कूर्गची तारीफ लोकांकडून पुष्कळदा ऐकली होती. २-३ वेळा जायचे बर्यापैकी नक्कीही केले होते. पण काही ना काही कारणाने दरवेळी कुर्गची ट्रीप रद्द होत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत अभिजीतचे आई-बाबा यायचे ठरले. आता मात्र नक्की जायचेच असे ठरवले. मॅजेस्टिक, बंगलोरहून कुर्गला बऱ्याच गाड्या असतात असे कळले. संदीपकडून 'अपना घर' ह्या होमे-स्टेची माहिती मिळाली होती. लगोलग बुकिंग्स करून टाकली.
शुक्रवारी रात्री ११च्या गाडीने कुर्गला निघालो. तिथे पहाटे ४.३० ला पोहोचलो. होमे-स्टेतर्फेच बस-स्टॅंडहून कॉम्प्लिमेंटरी पिक-अप, ड्रॉपची सोय होती. होमे-स्टेचा मालक रशीन ह्याला फोन लावला. १५ मिनिटात तो घ्यायला आला. होमे-स्टेवर जावून थोडा आराम केला. रशीननेच साईट-सीइंगसाठी गाडीची सोय आणि प्लानिंग करून दिले. नाश्त्याला गरमा-गरम पुट्टू, सांभार आणि कॉफी असा बेत होता. पुट्टू आम्ही वायनाड ट्रीपमध्येही खाल्ले होते. तांदळाचा हा पदार्थ सांभारसोबत भारी लागतो.
कॉफीही मस्तच होती. पोटोबाची पूजा सकाळी सकाळी आटोपल्यावर फिरायला बाहेर पडलो.
पहिली जागा होती Bhagamandala (मला इथल्या जागांच्या नावांचे उच्चार कधीच समजत नाहीत, त्यामुळे इंग्लीशमधूनच लिहिते). इथे कावेरी, सुज्योती आणि कनिके ह्या नद्यांचा संगम होतो. शिवाय इथे Bhagundeshwara Kshetra हे मंदिरही आहे. मंदिराच्या आवारात मुख्य देवळासोबत इतर छोटी छोटी ५-६ देवळे आहेत. देउळ दगडी आहे. आजूबाजूचा निसर्गही रम्य आहे. थोडा वेळ तिथे घालवून पुढे निघालो.
पुढचे ठिकाण होते तलकावेरी. ब्रह्मगिरी पर्वतात वसलेले असे हे ठिकाण. इथे कावेरी नदी उगम पावते. छोट्या झर्याच्या रुपात इथे जन्मास आलेली कावेरी लगेचच भूमिगत होऊन काही अंतरावर आपल्या डौलदार रुपात पुन्हा प्रकटते. ह्या जागेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. शंकराचे आणि गणपतीचे देउळ आहे. देवळाच्या बाजूने ब्रह्मगिरी पर्वताचे मोहक सौष्टव नजरेस येते. डावीकडे दरी. हिरव्यागार झाडांनी नटलेली, धुक्याची शाल ल्यालेली.
कितीतरी वेळ ह्या सौंदर्याला डोळ्यात साठवत राहिलो. पुढे सुमारे ४०० पायऱ्या वरती जाताना दिसल्या. एक-एक पायरी चढत जेव्हा वरती पोहोचलो तेव्हा एका क्षणात अंगाला आलेला क्षीण नाहीसा झाला. आम्ही ब्रह्मगिरीच्या शिखरावर होतो. चारीही दिशांनी दरी...पायथ्याच्या गावांचे मनोरम दृश्य. छोटी घरे, शेते...पलीकडे आणखी काही पर्वत. हिरवीगार जमीन. एके ठिकाणी पर्वताच्या सावलीने लीफ ग्रीन कलरचा पॅच निर्माण झाला होता. सूर्याच्या किरणांमुळे त्याच्या मधोमध लिरील ग्रीन कलरचा आणखी एक पॅच तयार झाला होता. फारच सुरेख दृश्य होते ते. ढगात बसलोय की काय असे वाटत होते.
काही वेळ तिथे घालवून खाली आलो. गरमा-गरम चहा प्यायला आणि पुढच्या प्रवासाला निघालो.
