Friday, May 20, 2011

७०-८० च्या दशकातील निवडक हिंदी गाणी

    दररोजप्रमाणे सकाळी घरात धावपळ करून ऑफिसमध्ये आले. सवयीनुसार फेसबुक उघडले. कलीगशी डिस्कशन केल्याशिवाय काम पुढे जाणार नव्हते आणि तो आला नव्हता. त्यामुळे हातात रिकामा वेळ होता. फेसबुकवर रेंगाळायाला सुरवात झाली. रेंगाळणे हे क्रियापद वापरायचे कारण म्हणजे कोणताही माणूस काही विशेष उद्देशाने फेसबुक उघडत असेल असे मला नाही वाटत. कोणाची वाट पाहत असू किंवा एखाद्या शोला भरपूर वेळ उरला असेल तर जसे आपण जवळपासच्या रस्त्यावर रेंगाळत बसतो तसेच फेसबुकचे मला वाटते. रेंगाळताना कोणी भेटले, किंवा काही आवडीचे सापडले तर ठीकच नाहीतर हात-पाय हलवण्याची खरोखर वेळ यायची वाट पाहत इकडे तिकडे बघत बसायचे नुसते. असो असेच रेंगाळत असताना मला 'कहाँ से आए बदरा' ह्या गाण्याची लिंक मिळाली. फेसबुकवर रेंगाळणे बंद होवून एक से एक सुंदर अशा गाण्यांच्या दुनियेकडे पावले वळली. अर्थात ह्याही प्रवासात यु-ट्यूबची साथ मिळाली. यू-ट्यूबवर येत जाणार्या सजेशन्समुळे सध्या चालू असलेल्या गाण्याच्या ढंगाची गाणी एका पाठोपाठ एक मिळत गेली न कलीग येईस्तोवारचा वेळ तर एकदम मस्त गेलाच, मूड फ्रेश झाला आणि शिवाय नंतरही कामे करताना मध्ये ब्रेक घेतले त्यात छान छान गाणी ऐकायला मिळाली. प्ले केलेले प्रत्येक गाणे हे माझ्या इतके आवडीचे होते की मी लिस्ट करत गेले आणि एक छोटीशी  गाण्यांची प्ले-लिस्ट तयार झाली. ती अशी:

कहाँ से आए बदरा (चश्म-ए-बद्दूर)
तू जो मेरे सुर में (चितचोर)
ना जाने क्यों, होता है यूँ जिंदगी के साथ (छोटीसी बात)
रिम-झिम गिरे सावन (मंज़िल)
तेरे बिना जिया जाये ना (घर)
तुम्हे हो ना हो (घरोंदा)
दो दीवाने शहर में (घरोंदा)
गोरी तेरा गांव बड़ा प्यारा (चितचोर)
आने वाला पल (गोलमाल)
उठे सबके कदम (बातों बातों में)
थोडा है थोड़े की ज़रूरत है (खट्टा मीठा)
ना बोले तुम ना मैंने कुछ कहा (बातों बातों में)
कहते सुनते बातों बातों में प्यार हो जायेगा (बातों बातों में)

लिस्ट हरवून जायला नको म्हणून ब्लॉगवर लिहून ठेवायचे ठरवले. ज्यांना ही गाणी आवडत असतील त्यांनी एखादे गाणे यु-ट्यूबवर लावले की पुढची गाणी आपोआप मिळत जातील.
ह्या सगळ्या गाण्यांमध्ये मला आवडते अशी गोष्ट ही की ती गाणी खूप साधी-सरळ आहेत. अर्थात नीट पाहायला गेले तर ती म्हणायला कठीण आहेत. पण त्यांचे शब्द असे आहेत की आपल्या दैनंदिन जीवनातील विचार-घटनाच ते कथन करत आहेत की काय असे वाटते. पिक्चरायझेषन पहिले तर आपल्यासारखीच मध्यमवर्गीय माणसे आपण घालू शकतो त्या पोशाखात आणि आपण करू शकतो अशा आचारात समोर वावरताना दिसतात. संगीतात कुठेही लाउडनेस नाही. त्यामुळे ही गाणी ऐकताना त्यांच्याबरोबर समरस झाल्याचा प्रत्यय मला येतो.
     ह्या गाण्यांच्या चित्रपटांपैकी घर सोडून इतर सिनेमे माझे अनेकदा पाहून झालेत. ह्या गाण्यांसारखेच हे सिनेमेही मला खूप आवडतात. ज्यांना ही गाणी आवडली असतील पण सिनेमे पाहिले नसतील त्यांनी जरूर पहा.
    प्रत्येकाची आवड-निवड वेगळी, पार्श्वभूमी वेगळी, गाणी ऐकण्यामागचा हेतूही वेगवेगळा...त्यामुळे ह्या लिस्टमध्ये विशेष काय आहे असे वाटून काही लोकांना पोस्ट वाचून कंटाळाही आला असेल. त्यांना सॉरी. @बाकीचे पब्लिक: एन्जॉय!!

