Saturday, February 18, 2012

सोनी आणि तिची पिल्ले

    गेल्या पोस्टमध्ये सांगितल्यानुसार सोनीला दोन गोंडस पिल्ले झाली. जन्मतः  ह्या पिल्लांचे डोळे बंद असतात, त्यांना चालता येत नसते. तेव्हा पिल्लांचे डोळे कधी उघडणार, ती चालायला कधी लागणार ह्याविषयी आम्हाला भयंकर उत्सुकता लागलेली असायची. दर तासाला पिल्ले काय करतायत हे पाहण्यासाठी पिल्ले असलेल्या दिवाणाकडे आमच्या चकरा सुरु असायच्या. मांजरी कोणालाही पिल्लांजवळ येऊ देत नाहीत, जवळ जायचा प्रयत्न केल्यास गुराकावतात, नखे मारतात असे आम्ही ऐकले होते. पण सोनीचे तसे काहीच नव्हते. उलट आम्ही पिल्लांना पाहतोय, त्यांना हातात घेतोय ह्याचे तिला कौतुक वाटायचे. किंबहुना ह्यांच्या उपस्थितीत थोडा वेळ तरी आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागणार नाही, थोडा आराम करता येईल ह्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसायचे. पिल्लांना पाहायला गेले की पिल्ले तीनच स्थितींत दिसायची: झोपलेली, दूध पिणारी किंवा भूक लागलीये म्हणून आईला शोधणारी!
    बाकी डोळे बंद असले तरी छोटी पिल्ले जात्याच स्मार्ट असतात, चौकस असतात. नाकाने वास घेऊन, आणि कानाने आवाज ऐकत ती सतत आपल्या आजूबाजूला नव्याने आलेल्या गोष्टीचा वेध घेत असतात. आपल्या आजूबाजूला कोणतीही संशयास्पद हालचाल होत असल्याचे त्यांना वाटले किंवा नवीन गोष्टीचा वास आला की ती फिस्कारतात. सोनीची पिल्ले ह्या बाबतीत एक्स्ट्रा स्मार्ट होती. आम्ही दिवाणाजवळ गेलो की ती आमच्या दिशेने तोंड करून काही वेळ भलते सलते आवाज काढत, उद्देश? आम्हाला घाबरवून. शेवटी त्या प्रकाराने ती दमली की परत तोंड वळवून आम्ही येण्याआधी जे त्यांचे चालू असे ते पुन्हा सुरु करायची. डोळे न उघडलेली पिल्ले आईला शोधण्यासाठी काढत असलेले वेगवेगळे आवाज ऐकणे, चालता येत नसतानाही नाकाने वास घेत आई कुठे असेल  ह्याचा वेध घेत, तिच्यापर्यंत कसे बसे सरपटत सरपटत जाणाऱ्या त्या पिल्लांना पाहणे हे आमच्यासाठी नवीन अनुभव होते.
    अजूनही दिवाणातील सोनी आणि तिच्या पिल्लांची काही दृश्ये रेकॉर्डेड फिल्मसारखी माझ्या डोळ्यासमोर येतात. सोनी कोपर्यात बसलीये. पिल्ले झोपलीयेत. अचानक एखाद्या पिल्लाला जाग येते. झोपेतून नुकतेच उठेलेले बाळ जसे कुरकुरते तसे हे पिल्लू क्षीण आवाजात आईला हाक मारण्याचा प्रयत्न करते. त्याचा आवाज ऐकून बाकीची पिल्लेही जागी होतात. सगळ्यांनाच एकदम आईची आठवण होते. सगळीच आईला हाक मारू लागतात. पिल्ले शांतपणे झोपलेली पाहून आपणही आराम करावा म्हणून थोडी डुलकी काढत असलेली आई ह्या गडबडीने जागी होते. सगळी पिल्ले कशी बशी धडपडत, सरपटत, वास घेत घेत आईपर्यंत पोहोचायच्या प्रयत्नात असतात. आपण बाळांनी  रांगायला लागण्याची जशी वाटत पाहत असतो तशीच ही आई पिल्ले चालायला लागण्याची वाट पाहत असते. त्यामुळे पिल्लांची इतकी धडपड पाहूनही ती स्वतःहून त्यांच्या जवळ जात नाही, पिल्ले तिच्यापर्यंत पोहोचायची आतुरतेने वाट पाहत राहते. शेवटी कशी बशी पिल्ले आईपर्यंत पोहोचतात. आईच्या पोटात डोके खुपसून त्यांचा दूध पिण्याचा कार्यक्रम सुरु होतो. पोटे भरली की तशीच एकेक एकेक करत आईच्या पोटात डोके खुपसून झोपून जातात. शेवटी दमलेली आई हाताच्या एका रेट्यात सगळ्या पिल्लांना आपल्या कुशीत ओढून घेते आणि त्यांच्या भोवती स्वतःला गुरफटून झोपून जाते. हा कार्यक्रम कितीही वेळा पाहिला तरी त्याचा आम्हाला कंटाळा यायचा नाही, उलट छानच वाटायचे.
