Monday, March 5, 2012

सोनी: अंतिम चरण

    मागे म्हटल्यानुसार सोनीची पिल्ले हळू हळू मोठी होऊ लागली. योग्य वेळ आली तशी ब्लॅकी व्यवस्थित चालू लागली. पण चॉकीच्या पायांत मात्र काहीतरी दोष होता. त्याच्या मागच्या पायांत जीवच नव्हता. त्याचे मागचे पाय मांजरांचा म्हणून जो आपण गुढघा म्हणू शकतो तिथून सरळ दुमडलेच जात नसत. त्यामुळे बेडूक पाण्यात पोहताना जसा दिसतो ना तसा तो पुढल्या दोन पायांवर सरपटत जायचा, मागचे पाय सरळच्या सरळ ओढत. त्याची ही केविलवाणी अवस्था पाहून आम्हाला फार वाईट वाटायचे. आईने त्याचे पाय बरे होण्यासाठी कॉडलिव्हर  ऑईलच्या गोळ्यांमधल्या तेलाने त्याच्या  पायांना मालिश करायला सुरवात केली. आईचा हा उपचार कामी आला आणि हळू हळू चॉकीचे पाय बरे झाले.
    पिल्लांचा दंगा आधी दिवाणातल्या दिवाणात मस्ती करणे, मग दिवाणावर चढून खाली उड्या मारणे, परत चढणे, परत उड्या मारणे, मग खोलीभर धावपळ करणे, मग घरभर धुमाकूळ घालणे ह्या पद्धतीने वाढत गेला. आमच्या घरात दिवसाच्या काही ठराविक वेळी, म्हणजेच सकाळ आणि रात्री जणू मांजरांचे ऑलिम्पिक चालू असायचे. कुस्ती, धावण्याची शर्यत, अडथळ्यांची शर्यत, लांब-उंच उडी, कागदाच्या बोळ्याचा  फुटबॉल, टी पॉय आणि सोफ्यावरचे जिम्नास्टिक्स, रिले इत्यादी खेळांचा आनंद आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळायचा. शिवाय प्रत्यक्ष ऑलिम्पिकमध्ये न पाहता येणारे लपा छापी, पकडा पकडी इत्यादी खेळही त्यांच्या ह्या ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होते. पिल्लांचे हे खेळ पाहून सोनीलाही कधी कधी त्यांच्यात खेळण्याची हुक्की येई. दोन पोरांची ही ढोली आई मोठ्या उत्साहाने त्यांच्या खेळात भाग घेई खरे, पण थोड्याच वेळ थकून भागून प्रेक्षकांत सामील होई.
    पिल्ले लहान असताना सोनी त्यांच्यासाठी वेगवेगळी शिकार घेऊन यायची. कधी उंदीर, कधी पोपट, कधी चिमणी, कधी आणखी काही! आमच्या घराला जाळीचे दर होते. लहानपणी त्याच्या जाळीतून सहजपणे ये-जा करणाऱ्या सोनीला आता त्यात मावत नसल्याने सहज आत येता येत नव्हते. घरातून बाहेर जाताना आणि येताना ती दारासमोर म्याव, म्याव करत बसायची. तिचे येणे-जाणे आमच्या दार उघडण्यावर अवलंबून होते. शिकार तोंडात धरून आणली की मात्र तिला नीट ओरडता यायचे नाही. तोंडात शिकार असताना ती दार उघडण्यासाठी ओरडली की तिचा आवाज वेगळाच यायचा. तिचा तो आवाज आला की पिल्लांना आईने आज आपल्यासाठी काहीतरी खाऊ आणलाय ह्याची कल्पना यायची आणि ती दाराच्या दिशेने धावत सुटायची. पिल्लांपासून शिकार वाचवत सोनी कशीबशी आतल्या खोलीपर्यंत घेऊन यायची आणि दिवाणाखाली जाऊन जमिनीवर ठेवायची. पुढचा अर्धा-एक तास दिवाणाखालून पिल्लांचे एकमेकांवर गुरगुरण्याचे आवाज येत राहायचे. चॉकी बोका असल्याने त्याच्यात जास्त शक्ती होती, त्यामुळे शिकारीतला जास्त वाटा तो फस्त करायचा.
    काही महिन्यांतच पिल्लेही मोठी झाली, वयात आली. त्यांचे आपापले उद्योग सुरु झाले. सोनीलाही आणखी एक-दोनदा पिल्ले झाली. आता मात्र लोकसंख्या नियंत्रणाची मोहीम हाती घ्यायला हवी ह्याची आईला जाणीव झाली. आईने सोनीचे ऑपरेशन करून आणले. हे ऑपरेशन मात्र सोनीला मानवले नाही. ऑपरेशन नंतर तिच्यात एकप्रकारचा सुस्तपणा आला. एकदा तर ती आमच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून खाली पडली. त्यामुळे ती एका पायाने लंगडू लागली. नंतर एकदा डॉक्टरला दाखवले असता तिच्या पोटात सिस्ट झाले असल्याचे कळले. ऑपरेशन करून ते काढावे लागले. एक दिवस नेहमीसारखी घरातून बाहेर पडलेली सोनी कधी घरी परतून आली नाही. खूप शोधाशोध करूनही ती सापडली नाही.
