Saturday, February 18, 2012

सोनी आणि तिची पिल्ले

    गेल्या पोस्टमध्ये सांगितल्यानुसार सोनीला दोन गोंडस पिल्ले झाली. जन्मतः  ह्या पिल्लांचे डोळे बंद असतात, त्यांना चालता येत नसते. तेव्हा पिल्लांचे डोळे कधी उघडणार, ती चालायला कधी लागणार ह्याविषयी आम्हाला भयंकर उत्सुकता लागलेली असायची. दर तासाला पिल्ले काय करतायत हे पाहण्यासाठी पिल्ले असलेल्या दिवाणाकडे आमच्या चकरा सुरु असायच्या. मांजरी कोणालाही पिल्लांजवळ येऊ देत नाहीत, जवळ जायचा प्रयत्न केल्यास गुराकावतात, नखे मारतात असे आम्ही ऐकले होते. पण सोनीचे तसे काहीच नव्हते. उलट आम्ही पिल्लांना पाहतोय, त्यांना हातात घेतोय ह्याचे तिला कौतुक वाटायचे. किंबहुना ह्यांच्या उपस्थितीत थोडा वेळ तरी आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागणार नाही, थोडा आराम करता येईल ह्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसायचे. पिल्लांना पाहायला गेले की पिल्ले तीनच स्थितींत दिसायची: झोपलेली, दूध पिणारी किंवा भूक लागलीये म्हणून आईला शोधणारी!
    बाकी डोळे बंद असले तरी छोटी पिल्ले जात्याच स्मार्ट असतात, चौकस असतात. नाकाने वास घेऊन, आणि कानाने आवाज ऐकत ती सतत आपल्या आजूबाजूला नव्याने आलेल्या गोष्टीचा वेध घेत असतात. आपल्या आजूबाजूला कोणतीही संशयास्पद हालचाल होत असल्याचे त्यांना वाटले किंवा नवीन गोष्टीचा वास आला की ती फिस्कारतात. सोनीची पिल्ले ह्या बाबतीत एक्स्ट्रा स्मार्ट होती. आम्ही दिवाणाजवळ गेलो की ती आमच्या दिशेने तोंड करून काही वेळ भलते सलते आवाज काढत, उद्देश? आम्हाला घाबरवून. शेवटी त्या प्रकाराने ती दमली की परत तोंड वळवून आम्ही येण्याआधी जे त्यांचे चालू असे ते पुन्हा सुरु करायची. डोळे न उघडलेली पिल्ले आईला शोधण्यासाठी काढत असलेले वेगवेगळे आवाज ऐकणे, चालता येत नसतानाही नाकाने वास घेत आई कुठे असेल  ह्याचा वेध घेत, तिच्यापर्यंत कसे बसे सरपटत सरपटत जाणाऱ्या त्या पिल्लांना पाहणे हे आमच्यासाठी नवीन अनुभव होते.