Friday, April 15, 2011

आजीचे घर

   परवा आजोबांकडे गेले होते. खूप वर्षांनी गेले. ज्या घरात माझे सगळे बालपण गेले त्या घरात कॉलेज, आय. आय. टी. अन मग लग्न ह्या गोष्टींमुळे कित्येक वर्षात पाऊलच ठेवता आले नव्हते. नानांना खूप आनंद झाला होता मी गेल्यामुळे... पण मी मात्र जुन्या आठवणींनी घायाळ झाले..
    हेच घर..नाना-आजी रिटायर व्हायला आल्यावर त्यांनी हे घर घेतले. आधी भाड्याची अनेक घरे, मग २ खोल्यांचे छोटेसे घर असा प्रवास करत करत पेशाने शिक्षक असलेले नाना-आजी आज रिटायर झाल्यावर स्वतःच्या सुटसुटीत अशा तीन खोल्यांच्या घरात आले. मुळातच आहे त्यात मजेत राहण्याचा स्वभाव असलेल्या आजीने आता रिटायर होणार म्हणल्यावर तर आणखीच वेगवेगळे प्लान बनवले. घर छान सजवले. संध्याकाळी बाल्कनीत बसून मोकळ्या हवेचा आस्वाद घेण्यासाठी झोपाळा बांधून घेतला. घरात मांजरे पाळली.
    ह्याआधीही आजीकडे काही कमी मजा असायची असे नाही. २ च खोल्यांचे घर होते पण आनंदाने पूर्ण भरलेले. शनिवारी शाळा सुटली की घरी येऊन जेवायचे न कपड्यांचे बोचके बांधून सायकलवर बसून सुसाट वेगाने आजीकडे जायचे. एकदा आजीकडे गेले की काहीही करा, कसेही वागा, कोणी ओरडायला नाही की काही नाही. 
   दुपारी आजोबा सगळ्या दारे-खिडक्या-पडदे बंद करून झोपायला जायचे. त्यांच्या घोरण्याचा आवाज एकदा सुरु झाला की आम्ही आमचे उद्योग करायला मोकळे. आजी, मावश्या, मी अन असेल तर दादा असे ओळीने पांघरूण  घेऊन आडवे व्हायचो. थोड्या वेळाने आजी झोपली की आमची हळू आवाजात बडबड सुरु व्हायची. फालतू विनोद, पाचकळ गप्पा- गोष्टींना ऊत यायचा. कधी कधी खिदळणे कंट्रोल न झाल्याने हसण्याचा मोठा आवाज ऐकून आजोबांची झोपमोड व्हायची. "झोपा की रे आता का मारू दोन फटके..." असे उगाचच ऐकवून ते परत झोपी जायचे. आमचे उद्योग परत चालू व्हायचे. डोक्यावर पांघरूण ओढून रिमोट कंट्रोलची वेगवेगळी बटणे दाबत लाल दिवा कसा लुकलुकतोय ते पाहत बसणे, एकमेकांना चिमटे काढणे, कागदावर खेळ खेळणे ह्यात अख्खी दुपार निघून जायची. मध्येच भूक लागली की फ्रीजमध्ये डोके खुपसून डोळ्यांना दिसेल तो खाऊ खायचा. आजीच्या फ्रीजमध्ये सरबते, काजुकंद, चॉकलेट्स ह्यांची रेलचेल असायची. अशा पद्धतीने दुपार घालवल्यावर आजी-आजोबांची उठायची वेळ व्हायची. मग उठल्यावर आजी मस्त चहा करायची. मग मावशीने straw ची बाहुली बनवण्यासाठी आणलेल्या straw ढापून त्यांनी चहा पिणे, बशीत चहा ओतून मांजरीसारखे चाटत चाटत दूध पिणे आदि प्रकार निवांतपणे चालत राहायचे.
    संध्याकाळ झाली की आजीचा ठराविक प्रोग्राम सुरु होई. आधी आजी स्वच्छ हात-पाय-धुवायची. मग खुर्चीत बसून आधी चेहऱ्यावर, मानेवर पावडर चोपडायची. मग केसांना काजळ लावून त्यांना काळा रंग आणायची. मग मस्त पेपर-पुस्तके वाचत बसायची. तिचा हा कार्यक्रम चालू झाल्यावर आम्ही खेळायला जायचो. परत येऊन हात-पाय धुवून, शुभंकरोती म्हणेस्तोवर जेवायची वेळ यायची. आजीची आमटी मस्त असायची. सर्व पदार्थ स्वैपाकघरातून हॉल मध्ये आणायचे, ताटे-वाट्या-भांडी घ्यायचे न मग जेवायला बसायचे. हसत-खेळत-गप्पा मारत जेवण व्हायचे. मग झोपायची तयारी... गाद्या घालायच्या  न लोळायला लागायचे. दिवे मालवले की आजी भुताच्या गोष्टी सांगू लागायची. भीती वाटून मावशीच्या कुशीत डोके खुपसून लपून बसल्यावर कधी झोप लागायची ते कळायचे नाही.
    आजीकडे सकाळी लवकर उठायचे वगरे काही नियम नव्हते. तेव्हा लवकर जाग आली की लोळत पडायला भरपूर वाव होता. मुळात जाग यायची तीच आजोबांच्या "राजी-मंजी उठा आता...किती वाजले पहा जरा!" (राजी-मंजी ही माझ्या मावश्यांची टोपण नावे)...आजोबा ही वाक्ये अनेक वेळा त्याच आवाजात रिपीट करत राहायचे कारण ज्याला त्याला मनापासून इच्छा झाल्याशिवाय कोणीही उठणार नाही ह्याची त्यांना खात्री होती. पण अमुक एक वेळ झाली तरी गजर करायचे काम जसे घड्याळ   करते तसे हे वाक्य म्हणण्याचे काम आजोबा दिवसें-दिवस, वर्षानुवर्षे करीत असत.
    झोपेतून उठले की आवारा-आवर, स्वैपाक सुरु व्हायचे. Background ला जुनी गाणी, बहुधा गीता दत्तची, चालू असायची. सैया मिलने आना रे, बाबूजी धीरे चलना, मूड मूड के ना देख इत्यादी गाणी ऐकली की अजूनही माझ्या डोळ्यासमोर तेव्हाचे वातावरण उभे राहते. अशा प्रकारे हसत-खेळत-कामे करत पुढचा दिवस सुरु व्हायचा.
    नंतर नानी-नाना नव्या घरी आले. तिकडे आधी म्हणाले तसा झोपाळाही होता. मांजरे होती. नवनवीन मित्र-मैत्रिणी होते. मजाच मजा. नानी ही एक फार रसिक व्यक्ती होती. तिला नाटक-सिनेमे ह्यांची भयंकर आवड होती. अनेक नाटक-सिनेमांच्या कॅसेटस तिच्याकडे होत्या. ते पहायलाही मजा यायची. तिच्या ह्या रसिकतेला काळाची मर्यादा नव्हती. जुने सिनेमे, जुनी गाणी, जुने डान्स जेवढे तिला आवडायचे तेवढेच नवेही. मला आठवतंय तिला प्रभू देवाचा डान्स फार आवडायचा म्हणून मावश्या, नानी-नाना, मी, दादा आणि आई-बाबा असे डेक्कन थेटरला जावून "हमसे हे मुकाबला" हा पिक्चरही पहिला होता....
    आजोळी अशीच मजा करत गेलो. मधल्या काळात माझ्या एका मावशीचे लग्न झाले. तिला मुलगा (अमित) झाला. तिचे बाळंतपण आजीकडेच झाले. घरात भरपूर खेळणी आली. अमितचे कौतुक करण्यात आणि काळजी घेण्यात काही काळ गेला. खूप आनंदात दिवस चालले होते.
    पण सगळेच छान होत राहिले तर ते आयुष्य कसले. तापाचे निमित्त होऊन तब्येतीने एकदम व्यवस्थित असलेली आजी पंधरा दिवसात गेली. आजोबांचा धीर पूर्ण खचला. घरात आजोबा न धाकटी मावशी असे दोघेच जण उरले. ज्या घरात लाड करून घेण्यासाठी जात होते तिथे आजीचे मरणोत्तर संस्कार करण्यासाठी न नंतर मावशी-आजोबांना मानसिक आधार द्यायला म्हणून राहायला जाण्याची वेळ आली. नंतर धाकट्या मावशीचेही   लग्न झाले. घरात आजोबा एकटे राहू लागले. घरातली एकेक वस्तू घराबाहेरची वाट धरू लागली. शो-केस मध्ये तोर्यात मिरवणाऱ्या वस्तूंवर धुळीचे थर  बसू लागले. घर सुने वाटू लागले.
    आजोबांच्या घरी परवा पाउल टाकल्यावर एवढा सगळा काळ डोळ्यासमोरून झरझर येऊन गेला. गळा दाटून आला, डोळ्यातले पाणी कधी एकदा बाहेर यायला मिळते याची वाट पाहू लागले. लग्न झाल्यावर सासरी जाताना रडायचे नाही असे मनाशी पक्के केले होते तेव्हा ह्या अश्रूंना बांध घालण्याची कला अवगत झाली ती  आज कमी पडली. हसत-हसत आजोबांना निरोप देऊन बाहेर पडले तशी मात्र डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आत्ता मस्त मजेत असलेल्या हिला एकदम झाले तरी काय हे मात्र अभिजीतला कळले नाही...