    सोनीच्या पिल्लांची जागा आता  ब्लॅकीच्या पिल्लांनी घेतली. ब्लॅकीच्या बाळंतपणात मात्र तिला एक वाईट सवय लागली. प्रतार्विधींसाठी तिसर्या मजल्यावरून खालपर्यंत जायचे तिच्याने होईना तेव्हा ती आमच्या खालच्या मजल्यावरच्या घरात जाऊन हा कार्यक्रम आटोपू लागली. त्या घरात विद्यार्थी राहत होते. ते दिवसभर घरी नसत. त्यामुळे त्यांच्याकडे हा कार्यक्रम आटपणे ब्लॅकीला सोयीचे वाटू लागले. कुत्र्यासारख्या प्राण्यांना आपण आटोक्यात तरी ठेऊ शकतो, पण मांजराचे काय करायचे? ती हट्टी असतात, त्यांना बांधूनही ठेवता येत नाही. आम्ही वेगवेगळे प्रयत्न करूनही ब्लॅकीने त्यांच्या घरी जायचे सोडले नाही तेव्हा मात्र तिला लांब सोडण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिला नाही. एक दिवस गाडी काढून तिला बावधनजवळ सोडून आलो तेव्हा झालेले सगळ्यांचे खिन्न-हताश चेहरे माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहेत. मध्यंतरी ब्लॅकीची पिल्ले एकेक करून पाळण्यासाठी लोक घेऊन गेले.
   पुढे आम्ही आमचे आनंद नगरचे घर सोडून रामबाग कॉलनीत  राहायला गेलो. चॉकी तेव्हा साधारण दीड वर्षांचा होता. आम्ही चॉकीला ह्या नव्या घरी नेण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न केले. रिक्षातून जाताना आमच्या हातात त्याला धरले तर तो इतकी झटापट करायचा की हातातून सुटून पळून जायचा. एकदा भाजीच्या बास्केटमध्ये ठेवून नेण्याचाही प्रयत्न केला. नखांनी, तोंडानी, नाकाने बास्केटचे झाकण उघडायचा प्रयत्न केल्याने त्याचे हात, तोंड रक्तबंबाळ झाले. अशाच परीस्थित कसेबसे घरापर्यंत नेले. दमलेला चॉकी झोपला, उठून दूध प्यायला आणि शेवटी जाळीच्या दारातून उडी मारून परत निघून गेला. आता मात्र आणखी प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही ह्याची आम्हाला चांगलीच जाणीव झाली. नंतर आनंद नगरमधून येत-जात असताना चॉकी आम्हाला बर्याचदा दिसायचा. हाक मारली की ओळखायचा, जवळ यायचा, थोडा  वेळ आमच्यासोबत घालवून निघून जायचा.
    अशाप्रकारे सोनीच्या वंशाच्या तीन पिढ्या आम्ही पाहिल्या. सोनी, ब्लॅकी, चॉकी आमच्या घरातून एकेक करत बाहेर पडले. सोनीची आमच्या घरातील वंशावळ संपली.  तरी एखाद्या मांजरीच्या पिढ्या न पिढ्या आमच्या घरात नांदण्याची ही काही अखेर नव्हती. ही तर खरी सुरवात होती. बापटांच्या घरातील मांजरांच्या इतिहासात पुढे ३-४ मांजरींनी आपल्या २-२, ३-३ पिढ्यांची भर घातली. प्रत्येक पिढीतली बाळंतपणे, नामकरण सोहळे, पराक्रम आणि मृत्यू इत्यादी घटनांच्या आठवणींच्या रुपात हा इतिहास आम्ही आमच्या मनात जपून ठेवला आहे.

  

1 comment:

  1. सोनीचे ऑपरेशन मीच करून आणले होते, त्यावेळी, डॉक्टरांशेजारी उभा राहून ते मी पाहिलेही आहे. त्यानंतरची सोनीची केविलवाणी अवस्था, तिचे लंगडणे, भोवळ येऊन पडणे हे ही मला स्पष्ट आठवते आहे. कुठेतरी या सगळ्याला आपण जबाबदार आहोत ही गोष्ट अजून मला टोचते.

    ReplyDelete