पुढची जागा होती Abbi Falls. ह्या धबधब्याकडे जाणारा रस्ता एका खासगी कॉफीच्या प्लांटेशनमधून जातो. पायऱ्या उतरत खाली जाताना आपल्या डोळ्यांना काय आनंद मिळणार आहे ह्याची पूर्ण कल्पना येत नाही. धबधबा जसा जसा जवळ येतो तसा तसा आपल्या आवाजाने आपले अस्तित्त्व जाणवून देऊ लागतो. पहिल्यांदा नजरेस पडतो तो झुलता पूल. ह्या पुलावर उभे राहून धबधब्याचे सौंदर्य न्याहाळत बसण्याचा आनंदच अवर्णनीय. समोर मोठीच्या मोठी खडकाची भिंत न तिच्या टोकावरून कोसळत खाली येणारा धबधबा. मुख्य म्हणजे धबधब्याच्या तिन्ही बाजूंना रेलिंग घातल्याने लोक दारू पिऊन धिंगाणा इथे घालून शकत नाहीत त्यामुळे निसर्गप्रेमींना येथील मनोरम दृश्याचा पुरेपूर आस्वाद घेता येतो. रस्त्यापासून दूर अशा ह्या ठिकाणी धबधब्याचा आवाजही अगदी वेगळ्या प्रकारचा अनुभव देऊन जातो. निसर्ग म्हणत असावा अशी काही काहीच तर ठिकाणे आहेत जिथे मी मोकळेपणाने बोलू शकतो आणि माझे शब्द माणसांपर्यंत पोचू शकतात. खरच हा धबधबा आपल्याशी काहीतरी बोलत आहे असे वाटते. त्याचे रूप डोळ्यात साठवत आणि आवाज कानांमध्ये ऐकत तिथेच बसून राहावे असे वाटले.
थोड्या वेळाने मन भानावर आल्यावर पुढे जायला हवेय ह्याची जाणीव झाली. परत निघालो. वर जावून ताक, तिखट लावलेली कैरी खाल्ल्यावर सिंहगडाची आठवण झाली. नॉस्टॅल्जिक वाटले. शेवटी ''जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी|". असो. तिथून निघालो आणि 'Raja's Sit' नावाच्या ठिकाणी गेलो. इथे एक बाग होती. बागेतून आणखी आत गेल्यावर दरीचा व्ह्यू होता. थोडावेळ तिथे बसलो. ढगांनी पावसाचे काही थेंब सांडून 'चला घरी जा बरे' असे शांत आवाजात सांगितले. जोरात पाऊस पडून त्यांनी हाकलण्याची आणखी पुढची स्टेप घेण्याआधी आम्हीच तिथून पळ काढला.रूमवर परत आल्यावर रशीनने गरमा-गरम कॉफी दिली. मग आराम करून जेऊन आलो. पत्ते खेळले. झोपून गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ला निघायचे होते. नाश्त्यात गरमा-गरम इडली-सांभार-कॉफी होते. त्यावर तव मारून निघालो ते एलिफंट कॅम्पकडे. गाडीतून जाताना जे दृश्य दिसत होते ते अप्रतिम होते. पावसाळी हवा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्यागार बागा कॉफीच्या, नारळाच्या, आंब्याच्या, निलगिरीच्या न आणखीही ना माहिती असलेल्या कसल्या कसल्या झाडांच्या. काही काही बागांमधली झाडे तर इतकी उंच होती की जणू काही त्यांच्यात आभाळाला टेकण्यासाठी शर्यत लागली होती. ह्याच बागांमध्ये क्वचित दिसणाऱ्या केळीच्या झाडांच्या झावळ्याही जमिनीकडे झुकलेल्या नव्हत्या...त्याही ताठ होत्या. असे वाटत होते की जणू ही झाडे हात उंचावून इतर उंच झाडांना म्हणत आहेत की 'आम्हालाही कडेवर घेऊन आभाळाला हात लावू द्या की...' असे रम्य दृष्य पाहता पाहता एलिफंट कॅम्प कधी आले तेच कळले नाही.
एलिफंट कॅम्प हे एक नदी ओलांडून पलीकडे आहे. ९.३०-११ ह्या वेळामध्ये हत्तींना नदीच्या किनार्याशी आणून त्यांना अंघोळ घालणे, मग त्यांना खाऊ पिऊ घालणे इत्यादी कार्यक्रम केले जातात. २० रुपयात बोटने नदी पार करून हा सगळा कार्यक्रम पाहण्याची सोय फॉरेस्ट डीपार्टमेंटने लोकांना करून दिली आहे. जर हत्तीला अंघोळ घालायची असले किंवा स्वतः खाऊ घालायचे असेल तर आणखी पैसे भरून तिकीट घेता येते.
