कपाळी नाही कुंकू घालते मी जीन्स
केसांचा बॉप आणि पायात हिल्स
कानात फक्त इयरिंग्स बाकी लंकेची पार्वती
So what? मला, आवडते मराठी
पोहे हार, चपला हार, डोरली नि बुगड्या
पैंजण आणि नथी, तोडे नि बांगड्या
लग्नात मिरवायला हवेच ना हे सारे
मऱ्हाटी साजाचे कौतुकच न्यारे
आवडतो पास्ता आणि कॅप्युचिनो स्ट्रॉंग
इंडो-चायनीज भारी लागते डोन्ट गेट मी रॉंग
तिखटजाळ मिसळीचाही बेत जमतो फक्कड
आंबट्ट ताकातली खमंग उकड
चकली हवी खुसखुशीत , आंबा हवा रसरशीत
कणिक नको विसविशीत, भात हवा घसघशीत
भाजी झाली झणझणीत, खिचडी झाली मिळमिळीत
सांगा कसे सांगाल सारे सगळे हे इंग्रजीत?
केळ्यांच्या शिकारणीला म्हणाल का सॅलड?
खव्याच्या साटोऱ्यांना स्टफ्ड स्वीट ब्रेड?
दडपे ते पोहे, भाजणीचे थालपीठ,
मराठी नावेच ह्यांना बसतात की हो फिट!
एक्सरसाईजला झुंबा झोकात करते
कार्डिओ पिलाटेची कसरतही होते
मंगळागौरीला गोलगोल फुगड्याही घालते
कोळीगीताच्या ठेक्यावर अंग डोलते
ओव्या आणि आरत्या, अभंग, गवळण
पोवाडे, भारुडे, गोंधळ, जागरण
सकाळी भूपाळी प्रसन्न होई मन
किकस्टार्ट होतो दिवस वाटते मला फार छान
हॅरी पॉटर, लॉर्ड ऑफ द रिंग्स फॅंटसीजची आवड
अगाथा ख्रिस्ती, सिडनी शेल्डनच्या थ्रिलर्सची जोड
जेन ऑस्टिन, जोनाथन स्विफ्ट, चार्ल्स डिकन्स वाचते
पण लिट्ल वूमनपेक्षाही चौघीजणीच भावते
बटाट्याच्या चाळीचे वाटेल भाषांतर कसे?
मराठीतच बोलतील ना माणदेशी माणसे?
बालकवी, कुसुमाग्रज, महान ते कवी
संदीप खरेचे काव्य आयुष्यावर बोलते काही
विट्टी आणि दांडू, लगोरी, लंगडी
मराठमोळ्या नावांची गम्मतच न्यारी
दुपारी बरा सागरगोट्यांचा डाव
भातुकलीची सर प्रिटेंड प्लेला येईल का राव?
पायात येतात गोळे, झोंबतात कधी डोळे,
येते कधी कणकण, डोके करते भणभण
कसे सांगू डॉक्टरला इंग्रजीत सारे
इंग्लिशमध्ये सांगताना डोके गरगरे
ऑफिसमध्ये इंग्लिश बाहेर हिंदीत बोलते
कामवाल्या बायकांशी कन्नड झाडते
मुलांशी अट्टाहासाने मराठीत बोलते
कारण फक्त एकच! मला मराठी आवडते!
शब्दमर्यादा दोनशेची संदर्भ किती देणार?
भूकसुद्धा लागलीये मला आयते कोण देणार?
भावना असतील पोचल्या माझ्या करते मी गुडबाय
मनात कायम राहणारच मराठी माय
यो यो हनी सिंघकडून इन्स्पिरेशन घेऊन
रॅप मी लिहिला बारीक लक्ष देऊन
लाईक्स तुम्ही द्यालच त्याला आहे मला माहित
मेंबर्स आपल्या मंडळाचे अजिबात कंजूस नाहीत!