    अजूनही दिवाणातील सोनी आणि तिच्या पिल्लांची काही दृश्ये रेकॉर्डेड फिल्मसारखी माझ्या डोळ्यासमोर येतात. सोनी कोपर्यात बसलीये. पिल्ले झोपलीयेत. अचानक एखाद्या पिल्लाला जाग येते. झोपेतून नुकतेच उठेलेले बाळ जसे कुरकुरते तसे हे पिल्लू क्षीण आवाजात आईला हाक मारण्याचा प्रयत्न करते. त्याचा आवाज ऐकून बाकीची पिल्लेही जागी होतात. सगळ्यांनाच एकदम आईची आठवण होते. सगळीच आईला हाक मारू लागतात. पिल्ले शांतपणे झोपलेली पाहून आपणही आराम करावा म्हणून थोडी डुलकी काढत असलेली आई ह्या गडबडीने जागी होते. सगळी पिल्ले कशी बशी धडपडत, सरपटत, वास घेत घेत आईपर्यंत पोहोचायच्या प्रयत्नात असतात. आपण बाळांनी  रांगायला लागण्याची जशी वाटत पाहत असतो तशीच ही आई पिल्ले चालायला लागण्याची वाट पाहत असते. त्यामुळे पिल्लांची इतकी धडपड पाहूनही ती स्वतःहून त्यांच्या जवळ जात नाही, पिल्ले तिच्यापर्यंत पोहोचायची आतुरतेने वाट पाहत राहते. शेवटी कशी बशी पिल्ले आईपर्यंत पोहोचतात. आईच्या पोटात डोके खुपसून त्यांचा दूध पिण्याचा कार्यक्रम सुरु होतो. पोटे भरली की तशीच एकेक एकेक करत आईच्या पोटात डोके खुपसून झोपून जातात. शेवटी दमलेली आई हाताच्या एका रेट्यात सगळ्या पिल्लांना आपल्या कुशीत ओढून घेते आणि त्यांच्या भोवती स्वतःला गुरफटून झोपून जाते. हा कार्यक्रम कितीही वेळा पाहिला तरी त्याचा आम्हाला कंटाळा यायचा नाही, उलट छानच वाटायचे.
    ही सगळी गंमत अनुभवत पिल्ले डोळे कधी उघडणार, कधी चालायला लागणार ह्याची वाट आम्ही पाहू लागलो. आधी पिल्लांचे डोळे नुसतेच काळ्या फटीसारखे दिसायला लागले. मग ते आणखी थोडे उघडले. थोडे, थोडे करत दहाव्या दिवशी पिल्लांचे डोळे पूर्ण उघडले. आता त्यांच्या पायातही थोडी ताकद आली होती. नुकतेच चालायला शिकलेले पाय आणि इतक्यातच पाहायला शिकलेले डोळे अशा परिस्थितीत त्यांना जमिनीच्या उंचीचा अंदाज येत नसे. पाहतायत कुठेतरी, जायचेय कुठेतरी, पावले भलतीकडेच पडतायत असा प्रकार. नुकतेच चालायला लागलेले बाळ पाहायला जितकी मजा येते तितकीच मजा आम्हाला त्यांच्या त्या गोंडस हालचाली पाहण्यात यायची. सोनेरी पिलाच्या डोळ्यांचा रंग होता निळा आणि तो बोका होता. सोनेरी रंग आणि निळे डोळे असलेला हा बोका फारच गोंडस दिसायचा. त्याच्या रंगावरून आम्ही त्याचे नाव चॉकी (चॉकलेटसारख्या रंगावरून )  ठेवले. दुसरे पिल्लू सोनीच्याच रंगाचे, हिरव्या डोळ्यांचे होते. ती मांजरी होती. तिचे नाव आम्ही ब्लॅकी ठेवले.
    मांजरी पिल्लांची जागा सात वेळा बदलतात असे म्हणतात. त्यांना पिल्लांची जागा बदलण्याची निसर्गतः सवय असते. त्या दर काही काळाने नवी जागा शोधतात आणि एकेका पिल्लाला पटापट तोंडात पकडून नवीन जागी घेऊन जातात. पण आधी म्हटल्याप्रमाणे सोनी बालसंगोपनात ढ असल्यामुळे तिला पिल्ले हालविण्याची इच्छा झाली तरी ती कृतीत उतरवता येत नसे. कितीतरी वेळ तर तिला पहिल्या पिल्लाला तोंडात पकडण्यासाठी लागायचा. खूप प्रयासांनंतर पिल्लाला तोंडात पकडले की सोनी कसे बसे १० पावले चालायची की ते पिल्लू तिच्या तोंडातून सुटून खाली पडायचे. बिचारे कावरे बावरे होऊन इकडे तिकडे पाहू लागायचे, " मैं कहाँ हूँ?" स्टाईल मध्ये! हा सगळा प्रकार पाहून आई सोनी पिल्लाला कुठे न्यायचा प्रयत्न करतीये ते पाहायची. त्या ठिकाणी जागा करायची, पिल्लांसाठी जुन्या जागी अंथरलेली साडी त्या जागी नेऊन पसरायची आणि स्वतःच पिल्लांना तिकडे नेऊन ठेवायची. ह्या सगळ्या कार्यक्रमाने थकलेली सोनी पिल्लांना घट्ट मिठी मारून झोपून जायची.
