Thursday, February 9, 2012

सोनी रीलोडेड

    आधीच्या पोस्टमध्ये सांगितल्यानुसार हाताच्या पंजावर मावणारी एवढीशी सोनी दिसामासाने अंग धरू लागली. काळ्या लोकरीच्या गुंड्या सारख्या दिसणाऱ्या तिच्या अंगावर हळू हळू सोनेरी, पांढऱ्या छटा दिसू लागल्या. सोनीच्या फरवरील केस इतर मांजरांच्या केसांहून जास्त मुलायम आणि लांब होते. शेपटी मस्त झुबकेदार होती. माझ्या मैत्रिणीकडे मांजरांचे एक कॅलेंडर होते. ते एकदा तिने दाखवले. त्यात डिट्टो  सोनीसारखी दिसणारी मांजर होती. त्यावरून सोनी अमेरिकन मांजरांच्या जातीतील होती असे कळले.
    सामान्यतः मांजरी जरा खत्रूड, माणसांच्या जास्त वाटेला न जाणाऱ्या आणि बोके प्रेमळ,  माणसांशी जास्त जवळीक ठेवणारे असे असतात. पण सोनीला आमचा सहवास आवडायचा. जेव्हा तिचे खेळणे संपायचे तेव्हा ती कोणाच्या तरी मांडीत जाऊन बसायची, नाहीतर पायापायात करत राहायची. आई सकाळी गच्चीत फेऱ्या मारायला जायची तेव्हा सोनीपण तिच्यासोबत जायची. किंबहुना आईची गच्चीवर जायची वेळ झाली आणि लोखंडी दार उघडताना कडी वाजली की  कडीचा आवाज ऐकून सोनी जिथे असेल तिथून धावत पळत यायची. दार उघडले की भराभरा पायऱ्या चढून गच्चीसमोर जाऊन बसायची. गच्चीचे दार उघडून आत पाऊल टाकेस्तोवर तर बाईसाहेब गच्चीच्या कठड्यावर जाऊन बसलेल्या असायच्या. मलाही गच्चीत अभ्यासाला जायला आवडायचे. अशा वेळी सोनी काही वेळ स्वतःशी खेळायची आणि दमली की मांडीवर येऊन बसायची. खेळणे आणि दमल्यावर मांडीवर येऊन बसणे  आलटून पालटून चालू राहायचे. 
    सुरवातीचे सोनीचे गच्चीवरचे खेळ म्हणजे छोटे छोटे किडे, फुलपाखरे ह्यांच्या मागे लागणे, त्यांना पकडून त्यांच्याशी खेळत बसणे आणि शेवटी ते खाणे. काही वेळा कठड्यावर किंवा टी. व्ही. च्या antenna वर बसलेल्या पक्ष्यांना पकडायचा प्रयत्नही  चालू असायचा. पण अजून नेम धरण्याचा तितकासा अंदाज नसल्याने त्यात तिला यश मिळायचे नाही. परंतु इतर पिल्लांना आईकडून मिळणारे शिकारीचे शिक्षण सोनीला न मिळताही तिने लवकरच त्यातही प्राविण्य मिळवले. इतर वेळी गळ्यातली मोत्याची माळ मिरवत फिरणारी गोंडस सोनी शिकार करू लागली की मात्र एकदम उग्र दिसायची. तोंडाने वेगवेगळे आवाज काढत, गुरकावत, डोळे शिकारीवर रोखून सोनी आधी दाबा धरायची आणि योग्य वेळ येताच भक्ष्यावर झेप घेऊन त्याला पायाशी लोळवायची.   
    लहान लहान म्हणता म्हणता सोनीने तारुण्यात कधी पदार्पण केले ते कळले नाही.दिसायला गोड, अंगावर असलेल्या लांब केसांच्या फरमुळे जराशी गुबगुबीत वाटणारी सोनी जवळपासच्या बोक्यांना 'सुबक, ठेंगणी..' ह्या जुन्या मराठी गाण्यात वर्णन केलेल्या तरुणीसारखी वाटत असणार ह्यात शंका नाही. आमच्या घराबाहेर नवनवीन बोक्यांच्या चकरा चालू  झाल्या. परिणाम? आमच्या घराची लोकसंख्या वाढली. सोनीचे बाळंतपण, त्या वेळचे तिचे नखरे, नंतर सोनीच्या पिल्लांचा घरातील वावर ह्यांनी आमच्या घराचे वातावरण आणखी बदलले. त्याविषयी पुढच्या पोस्टमध्ये गप्पा मारू. 
    (सोनीचा फोटो पुण्याच्या घरी असल्याने तो काही मी इथे पोस्ट करू शकत नाही. पण सोनीची छबी तुमच्या डोळ्यासमोर उभी राहावी म्हणून एक लिंक इथे देते आहे: http://pusscats.com/Siberian_Cats.htm. ह्या लिन्कवरचा फोटो आणि मांजरीचे वर्णन सोनीशी अगदी मिळते जुळते आहे. त्यावरून ती सायबेरीअन जातीची असायला हवी. पण आधी म्हणल्याप्रमाणे मैत्रिणीने लहानपणी दाखविलेल्या कॅलेंडरनुसार ती अमेरिकन जातीची होती अशी आमची समजूत झाली होती.  निष्कर्ष? काही नाही. शेवटी जातीत काय आहे? असे म्हणून सोडून देऊ.)




1 comment:

  1. manjaranche maansa sarkhe balantpana madhe nakhare astat he attach kalala mala!! :) interesting !

    ReplyDelete