Thursday, August 26, 2010

दोन तासांची पाहुणी

दिवस होता भाद्रपद शुद्ध षष्ठीचा. 'काही विशेष का असते भाद्रपद शुद्ध षष्ठीला?' असा विचार करत असाल तर डोके वापरणे लगेच थांबवा. असेच आपले सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जड शब्द वापरले. असो, दिवस तसा साधाच होता. पण आमच्याकडे त्या दिवशी एक गम्मत घडली.
       तेव्हा घरी अभिजित आणि मी असे दोघेच असायचो. त्या दिवशी संध्याकाळी कम्पनीतून घरी आले आणि पाय धुवायला म्हणून बाथरूममध्ये जायला निघाले. दार उघडता क्षणी कमोडच्या कडेवर एक काळा पट्टा दिसला. 'काय असेल ते?', अशा विचारानेच माझ्या हृदयाचा ठोका चुकला. अभिजीतला दाखवावे तर तो गच्चीवरून कपडे आणण्यासाठी गेला होता. त्यामुळे ते तिथून हालायच्या आतच 'ते काय आहे?' त्याचा छडा आपल्यालाच लावायला लागणार हे मी समजून चुकले. मनाचा ठिय्या करून थोडे आणखी पुढे  गेल्यावर ती कोणत्यातरी प्राण्याची शेपटी आहे हे लक्षात आले. सस्पेन्स सस्पेन्स अजून वाढला. तसेच धारिष्ट्य करून आणखी पुढे सरकले. तेवढ्यात तो प्राणी धडपडत खाली घसरला. पुढे वाकून पाहिले तर दोन डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते. 'अरे देवा, उंदीर आहे की काय?', कल्पनाच भयंकर होती. डोळे प्राण्यावर खिळलेले. नीट निरखून पाहिले तेव्हा लक्षात आले की ती खार होती.  काय करावे सुचेना. माझी हालचाल बंद झालेली पाहून खारीने परत हालचाल सुरु केली आणि ती वर यायचा प्रयत्न करू लागली. तिच्या प्रयत्नांना फळ काही येईना.
       हे सगळे घडेपर्यंत अभिजीत खाली आला आणि त्याने खार पाहिली. "घराच्या दारे खिडक्या पूर्ण बंद असताना ही आत आली कुठून?" हा प्रश्न आम्हाला पडला. बहुधा, सकाळी मी निघाल्यावर २ मिनिट दार उघडे होते तेव्हाच ती घरात आली असावी असा निष्कर्ष निघाला.
       एव्हाना खार कमोडच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करता करता अर्धमेली झाली. आता मात्र तिला बाहेर काढायला हवे होते. खारीशी अशा पद्धतीने पहिलीच गाठ पडल्याने तिला हातात धरून बाहेर काढायची काही हिम्मत होत नव्हती. तिला काठीने खालून थोडा आधार देऊन वर काढता येईल का ते पाहिले. पण काठीने आधार देऊनही ती घसरतच होती. शेवटी एक फडके कमोडच्या कडेवर ठेवले तेव्हा खारुताई फड़क्यात नखे रुतवून काठावर चढली.
       इतके सगळे उपद्व्याप करून खारुताई इतकी दमली की ५ मिनिटे ती तशीच कमोड्च्या काठावर पडून राहिली. मग तिला थोड़ी तरतरी आली आणि तिने टुणकन खाली उडी मारून बाथरूमच्या कोपर्याकडे धाव घेतली. थंडीने आणि  भीतीने हुडहुडी भरू लागली. शक्तीच्या अभावी तिला जागचे हलता येईना, तिला अन्नाची गरज होती. "काय द्यावे बरे?" असा विचार करत असतानाच समोर बीट दिसले. बिटाचा तुकडा तिच्यासमोर धरला. तिने अगदी कार्टूनमध्ये दाखवतात तसे दोन हातात धरून तो खायला सुरुवात केली. दोन-तीन बीटाचे तुकडे खाल्ल्यावर तिने २-३ शेंगदाणे खाल्ले. भुकेमुळे खारुताईला "आपण कुठे आहोत? हे अन्न आपल्याला कुठून मिळतेय?" ह्या कशाचीच शुद्ध नव्हती. खाल्ल्यावर तिला जरा तरतरी आली. मग तिने आपले अंग
चाटून स्वछ आणि कोरडे करण्यास सुरुवात केली. अंघोळीचा कार्यक्रम झाल्यावर ती परत थोडी शांत बसली. स्वच्छता मग विश्रांती, परत स्वच्छता परत विश्रांती अशा राउंड्स काही काळासाठी चालू राहिल्या. खारुताई आणखी आणखी तरतरीत दिसू लागली. आधी तिचे आवाजान्कडे लक्ष जात नव्हते, आता ती आवाज ऐकून अंग चोरून बसू लागली, सतर्क वाटू लागली.