Friday, April 8, 2011

वल्ली अशी व्यक्ती

    सेल्वी: वय ३५, उंची ५ फूट, काळा रंग, सडपातळ बांधा..वर्णन "आपण ह्यांना पाहिलात का?" मधील एखाद्या हरवलेल्या व्यक्तीचे नसून माझ्याकडे कामाला येणाऱ्या बाईचे आहे. ह्या वर्णनात काही विशेष नाही पण ते वाचून तुमच्या डोळ्यासमोर जी वक्ती उभी राहू शकते त्यापेक्षा सेल्वी खूप वेगळी आहे. आजपर्यंत अनेक कामवाल्या बायका मी पाहिल्या पण सेल्वीसारखा नमुना सापडणे ही अशक्य गोष्ट आहे. असे काय वेगळे आहे सेल्वीमध्ये? वाचा म्हणजे समजेल.
    पहिला दिवस. समोरच्या दुकानदाराला सांगून ठेवले होते की एखादी कामवाली बाई ओळखीची असेल तर पाठवून दे. संध्याकाळी बेल वाजली. दार  उघडले. समोर कोणी दिसेना. बाहेर मान काढून आजूबाजूला पहिले तर नवीन जागी गेल्यावर लहान मुले जशी बावरून उभी असतात तशी सेल्वी उभी होती. आत बोलावले. काम काय आहे, पैसे, वेळ वगैरे ठरले. मी ऐकले होते की बंगलोरमध्ये नीट बोलणारी बाई मिळणे अवघड आहे. इथे कामवाल्या बायकांना भयंकर भाव असल्याने त्यांचे कामाचे भावही तितकेच जास्त असतात आणि वागणे म्हणजे चितळ्यांकडे काम करणाऱ्या माणसांहूनही तुसडेपणाचे असते. (चितळ्यान्चा वारंवार उद्धार करण्यासाठी मी तुमचीच माफी मागते पण दरवेळी पुण्याला गेल्यावर ते एक नवी हिट देऊन मला त्यांचा विसर पडू नये ह्याची ते पुरेपूर काळजी घेतात त्यामुळे त्यांची आठवण काढल्याशिवाय मलाही चैन पडत नाही. असो.) तर बंगलोरमधल्या बायकांची अशी प्रतिमा माझ्या मनात असताना सेल्वीला भेटून मला जरा बरे वाटले. पण प्रथमदर्शनी ही व्यक्ती माझ्या पोस्टचा विषय बनेल असे काही मला वाटले नाही.
सेल्वी रोज कामाला येते आणि रोज नवनवीन कारनामे करते किंवा ऐकवते. त्यामुळे तिचे किस्से सांगायला एक पोस्ट नक्कीच पुरे पडणार नाही पण 'निवडक सेल्वी' मला ह्या पोस्टमधून कॅप्चर करता येतीये का ते पाहते. किस्से वाचताना सेल्वीचे वय ३५ आहे हे लक्षात घेऊन वाचल्यास किस्से आणखी रंगतदार वाटतील.
हा किस्सा मला अभिजितने सांगितला. सांजवेळ झाली होती. लाईट गेले होते. मी कामाहून यायची होते. अभिजित घरात एकटा होता. हॉलमध्ये फक्त एक मेणबत्ती लावलेली होती. सेल्वी पायाचा आवाज न करता वर आली. बाहेर थंडी असल्याने तिने फरचा कोट घातलेला होता. अभिजीतला घाबरवण्यासाठी म्हणून सेल्वी भूतासारखा आवाज करत घरात शिरली. फरच्या कोटमुले मेणबत्तीच्या प्रकाशात खरच एखाद्या विचित्र प्राण्यासारखी दिसत होती. न आमच्या आसपास लहान मूल कोणी नसल्याने (आणि मोठ्या माणसांनी असे वागणे अपेक्षित नसल्याने) तिचे ते रूप पाहून अभिजीत खरच दचकला. न तो दचकलेला पाहून सेल्वी हसत सुटली. मी घरी आल्यावर भैयाची कशी मजा केळी ह्याची स्टोरी सेल्वीने छान मसाला लावून मला सांगितली. नंतरचे काम सेल्वीने एका हातात मेणबत्तीन धरून दुसऱ्या हातात फडके-झाडू धरून पूर्ण केले. तिचा स्वभाव गंमतीशीर नसता तर तिचे ते भयंकर स्वरूप पाहून मला नक्की भीती वाटली असती.
बंगलोरमधील बायकांना हिंदीतून बोलता येत नाही (ते अपेक्षितही नाही). पण सेल्वीला मात्र बऱ्यापैकी चांगले हिंदी येते. केवळ हिंदीतून बोलणेच नाही ८०-९०च्या दशकातल्या सिनेमातील गाणीही सेल्वीला चांगलीच माहित आहेत. अभिजीत घरी नसेल की नामी संधी पाहून तर सप्तकात सेल्वी 'मुझे नींद न आये, परदेसी परदेसी, देखा ही पेहली बार ' इत्यादी गाणी गात असते. ह्या तिच्या कालाकारीबद्दल मी तिला दाद देणेही तिला अपेक्षित असते. त्यासाठी प्रत्येक गाणे संपले की टी माझ्याकडे लाजून पाहते अगदी कविता म्हणून दाखवली की लहान मुले लाजतात तशी.
    एकदा संध्याकाळी मी कामावरून येत होते. ६.४५ वाजले होते. सेल्वी आमच्याकडे यायची वेळ आहे ७.३०. सेल्वी जनरल रस्त्यातून हिंडत होती. मला पाहून म्हणे चाल आज मी तुझ्याकडे लवकर येते. म्हणले चल. आमच्या घराच्या खालचे फाटक उघडेपर्यंत सेल्वी माझ्याबरोबर चालली. घराचा जिना आल्यावर पाळायला लागली. म्हणले कसली घाई आहे. म्हणे भर भर जाते न भैयाची मजा करते. पळत पळत गेली न रोजच्या सवयीनुसार गेल्या गेल्या ओरडली 'म्याडम किधर ही?'  अभिजीत म्हणाला आली नाही अजून. सेल्वी मुद्दाम भीतीचे नाटक करत म्हणे "७.३० बाज के हो गया म्याडम नी आयी अब तक?" आता ६.३० ची वेळ. बाहेर उजेड होता. अभिजीतला कळले की ती मजा करत आहे. तो म्हणाला अभी टीम नही हुआ ना, आयेगी. तरी हिचे घाबरण्याचे नाटक चालूच. शेवटी मी वर पोचल्यावर आणखी एकदा भैयाला आपण कसे फसवले ह्याचे स्वतःच समाधान वाटून घेऊन, हसत-हसत बाईसाहेब कामाला लागल्या.
