मतही इथे घेता आली नाही. कलिंगडांची खरी मजा येते ती उकाड्यात! सरबतांचेही तेच! भयंकर उकडतेय, डोक्यावर पंखा गरागरा फिरतोय, घामाच्या धारा वाहतायत आणि अशात कोणी कलिंगडाच्या फोडी खायला दिल्या, सरबत दिले काय समाधान मिळते! पन्ह्याची, ताज्या-ताज्या उसाच्या रसाची, कोकमाच्या,  लिंबाच्या,  रसनाच्या सरबतांची खरी मजा कडक उन्हाळ्यातच येते. होलसेल मार्केटातून १०० पेप्सिकोल्यांचे पाकीट आणून येता-जाता पेप्सीकोले खाणे हे उन्हाळ्यातच आनंद देऊ शकते. चैत्राच्या हळदी-कुन्कवानिम्मित बनणारे डाळ-पन्हेही उन्हाळ्यातच खायला छान वाटते. बंगलोरला उन्हाळ्यातही उकडतंय अशी परिस्थिती क्वचितच निर्माण होते. वर्षातले १० महिने तर इथे पाऊसच असतो. थंडी-उन्ह-पावसाचा खेळ तर दिवसभर चालू असतो. एकंदरीत बंगलोरचे हवामान चांगले आहे. पण ४ महिने उन्हाळ्याने त्रासलेल्या जिवाला पहिल्या पावसाने मिळणारा आनंद इथे नाही की सततच्या पावसाने  कंटाळलेल्या लोकांना दिवाळीच्या सुमारास अलगद येणाऱ्या थंडीने मिळणारा गारवा नाही. स्वेटर, छत्र्या ह्या वस्तू इथे कधी माळ्यावर जातच नाहीत!
   लहानपणी गच्चीत आईने धान्ये, वाळवणे घातली की त्यांची पक्ष्यांपासून राखण करण्याचे काम माझ्याकडे असायचे. वाळवणे घातली की गच्चीच्या समोरच्या पोर्चमध्ये एखादी सतरंजी पांघरून, सोबत द्राक्षे-दाणे-खाऊचा खुराक घेऊन फास्टर फेणे, टारझन, शरलॉक होम्स वगरे दिवसभर वाचत  बसायची मजा वेगळीच होती. इथे उन्हाळा असा विशेष वेगळा नसल्याने वाळवणे घालण्याचा प्लान करणेच अवघड! भर उन्हात मंडईत जाऊन लिंबे, माठ, पांढरे कांदे, वाळे, रसाची गुऱ्हाळे, शिकेकाई, मसाले ह्यांनी भरलेला बाजार नुसता पाहण्यातली एक मजा होती हे इथे उन्हाळा घालवल्यानंतर कळले.
     गेल्या मार्चमध्ये उकाडा जाणवला तशी मी मोठ्या हौसेने माठ घेऊन आले. पुण्याला गेले असताना माठात घालायला वाळा घेऊन आले. थोडे दिवस माठातले पाणी प्यायले, पण कसले काय! थोड्याच दिवसात पावसाने उन्हाळ्याला पळवून लावले, विशेष उकडेनासे  झाले आणि माठातले पाणी प्यायचे थांबवून नॉर्मल पाणी प्यायला सुरवात करावी लागली.
   थोडक्यात बंगलोरच्या लाईफमध्येही भरपूर (महागड्या?) मजा मिळतात. पण आपल्या देशीच्या ह्या बारीक सारीक माजांची सर त्यांना नाही. पुढच्यावेळी ही सगळी मजा घेण्यासाठी आवर्जून उन्हाळ्यातच पुण्याला जायचे मी ठरवले आहे.