    असे करता करता सोनीची पिल्ले मोठी होऊ लागली. छान चालू लागली. भयंकर दंगा करू लागली. मायेने साद घालून बोलावणाऱ्या सोनीचे ती अजिबात ऐकेनाशी झाली, मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष करू लागली. आता आमच्या घरात पाचाच्या जागी सात प्राणी (मनुष्य हाही प्राणीच आहे ह्याला अनुसरून) नांदू लागले. सोनी, चॉकी आणि ब्लॅकीचे पुढचे किस्से पुढच्या पोस्टमध्ये पाहू. तोवर टाटा!


Monday, February 13, 2012

सोनीचे बाळंतपण

    मागील पोस्टमध्ये म्हटल्यानुसार सोनीने तारुण्यात पदार्पण केले आणि आमच्या घरासमोर बोक्यांच्या फेऱ्या चालू झाल्या. दिवसभर आमच्या मागे मागे करणारी सोनी घराबाहेर जास्त वेळ रमू लागली. काही काळातच सोनीच्या हालचालीत एकप्रकारचा मंदपणा जाणवू लागला. पण आमच्याकडे आधी सगळे बोके होते आणि ही पहिलीच मांजरी. त्यामुळे एवढ्याशा बदलावरून तिला पिल्ले होणार आहेत हे समजण्याइतके आम्ही एक्स्पर्ट झालेले नव्हतो. काही दिवसांनी तिचे पोट मोठे दिसू लागले आणि ती जास्त लाडे लाडे वागू लागली तेव्हा मात्र तिला पिल्ले होणार ह्याची खात्री झाली.
    एवढेसे पिल्लू असल्यापासून सांभाळ केलेल्या आपल्या पोरीसारख्या मांजरीचे बाळंतपण म्हणजे तिचे किती लाड करू आणि किती नको असे आमच्या आईसाहेबांना झाले. तिच्या खाण्यापिण्याची आणखी काळजी घेतली जाऊ लागली. खिरीचा खुराक सुरु झाला. एकदा आमच्या घरी पाहुणे आले होते. तेव्हा आई मांजर गरोदर आहे म्हणून तिला खीर खाऊ घालतीये हे पाहून त्यांना केवढे आश्चर्य वाटले होते ते मला अजूनही आठवतेय! आधीच लाडोबा असलेल्या सोनीला आपले अजून लाड होतायत हे पाहून आणखीनच लाडे लाडे वागण्याची संधी मिळाली. आपल्याला कसेही वागले तरी कोणी फटके मारत नाही हे तिला चांगलेच कळले. 
   जसजशी पिल्ले व्हायची वेळ जवळ आली तसतशी सोनीची पिल्ले घालण्यासाठीच्या जागेची शोध मोहीम सुरु झाली. काही फार संशयी वृत्तीच्या मांजरी  पिल्ले कुठल्यातरी अडगळीच्या ठिकाणी घालतात जेणेकरून पिल्ले कोणाच्या हाती सहज सहजी लागत नाहीत. पण सोनीचा तसा काही विचार दिसला नाही. आमच्या घरात अडगळ अशी नव्हतीच त्यामुळे तिने त्यातल्या त्यात जागेचा शोध सुरु केला. दिवाणाचे दार, किंवा कपाटांची  दारे उघडी दिसली की सोनी आत जाऊन बसायची. थोड्या वेळ त्या जागेचा 'फील' घेऊन बघायची. 'पिल्ले इथे सुरक्षित राहू शकतील का?' ह्याचे बहुधा ती आडाखे बांधत असावी. थोडा वेळ झाला की आपल्या आपण बाहेर पडायची. कपाटाची तपासणी करायला मात्र तिला थोडा जास्त वेळ लागायचा. प्रत्येक कप्प्यात जाऊन निरीक्षणे करणे म्हणजे केवढे मोठे काम! सोनीची स्वारी कपड्यांच्या कप्प्याच्या दिशेने जाऊ लागली की मात्र आम्ही तिला बाहेर काढून कपाट लावून घ्यायचो.
