Monday, March 26, 2012

अ वॉक टू रिमेंबर

    शनिवारचा दिवस होता. आदल्या दिवशी झोपायला उशीर झाला होता. घडाळ्यात सातचा अलार्म लावला होता. सात वाजले, घड्याळ आरवले, आळस देत देत आम्ही उठलो.  "ए वॉकला जाऊया?", मी अभिजीतला विचारले. आश्चर्यकारकरित्या तोही लगेच "हो" म्हणाला. १५-२० मिनिटात आवरून घराबाहेर पडलो. लेकला जायचे म्हणले तर बर्यापैकी उशीर झालेला होता. मागच्याच गल्लीतून निघून गोल चक्कर मारून येता येता  भाजी घेऊन येऊ असे ठरले.
   सूर्य केव्हाच उठून तयार होऊन बसला होता. त्यामुळे रस्त्यावरून चालणे काही विशेष रिफ्रेशिंग वाटणार नव्हते. पण आळसात सकाळ घालवण्यापेक्षा नावाला का होई ना जरा फिरून आलेले बरे म्हणून निघालो  होतो एवढेच! चालता चालता घराजवळच्या एका बेकरीजवळ पोचलो. सहज बेकरीच्या टेबलाखाली नजर गेली तर तिथे एक मांजरीचे पिल्लू बसलेले दिसले. बेकरीच्या पायरीजवळच बसलेले एक कुत्रे ह्या पिल्लाकडे रोखून पाहत होते. पिल्लू कुत्रे अंगावर आलेच तर कुठे पळायचे ह्याचा कानोसा घेत होते. पावले आपोआप बेकरीकडे वळली. आम्ही बेकरीशी जाऊन आधी कुत्र्याला पळवले. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी तोंडाने च-च आवाज काढत पिल्लाला हाक मारायला सुरवात केली. अपेक्षेप्रमाणे पिल्लाने माझ्यापासून 'सुरक्षित अंतर ठेवण्याचे' धोरण अवलंबले. दुसरे एखादे मांजर असते तर मीही ते लांब पळतेय म्हणाल्यावर नाद सोडून दिला असता. पण हे पिल्लू फार गोड होते आणि दुसरे  म्हणजे मी बेकरीसमोर उभी होते त्यामुळे बिस्किटाची लाच दाखवून पिल्लाला जवळ यायला लावायचा प्रयत्न करून बघायला काही हरकत नव्हती. शक्यतो दुकानदार मांजरांना थारा देत नाहीत. त्यांच्या दुकानात मांजरांशी खेळलेलेही त्यांना आवडत नाही. पण ते पिल्लू बहुदा त्या बेकरीवाल्याने पाळलेले असावे. मी पिल्लाला हाक मारल्याबद्दल बेकरीवाल्याने कोणतीही नापसंती दर्शवली नाही. मी बेकरीतून रुपयाचे बिस्कीट घेतले आणि पिल्लापुढे धरून त्याला परत हाक मारली.
    जुन्या मुवीमध्ये मुलीला पाहायला लोक आलेले असताना ती जशी घाबरत, लाजत पुढे यायची तसे ते पिल्लू "जाऊ की नको, जाऊ की नको" असा विचार करत दबकत दबकत पुढे येऊ लागले. पण पहिल्याच दमात माझ्या एकदम जवळ यायची तर हिम्मत त्याच्यात नव्हती. मग मी बिस्किटाचा छोटा तुकडा पायरीवर ठेवला. बिस्किटाचा खमंग वास आल्यावर मात्र त्याच्याने रहावले नाही आणि ते पुढे येऊन बिस्कीट खाऊ लागले. त्याला बरीच भूक लागल्याचे दिसत होते. दुष्काळातून आलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याची जी तऱ्हा होईल तसे ते भराभरा बिस्कीट खाऊ लागले. तुकडा संपत आला की तोंडात बिस्कीट असतानाच ते "अजून बिस्कीट दे" असे म्हणत आवाज काढत होते. अर्धे बिस्कीट संपवल्यावर मात्र ते जरा शांत झाले. मग पुढला तुकडा त्याने शांतपणे खाल्ला. त्याच्या पुढचा तुकडा मी हातात धरल्यावर तो तोंडात घेण्याऐवजी जेव्हा ते पंजाने त्याच्याशी खेळू लागले तेव्हा मात्र त्याची भूक भागल्याची मला खात्री झाली.