    सेल्वी अतिशय भोळी आहे. तिच्या सांगण्याप्रमाणे तिच्या आई-वडिलांनी तिला खऱ्या जगाचा अनुभवच घेऊ दिलेला नाही. आमच्या गल्लीपलीकडे तिने कधी पुन टाकलेले नाही. लग्नानंतर तमिळनाडूतील कोणत्याश्या गावी नवर्यासोबत गेली. आधी २ मुली झाल्या. मुलगा पाहिजेच ह्या सासूच्या आग्रहाखातर अजून एक पोर जन्माला घातले. ह्यावेळी नशिबाने (?) मुलगा झाला. काही काळ बरे चालले. नंतर नवरा दारूच्या आहारी गेला. सेल्वीला, मुलांना मारू लागला, कसेही वागू लागला. तेव्हा मुलांना घेऊन सेल्वी आपल्या आई-वडिलांकडे निघून आली. डोक्याला छप्पर, खायला अन्न न मुलांचा सांभाळ ह्यासाठी सेल्वी आई-बाबांना ३००० रुपये देते. सेल्वीची अशी परिस्थिती पाहता काही लोक सेल्विच्या मुलांची फी भरतात. परंतू त्याबदल्यात सेल्वीकडून कितीही काम करून घेतात. सेल्वीही काही कमी नाही. ती मुलांसाठी रोज प्रत्येकी एक पर्लेजीचा पुडा, पाव-पाव लिटर दूध घेऊन जाते. समोरच्या दुकानदाराला ती महिन्याचे १ हजार रुपये देते. त्यात हा सगळा खुराक, शाम्पू, साबण इत्यादी गोष्टी नेते. सेल्वीकडे चंद्रमुखीचा ब्लाउज (असेही काही असते हे तिच्याकडूनच कळले), अमक्या स्टाईलची साडी, तमक्या स्टाईलची टिकली अशा वस्तू असतात. सेल्वी पार्लरमधून हेयर-कट करून घेते. काळजीपोटी एकदा तू काही सेव्हिंग करतेस की नाही असे विचारले असता ती शून्य सेव्हिंग करते असे कळले. "तुझा नवरा सोबत नाही. दोन मुली आहेत त्यांची लग्ने कशी करशील?" असे विचारले असता मुलगा (जो आत्ता ५ वर्षांचा आहे) करून देईल ना असे म्हणाली. असे विचार करून चालणार नाही हे समजावून दिले असता ५ मिनिटांसाठी थोडे विचारात पडली पण बहुधा आयुष्य हे असल्या  गोष्टींची काळजी करण्याइतके स्वस्त नाही असा विचार करून पुन्हा मूळ पदावर आली. कधी कधी ह्या भोळेपणामुळे तिची काळजी वाटते.
   लोकही साधे नसतात. एका गाण्याचे क्लास घेणाऱ्या बाईंकडे ही कामाला जाते. त्यांनी हिच्या डोक्यात घालून ठेवले की "मुलांना गाणे शिकव म्हणजे शाळेत बक्षिसे मिळायला लागतील, पुढे मोठी होऊन खूप कमावतील. दुसर्यांकडून मी महिन्याला ४५० रुपये घेते तुझ्याकडून मात्र प्रत्येकी २५० घेईन." झाले हिच्या डोक्यात भूत बसले. रोजच्याप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा सांगायला सुरवात केल्यावर तिने मला हे सांगितले. मला तिला नित समजवावे लागले की असे काही करण्यापेक्षा पैसे साठवून ठेव थोडे. काही दिवसांनी परत बाईसाहेब मला विचारत होत्या "कम्प्युटरची किंमत काय असते? विचार करतीये मुलांसाठी एक घ्यावा!" धन्य! काय बोलावे मला कळेना. मुलगा आहे इंग्लिश मिडीयमला. मुली कन्नड मिडीयम मध्ये. तिघेही क्लासला जातात. शिवाय मुलींना इंल्गीश यावे ह्यासाठी बाई स्पेशल इंग्लिशची  ट्यूशन शोधात आहेत. अंथरून पाहून पाय पसरावेत पण हे सेल्वीला कसे कळणार. मुलांना इंग्लिश शिकवले की त्यांना आपोआप छान नोकरी लागेल अशी तिची धारणा कोण दूर करणार? मुलांना रोज बिस्किटे खायला घालून खुश ठेवण्यापेक्षा स्वतः त्यांना थोडा वेळ दिला तर त्यांना जास्त आनंद मिळेल हे तिला केव्हा कळणार? खूप समजावले तरी सेल्वी तशीच.
कधी कधी असे वाटते की ही माणसे काही नसताना किती सुखी असतात...आपणच सगळे असून दुःख शोधून काढत असतो बहुधा. घर-गाडी-करियर-म्हातारपणासाठी सेव्हिंग करता करता आहे ते सुख खर्च करत राहतो... उद्याची चिंता ना करता हाती येणारा प्रत्येक क्षण मनाला येईल तसा उपभोगून स्वछंदीपणे जगणारी सेल्वी बरोबर की उद्याची काळजी करत, प्रत्येक पाउल जपून, मोजून-मापून टाकण्यात हाती असलेले अनेक क्षण खर्ची घालणारे आपण बरोबर?
(सेल्वीबद्दल लिहिण्यासारखे पुष्कळ आहे पण वेळेअभावी जेवढे जमले तेवढे लिहिले...सेल्वीचे नाव-नवीन प्रताप पाहता माझ्या इतरही पोस्ट्स मध्ये तिचा रेफरन्स येताच राहील...)
  