        तिला तरतरी आलीये म्हणल्यावर आम्ही तिला एकटीला सोडले. कोणी आजूबाजूला नाही असे पाहून ती बाहेर आली. स्वयंपाकघरात शिरली. उंच उंच उड्या मारून ओट्यावर, फ्रिजवर चढायचा प्रयत्न करू लागली. पण ते काही तिला जमले नाही. तेवढ्यात मी स्वयंपाकघरात काम करायला गेले. माझी चाहूल लागताच ती फ्रिजमागे लपून बसली. काही काळाने कुठे गेली म्हणून पाहू लागले तर दिसेना! अभिजीत शोधू लागला. ती गुपचूप दारामागे जाऊन बसली होती. अभिजीतची चाहूल लागताच तिथल्या झाडूवर झाडासारखे चढायचा प्रयत्न करू लागली आणि जमत नाही म्हणल्यावर काही काळ परत शांतपणे बसून राहिली. आम्ही परत आमच्या कामाला लागलो. मग परत धैर्य करून खारुताई देवघरात शिरली. पाहिले तर ती मस्त देवाच्या फोटोमागे अंग चोरून बसली होती.
         शेवटी तिला जायला आम्ही हॉलचे दार उघडून ठेवले आणि तिच्या थोडे जवळ जाऊन जरा आवाज केला. आवाजाला घाबरून खारीने दाराच्या दिशेने पळ काढला. दाराबाहेर पाऊल टाकताच तिला काहीतरी वेगळे वाटले बहुतेक! ती एक मिनिट तिथेच थांबली आणि भिन्तिवरून उडी मारून निघून गेली.
         खारुताई २-२.५ तासच आमच्याकडे होती पण तेवढ्या वेळात ती घरभर हिंडली. घरी दोघेच असल्याने ह्या छोट्या आगंतुक पाहुणीचा तेवढ्याच वेळात आम्हाला लळा लागला. गेल्यानंतर बराच वेळ आम्हाला दोघांना ती तिथल्या कोपर्यातच असल्याचा भास होत होता! आमच्या डेली सोपमध्ये "guest appearance" देणारी ही खारूताई कायमची आमच्या आठवणीत राहिलेली आहे.

Saturday, August 21, 2010

ग म भ न - कन्नडाचे

सध्या मी 'ग म भ न' शिकतीये कन्नड़ लिपीचे! कसे कसे? कशासाठी? तर कन्नड़ शिकायची आयडिया मला मी रोज कॅबने कंपनीत जाते तेव्हा आली. जसे आपल्या इथे महाराष्ट्रात दुकानांवर  इंग्लिशसोबतच मराठीतही नावे लिहावी लागतात ना तसेच इथेही आहे. प्रत्येक दुकानावर, शो-रूमवर, इंग्लिश आणि कन्नड़ दोन्हीत नावे लिहिलेली असतात. आता हा मुद्दा निघालाच आहे तर मला हे नमूद  करावेसे वाटते आहे की महाराष्ट्रातील अमराठी लोक शिवसेनेला नावे ठेवतात पण दक्षिण भारतात पण तेच तर आहे आणि त्याला हरकत काय आहे? एखाद्या प्रदेशात तिथली भाषा वापरली जावी ही उत्तम गोष्ट आहे. मी इथे कर्नाटकात राहते आहे तर कन्नड़ न शिकता इंग्लिशला आपलेसे का करावे? जोवर येत नाही तोवर इंग्लिशचा वापर करायलाच लागेल पण जर मी कन्नड़ शिकले तर मला एक नवी भाषा यायला लागेल आणि मी जिथे राहते त्या प्रदेशाशी आणि तिथल्या लोकांशी आणखी जवळीक साधण्यास त्याने मदतच होईल. शिवाय भाषेच्या अज्ञानाने जी फसवणूक होऊ शकते तिची शक्यता कमी होईल. असो! तर प्रत्येक दुकानावर, शो-रूमवर इंग्लिश आणि कन्नड़ दोन्हीत नावे लिहिलेली असतात. मी गंमत म्हणून ती दोन्ही नावे बारकाईने पाहायला लागले. अशा अनेक इंग्लिश-कन्नड़ जोड्या नीट जाणिवपूर्वकपणे पाहिल्यावर मला अनेक अक्षरे, कान्हा, मात्रा