Sunday, February 5, 2012

सोनी

   परवाच 'Marley and Me' वाचून झाले. मार्ली ह्या खोडकर, खट्याळ (मार्लीच्या मालकाच्या भाषेत वाया गेलेल्या) कुत्र्याची आणि त्याच्या मालकाची ही गोष्ट अतिशयच रंजक आहे. पुस्तक अतिशय वेधक होते, वाचताना मी मार्लीच्या गोष्टीत पूर्णपणे रंगून गेले. पण पुस्तक संपले आणि मन मार्लीतून बाहेर आले, सोनीच्या आठवणींत  शिरले. सोनी, माझी लाडकी मांजरी!
   संध्याकाळची वेळ होती. दाराची बेल वाजली. आईने दार उघडले. पाहते तर काय, दारासमोर बिल्डींगमधली समस्त बच्चेकंपनी हजर होती. "काकू काकू, पार्किंगमध्ये ना आम्हाला मांजराचे छोटेसे पिल्लू सापडले आहे. तुम्ही त्याला सांभाळाल?", डायलॉग पाठ केल्यासारखी एका सुरात पोरे म्हणाली.
    ह्याआधी मांजराची ३-४ छोटी पिल्ले आम्ही पाळली होती. पण कधी कुत्री मागे लागून, कधी काही आजाराच्या  निमित्ताने अशी अगदी लहान असतानाच ती मेलेली होती. प्रत्येक पिल्लाचे घरी येणे, त्याची आम्ही काळजी घेणे, त्याच्या घरातील वावराची आम्हाला सवय होणे आणि त्याच्या मृत्यूने घरास रिकामपण येणे, अवघड होत असे. आणखी मांजरे न पाळायचे आम्ही ठरवले होते. त्यामुळे आईने "नको रे! आता नाही पाळत आम्ही मांजरे!" असे सांगून टाकले. "काकू पिल्लू खूप छोटे आहे. आणि ते फारच  घाबरल्यासारखे दिसते आहे. त्याची आईही दिसत नाहीये कुठे! तुम्ही नाही पाळलेत तर कुठे जाईल ते?" मुले म्हणाली. एवढेसे पिल्लू, तसेच पार्किंगमध्ये राहू दिले तर कुत्री तरी मारतील नाहीतर गाडीखाली येऊन तरी मारेल. ही कल्पना सहन न होऊन "घेऊन या त्याला, बघू काय करायचे ते!", असे आई पोरांना म्हणाली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन पोरे लगेच पिल्लाला घरी घेऊन आली.
   थोड्याच वेळात हाताच्या ओंजळीत मावणारा, मिचमिच्या डोळ्यांचा, करड्या रंगाचा, 'फर'चा एक गोळा आमच्या दिवाणखान्यातल्या सोफ्याखाली स्थानापन्न झाला होता. मांजरी आहे पाहून आईने पिल्लाचे नाव सोनी ठेवले. सोनी १-२ दिवसात आमच्या घरात रुळली. दिवसभर जमिनीवर पडलेल्या छोट्या वस्तूंशी तसेच स्वतःच्याच शेपटीशी खेळणे,  घरभर धावपळ करणे असल्या कसरतींनी दमलेली सोनी रात्री आमच्या पायात किंवा उशाशी येऊन बसायची. तिथे बसून तिचे छोटे-मोठे चाळे चालूच असायचे. तरी आम्हाला ते हवेहवेसे वाटायचे. 
   मांजरांना सुकी मच्छी खाऊ घातली की ती मस्त गुटगुटीत राहतात असा कोणीतरी दिलेला सल्ला ऐकून आईने सोनीला मच्छी खाऊ घालायला सुरवात केली. सकाळी आणि संध्याकाळी ठराविक  वेळी सोनीला आम्ही मच्छी देत असू. तिलाही लवकरच हे लक्षात आले. सकाळी आणि दुपारी आई झोपून उठली की सोनी आरडा ओरडा करून "लवकर मच्छी  दे", अशी डिमांड करू लागली.
   सोनीला खाऊ पिऊ घालणे, तिच्याशी खेळणे सगळ्यांनाच हवेहवेसे वाटे. शाळेतून आल्या आल्या दप्तर जागेवर ठेऊन सोनी कुठेय ते शोधणे आणि तिच्याशी खेळणे हा आमच्या दैनंदिनीतला एक  महत्त्वाचा कार्यक्रम झाला होता. दोरीच्या टोकाला कागदाचा बोळा बांधून तो जमिनीवर सोडायचा आणि गाडीसारखे बोळा ओढत घरभर धावायचे. सोनी बोळा पकडायला मागे धावायची. आमची ही अशी पकडा  पकडी कित्येकदा चालू असायची. रात्री झोपण्याआधी आई-बाबा शतपावली करू लागले की त्यांच्या पायापायात करणे हा सोनीचा एक आवडता टाईमपास होता.
   इतर मांजरांप्रमाणेच कानामागे, गळ्याला खाजवलेले सोनीला  खूप आवडायचे.अंग चाटून पुसून स्वच्छ करायचे आणि कोवळ्या उन्हात जाऊन बसायचे हा तिचा आवडता कार्यक्रम दिवसातून २-३ वेळा होत असे. अंघोळ करायची, उन्ह खायचे आणि सोफ्यावर किंवा दिसेल त्याच्या मांडीत जाऊन झोपून जायचे! अभ्यास करताना सोनी जवळ बसलेली असली की छान वाटायचे, सोबत वाटायची. पण कधी कधी हात पाय ताणून देऊन मस्त झोप काढणऱ्या सोनीला पाहून तिचा फार हेवाही वाटायचा. "खायचे, प्यायचे, लाड करून घ्यायचे आणि झोपायचे, काय मस्त आयुष्य आहे,असे आयुष्य पाहिजे!" असे वाटायचे.
   मिचमिच्या डोळ्यांच्या त्या फरच्या गोळ्याचे काही महिन्यातच एका सुंदर, रुबाबदार मांजरीत रुपांतर झाले. काही काळाने तिला पिल्ले झाली. आमच्या कुटुंबात दोन मेम्बर्सची भर पडली. सोनी आणि तिच्या पिल्लांच्या तुम्हाला सांगाव्यात अशा अनेक आठवणी माझ्या माझ्या मनात रंग लावून उभ्या आहेत. तुमच्याशी त्या शेअर करण्यासाठी लवकरच मी पुढची पोस्ट लिहीन. तोवर अलविदा!  
(टीप:  Marley and Ме हे पुस्तक प्राणी आवडणाऱ्या लोकांनी जरूर वाचा. तुम्हाला नक्की आवडेल.)

No comments:

Post a Comment