Thursday, March 17, 2011

वायनाड (केरळ) ट्रीप

    ऑक्टोबरचा लाँग वीकेंड जवळ येत होता. रोजच्या रुटीन मधून ब्रेक हवा होता. "आपण कुठेतरी फिरायला जाऊया मस्त!", अभिजीतला सुचवले. तोही लगेच तयार झाला. वेगवेगळ्या जागांची माहिती काढणे सुरु झाले. कूर्गबद्दल खूप लोकांकडून ऐकलेले असल्याने त्याच्याबद्दल सर्च करायला लागलो. दक्षिण भारतातील हिल-स्टेशन्सवर राहण्यासाठी "होम-स्टे" हा उत्तम पर्याय असतो. त्या ठिकाणचे लोक आपल्या घरीच राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय करतात, उत्तम पाहुणचार करतात. फायदा असा की ह्यामुळे जिथे जाऊ त्या ठिकाणाची राहणी, खान-पान, घरे इत्यादीन्बद्दलही कल्पना येते. आम्ही कूर्गमधील होम-स्टेजना कॉल करू लागलो. दसरा जवळ आला होता. ह्या काळात कूर्गमध्ये जत्र भरते. त्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते. असंख्य कॉल्स केले. सगळे होम-स्टेज बुक झालेले होते. त्यातच एका मित्राने सांगितले की त्या जत्रेमुळे कूर्ग ही आत्ता जाण्यासाठी योग्य जागा नाही. आमचा कूर्गविषयीचा सगळा अभ्यास वाया गेला. बर... मग आता कुठे जायचे हा प्रश्न होताच. http://www.mustseeindia.com/places-around-bangalore  ही एक अतीशय माहितीपूर्ण साईट मिळाली. अनेक जागांविषयी चर्चा करता करता गाडी वायनाडला पोहोचली. वायनाड- केरळ मधील एक पर्यटनासाठी प्रसिद्ध असा जिल्हा. कसे जावे, कुठे राहावे परत शोध सुरु झाला.
    हल्ली travelogs, tourism-related sites वरचे हॉटेल्सविषयींचे रिव्ह्यूज ह्यांमुळे ट्रिपचे प्लानिंग करणे फार सोप्पे झाले आहे. अनेक ठिकाणी 'Tropical Forrest' ह्या होम-स्टे विषयी चांगले रिव्ह्यूज लिहिलेले दिसले. त्यांना फोन केल्यावर एका बंगल्यात जागा आहे असेही कळले. आम्ही फार विचार न करता बुकिंग करून टाकले. बुकिंग केल्यावर प्रवास कसा करावा ह्याचा विचार सुरु झाला. दोन माणसांसाठी स्वतंत्र गाडी करणे हा पर्याय खर्चिक आणि कंटाळवाणा वाटला. कोणत्यातरी न आठवणार्या कारणाने बसने जायचाही पर्याय रद्द केला. "बाईकने जावे का?", अभिजीतने योग्य वेळ पाहून हळूच पिल्लू सोडले. आम्ही आधी मुन्नारला गेलो होतो तेव्हा तिथल्या कॉफी-इस्टेट्स पाहून तशा रस्त्यांवर गाडी चालवायला मिळाली तर किती मजा येईल असे अभिजीतने म्हणाल्याचेही मला आठवले. माझ्या तोंडातून पटकन हो निघाले.
     त्यावेळी काही जाणवले नाही. पण आम्हाला ३०० की.मी.चे अंतर कापायचे होते. मी कधी बाईक वरून इतक्या लांब गेलेली नव्हते. शिवाय आम्ही दोघाच जाणार होतो. तेव्हा काही झाले तर सोबत कोणीच असणार नव्हते. मला जरा भीती वाटायला लागली. बस मिळू शकेल का त्याची चौकशीही केली. पण लाँग वीकेंड सुरु व्हायला एकाच दिवस उरला असल्याने बुकिंग फूल झाले होते. पर्यायाच नाही म्हणल्यावर भगवान-भरोसे बाईक-ट्रीप करूनच पाहू असे ठरवले.
     सकाळी ५ ला घरून निघालो. तासा-दीड तासाचे ब्रेक घेत घेत अंतर कापू लागलो. दर वेळी ब्रेअक घेतला की पुढच्या स्ट्रेचमध्ये किती वेळात कुठे पोहोचायला हवे ते ठरवायचो. जस-जसे पुढे जाउ लागलो तस-तसा माझाही कॉन्फिडन्स वाढून भीती नाहीशी झाली. मजा यायला लागली. वार्याच्या आवाजात आवाज मिळवून अनेक गाणी म्हणाली.
यूं ही चला चाल राही, यूं ही चला चाल राही..कितनी हसीन ही ये दुनिया...
भूल सारे झमेले देख फुलों के मेलें, बाडी रंगीन ही ये दुनिया...
   वातावरण अगदी हे गाणे आठवावे असे होते. निमा-पाऊण प्रवास एकदमच मस्त झाला. रस्ता एकदमच मस्त होता. वरुणराजाची कृपा म्हणून पाऊसही पडत नव्हता. पण मध्येच एका स्ट्रेचमध्ये रस्ता अस्तीशय वाईट होता."रस्त्यात खड्डा, की खड्ड्यात रस्ता" अशी परिस्थिती होती. कंबरडे पार मोडले. बराच वेळ प्रवास झाल्याने दुखणे जास्तच तीव्र वाटत होते. आधी आम्ही १-१ गाव मागे टाकण्यासाठी झुंजत होतो न आता १-१ १-१ की.मी पार पाडण्यासाठी झुन्जतोय असे वाटू लागले. एवढा केलेला प्रवास पाहता डेस्टीनेशन तसे जवळ आले होते, पण आता आम्हाला जास्त विचारात विचारात जायला लागत असल्याने जास्त वेळ लागत होता. तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. वाटेत थांबून रेन-कोट घालण्याचा कार्यक्रम आटपायला लागला. दमलेले आम्ही, पाऊस अशा परिस्थितीत आमची गाडी कशी-बशी पुढे सरकू लागली. "Tropical ForRest" हे ठिकाण पहायला आपले प्राण तरी शिल्लक राहणार आहेत का?" असले बालिश विचार मनात यायला लागले. एवढ्यात "Tropical ForRest" च्या पाट्या दिसू लागल्या. आमच्या जिवात जीव आला. चहाचे मळे लागले. जिवाला आणखी छान वाटले आणि असे छान वाटत असतानाच "Tropical ForRest" सापडले. तिथला व्यवस्थापक साजी ह्याला फोन केला. होम-स्टे छोटीशी टेकडी चढून गेल्यावर होता. पाऊस पडत होता. तरी साजी आम्हाला घ्यायला आला. साजीने आमचे छानसे स्वागत केले. टपरीवर चहा पाजला. पाऊस थांबताच आम्ही वरती गेलो.
वायनाडला पावसाळ्यात थोडा लवकर अंधार पडतो, धुकेही पडते. त्यामुळे सर्व हालचाल बंद होते. चार वाजले होते. त्यामुळे कुठेही न जाता तिथेच थोडे इकडे तिकडे फिरून मग आराम करायचा निर्णय घेतला.
    घराच्या आजूबाजूला चालायला सुरवात केली. थोडासा चढ चढून गेलो न वरून मस्त दृश्य दिसत होते. हलकेसे धुके, वळणं-वळणांचा रस्ता, त्यापलीकडे दरी! परत येताना आजूबाजूच्या झाडांकडे लक्ष गेले. रानफुले उत्साहाने डुलत होती. जिकडे तिकडे भरपूर लाजाळूची झाडे उगवलेली होती. एका लाजाळूच्या पानांना हात लावून लावून त्याला इतके लाजवले की बिचार्याने स्वतःला जमिनीवर झोकुनच दिले. फोटो-बिटो काढले.


आता मात्र थकवा जाणवू लागला. मस्त कट्ट्यावर बसलो. पत्ते खेळलो. अंधार झाला तशी आत गेलो. साजीने मस्त गरमा-गरम जेवण आणले. त्यात काही पदार्थ आपले नेहमीचे अन काही केरळी पद्धतीचे होते. केरळी पदार्थांमध्ये नारळ बर्याच प्रमाणात वापरतात असे कुठेतरी वाचलेले प्रत्ययास आले. हवा थंड होती. दिवसभराचा थकवा, पाऊस, थंडी, गरम चहा, पत्ते, गरम जेवण..मस्त झोपेसाठी अजून चांगले औषध ते काय असणार? पांघरुणात डोके खुपसून मस्त झोपून गेलो.
     येऊन-जाऊन ६०० की,मी, असा बाईकचा प्रवास खूप होणार होता. त्यामुळे त्यादिवशीच्या साईट-सीइंगसाठी जीप केली. सकाळी लवकर निघालो. आम्ही केरळला दोनदा गेलोय. दोन्हीवेळा आम्हाला हॉटेल आणि ड्रायव्हरचा अनुभव छान आलेला आहे. समोरच्या माणसाची ट्रीप जमेल तेवढी सोयीची, आनंददायक करावी हा त्यांचा हेतू त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सतत प्रत्ययास आला. साजीने सकाळी मस्त ब्रेकफास्ट आणून दिला. ब्रेकफास्टमध्ये चहा-कॉफी, पुट्टू, सांबार न केळी होती. पुट्टू हा केरळातील ब्रेकफास्ट स्पेशल आयटम आहे. तिखट आवडत असेल तर साम्बारासोबत खावा. गोड आवडत असेल तर केळी आणि साखर घालून खावा. ब्रेकफास्टने ट्रीपच्या मजेत भर घातली.  
     पहिली भेट दिली Banasura Sagar Dam ला. नाव मराठीत लिहिणे अशक्य आहे कारण त्यांचे खरे उच्चार काही आम्हाला कळले नाहीत. हा भारतातील सर्वात मोठा आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा earthen dam आहे असे कळले. बाहेर गाड्यांवर तिखट-मीठ लावलेला अननस, कैरीच्या फोडी, आवळे अशा गोष्टी दिसल्या. त्यांचा आस्वाद घेत घेत धरणाच्या दिशेने चालू लागलो. तिथे पोहोचल्यावर जे दृश्य दिसले ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट येते. हिरवी जमीन, निळे पाणी, पलीकडे डोंगर..पाण्यामध्ये patch-work करावे तसे क्चोते-छोटे हिरवेगार जमिनीचे तुकडे..छोटी बेटेच जणू. ह्या बेटांची शोभा वाढवली होती ती त्यांवर हिंडणार्या बगळ्यांनी. पाण्यात बदके पोहत होती. आहाहा. शेजारीच एक छोटीशी हट होती. तिथे काही काळ नुसते हे दृश्य पाहत बसलो. पलीकडे छोटीशी बाग होती. उंच झोके झाडाला बांधले होते. काही काळ झोका घेतला. न निसर्गाची शोभा पाहत पाहत तिथून Kuruva Dweep पाहण्यासाठी निघालो.