लिहिण्याची पद्धत कळायला लागली. ह्याचा अजून एक बोनस म्हणजे माझ्या कंपनीत जातानाच्या अर्ध्या तासात मस्त विरंगुळाही होऊ लागला. एक दिवस मी कन्नड़ लिपीसाठी सर्च केले तेव्हा मला http://www.omniglot.com/writing/kannada.htm ही लिंक मिळाली. त्यात प्रत्येक कन्नड़ अक्षर-स्वर  आणि  त्याचा इंग्लिश उच्चार दिला आहे. ते एकदा हाताने लिहून काढले. तेव्हापासून मला अक्षरे आणखी नीट समजू लागली. आता मला कन्नड़मध्ये लिहिलेल्या पाट्या वाचता येऊ लागल्या आहेत. ही लिपी शिकण्याचा अजून एक फायदा म्हणजे- इथे बसेसवर बर्याचदा फ़क्त कन्नड़मधून नावे लिहिलेली असतात. कन्नड़ ना समजणाऱ्यांना बसचे नंबर लक्षात ठेवावे लागतात. पण कन्नड़ वाचता येत असेल तर लास्ट स्टॉपची नावे वाचता येतात. एकदा का लिपी वाचता येऊ लागली की कन्नड़ भाषा शिकण्याचा माझा विचार आहे. बघू कसे काय जमते ते!

Monday, August 16, 2010

रविवारची कहाणी

गेला रविवार एकदम मस्त गेला होता न त्याबद्दल मला लिहायचेसुद्धा होते पण "ब्रेक के बाद" असे म्हणून जे गेले ते परत ब्लॉगकडे वळायला एक आठवडा गेला न मला जे लिहायचे होते तेच मी विसरून गेले...असो...आजचा दिवस म्हणजे रविवार ही काही कमी happening नव्हता....म्हणले गेल्या रविवारची नाही तर आल्या रविवारची कहाणी तरी लोकांना सांगावीच! (टिप: मी एक सामान्य मुलगी असल्याने माझ्या जीवनात अमिताभच्या शोले, बागबान, सरकार, अजूबा आदी पिक्चरसारखे अद्भुत-रम्य असे काही घडत नाही...अमोल पालेकरच्या चितचोर, हम दोनों, बातों बातों में ह्या पिक्चर्ससारखे माझे आयुष्यही हलके-फुलकेच...नवीन सांगण्यासारखे त्यात काही नाही...तरी देवाने फुकटात काहीतरी खरडायची न लोकांपर्यंत पोहोचवायची सोय केल्याने मी लिहिते...तेव्हा तुम्हाला वैताग आल्यास क्षमस्व...)...असो...गाड़ी रुळावर आणली नाही तर पोस्ट रविवारची न संगता भलतीच कहाणी सांगेल...जाते थे जापान पोहोंच गए चीन समझ गए ना अशी गत होईल...तर सकाळी उठले न एकदम क्लिक झाले की आज स्वातंत्र्य दिवस! शाळेतले दिवस आठवले...सकाळी लवकर उठून आवरून शाळेत जायचो...झेंडावंदन करायचो...त्यावेळी सगळ्यांनी मिळून एका आवाजात, एका सुरात म्हणलेली प्रतिद्न्या, राष्ट्रगीत, देशाभाक्तिपर गीते आजही माझ्या कानांत घुमतात...माग काही कार्यक्रम व्हायचे (जे मला आवडायचे नाहीत त्यामुळे ग्राउंडवरच्या धुळीशी, मैत्रिणीच्या वेणीशी, स्वेटरच्या फुलांशी करत बसलेले खेळ अजूनही आठवतात...)कार्यक्रम संपले की एकदम पळत सुटायचो...अंगात एक चैतन्य संचारलेले असायचे...सोसायटीतले झेंडावंदन असायचेच...पार्ले-जीचा पुडा मिळायचा ते झाले की...ण माग खेळाच्या स्पर्धा...घरी आल्यावर टीवीवर लागलेले कार्यक्रम...miss those days! आज ह्यातले काहीच नव्हते...in fact ह्यातले काहीच नसण्याची सवय झालीये...उठले टीवी लावला...कर्मा लागला होता...
हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए |
दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए ||
"ओळी ऐकण्यापुरत्याच राहिल्या आहेत नाही आपल्यासाठी!", मनात विचार आला...अजून थोडा विचार केला...आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांना मदत करून, अन्धश्रद्धांचा त्याग करून, लाच न देऊन, वाहतुकीचे नियम पाळून , कर भरून आपण खारीचा काही होईना वाटा उचलत आलोय आणि उचलत राहू असे डोक्यात येऊन मनाला थोडेतरी बरे वाटले...इतक्यात खालून ढोलाचा आवाज आला...पळत पळत passage मध्ये गेले...जवळच्या शाळेतल्या मुलांची परेड चालली होती...आवाज ऐकून अभिजीतही आला...५ मिनिटे थाम्बून परेड पाहिली...न दिवसाला सुरवात केली...
रविवारची सकाळ...नाश्ता काय करावा? पुदिन्याची चटणी केली...चटणी सॅंडविच खाल्ली, ब्रेडला तोप लावून त्यावर साखर पेरून खाल्ली आणि गोडमिट्ट कॉफीत ब्रेड बुडवून खाल्ला...मजा आली!
आवरून सुरभीकडे गेलो...गेल्याच आठवड्यात तिची आई आलेली...त्यांच्या हातचा दाण्याचा लाडू खायला मिळाला...आईचे घर सोडले की ह्या गोष्टींची किम्मत काय ते कळते! खूप छान वाटले...मग गेलो केतकीकडे...मी, केतकी, तानपुरा न तबला मशीन, सोबतीला यमन...वाह...एक तास कसा गेला कळलेच नाही....मग केतकी आम्हाला "स्मोकिंग चूल्हा" मध्ये जेवायला घेऊन गेली...नावावर जाओ नका...अतिशय साढ़े, घरगुती न रुचकर असे जेवण होते...पुलाव, दाल, फुलके, बटाट्याची भाजी...सोबतीला मसाला ताक...वाह...इतक्यांदा "वाह वाह" करायला ही काही "ताजमहल चाय"ची जाहिरात नाही न मला भेटायला झाकिर हुसेन येणार नाहिये हे माहिती आहे मला...पण tasty खायला मिळाले की तोंडातून अशी दाद येणारच! असो...