बोटने पलीकडे गेलो. हत्तींचे शांतपणे निरीक्षण करता येईल अशी मोक्याची जागा शोधून बसलो. कॅम्पची लोक एकेक करून हत्तींना अंघोळ घालायला आणत होते. हत्तींचे चालणे, वागणे ह्यावरून हत्तींचे वय लक्षात येत होते. सगळ्यात मोठे हत्ती शांतपणे येऊन किनार्यावर पडायचे. त्यांना अंघोळ घातली की माहुताच्या आदेशाप्रमाणे निघून जायचे. थोडे मध्यमवयीन हत्ती स्वतःला वाटले तर सोंडेने अंगावर पाणी घेत होते. एक हत्तीचे पिल्लूही तिथे होते. बाकीच्या हत्तींना साखळदंड बांधलेले होते. हे पिल्लू लहान असल्याने पाहिजे ते करायला मोकळे होते.
ते आले, पळत पळत पाण्यात शिरले. पाण्यात वेगवेगळ्या हालचाली करून मजा करू लागले. मग त्याचा कंटाळा आल्यावरइतर हत्तींना त्रास देणे त्याने सुरु केले. ह्याला धक्का दे, त्याच्या पायाशी खेळ असे खूप वेळ केल्यावर मात्र माहुताने पाठीवर एक फटका मारला. 'आता आपली जाण्याची वेळ झाली' हे पिल्लाला समजले. नाखुशीनेच आपल्या आईच्या मागे मागे जाऊ लागले. चढ आल्यावर मात्र पिल्लाला काय करावे ते कळेना. तेव्हा पाय गुडघ्यात वाकवून सोंडेचा आधार घेऊन, अडखळत कडे बसे ते चढले. ५ मिनिटांपूर्वीच अंघोळ करून स्वच्छ झालेले पिल्लू परत मळले.
पुढचा कार्यक्रम होता हत्तींच्या नाश्त्याचा. कॅम्पच्या लोकांनी त्यांना भरवायला नाचणीचे गोळे केले होते. २-२ गोळे हे लोक हत्तीच्या तोंडात भरवत होते. एक गोळा लागलीच तोंडात टाकून, न दुसरा गोळा सोंडेत झेलून हत्तींची खादाडी सुरु झाली. पुढे हत्तींची सगळी माहिती तिथल्या माणसांनी दिली. कॅम्पला तशी मजा आली. पण अंकुशाकडे पाहून मला फार वाईट वाटले. हत्तींना वठणीवर आणण्यासाठी माहूत अंकुश आणि पायाचा वापर करतात. पायाने कानावर टोचून टोचून हत्तीला सूचना देतात. अंकुशाच्या काठीने डोक्यावर मारतात. टोकदार अंकुश डोक्याला टोचतात. त्या हत्तींना सारखे तसे करून दिखात नसेल काय? आपल्याला कोणी असे केले असते तर? केवळ बुद्धी कमी म्हणून तो विशालकाय हत्ती माणसाच्या मुठीत राहतो.
एका माणसाने दुसर्या माणसाला अशा प्रकारे वागवले तर ती गुलामगिरी न माणसाने प्राण्यांना असे वागवले तर त्याला काय म्हणायचे? असे विचार मनात चालू असताना नजर वेधली ती पलीकडच्या सुरेख दृश्याने. मस्त हिरवळ, भरपूर झाडे, त्यांमधली काही गुलमोहोराची होती..हिरवा आणि केशरी रंगांनी रंगून गेली होती.
डोळ्यांना तृप्ती मिळाली. निसर्गाचे हे वैभव डोळ्यात साठवत बोटीने परत पलीकडे गेलो. गाडीत बसलो ते 'निसर्ग धाम' ला जाण्यासाठी.
परत एकदा झुलत्या पुलाने झुलून दाखवून आमचे स्वागत केले. पूल बांधलेला आहे कावेरी नदीवर. नदीच्या पाण्यात बोटिंग करायची सोयही आहे. पूल पार करून आत गेल्यावर आपण बांबूच्या बेटावर आहोत असे वाटते. जिकडे तिकडे बांबूच्या झाडांचे पुंजके.