     म्हणता म्हणता पिल्ले होण्याचा दिवस आला. सोनी बेचैन दिसत होती. अधून मधून वेगवेगळ्या तर्हेचे आवाज काढत होती. आईच्या जवळ जवळ राहण्याचा प्रयत्न करत होती. तिचे हे वागणे पाहून आईला तिला लवकरच पिल्ले होणार आहेत ह्याची कल्पना आली. सोनीला काही सुचत नव्हते. एका जागी बसत नव्हती, जणू काही पिल्ले घालण्याच्या जागेच्या केलेल्या तपासाची सगळी कन्क्लुजंस ती विसरून गेली होती. त्यामुळे कुठे पिल्ले घालावीत हे तिला सुचत नव्हते. शेवटी ही अशीच फिरत राहिली तर भलतीकडेच पिल्ले घातली जातील ह्या काळजीने आईने दिवाणाच्या एका कप्प्यात मोकळी जागा केली, त्यात जुनी सुती साडी पांघरून ठेवली आणि सोनीला त्यावर बसवले. तिने जास्त हालचाल करू नये म्हणून अधून मधून तिच्या जवळ जाऊन आई तिला कुरवाळत राहिली. काही वेळाने सोनीला दोन पिल्ले झाली. 
    शिकारीत पैकीच्या पैकी मार्क मिळवणारी सोनी मुलांचे संगोपन ह्या विषयात मात्र अगदी ढ होती. अगदी १० पैकी २ मार्क्स देऊन नापास करावे इतकी ढ! पिल्ले जन्माला घातल्यावर मांजरी लगेच त्यांना स्वच्छ करतात. पिल्ले घातलेल्या जागी अगदी कसलाही नामोनिशाण उरत नाही इतका उरक त्यांच्यात असतो. पण आमची सोनी, पिल्ले जन्माला घालण्याच्या प्रोसेसमध्येच थकलेली. काही  वेळ गेल्यावर तिला पिल्लांकडे पहायचे सुचले. बाकीचे सोपस्कार आईनेच पार पाडले.
    अर्थात हा सगळा एपिसोड मी शाळेत असताना झाला आणि आईने मला तो नंतर सांगितला. मी पाहिली तेव्हा मला दिसली दोन छोटीशी पिल्ले, अगदी बोटाच्या लांबीएवढी छोटी. एक सोनीच्याच रंगाचे आणि एक सोनेरी! मिटलेले डोळे आणि इवलेसे शिम्पल्यासारखे कान.  त्यांना पाहून आपल्याला छोटी छोटी भाचरंडे झाल्यासारखे वाटले. येता जाता सारखे 'पिल्ले काय करतायत? डोळे उघडले का? चालायला लागली का?' इत्यादीचे निरीक्षण करण्याची सवय लागली. पिल्लांच्या गंमती-जंमती पाहण्यात किती वेळ जायचा ते समजायचे नाही. 
पिल्लांचे नामकरण, त्यांचे बालपण इत्यादीबद्दल गप्पा मारू पुढच्या पोस्टमध्ये. तोवर सायोनारा!