पुढचा कार्यक्रम होता "पीपली लाइव्ह" पाहायचा...शो ३ चा होता...आत्ताशी १ वाजला होता...घरी जाऊ, मशीन ठेऊ न पुढे जाऊ असे ठरवले होते त्याप्रमाणे निघालो...management च्या planning and execution चे धड़े पावासानेही घेतलेत की काय कोण जाणे...आम्ही रस्त्यावर पाऊल टाकले न पावसाने पडायला सुरवात केली...पाऊस जोरात नव्हता तेव्हा पुढे टाकलेले पाऊल तसेच आणखी पुढे रेटले...आम्ही जसजसे पुढे जाओ लागलो तसतसे पावसाला अजूनच चेव चढू लागला....थांबणे भाग होते...जिथे थांबलो तिथेच समोर जूसचे दुकान होते...लगेच "chance pe dance" करावा तसे आम्ही दुकानात शिरलो...मेनू कार्ड उघडले..."1 pomegranate juice" ऑर्डर दिली...टीवी चालू होता..."तारे जमीं पर" लागला होता...बाहेर पाऊस, हातात डाळीम्बाचे जूस, टीवी वर "तारे जमीं पर"....मैफिल चांगलीच रंगली...अधून मधून बाहेर लक्ष जात होते..."आपल्याला भाव देत नाही म्हणजे काय!" असा विचार करूनच की काय पाऊस वाढतच चालला होता...पण मैफिल सोडायला मन तयार नव्हते...दुर्लक्षच झाले...तेवढ्यात डिश टीवी चा सिग्नल गेला...आता मात्र पावासाकडे डोळे लागले (तो येण्यासाठी नव्हे तर थांबण्यासाठी...) पण आधी न दिलेल्या भावाचा बदला घ्यायचा म्हणून तोही वाढतच चालला होता...असे करत करत २ वाजले...आता मात्र निघायलाच हवे होते...अभिजीतला म्हणले "चाल जाउया तसेच! पावसात भिजायला मजा येईल..." आम्ही निघालो...पावसाला ठेंगा दाखवून आम्ही तसेच निघालो...केवढी थंडी वाजत होती...तिला ignore करण्यासाठी तोंडातून वेगवेगळे आवाज काढत निघालो...आम्ही पुढे गेल्यावर लक्षात आले की पुढच्या area त विशेष पाऊस पडलेला नव्हता न आत्ताही अतिशय थोडा पडत होता...चला सुटलो असे म्हणून गाडी हाणली न घरी पोचलो (पण आम्हाला काय माहीत रुसलेला पाऊस आमचा पाठलाग करत आमच्या मागेच येत होता...)...२.१५ ला घरी पोचलो...कपडे बदलले ...२.३५ ला बाहेर पडलो...पाहतो तर काय परत पाऊस! पण आता आमच्याकडे रेनकोट होते...परत निघालो थेटरच्या दिशेने...जवळ जवळ १० मिनिटांचा रस्ता पटापट कापला...साधारण १ की.मी. च अंतर उरले होते..."आपण वेळेत पोचणार" असे म्हणेस्तोवर समोर ट्राफिक दिसले...बेंगलोरचे ट्राफिक म्हणजे काट असते ते इथे ययूनाच अनुभवावे...२.४५ वाजले होते...आता अर्धा तासाच्या आत काही आम्ही थेटरला पोचत नाही अशी चिन्हे दिसू लागली...आधीच तो "पीपली लाइव्ह" १.३० तासांचा त्यात आपण १५ मिनिटे उशिरा गेलो तर "अब बचा क्या?" अशी म्हणायची वेळ येणार हे स्पष्ट दिसू लागले...ह्याच चिंतनात १० मिनिटे गेली...इतक्यात ट्राफिक अचानक
क्लिअर झाले...श्रीकृष्णास वासुदेव नदीपार नेत असताना पुराचे पाणी अचानक बाजुला गेले होते तसाच दैवी चमत्कार होउन समोरचे ट्राफिक अचानक क्लेअर झाले...आता आम्हाला काही रस्त्यातून पुढे जाऊन कन्सवधासारखे महत्त्वाचे काम करायचे नव्हते...पण फ़क्त कल्याणकारी कामांच्या वेळीच घडवून आणण्यासाठी जर देवाने चमत्कार राखून ठेवले तर आजच्या जगात तोच बिचारा frustrate होईल...थोडक्यात काय तर चमत्कार व्हावा तसे ट्राफिक क्लेअर झाले...बरोब्बर ३ च्या ठोक्याला आम्ही थेटरात पाऊल टाकले...पुढचा १.३० तास डोळ्यापुढे जे काही घडले ते कमाल होते...."पीपली लाइव्ह" हा एक सुंदर पिक्चर आहे...रिपोर्टर्सची थट्टा अनेक पिक्चर्समधून उडवली जाते...राजकारण्यान्चा नालायकपणा अनेक पिक्चर्स दाखवतात...पण ह्या दोन्हींचा एकत्रित परिणाम किती अनापेक्षित होऊ शकतो त्याचा ह्या पिक्चरने दिलेला पञ्च हृदयावर घाव सोडून जातो...
पीपली लाइव्ह संपून निघालो...भूक लागली होती...मोकामध्ये "chocolate fondue" नामक प्रकार खाल्ला (ठीक ठाकच होता...) क्रीम, चोकोलेटचा (कधी नाव्हे तो) overdose झाला...ह्यावर उतारा काय? पाणीपुरी! वाटेत पाणीपुरी खाल्ली..सोबत मसाला पुरी मिळाली...जीभ धन्य झाली...घरी आलो...शांत बसलो..."आपले उद्या joining आहे!" मन म्हणाले..."अरे देवा! सगळ्या documents जागेवर आहेत का..." काय काय न्यायचेय ते पाहण्यासाठी offer letter उघडले...अनेक कागदांच्या zerox हव्या आहेत असे दिसले...परत घराबाहेर पडलो न घेऊन आलो...तेवढ्यात येता येता मराठी गाण्यांचा विषय निघाला...घरी आल्या आल्या laptop चालू केला गेला...ती गेली तेव्हा रिमझिम, तू तेव्हा तशी, सुरमई श्याम, जिवलगा, श्याम सुंदर राजसा, नाविका रे, पाखरा जा दूर देशी, माझे रानी माझे मोगा, गोमू संगतीन एकातून एक अनेक गाणी आठवत गेली तशी ऐकत गेलो...दिवसाचा शेवट सुरेख झाला...
ह्या दिवसाची आठवन म्हणून पोस्ट लिहायला घेतली अणि अशा प्रकारे रविवारचा दिवस सुखात गेला...जसा पाऊस आमच्यावर कोपला तसा तुमच्यावर न कोपो. तरी जसा आमचा हा रविवार मस्त गेला तसा तुमचा पुढचा प्रत्येक रविवार जाओ. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफल सम्पूर्ण! (मला ह्या वाक्याचा नीट अर्थ माहीत नाही तरी जुन्या काहण्यान्च्या style ची ही केलेली नक्कल...तेव्हा काही चूक झालेली असल्यास क्षमा असावी.)

Monday, August 9, 2010

एक उनाड दिवस...

बंगलोरला आल्यावर हा पाहिला वीकेंड होता ज्यात माझ्या न अभिजीतच्या जिवाला थोड़ी शांतता होती...नाहीतर नवा संसार म्हणजे सामन आणा, भाजी आणा, फ्रिज आणा, फर्नीचर आणा...लिस्ट कधी संपेल की नाही अशी शंका वाटायला लागली होती...असो...तर एकदाचा ज़रा शांतता असलेला वीकेंड मिळाला...
शनिवारी सकाळी जेवायला पंजाबी पद्धतीचे काहीतरी करावे असे सर्वानुमते (म्हणजे माझ्या अणि अभिजीतच्या मते) ठरले...उषा पुरोहितांचे पुस्तक शेल्फतून बाहेर निघाले..त्यावरची शूल झटकली गेली...दिलेल्या रेसिपीज आणि घरात असलेले सामान ह्यांचा अंदाज घेऊन ज्या रेसिपीसाठी लागणार्या वस्तू घरात आहेत तो पदार्थ करायचे ठरले...डीटेल्ड अभ्यास केला गेला आणि "मसाला गोबी आणि लाछा पराठा" करायचे असे ठरले...पुरोहित बाईंच्या आणि देवाच्या कृपेने दोन्ही पदार्थ खूप छान झाले...देवाची कृपा ह्यासाठी की पुरोहित बाईंची रेसिपी कितीही चांगली असेल तरी मसाले आणि मीठ ह्यांचे प्रमाण योग्य होण्यासाठी अजूनही मला ईश्वरी मर्जीवर अवलंबून रहावे लागते...असो...जेवण मस्त झाले...
दुपारी आमच्या मित्रपरिवारासोबत पत्ते खेळण्याचा कार्यक्रम ठरवला गेला...जजमेंटचे डाव मस्त रंगले...१३ डाव खेळल्यावर मात्र आता पोटोबाचाही काही विचार करायला पाहिजे अशी जाणीव आम्हाला झाली...A2B मध्ये गेलो....१४ इडल्या (घाबरू नका...ही एकच डिश असते आणि तिच्यात १४ छोट्या छोट्या इडल्या साम्बारात बुडवून दिलेल्या असतात), समोसा चाट, कचोरी चाट, दही बटाटा चाट, पाव भाजी इत्यादी पदार्थान्वर मस्त ताव मारला गेला...न शेवटी लस्सी आणि कॉफी इत्यादी पेयांनी पोटपूजेची सांगता केली गेली...