    ही सगळी गंमत अनुभवत पिल्ले डोळे कधी उघडणार, कधी चालायला लागणार ह्याची वाट आम्ही पाहू लागलो. आधी पिल्लांचे डोळे नुसतेच काळ्या फटीसारखे दिसायला लागले. मग ते आणखी थोडे उघडले. थोडे, थोडे करत दहाव्या दिवशी पिल्लांचे डोळे पूर्ण उघडले. आता त्यांच्या पायातही थोडी ताकद आली होती. नुकतेच चालायला शिकलेले पाय आणि इतक्यातच पाहायला शिकलेले डोळे अशा परिस्थितीत त्यांना जमिनीच्या उंचीचा अंदाज येत नसे. पाहतायत कुठेतरी, जायचेय कुठेतरी, पावले भलतीकडेच पडतायत असा प्रकार. नुकतेच चालायला लागलेले बाळ पाहायला जितकी मजा येते तितकीच मजा आम्हाला त्यांच्या त्या गोंडस हालचाली पाहण्यात यायची. सोनेरी पिलाच्या डोळ्यांचा रंग होता निळा आणि तो बोका होता. सोनेरी रंग आणि निळे डोळे असलेला हा बोका फारच गोंडस दिसायचा. त्याच्या रंगावरून आम्ही त्याचे नाव चॉकी (चॉकलेटसारख्या रंगावरून )  ठेवले. दुसरे पिल्लू सोनीच्याच रंगाचे, हिरव्या डोळ्यांचे होते. ती मांजरी होती. तिचे नाव आम्ही ब्लॅकी ठेवले.
    मांजरी पिल्लांची जागा सात वेळा बदलतात असे म्हणतात. त्यांना पिल्लांची जागा बदलण्याची निसर्गतः सवय असते. त्या दर काही काळाने नवी जागा शोधतात आणि एकेका पिल्लाला पटापट तोंडात पकडून नवीन जागी घेऊन जातात. पण आधी म्हटल्याप्रमाणे सोनी बालसंगोपनात ढ असल्यामुळे तिला पिल्ले हालविण्याची इच्छा झाली तरी ती कृतीत उतरवता येत नसे. कितीतरी वेळ तर तिला पहिल्या पिल्लाला तोंडात पकडण्यासाठी लागायचा. खूप प्रयासांनंतर पिल्लाला तोंडात पकडले की सोनी कसे बसे १० पावले चालायची की ते पिल्लू तिच्या तोंडातून सुटून खाली पडायचे. बिचारे कावरे बावरे होऊन इकडे तिकडे पाहू लागायचे, " मैं कहाँ हूँ?" स्टाईल मध्ये! हा सगळा प्रकार पाहून आई सोनी पिल्लाला कुठे न्यायचा प्रयत्न करतीये ते पाहायची. त्या ठिकाणी जागा करायची, पिल्लांसाठी जुन्या जागी अंथरलेली साडी त्या जागी नेऊन पसरायची आणि स्वतःच पिल्लांना तिकडे नेऊन ठेवायची. ह्या सगळ्या कार्यक्रमाने थकलेली सोनी पिल्लांना घट्ट मिठी मारून झोपून जायची.
    असे करता करता सोनीची पिल्ले मोठी होऊ लागली. छान चालू लागली. भयंकर दंगा करू लागली. मायेने साद घालून बोलावणाऱ्या सोनीचे ती अजिबात ऐकेनाशी झाली, मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष करू लागली. आता आमच्या घरात पाचाच्या जागी सात प्राणी (मनुष्य हाही प्राणीच आहे ह्याला अनुसरून) नांदू लागले. सोनी, चॉकी आणि ब्लॅकीचे पुढचे किस्से पुढच्या पोस्टमध्ये पाहू. तोवर टाटा!


1 comment:

  1. khup chhan. 'baapsangopanaat dha' hi sankalpana awadli . hahaha

    ReplyDelete