 



Thursday, February 9, 2012

सोनी रीलोडेड

    आधीच्या पोस्टमध्ये सांगितल्यानुसार हाताच्या पंजावर मावणारी एवढीशी सोनी दिसामासाने अंग धरू लागली. काळ्या लोकरीच्या गुंड्या सारख्या दिसणाऱ्या तिच्या अंगावर हळू हळू सोनेरी, पांढऱ्या छटा दिसू लागल्या. सोनीच्या फरवरील केस इतर मांजरांच्या केसांहून जास्त मुलायम आणि लांब होते. शेपटी मस्त झुबकेदार होती. माझ्या मैत्रिणीकडे मांजरांचे एक कॅलेंडर होते. ते एकदा तिने दाखवले. त्यात डिट्टो  सोनीसारखी दिसणारी मांजर होती. त्यावरून सोनी अमेरिकन मांजरांच्या जातीतील होती असे कळले.
    सामान्यतः मांजरी जरा खत्रूड, माणसांच्या जास्त वाटेला न जाणाऱ्या आणि बोके प्रेमळ,  माणसांशी जास्त जवळीक ठेवणारे असे असतात. पण सोनीला आमचा सहवास आवडायचा. जेव्हा तिचे खेळणे संपायचे तेव्हा ती कोणाच्या तरी मांडीत जाऊन बसायची, नाहीतर पायापायात करत राहायची. आई सकाळी गच्चीत फेऱ्या मारायला जायची तेव्हा सोनीपण तिच्यासोबत जायची. किंबहुना आईची गच्चीवर जायची वेळ झाली आणि लोखंडी दार उघडताना कडी वाजली की  कडीचा आवाज ऐकून सोनी जिथे असेल तिथून धावत पळत यायची. दार उघडले की भराभरा पायऱ्या चढून गच्चीसमोर जाऊन बसायची. गच्चीचे दार उघडून आत पाऊल टाकेस्तोवर तर बाईसाहेब गच्चीच्या कठड्यावर जाऊन बसलेल्या असायच्या. मलाही गच्चीत अभ्यासाला जायला आवडायचे. अशा वेळी सोनी काही वेळ स्वतःशी खेळायची आणि दमली की मांडीवर येऊन बसायची. खेळणे आणि दमल्यावर मांडीवर येऊन बसणे  आलटून पालटून चालू राहायचे. 
    सुरवातीचे सोनीचे गच्चीवरचे खेळ म्हणजे छोटे छोटे किडे, फुलपाखरे ह्यांच्या मागे लागणे, त्यांना पकडून त्यांच्याशी खेळत बसणे आणि शेवटी ते खाणे. काही वेळा कठड्यावर किंवा टी. व्ही. च्या antenna वर बसलेल्या पक्ष्यांना पकडायचा प्रयत्नही  चालू असायचा. पण अजून नेम धरण्याचा तितकासा अंदाज नसल्याने त्यात तिला यश मिळायचे नाही. परंतु इतर पिल्लांना आईकडून मिळणारे शिकारीचे शिक्षण सोनीला न मिळताही तिने लवकरच त्यातही प्राविण्य मिळवले. इतर वेळी गळ्यातली मोत्याची माळ मिरवत फिरणारी गोंडस सोनी शिकार करू लागली की मात्र एकदम उग्र दिसायची. तोंडाने वेगवेगळे आवाज काढत, गुरकावत, डोळे शिकारीवर रोखून सोनी आधी दाबा धरायची आणि योग्य वेळ येताच भक्ष्यावर झेप घेऊन त्याला पायाशी लोळवायची.   
    लहान लहान म्हणता म्हणता सोनीने तारुण्यात कधी पदार्पण केले ते कळले नाही.दिसायला गोड, अंगावर असलेल्या लांब केसांच्या फरमुळे जराशी गुबगुबीत वाटणारी सोनी जवळपासच्या बोक्यांना 'सुबक, ठेंगणी..' ह्या जुन्या मराठी गाण्यात वर्णन केलेल्या तरुणीसारखी वाटत असणार ह्यात शंका नाही. आमच्या घराबाहेर नवनवीन बोक्यांच्या चकरा चालू  झाल्या. परिणाम? आमच्या घराची लोकसंख्या वाढली. सोनीचे बाळंतपण, त्या वेळचे तिचे नखरे, नंतर सोनीच्या पिल्लांचा घरातील वावर ह्यांनी आमच्या घराचे वातावरण आणखी बदलले. त्याविषयी पुढच्या पोस्टमध्ये गप्पा मारू. 