वेळ होता...जवळच नवे शोपर्स स्टॉप उघडले होते...त्याला भेट दिली...२५००-३५००च्या अगदी टुकार हाफ-पॅंट, हजाराच्या पटीतल्या किमतींचे सदरे आणि झगे आदी वस्तू पाहून भारतीयांकडे खूपच पैसा झालेला दिसतोय अशा तर्हेचे रिमार्क्स मनोमन मारत तिकडून बाहेर पडलो (तसे पुण्यातही मॉल आहेत न काही लोकांच्या आग्रहाखातर त्यांनाही भेटी दिलेल्या आहेत...तरीही माझे बापडे मन अजूनही अशा वस्तू पाहून अचंबित होते...) ...असो...मित्रमंडळीन्चा निरोप घेऊन निघालो...इतक्यात ह्या अथावाद्यात ठरवलेले एक मोठे काम राहिले आहे ह्याची आठवण झाली...काम होते: कॉर्नर हाऊसला जाऊन आइसक्रीम खाणे...ताबडतोब हे काम पूर्ण करून टाकायचे ठरले...कॉर्नर हाऊसला "Death By Chocolate" नामक सन्डे मिळते त्याची आर्डर दिली गेली....ब्राउनी, चोकोलेट फ़ज, चोकोलेट आइसक्रीम, चोकोलेट सॉस, त्यावर शेंगादाण्याचा चुरा न चेरीज...आहाहा...आता एवढे चोकोलेटसुद्धा माझ्यासारख्या चोकोलेट-लवरच्या डेथला कारण नाही होऊ शकले ही गोष्ट वेगळी...
अशा प्रकारे तर्हेतर्हेच्या पदार्थांचा आणि पत्त्यांचा आनंद घेऊन तृप्त झालेला आत्मा नवर्याच्या मागे गाडीवर बसून आरामात थंड वाऱ्याचा अडिशनल आनंद घेण्यात रममाण झाला....
एवढ्यात आठवण झाली ती "माहेरच्या मुराम्ब्याची"! :D माहेरची साडी, माहेरचे कुंकू वगरे ठीक आहे...पण माहेराचा मुरंबा! हा काय प्रकार आहे? तर त्याचे असे झाले की अभिजीत लग्नाआधी ह्या मित्रमंडळीन्सोबत रहात असताना ते सगळे रोज जेवण घरी तयार करायचे...तोंडी लावणे म्हणून मी रुखावतातला मुरंबा अभिजीतसोबत पाठवला होता...पण ह्यांनी तो काही संपवला नाही...म्हणून तो परत आणण्याचे काम करणे महत्त्वाचे होते...माझ्या माहेरच्या मुरम्ब्याला त्यांनी न खाल्ल्याने बुरशी लागून तो वाया गेला असता तर किती हाहाकार माजला असता ह्याची कल्पना अभिजीतला असल्याने मुरम्ब्याची आठवण करून देताच अभिजीतने गाडी मॅकच्या घराकडे वळवली....मॅकच्या घरी त्याचे आई-बाबा आले होते....काकूंनी मस्त पोहे केले...सोबतीला राजकोटचा म्हैसूर पाक आणि चिक्की होते...आत्मा अजून तृप्त झाला...
आता मात्र काहीही करण्याचे त्राण शिल्लक नव्हते...गाड़ी सरळ घराच्या दिशेने वळवली...घरी येऊन पांघरुणात दडी मारून मस्त झोपून गेलो...
आमच्या वीकेंडच्या आठवणी सांगता सांगता आज वीकडे आहे न आपल्याला काम आहे हे विसरूनच गेले...त्यामुळे रविवारची कहाणी बाकी असूनही सध्या राम राम घेते...उरलेली कहाणी ब्रेक के बाद!