   लहान मुलांना आवडतीचा खाऊ दिला की कशी ती सगळी भीती सोडून, नवखेपणा विसरून ती जवळ येतात तसेच ह्या पिल्लाचे झाले. ते एकदम ओळखीच्या माणसासारखे अभिजीतच्या मांडीवर जाऊन बसले आणि  तिथून माझ्याकडे पाहू लागले. दोन मिनिटे माझे निरीक्षण केल्यावर "आपल्याला खाऊ घालणारी ही नक्की कोण आहे?" असा प्रश्न त्याला बहुतेक पडला. ते माझ्या तोंडाकडे पाहून प्रश्नार्थक स्वरात ओरडू लागले. मी "काय..काय?" असे विचारल्यावर अभिजीतच्या मांडीवरून उतरून माझ्याजवळ आले. माझ्याशी दोन मिनिटे  खेळले, परत अभिजीतकडे गेले. "ही अचानक आलेली माणसे नक्की कोण आहेत? ती कुठून आली आहेत? आता आपण ह्यांच्यासोबत काय करणे अपेक्षित आहे?" असे प्रश्न त्याला बहुदा पडलेले असावेत. ५-१० मिनिटे अशीच इकडून तिकडे करण्यात गेली. मध्येच ते मगाचचे कुत्रे परत आले. तेव्हा हे पिल्लू आमच्या दोघांच्या मधोमध अगदी विश्वासाने बसले. थोडा वेळ वाट पाहून कुत्र्यालाही कंटाळा आला, ते परत निघून गेले. पिल्लू परत खेळायला लागले. पिल्लाचा खाणे-ओरडणे-खेळणे इत्यादी कार्यक्रम पूर्ण झाला. आम्हालाही घरी लवकर जायचे असल्याने आम्ही निघायचे ठरवले. पिल्लू मागे येऊ लागले पण दुकानाच्या शेवटच्या पायरीवरून मात्र ते आपल्या मालकाकडे परत गेले.
    मला मांजरे फार आवडतात.  पण आमच्या बिल्डींगवर "Pets Strongly Discouraged" अशी पाटी लावलेली आहे. भाड्याने राहत असल्याने उगाच कोणाच्या भानगडीत पडायला नको म्हणून आम्हीही ह्या डिस्करेजमेंटला विरोध करायला जात नाही. त्यामुळे मांजर पाळणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे "तू दर शनिवारी इथेच बसत जा. आम्ही तुला बिस्कीट द्यायला आणि तुझ्याशी खेळायला दर शनिवारी इकडे येत जाऊ", असे डील त्याच्याशी करून आम्ही त्याला बाय केले.
   पाऊण बिस्किटातच पिल्लाचे पोट भरल्याने उरलेला पाव तुकडा अजून माझ्या हातातच होता. वाटेत एखादे कुत्रे दिसले तर त्याला घालू असे आम्ही ठरवले. एके ठिकाणी एकदम तीन कुत्री दिसली. त्यांच्यापैकी एकाला हा तुकडा दिला तर एवढ्याश्या तुकड्यासाठी त्यांच्यात भांडाभांडी होईल आणि ज्यांना तुकडा नाही मिळाला त्यांचा हिरमोड होईल असा विचार करून आम्ही बिस्कीट न देता पुढे गेलो. पुढच्याच चौकात गेल्याच शनिवारी दिसलेले एक काळ्या रंगाचे ढोले, बुटके कुत्रे दिसले. मागच्या शनिवारी त्याला हक मारून जवळ बोलावल्यावर ते फार आशेने माझ्याकडे आले होते, शेपटी हलवत हलवत! पण माझ्याकडे त्याला द्यायला काहीच नव्हते. दोन मिनिटे वाट पाहून ते निराशेने निघून गेले होते. आज त्याला बोलावल्यावर ते अजूनच उत्साहात संपूर्ण अंग हालवत हालवत माझ्याजवळ आले. मी पटकन हातातला तुकडा त्याला दिला. ते इतके उत्साहात होते की तो तुकडा चावायच्या नादात जमिनीवर पडला. ते वास घेत घेत जमिनीवरचा तुकडा शोधायला लागले. आपण फार काळ इथे उभे राहिलो तर हे "अजून खाऊ दे" म्हणून नक्की आपल्या मागे लागेल असा विचार डोक्यात क्लिक झाल्यावर मी क्षणाचाही वेळ न दवडता तिकडून कल्टी मारली. कुत्रेही आधी तुकडा शोधण्यात आणि  मग तो खाण्यात बिझी झाल्याने, मी निघाले आहे ह्याकडे त्याचे लक्ष गेले नाही.एका मिनिटात आटोपलेल्या ह्या प्रोग्राममध्ये इतकी मजा आली की काही विचारू नका.
   आम्ही घराकडे परत निघालो. भाजी घेतली. जाताना बेकरी परत लागली. साहजिकच नजर माऊला परत शोधू लागली. माऊ तिकडे दिसत नव्हते. मनातल्या मनात "पुढच्या शनिवारी माऊची भेट नक्की होऊ देत" अशी इच्छा व्यक्त करत, माऊसोबत घालवलेल्या १५-२० मिनिटातल्या आठवणींना मनात साठवत आम्ही घरी गेलो.

2 comments:

  1. एकदम खुसखुशीत लिहिले आहेस :)

    ReplyDelete