आत गेल्या गेल्या एका मोठ्या कुंपण घातलेल्या जागी नांदणारे असंख्य ससे नजर वेधून घेतात. खूप वेगवेगळ्या रंगांचे नि वयाचे ससे आहेत. मी बराच वेळ त्यांचे निरीक्षण करत बसले. पुण्याच्या मांजरांची आठवण झाली. काही ससे झोपले होते. काही बसल्या बसल्या डुलक्या मारत होते तर काही मस्त पाय पसरून, एकमेकांच्या अंगावर लुडकून झोपले होते.
काही सशांची खादाडी चालली होती. कसली घाई असते ह्या सशांना काय माहित. खातानाही तोंड ते इतके भरभर भरभर हलवत होते की दुखत कसे नाही असे वाटत होते. थोड्या वेळानंतर सशांचा खेळण्याचा कार्यक्रम सुरु झाला. सुरवात झाली ती अशी. एका सशाला अचानक काय वाटले त्याने भराभरा जाऊन दुसर्या सशाच्या अंगावर उडी मारली. खो मिळाल्यासारखा हा ससाही दुसर्या सशाच्या दिशेने पळाला. त्याचा खो मिळताच तिसर्या सशाने हेच केले. ह्या खो-खोचा कंटाळा आल्यावर परत खादाडी आणि झोपेचा प्रोग्राम सुरु झाला.
'स्वीट कॉर्न' चा आस्वाद घेत घेत आत जायला निघालो. वाटेत एके ठिकाणी दिवसभर वन्य प्राण्यांवर आधारित फिल्म्स दाखवण्याची सोय केलेली दिसली. पुढे जाऊन हरणांच्या पिंजर्याला भेट दिली. भरपूर हरणे होती. त्यांचा पिंजराही मोठा होता. गरज लागेल तेव्हा हरणांना विश्रांती घेता यावी म्हणून छान अडोश्याचीही सोय होती.
तिथेच पुढे हत्तीवर सैर करण्याची सोय होती. पण मला तो प्रकार विशेष आवडला नाही.हत्तींविषयी फारच वाईट वाटले.
फोटोत दाखवल्याप्रमाणे त्या प्लाटफॉर्मखाली मान घालून आधी हत्तीला उभे करायचे. मग लोक त्यावर बसणार. मग हत्ती ठरलेल्या वाटेवर ५ मिनिटे हिंडवून आणणार. हे दिवसातून अनेक वेळा रिपीट झाल्यावर हत्तीला कंटाळा नसेल येत का? बर वाट फार निमुळती होती. त्यामुळे दोन हत्ती विरुद्ध दिशेने आले की जॅमचा प्रोब्लेम सोडवण्यासाठी परत हत्तींच्या कानाला अंकुश लावून त्यांना वळवले जायचे. कानामागे पायाने टोचून टोचून हत्तीला वाट दाखवली जायची. अंकुश आणि पायाचा सारखा वापर करूनच बहुदा एका हत्तीचा कान अक्षरशः फाटला होता.
इथे एका माकडाने धुमाकूळ घातला होता. लोकांच्या पिशव्या उचकून त्यातून जर खाण्यासारखा पदार्थ बाहेर आला तर त्याचा फन्ना उडवायचा नाहीतर कपड्यांसारख्या निरुपयोगी वस्तू बाहेर आल्या तर भिरकावून द्यायच्या असा प्रकार चालला होता. २-३ माणसांनी हुसकावून लावायचा प्रयत्न केला असता ह्या माकडाने त्या माणसांच्या अंगावर धावून जायचेही कमी केले नाही.
काही वेळ पाण्यात पाय सोडून बसलो न निघालो. आतच छोटेसे हॉटेल आहे तिथे जेऊन निसर्गाधामला अलविदा म्हणले.
पुढे गोल्डन टेम्पलला गेलो. दारातून प्रवेश केल्या केल्या स्वच्छ आणि सुंदर असे प्रांगण लागले. प्रांगणातून अजून आत गेल्यावर एक छोटी वाट लागली. दोन्ही बाजूंनी हिरवळ होती. हिरवळीवर वेगवेगळे पक्षी दिसत होते. सतत जाग असलेल्या ह्या ठिकाणीही एका बदकोबांचे मस्त डुलक्या घेणे चालले होते.