    (सोनीचा फोटो पुण्याच्या घरी असल्याने तो काही मी इथे पोस्ट करू शकत नाही. पण सोनीची छबी तुमच्या डोळ्यासमोर उभी राहावी म्हणून एक लिंक इथे देते आहे: http://pusscats.com/Siberian_Cats.htm. ह्या लिन्कवरचा फोटो आणि मांजरीचे वर्णन सोनीशी अगदी मिळते जुळते आहे. त्यावरून ती सायबेरीअन जातीची असायला हवी. पण आधी म्हणल्याप्रमाणे मैत्रिणीने लहानपणी दाखविलेल्या कॅलेंडरनुसार ती अमेरिकन जातीची होती अशी आमची समजूत झाली होती.  निष्कर्ष? काही नाही. शेवटी जातीत काय आहे? असे म्हणून सोडून देऊ.)




Sunday, February 5, 2012

सोनी

   परवाच 'Marley and Me' वाचून झाले. मार्ली ह्या खोडकर, खट्याळ (मार्लीच्या मालकाच्या भाषेत वाया गेलेल्या) कुत्र्याची आणि त्याच्या मालकाची ही गोष्ट अतिशयच रंजक आहे. पुस्तक अतिशय वेधक होते, वाचताना मी मार्लीच्या गोष्टीत पूर्णपणे रंगून गेले. पण पुस्तक संपले आणि मन मार्लीतून बाहेर आले, सोनीच्या आठवणींत  शिरले. सोनी, माझी लाडकी मांजरी!
   संध्याकाळची वेळ होती. दाराची बेल वाजली. आईने दार उघडले. पाहते तर काय, दारासमोर बिल्डींगमधली समस्त बच्चेकंपनी हजर होती. "काकू काकू, पार्किंगमध्ये ना आम्हाला मांजराचे छोटेसे पिल्लू सापडले आहे. तुम्ही त्याला सांभाळाल?", डायलॉग पाठ केल्यासारखी एका सुरात पोरे म्हणाली.
    ह्याआधी मांजराची ३-४ छोटी पिल्ले आम्ही पाळली होती. पण कधी कुत्री मागे लागून, कधी काही आजाराच्या  निमित्ताने अशी अगदी लहान असतानाच ती मेलेली होती. प्रत्येक पिल्लाचे घरी येणे, त्याची आम्ही काळजी घेणे, त्याच्या घरातील वावराची आम्हाला सवय होणे आणि त्याच्या मृत्यूने घरास रिकामपण येणे, अवघड होत असे. आणखी मांजरे न पाळायचे आम्ही ठरवले होते. त्यामुळे आईने "नको रे! आता नाही पाळत आम्ही मांजरे!" असे सांगून टाकले. "काकू पिल्लू खूप छोटे आहे. आणि ते फारच  घाबरल्यासारखे दिसते आहे. त्याची आईही दिसत नाहीये कुठे! तुम्ही नाही पाळलेत तर कुठे जाईल ते?" मुले म्हणाली. एवढेसे पिल्लू, तसेच पार्किंगमध्ये राहू दिले तर कुत्री तरी मारतील नाहीतर गाडीखाली येऊन तरी मारेल. ही कल्पना सहन न होऊन "घेऊन या त्याला, बघू काय करायचे ते!", असे आई पोरांना म्हणाली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन पोरे लगेच पिल्लाला घरी घेऊन आली.