केरळ टूरिझमच्या चिन्हाखाली "Gods own country" असे वाक्य लिहिलेले आहे. केरळच्या रस्त्यांवरून जायला लागले की ह्या वाक्यात किती तथ्य आहे ते प्रत्ययास येते. चांगले रस्ते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला चहा-कॉफीच्या किंवा नारळांच्या बागा. सीझनमध्ये गेल्यास मस्त हवा...कोणत्याही ठिकाणाला भेट न देता नुसती भटकंती केली तरी डोळ्यांना सुख आणि जीवाला समाधान मिळते. बराचसा रस्ता असाच गेला. "कुरुवा द्वीप" कडे जाणारा रस्ता मात्र भयंकर होता. भूकंप होतोय की काय असे वाटावे तशी गाडी हलत होती. १०-१५ मिनिटांचा असा भयंकर प्रवास झाल्यावर कुरुवा द्वीपला पोहोचलो. ही जागा एकदम रहस्यमय किंवा भूत-खेतांच्या सिनेमात शोभून दिसावी अशी होती. हे एक छोटेसे बेत आहे. ह्या बेटाच्या चारीही बाजूंना चॉकलेटी रंगाचे पाणी आहे! बेटावर चित्र-विचित्र आकारांची  झाडे आहेत. उंच बांबूंची झुडुपे आहेत. बाम्बूतून वाहणार्या वार्याचा गंभीर आवाज येत असतो. हिरवा रंग असा नजरेसाच येत नाही. पाणी चॉकलेटी, जमीन चॉकलेटी,  गूढ दिसणारी झाडे! बेटाच्या एका बाजूने चालत निघायचे न बेटाच्या काठाने संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करायची. एका वेगळ्याच वातावरणाचा अनुभव आला.

      तिथून आम्ही निघालो Poolot Lake ला. आता मला ह्याचाही उच्चार माहित नाही. ही जागाही छान होती. तलाव,  त्याच्या बाजूने चक्कर मारायला वाट केलेली होती. बाजूला झाडे. आम्ही संध्याकाळी ५ च्या सुमारास तिकडे पोचलो. अंधार पडत आला होता. किंचितसा पाऊसही होता. त्यामुळे इथेही एक गूढ-गंभीर असे वातावरण अनुभवास आले.

     दिवसभर मस्त फिरणे झाले. तसे वायनाड पूर्ण फिरायला २-३ दिवस लागतात. ठिकाणे लांब लांब आहेत. पण एक दिवसात ह्या तीन ठिकाणी जाता आले आणि फार मजा आली.
घरी परतलो. थोडा आराम, खेळ, गरमा-गरम जेवण आणि मग मस्त झोप असा दिवस म्हणता म्हणता संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो. आता रस्त्याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे कुठे कुठे विश्रांतीला थांबायचे ते आधीच ठरवले. त्यामुळे प्रवास सुखकर झाला.
येता येता चिन्नपट्टणंला मुद्दाम ब्रेक घेतला. बेंगलोरजवळील हे गाव रंगीत लाकडी खेळणी आणि वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. एका दुकानाला भेट दिली. रंगीत खेळण्यांच्या दुनियेत अक्षरशः हरवून गेल्यासारखे वाटले. थोडी खरेदी करून निघालो. बंगलोर गाठले.
     केरळचा हिरवागार निसर्ग, जेवण, पाहुणचार आणि बाईक..कॉम्बीनेशन मस्त होते. ट्रीप अविस्मरणीय होती. सहा महिन्यांनी मी तिच्यावर पोस्ट लिहू शकत आहे त्यातच सगळे आले.

