Wednesday, June 12, 2024
So what? मला आवडते मराठी
नमस्कार दोस्तहो, काय म्हणताय? खूप दिवसांनी ब्लॉगला पोस्ट लिहीत आहे. मराठी भाषा दिनानिमित्त आमच्या मंडळाने एक स्पर्धा घेतली होती. त्यासाठी मी हा रॅप लिहिला होता. कसा वाटतोय? कंमेंट्समधून नक्की सांगा.
कपाळी नाही कुंकू घालते मी जीन्स
केसांचा बॉप आणि पायात हिल्स
कानात इयरिंग्स बाकी लंकेची पार्वती
So what? मला, आवडते मराठी
पोहेहार, चपलाहार, डोरली नि बुगड्या
पैंजण आणि नथी, तोडे नि बांगड्या
लग्नात मिरवायला हवेच ना सारे
मऱ्हाटी साजाचे कौतुकच न्यारे
आवडतो पास्ता कॅप्युचिनो स्ट्रॉंग
इंडो-चायनीज भारी लागते, डोन्ट गेट मी रॉंग
तिखटजाळ मिसळीचा बेत जमतो फक्कड
आंबट्ट ताकातली खमंग उकड
चकली हवी खुसखुशीत , आंबा हवा रसरशीत
कणिक नको विसविशीत, भात घ्यावा घसघशीत
भाजी झाली झणझणीत, खिचडी झाली मिळमिळीत
सांगा कसे सांगाल सारे सगळे हे इंग्रजीत?
केळ्यांच्या शिकारणीला म्हणाल का सॅलड?
खव्याच्या साटोऱ्यांना स्टफ्ड स्वीट ब्रेड?
दडपे ते पोहे, भाजणीचे थालपीठ,
मराठी नावेच ह्यांना बसतात की हो फिट!
व्यायामाच्या वेळी झुंबा, झोकात करते
कार्डिओ पिलाटेची कसरतही होते
मंगळागौरीला गोलगोल फुगड्याही घालते
लावणीच्या ठेक्यावर ठेक्यावर अंग डोलते
ओव्या आणि आरत्या, अभंग, गवळण
पोवाडे, भारुडे, गोंधळ, जागरण
सकाळी भूपाळी प्रसन्न होई मन
किकस्टार्ट होतो दिवस मस्त, जातो फार छान
हॅरी पॉटर, लॉर्ड ऑफ द रिंग्स फॅंटसीजची आवड
अगाथा ख्रिस्ती, डॅन ब्राऊनच्या थ्रिलर्सची जोड
जेन ऑस्टिन, चार्ल्स डिकन्स आवडीने वाचते
पण लिट्ल वूमनपेक्षा चौघीजणीच भावते
बटाट्याच्या चाळीचे वाटेल, भाषांतर कसे?
मराठीतच बोलतील ना माणदेशी माणसे?
बालकवी, कुसुमाग्रज, महान ते कवी
खरेचे काव्य आयुष्यावर बोलते काही
विट्टी आणि दांडू, लगोरी, लंगडी
मराठमोळ्या नावांची गम्मतच न्यारी
दुपारी बरा सागरगोट्यांचा डाव
भातुकलीची सर प्रिटेंड प्लेला येईल का राव?
पायात येतात गोळे, झोंबतात कधी डोळे,
येते कधी कणकण, डोके करते भणभण
कसे सांगू डॉक्टरला इंग्रजीत सारे
इंग्लिशमध्ये सांगताना डोके गरगरे
ऑफिसमध्ये इंग्लिश बाहेर, हिंदीत बोलते
कामवाल्या बायकांशी कन्नड झाडते
मुलांशी मुद्दाम मराठी बोलते
कारण फक्त एकच! मला मराठी आवडते!
word limit दोनशेची किती मी सांगणार?
भूकसुद्धा लागलीये मला, आयते कोण देणार?
भावना असतील पोचल्या माझ्या, करते मी गुडबाय
मनात कायम राहणारच मराठी माय
यो यो हनी सिंघकडून इन्स्पिरेशन घेऊन
रॅप मी लिहिला बारीक लक्ष देऊन
लाईक्स तुम्ही द्यालच मला चांगलंच आहे माहित
मेंबर्स आपल्या मंडळाचे मुळ्ळीच कंजूस नाहीत!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment