ऑफिसमध्ये कलीग्स नेहमी आपापल्या मुलांच्या मज सांगत असतात. श्रेयाला बागेत घेऊन जाते तेव्हासुद्धा बिल्डींगमधल्या मुलांशी गप्पा मारायला मिळतात. त्यामुळे छोट्या छोट्या मुलांच्या अनेक गंमती-जंमती ऐकायला आणि पाहायला मिळतात.त्यातले थोडेसे अनुभव तुमच्यासोबत शेअर करते.
एकदा मी आणि श्रेया बागेत बसलेले असताना अक्षता नावाची एक तीन-चार वर्षाची मुलगी माझ्याशी गप्पा मारायला लागली. इतक्यात अभिजीत ऑफिसहून परत आला. माझ्याजवळ येऊन काहीतरी बोलू लागला. तोच अक्षता म्हणाली, "हे कोण आहेत?" मी म्हणाले, "हे श्रेयाचे बाबा आहेत." मी असे म्हणाल्याबरोबर अक्षता तिथून पळून गेली. दुसऱ्या दिवशी दिसली तेव्हा मी तिला आदल्या दिवशी पळून जाण्याचे कारण विचारले. मला म्हणाली, "मला हे बाबा लोक आवडत नाहीत." मी म्हणाले, "तुला कोणाचेच बाबा आवडत नाहीत का?" तर म्हणाली, "मला फक्त माझेच बाबा आवडतात, बाकी कोणाचेच नाहीत." आता बाबा आवडण्याची ते शक्तिमान आहेत, किंवा माझ्याशी खूप खेळतात, किंवा छान गोष्टी सांगतात वगैरे कारणे ऐकली आहेत. पण अक्षताचे कारण फार वेगळे होते. ती म्हणाली, "हे बाबा लोक चेहरा स्वच्छ ठेवत नाहीत. माझेच बाबा फक्त ऑफिसमधून आल्या आल्या चेहरा स्वच्छ धूतात म्हणून मला आवडतात!"
एकदा मी श्रेयाला बाबागाडीत बसवून फिरवत होते. दोन-तीन मुले सायकलवर फेऱ्या मारत होती. अधून मधून श्रेयाला हाका मारत होती, आमच्याशी शर्यत लावत होती. काही वेळाने ती पिझाच्या दुकानाचा खेळ खेळू लागली. त्यांचे खोटे खोटे पिझाचे दुकान, कोणीतरी ऑर्डर देत होते, कोणी घेत होते, कोणी पिझा तयार करत होते, कोणी डिलिवरी करत होते. सहज काहीतरी बोलायचे म्हणून मी त्यांना म्हणाले, "श्रेयाला पिझा देणार का?" तर एक मुलगा म्हणाला, "आम्ही काही खरा खरा पिझा नाही बनवू शकत. श्रेयाला पिझा द्यायचा असेल तर तुम्हाला शेजारी डॉमिनोजला ऑर्डर द्यायला लागेल. " 'एवढे कसे कळत नाही ह्यांना?' अशाप्रकारचे भाव चेहऱ्यावर आणत पोरे आपल्या खेळत परत मग्न झाली.
सारंगी नावाची एक तीन-चार मुलगी एक दिवस माझ्याशी खूपच गप्पा मारायला लागली. त्याही इंग्लिशमधून…"माझा भाऊ! सारखी आईची बोलणी खातो. मुद्दाम करतो असे नाही. पण त्याला रिस्पॉssन्सिबिलिटी कळत नाही. त्याला त्याची रिस्पॉssन्सिबिलिटी कळली तर किती बरे होईल. मी कालच त्याला म्हणत होते की रिस्पॉssन्सिबिलिटीने वाग." घरी कोणीतरी भावाला बहुतेक रागावले असेल. त्यातला रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द तिला आवडला असेल. आवाजात गंभीरता आणत, टिपिकल साऊथ इंडिअन पद्धतीने हेल काढत सारंगी कितीतरी वेळ रिस्पॉssन्सिबिलिटी, रिस्पॉssन्सिबिलिटी हा शब्द वापरत माझ्यासोबत बडबड करत बसली होती. आता एवढ्याशा चिमुरडीला रिस्पॉन्सिबिलिटी ती काय कळणार?
माझ्या ऑफिसमधल्या एका कलीगच्या, म्हणजे अमरिंदरच्या मुलाचे नाव आहे आरुष! आरुषच्या घरी जेवण तयार करायला रोज कूक येत असे. आपले आई-बाबा कूकला रोज काय तयार करायचे ते सांगतात हे तो नेहमी पाहत असे. एक दिवस अमरिंदर आरुषला घेऊन मित्राकडे जेवायला गेला होता. अमरिंदरचा मित्र स्वयंपाकघरात काहीतरी पदार्थ तयार करत होता. त्याला कूक समजून आरुष त्याला म्हणाला "काका, आज जरा पाव-भाजी बनवा."
माझ्या ऑफिसमधल्या एका कलीगच्या, म्हणजे अमरिंदरच्या मुलाचे नाव आहे आरुष! आरुषच्या घरी जेवण तयार करायला रोज कूक येत असे. आपले आई-बाबा कूकला रोज काय तयार करायचे ते सांगतात हे तो नेहमी पाहत असे. एक दिवस अमरिंदर आरुषला घेऊन मित्राकडे जेवायला गेला होता. अमरिंदरचा मित्र स्वयंपाकघरात काहीतरी पदार्थ तयार करत होता. त्याला कूक समजून आरुष त्याला म्हणाला "काका, आज जरा पाव-भाजी बनवा."
रोज श्रेयाला घेऊन जाते तेव्हा, कलीग्सच्या बोलण्यातून रोजच असे मजेदार अनुभव येत असतात. त्यातले निवडक तुम्हाला सांगितले. प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीतील मुले कशी स्मार्ट ह्याबद्दल बोलत असते. आता आपल्या पुढच्या पिढीबद्दल हे म्हणायचे आपले दिवस आलेत असे दिसतेय.
No comments:
Post a Comment