Saturday, February 5, 2011

ನಮ್ಮಬೆಂಗಳೂರು (नम्म बेंगळूरू), अर्थात आमचे बेंगळूरू


(टीप: बेंगळूरू इथे  नीट लिहिता येत नसल्याने मी पोस्टमध्ये बेंगलोर असे लिहिणार आहे...)
    मला बेंगलोरमध्ये येऊन आता सहा महिने होऊन गेले आणि ह्या सहा महिन्यांमध्ये बेंगलोरने मला अनेक रंगीबेरंगी आठवणी दिल्या. ह्या रंगांनी बेंगलोरचे रंगतदार चित्र तुमच्यासमोर उभे करावे असे आज वाटले...
सगळ्यात आधी मी बेंगलोरला आले ते लग्नानंतर अभिजीतला भेटायला २-३ दिवसांसाठी. बस स्टॉप वर उतरल्या उतरल्या बेंगलोरने मला सुखद धक्का दिला. मी एका फ्रूट-प्लेट घेतली, त्या माणसाने अतिशय आपुलकीने "फ्रूट-प्लेट आवडली का?" असे मला हावभावांनी, खाणा-खुणान्नी विचारले. एकतर ती फ्रूट-प्लेट होती, वाईट लागायचा विशेष प्रश्नच येत नाही तरी त्याने विचारले. दुसरे म्हणजे एखाद्या दुकानदाराने आपल्याशी आपुलकीने बोलण्याची सवयच पुणेकर असल्याने राहिली नाहीये. कोणत्याही ठिकाणी आलेला पाहिला अनुभव त्या ठिकाणाबद्दलचे इम्प्रेशन मनात सोडून जातो. बेंगलोर मला पहिल्याच काही भेटीत आवडले. त्या ट्रीपमध्ये अजून एक गोष्ट लक्षात राहिली ती "सेट डोसा" आणि "चाउ-चाउ बाथ"...उडुपी उपहार मध्ये खाल्लेला सेट डोसा अविस्मरणीय होता..३ छोटे डोसे...वरून तूप...सांबार...चटणी...खल्लास...५ मिनिटात डोश्याचा फन्ना उडालेला होता. दुसरा नंबर चाऊ-चाऊ बाथचा. नावावरून एखादा चायनीज पदार्थ  आहे असे जर तुम्हाला वाटले असेल तर तुम्ही चुकलेले आहात. चाऊ-चाऊ बाथ म्हणजे १ मूद उपमा आणि एक मूद शिरा. शिऱ्यासारख्या असणार्या पदार्थांना इथे बाथ म्हणजे भात असे म्हणतात. जो शिरा होता तो होता केसरी बाथ. केसरी बाथ हा मी आजपर्यंत असंख्य वेळा खाऊनही त्याचा मला कंटाळा आलेला नाही...हा तुपातला शिरा असतो ज्यात लवंग घातलेली असते, कधी कधी अननस...आहाहा...बेंगलोर कधी आलात तर ना विसरता केसरी बाथ खाऊन पहा (मी नेहमी उडुपी उपहार, कोरमंगला इथे हा खाल्लेला आहे, इतर ठिकाणी कसा मिळतो मला कल्पना नाही.) तर एकदा खायला छान मिळतेय म्हणल्यावर 'मेरा दिल खुश हुवा...' इथे जागो-जागी फ्रूट-डिशेस आणि जुसेस च्या गाड्या आणि दुकाने असतात. कॉर्नर-हाउसचे आईस-क्रीम युनिक असते. भुट्टे आणि शहाळ्यांची रेलचेल असते. पाणी-पुरीच्या गाड्याही दिसतात. बेंगलोरमध्ये काही चटक-मटक खायची इच्छा झाली तर फक्त पाणी-पुरीवालेच तुमच्या कामी येऊ शकतात. पाणी-पुरी बरी असते. बाकी भेळ वगरे स्वतःच खून अनुभव घ्यावा. इथे भेळेत चिंचेचे पाणी वगरे घालायची भानगड नसते. लिंबाचा रस आणि चाट मसाला हेच काय ते चवीला घालतात. बाकी काकडी आणि गाजर हे  भेळेतले  महत्त्वाचे पदार्थ आहेत असे बेंगलोरमध्ये जन्मास आलेल्या प्रत्येक माणसाचे ठाम मत असणार कारण भेळेत काकडी-गाजर नाही असे पाहायला मिळणे अशक्य आहे. तेही काही वाईट लागत नाही. पण भेळेसारख्या चटकदार पदार्थात काकडी-गाजरासारखे सभ्य-गुणी सदस्य शोभूनच दिसत नाहीत. असो. बेंगलोरमध्ये पाव-भाजी, सामोसा, वडा-पाव असले चमचमीत पदार्थ मिळण्याची अपेक्षा जिभेने अजिबात ठेऊ नये...हे पदार्थ घेतलेच तर ते इतके पथेटिक लागतात की का घेतले असे वाटते.
    बेंगलोरला माझ्या मते दोनच ऋतू असतात पावसाळा किंवा अ-पावसाळा. बाकी इथे प्रत्येक दिवशी थंडी आणि उन्ह ह्यांचा खेळ चालू असतो. वर्षाचे अनेक महिने पाऊस थोडा-थोडा पडत असतो. आत्ता सूर्य दिसतोय, जरा उबदार वाटतंय तर ५ मिनिटांनीही तसेच वाटत असेल ह्याची खात्री नाही. हवामान असे आहे की पंखा तसा इथे लागतच नाही पण इकडे सर्दी-खोकला-ताप हे चारी ठाव पाव्हणे असतात.
     बेंगलोरची तारीफ करण्यासारखी गोष्ट म्हणजे इथली बस सेवा. वेल-कनेक्टेड, वेल-ऑर्गनाईझ्ड! प्रत्येक रूटवर एस-टी, एशिआड, शिवनेरी वगरेसारख्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बसेस धावत असतात. तुमच्या गरजेनुसार, तुमच्या खिश्याला परवडेल अशी बस निवडण्याची सोय तुम्हाला मिळते (पुण्यात गर्दी-उशीर ह्यांमुळे असंख्य लोक बसने जाण्याची हिम्मतच करत नाहीत). 
    पण   पुण्याचे ट्राफिक काय असे बेंगलोरचे ट्राफिक आहे. काही सिग्नल्स मध्ये लोकांना अर्धा अर्धा तास अडवून ठेवण्याची क्षमता आहे. आमच्याच घराच्या इथला सिग्नल एकदा लागला की तो सुटेपर्यंत गाड्या एकामागे एक थांबत जातात त्या पार पाव किलोमीटर पर्यंत उभ्या असतात. १० किलोमीटरचे अंतर पार करायलाही माणसाला १-१.५-२ तास लागू शकतात. शहराच्या आतून पुण्याला जायला बस निघाली की ती किमान २-२.५ तास आधी बेंगलोरमध्येच असते! भरीस बेंगलोरच अवाढव्य आकार. केवढे मोठे आहे बेंगलोर. बेंगलोरसमोर पुणे म्हणजे मला हत्तीसमोर उंदीर वाटायला लागले आहे. बेंगलोरचा  मध्य पकडला तर किमान २५ किलोमीटर त्रिज्येवर (रेडिअस) सर्व बाजूंनी बेंगलोर पसरलेले दिसेल. पुण्याची व्यास (डायमीटर) तरी एवढी आहे का? त्यामुळे बेंगलोरच्या उत्तरेकडील भागात जायचे म्हणजे पुण्याहून मुंबईला जाण्यासारखे होते.
     बेंगलोरला गार्डन सिटी म्हणतात. बेंगलोर हे नाव अगदी सार्थ ठरवते. इथे जागो-जागी छोट्या-मोठ्या बागा आहेत, छान मेंटेन केलेल्या, सुंदर...झाडांचीही संख्याही बरी आहे. गार्डन सिटी बरोबरच बेंगलोरला लेक (तलाव) सिटी म्हणायला हवे. गूगल वरून नकाशा पहा बेंगलोरचा असंख्य तलाव दिसतील तुम्हाला.
     बेंगलोरमध्ये लोकांना मिठाईसाठी वेगळी दुकाने काढणे परवडत नाही बहुतेक. मिठाई ही बेंगलोरमध्ये बेकरीत किंवा फार तर फार हॉटेलमध्ये मिळण्याची गोष्ट आहे. तसेच इथे डेअरीज (जिथे ताजे ताजे दुधाचे पदार्थ मिळतात)  पण फार दिसत नाहीत. एक नंदिनी नावाची कात्रज सारखी मोठ्ठी डेअरी आहे. त्यांचे packed पदार्थ मिळतात. म्हणजे खावा, लोणी वगरे सगळा packed घ्यायचे. एखाद्या मॉलमध्ये कधीतरी एखादी ताजे दुधाचे पदार्थ विकणारी डेअरी सापडते. चक्का तर इथे बहुधा तयार होत नाही. पाव-भाजीचा पाव ही इथे दुर्मिळ गोष्ट आहे. लोकांना पाव-भाजी खायला बोलवायचे असेल तर गणपतीसाठी पत्री गोळा करत हिंडावे तसे वेगवेगळ्या दुकानांतून एक-एक, दोन-दोन पाव लाद्या गोळा करत फिरावे लागते. दूध मसाला आहे का (एवरेस्ट कंपनीचा दूध मसाला महाराष्ट्रात सगळीकडे मिळतो) विचारल्यास मसाला दूध हवे आहे का असे उत्तर मिळते. केशर, मटकीसारख्या गोष्टी आणायला मॉल मध्ये जावे लागते. 
     बेंगलोरमध्ये इंग्लिशमधून शिक्षणाची इतकी क्रेझ आहे की जास्तीत जास्त लोक मुलांना इंग्लिश मिदिम मध्येच घालतात. आमच्या बाईचेच इदाहरण घ्या. नवर्याने सोडलेली, ३ मुलांची आई असलेली न वडलांनी घरात आसरा दिलेली बाई...कसे-भासे पोटभरीला पैसे मिळतात, पण मुलगा इंग्लिश मिडीअम मध्ये शिकतो. मुली कन्नड मिडीअम मध्ये आहेत पण त्यांना स्पेशल क्लास लावलेला आहे इंग्लिशसाठी!
इथले  रस्ते पुण्यासारखेच घाणेरडे आहेत, corruption हे पुण्याच्या थोबाडीत मारेल एवढे जास्त आहे. काही दुकानदारांना चितळ्यानएवढाच माज आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या ही पुण्यापेक्षा कितीअरी जास्त आहे (प्युरीफायर वाल्यांचा धंदा उत्तम चालतो.)
     आधीच म्हणल्याप्रमाणे बेंगलोर हे पुण्याचेच एक मोठे version आहे. त्यामुळे, आपली मराठी, आपली माणसे, आपला वडा-पाव सोडले तर पुण्याला फारसे मिस करायची वेळ येत नाही...म्हणूनच इथून आलेल्या माणसांनाही बेंगलोरला 'नम्म बेंगळूरू:आमचे बेंगळूरू' म्हणावेसे वाटल्यास नवल नाही.

