Saturday, August 21, 2010

ग म भ न - कन्नडाचे

सध्या मी 'ग म भ न' शिकतीये कन्नड़ लिपीचे! कसे कसे? कशासाठी? तर कन्नड़ शिकायची आयडिया मला मी रोज कॅबने कंपनीत जाते तेव्हा आली. जसे आपल्या इथे महाराष्ट्रात दुकानांवर  इंग्लिशसोबतच मराठीतही नावे लिहावी लागतात ना तसेच इथेही आहे. प्रत्येक दुकानावर, शो-रूमवर, इंग्लिश आणि कन्नड़ दोन्हीत नावे लिहिलेली असतात. आता हा मुद्दा निघालाच आहे तर मला हे नमूद  करावेसे वाटते आहे की महाराष्ट्रातील अमराठी लोक शिवसेनेला नावे ठेवतात पण दक्षिण भारतात पण तेच तर आहे आणि त्याला हरकत काय आहे? एखाद्या प्रदेशात तिथली भाषा वापरली जावी ही उत्तम गोष्ट आहे. मी इथे कर्नाटकात राहते आहे तर कन्नड़ न शिकता इंग्लिशला आपलेसे का करावे? जोवर येत नाही तोवर इंग्लिशचा वापर करायलाच लागेल पण जर मी कन्नड़ शिकले तर मला एक नवी भाषा यायला लागेल आणि मी जिथे राहते त्या प्रदेशाशी आणि तिथल्या लोकांशी आणखी जवळीक साधण्यास त्याने मदतच होईल. शिवाय भाषेच्या अज्ञानाने जी फसवणूक होऊ शकते तिची शक्यता कमी होईल. असो! तर प्रत्येक दुकानावर, शो-रूमवर इंग्लिश आणि कन्नड़ दोन्हीत नावे लिहिलेली असतात. मी गंमत म्हणून ती दोन्ही नावे बारकाईने पाहायला लागले. अशा अनेक इंग्लिश-कन्नड़ जोड्या नीट जाणिवपूर्वकपणे पाहिल्यावर मला अनेक अक्षरे, कान्हा, मात्रा लिहिण्याची पद्धत कळायला लागली. ह्याचा अजून एक बोनस म्हणजे माझ्या कंपनीत जातानाच्या अर्ध्या तासात मस्त विरंगुळाही होऊ लागला. एक दिवस मी कन्नड़ लिपीसाठी सर्च केले तेव्हा मला http://www.omniglot.com/writing/kannada.htm ही लिंक मिळाली. त्यात प्रत्येक कन्नड़ अक्षर-स्वर  आणि  त्याचा इंग्लिश उच्चार दिला आहे. ते एकदा हाताने लिहून काढले. तेव्हापासून मला अक्षरे आणखी नीट समजू लागली. आता मला कन्नड़मध्ये लिहिलेल्या पाट्या वाचता येऊ लागल्या आहेत. ही लिपी शिकण्याचा अजून एक फायदा म्हणजे- इथे बसेसवर बर्याचदा फ़क्त कन्नड़मधून नावे लिहिलेली असतात. कन्नड़ ना समजणाऱ्यांना बसचे नंबर लक्षात ठेवावे लागतात. पण कन्नड़ वाचता येत असेल तर लास्ट स्टॉपची नावे वाचता येतात. एकदा का लिपी वाचता येऊ लागली की कन्नड़ भाषा शिकण्याचा माझा विचार आहे. बघू कसे काय जमते ते!

5 comments:

  1. एखाद्या प्रदेशात तिथली लोकल भाषा वापरली जावी ही उत्तम गोष्ट आहे. मी इथे आहे तर कन्नड़ न शिकता इंग्लिशला आपलेसे का करावे? - हा विचार खूप आवडला.

    ReplyDelete
  2. kahi diwsan purvi lunch table war discussion chalu hota ..ek colleague sangat hote tyancha ek friend local bhasha kashi shikaycha te.. to bus ni pravas karaycha ..ani generally conductors chi wakya sagli kade ek sarkhich astat :D ..tar conductor che wakya ani tya war lokanche responses aikun to bhasha halu halu shikala ..

    tuzi patyanchi pan padhhat mala awadli :)

    ReplyDelete
  3. hey shiye idea!!! All d best!!!

    ReplyDelete
  4. Hey, try to learn some Kannada songs ;).. Here is one.. beautiful one.. http://www.youtube.com/watch?v=pGQVSPYX6IE

    Lyrics and it's meaning :- http://ssvikas.blogspot.com/2009/02/mungaru-maleye-mungaru-male-translation.html

    ReplyDelete