   थोड्याच वेळात हाताच्या ओंजळीत मावणारा, मिचमिच्या डोळ्यांचा, करड्या रंगाचा, 'फर'चा एक गोळा आमच्या दिवाणखान्यातल्या सोफ्याखाली स्थानापन्न झाला होता. मांजरी आहे पाहून आईने पिल्लाचे नाव सोनी ठेवले. सोनी १-२ दिवसात आमच्या घरात रुळली. दिवसभर जमिनीवर पडलेल्या छोट्या वस्तूंशी तसेच स्वतःच्याच शेपटीशी खेळणे,  घरभर धावपळ करणे असल्या कसरतींनी दमलेली सोनी रात्री आमच्या पायात किंवा उशाशी येऊन बसायची. तिथे बसून तिचे छोटे-मोठे चाळे चालूच असायचे. तरी आम्हाला ते हवेहवेसे वाटायचे. 
   मांजरांना सुकी मच्छी खाऊ घातली की ती मस्त गुटगुटीत राहतात असा कोणीतरी दिलेला सल्ला ऐकून आईने सोनीला मच्छी खाऊ घालायला सुरवात केली. सकाळी आणि संध्याकाळी ठराविक  वेळी सोनीला आम्ही मच्छी देत असू. तिलाही लवकरच हे लक्षात आले. सकाळी आणि दुपारी आई झोपून उठली की सोनी आरडा ओरडा करून "लवकर मच्छी  दे", अशी डिमांड करू लागली.
   सोनीला खाऊ पिऊ घालणे, तिच्याशी खेळणे सगळ्यांनाच हवेहवेसे वाटे. शाळेतून आल्या आल्या दप्तर जागेवर ठेऊन सोनी कुठेय ते शोधणे आणि तिच्याशी खेळणे हा आमच्या दैनंदिनीतला एक  महत्त्वाचा कार्यक्रम झाला होता. दोरीच्या टोकाला कागदाचा बोळा बांधून तो जमिनीवर सोडायचा आणि गाडीसारखे बोळा ओढत घरभर धावायचे. सोनी बोळा पकडायला मागे धावायची. आमची ही अशी पकडा  पकडी कित्येकदा चालू असायची. रात्री झोपण्याआधी आई-बाबा शतपावली करू लागले की त्यांच्या पायापायात करणे हा सोनीचा एक आवडता टाईमपास होता.
   इतर मांजरांप्रमाणेच कानामागे, गळ्याला खाजवलेले सोनीला  खूप आवडायचे.अंग चाटून पुसून स्वच्छ करायचे आणि कोवळ्या उन्हात जाऊन बसायचे हा तिचा आवडता कार्यक्रम दिवसातून २-३ वेळा होत असे. अंघोळ करायची, उन्ह खायचे आणि सोफ्यावर किंवा दिसेल त्याच्या मांडीत जाऊन झोपून जायचे! अभ्यास करताना सोनी जवळ बसलेली असली की छान वाटायचे, सोबत वाटायची. पण कधी कधी हात पाय ताणून देऊन मस्त झोप काढणऱ्या सोनीला पाहून तिचा फार हेवाही वाटायचा. "खायचे, प्यायचे, लाड करून घ्यायचे आणि झोपायचे, काय मस्त आयुष्य आहे,असे आयुष्य पाहिजे!" असे वाटायचे.
   मिचमिच्या डोळ्यांच्या त्या फरच्या गोळ्याचे काही महिन्यातच एका सुंदर, रुबाबदार मांजरीत रुपांतर झाले. काही काळाने तिला पिल्ले झाली. आमच्या कुटुंबात दोन मेम्बर्सची भर पडली. सोनी आणि तिच्या पिल्लांच्या तुम्हाला सांगाव्यात अशा अनेक आठवणी माझ्या माझ्या मनात रंग लावून उभ्या आहेत. तुमच्याशी त्या शेअर करण्यासाठी लवकरच मी पुढची पोस्ट लिहीन. तोवर अलविदा!  
(टीप:  Marley and Ме हे पुस्तक प्राणी आवडणाऱ्या लोकांनी जरूर वाचा. तुम्हाला नक्की आवडेल.)