Thursday, December 23, 2010

गप्पा पुस्तकांविषयीच्या

खूप दिवस झाले पोस्ट लिहून...मधले दिवस मी काही interesting पुस्तके वाचण्यात मग्न होते...रविंद्रनाथ टागोरांचे गोरा आणि इंदिरा गांधींचे चरित्र (लेखिका: पुपुल जयकर) ही त्यातली दोन...पुस्तके खूपच छान होती...
'गोरा' ही स्वातंत्र्योत्तर भारतातील समाजव्यवस्थेविषयीचे अनेक पैलू उलगडत जाणारी कथा आहे. गोरा व त्याचा मित्र बिनोय ह्यांच्या आयुष्यात घडत जाणार्या घटनांमधून रविन्द्रनाथ हा क्लिष्ट विषय अतिशय मनोरंजकपणे मांडत जातात.
इंदिरा गांधीच्या चरित्राचे पानन पान त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अद्भूत घटनांनी थकक करून सोडते. शाळेत शिकवतात फ़क्त स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास...त्यानंतर भारतात काय काय घडले हे माझ्या वयाच्या लोकांना क्वचितच माहीत असते. इंदिरा गांधींच्या चरित्रात स्वतंत्र्यापूर्वीचा काही काळ आणि स्वातान्त्र्यानंतरचा ३०-४० वर्षांचा काळ आपल्यासमोर उभा राहतो. स्वातंत्र्योत्तर भारतापुढील समस्यांची तीव्रता स्वातंत्र्योत्तर भारतापुढील समस्यान्हून तीळमात्रही कमी नव्हती. पैशाची टंचाई, बेरोजगारी, महागाई, जातीवाद, गुन्हेगारी, स्मगलिंग...एक ना अनेक संकटे...त्यात पकिस्तान, त्याची बाजू घेऊन चीन आणि अमेरिका ह्यांनी नव्याने सुरु केलेला छळ...भारताने साजरे केलेले स्वातंत्र्य दिवस जस-जसे संख्येने वाढू लागले तस-तसे ह्या संकटांची तीव्रताही वाढू लागली. न अशातच नेहरूंनंतर इंदिरा पंतप्रधान झाली. मुळात एक स्त्री, वयाने लहान...आपण हिचा वापर करून भारताचा कारभार आपल्या हातात घेऊ (तिला manipulate करू) अशी कांग्रेसच्या दिग्गजान्नी पाहिलेली स्वप्न तिने धुळीस मिळवली. इतर राष्ट्रांमध्ये भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. महिला आणि मुलांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले. केवळ आर्थिक आणि सामाजिक विकासाच नाही, कला आणि साहित्य ह्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी देशात व देशाबाहेर अनेक उपक्रम आयोजित केले. तिने चुकाही केल्या. पण चुकांची जबाबदारी स्वतःवर घेऊन त्याचे प्रायश्चित्तही घेतले (तिची हत्त्या हाही त्याचाच एक भाग होता का? सुवर्ण मंदिरावर कारवाई केल्याने शिखांचा रोष तिने ओढवून घेतला. त्यानंतर तिच्या सुरक्षादलातील शिखांपासून तिला धोका आहे असे रिपोर्ट आले असतानाही तिने त्यांच्या भावना अजून दुखावून जाऊ नयेत म्हणून त्यांना काढले नाही. न त्यातीलच दोन शिखान्नी तिची हत्त्या केली.) राष्ट्रीय समस्या आणि कौटुम्बिक समस्यान्नी घेरले असतानाही तिने कधी धैर्य सोडले नाही आणि शेवटपर्यंत लढा देत राहिली. कोणी माणूस इतका खंबीर, दक्ष, efficient कसा असू शकतो असा प्रश्न तिचे चरित्र वाचताना पानो-पानी डोकावत राहतो. अर्थात मी काही इतिहासाची अभ्यासक नाही. पण पुपुल जयकरान्च्या perspective ने पाहिलेली इंदिरा गांधी माझ्या मनात देशप्रेम, जागरूकता, निर्भिड़ता ह्यांविषयीची एक नवी जाणीव करून गेली...
माझ्या शेवटच्या पोस्टनंतर माझी आणि अभिजीतची केरळमधील वायनाडला bike-trip झाली. वायनाड खूप मस्त आहे...ह्या ट्रिप विषयी लिहायची इच्छा आहे...पण त्याविषयी सविस्तर लिहिन पुढच्या पोस्टमध्ये....
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...हे वर्ष आपल्या सर्वांना आणि आपल्या भारताला भरभराटीचे जावो ही प्रार्थना...

Sunday, October 10, 2010

Little Women (By Louisa May Alcott)

Spoiler Warning Ahead!
इतक्यातच एक पुस्तक वाचले: "Little Women- By Louisa May Alcott". Little Women ही चार बहिणींची गोष्ट आहे. वेगळी वये, वेगळे स्वभाव, साहजिकच वेगळी विश्वे आणि वेगळी स्वप्ने घेऊन जगणाऱ्या ह्या बहिणी! ह्या मुलींचे वडील घरापासून लांब युद्धभूमीवर असतात. पूर्वी पैशाने संपन्न असणारे घर फसवणुकीमुळे दारिद्र्याच्या विळख्यात अडकलेले असते. ह्या background वर एक वर्षात त्यांच्या आयुष्यात काय काय घडते ह्याची ही गोष्ट आहे. मेगला छान-छौकीच्या वस्तुंची आवड असते. जो tomboyish असते. वडलांच्या गैरहजेरीत आपण कुटुम्बातील एक जबाबदार व्यक्ती आहोत असे तिला वाटत असते. बेथ ही एक लाजरी-बुजरी, घरालाच जग मानणारी मुलगी असते. सगळ्यात धाकटी एमी थोडीशी स्वार्थी असते. पण ह्या मुलींवर त्यांचे आई-वडिल खूप काळजीपूर्वक संस्कार करत असतात. त्यांच्यातील दुर्गुणांवर मात करण्यासाठी त्यांना मदत आणि प्रोत्साहन देत असतात, वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. एका वर्षात असे वेगवेगळे प्रसंग येतात की ह्या मुलींना जगातील पैसा, आराम ह्या गोष्टींपेक्षा आपल्या घरात मिळणारे प्रेम किती मौल्यवान आहे ह्याचा प्रत्यय येतो. मेग एका श्रीमंत कुटुम्बासोबत काही दिवस काढ़ते आणि केवळ पैसा आनंद देत नाही हे समजते. जो आपल्या धाकट्या बहिणीच्या जीवघेण्या आजारपणात तिची काळजी घेते आणि तिला आपल्यातील स्त्रित्त्वाचा प्रत्यय येतो. बेथ थोड़ी धीट होते. एमीला काही काळ घरापासून दूर एका खष्ट आजीबाईकडे राहिल्याने आपल्या घरात आपल्याला किती प्रेम आणि काळजीने वाढविले जाते ह्याची कल्पना येऊन आपण किती स्वार्थी आहोत ह्याची जाणीव होते आणि त्यावर मात करायला ती शिकते.
कथेमध्ये अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. चौघी बहिणी नाताळनिमित्त घरात दरवर्षी नाटक बसवत असतात. एक गोष्ट त्या वर्षीच्या नाटकाचे वर्णन करते. त्या काळात असलेल्या clubs च्या craze ने प्रेरित होऊन ह्या मुलीन्नीही एक क्लब काढलेला असतो. त्या क्लबचे, त्याच्या मासिकाचे वर्णन छान आहे. जोची स्वयंपाकघरात झालेली फजिती, एमीची शाळेत झालेली फजिती, बेथच्या मांजरी आणि भावल्या, शेजारच्या घरातील Laurie, त्याचे आजोबा, त्यांच्या गमती-जमती छान आहेत.
लेखिकेची कथनाची शैली खूप ओघवती आहे. सर्व प्रसंग आपल्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखे येत जातात. शांता शेळक्यान्नी केलेला "चारचौघी" हा ह्या पुस्तकाचा अनुवादही तितकाच सुंदर आणि प्रभावीपणे ही कथा आपल्यासमोर मांडतो.
बापरे! कोणत्याही गोष्टीला review करणे ही किती अवघड गोष्ट आहे हे मला आत्ता कळते आहे. पण पुस्तक इतके सुंदर होते की ह्याबद्दल लिहून आपण त्याच्या वाचनाची एक स्मृति जपून ठेवावी असे वाटले त्यासाठी हा एक प्रयत्न. ज्यांना कौटुम्बिक कथांमध्ये रस आहे त्यांनी चारचौघी किंवा Little Women नक्की वाचा.