मुख्य मंदिर बंद दिसले. आणखी आत गेले असता "Padmasambhava Buddhist Vihara" नावाची मंदिरासारखीच जागा दिसली. आत गेलो तर एका वेगळ्याच दुनियेत असल्यासारखे वाटले. मोठाच्या मोठा हॉल. समोर बुद्ध देवतांच्या तीन प्रचंड मोठ्या मूर्ती होत्या. हॉलच्या भिंतींवर बौद्ध इतिहासावर आधारित काही चित्र होती. खांबांना आणि छपराला पाच रंगांच्या कापडांच्या झालरींनी सजवलेले होते.
त्या मूर्ती, सजावट आणि शांतता ह्यांमुळे नकळतच जमिनीवर बसून ध्यानमग्न व्हावे अशी इच्छा झाली. ५ मिनिटे डोळे मिटून बसल्यावर शांतीचा अनुभव आला. डोळे उघडवेसेच वाटेना. काही वेळानी बळेच डोळे उघडले. शांतपणे मंदिराबाहेर पावले टाकली. प्रांगणाच्या बाहेर पावले टाकू इतक्यात मुसळधार पाऊस आला. पळत पळत एका हॉटेलात जाऊन बसलो. गरमागरम चहाने रंगत वाढवली. कसे बसे गाडीत बसलो आणि होम-स्टे वर पळालो.
रशीनने परत गरमागरम कॉफी आणून दिली. कॉफीचा आस्वाद घेत घेत पत्ते खेळलो. होम-स्टेतच गॅस आणि भांड्यांची सोय असल्याने तिथेच सूप, नूडल्स, सॅन्डविचेस तयार करून त्याचा फन्ना उडवला. परत पत्ते खेळलो. अभिजीतच्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता दुसर्या दिवशी. रात्री १२ ला केक कापून त्यांना सरप्राईझ द्यायचे ठरवले होते. रशीनला सांगून केक मागवून ठेवला होता. पत्ते खेळता खेळता ११.३० वाजले सगळ्यांना झोप आली होती. सगळे आपापल्या रूम्सवर गेलो. मधल्या काळात केक आणि ग्रीटिंग कार्ड काढून ठेवले. १२ वाजता जाऊन आई-बाबांचे दर वाजवले. घाबरतच त्यांनी दर उघडले. अशा नवीन ठिकाणी केकचे सरप्राईझ मिळण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. एकदम खुश झाले. थोड्या वेळ गप्पा मारून झोपलो.
दुसर्या दिवशी नाश्त्यात रशीनने उपमा दिला होता. त्यावर तव मारून झाल्यावर रशीनने स्टेशनवर सोडले. गाडी वेळेवर आली. गाडी निघाली आणि पुन्हा सुंदर रस्त्यावरून पळायला लागली. पण २-३ दिवसांच्या धावपळीमुळे आता मात्र डोळे मिटू लागले. स्वप्नातही नारळाच्या बागा येऊ लागल्या. गाडी बंगलोरला आल्यावर मात्र जाग आली. आधी भराभर अंतर कापणारी गाडी आता मात्र गोगलगायीच्या वेगाने चालू लागली. कसे बसे मॅजेस्टिक आले. तिथून पकडलेली घरासाठीची बस जॅममधून वाट काढत काढत कशीबशी स्टेशनच्या दाराशी पोचेस्तोवर बंद पडली. परत आतपर्यंत चालत जाऊन दुसरी बस पकडली. पुन्हा तिकीट काढावे लागले. ट्रीपच्या शेवटी मनस्तापाचा काळा तीट लागल्याने इतक्या सुरेख झालेल्या ट्रीपला आपलीच नजर लागायची भीती गेली. घरी येऊन खिचडी करून खाल्ली आणि झोपून गेलो.
२-३ दिवसांची ही ट्रीप इतकी रेफ्रेशिंग होती की तिने पुढले अनेक दिवस बंगलोरमधल्या धावपळीला तोंड देण्यासाठीचे इंधन पुरवले....
(Photos By: Abhijeet and Me)
(Photos By: Abhijeet and Me)
cool!!! Chan ahe pravas varnan!!!!
ReplyDelete"निसर्ग म्हणत असावा अशी काही काहीच तर ठिकाणे आहेत जिथे मी मोकळेपणाने बोलू शकतो आणि माझे शब्द माणसांपर्यंत पोचू शकतात"
ReplyDeleteA very touching line ... the best of the blog :)
khup Sundar varnan kela ahe :)
ReplyDelete