मागील पोस्टमध्ये म्हटल्यानुसार सोनीने तारुण्यात पदार्पण केले आणि आमच्या घरासमोर बोक्यांच्या फेऱ्या चालू झाल्या. दिवसभर आमच्या मागे मागे करणारी सोनी घराबाहेर जास्त वेळ रमू लागली. काही काळातच सोनीच्या हालचालीत एकप्रकारचा मंदपणा जाणवू लागला. पण आमच्याकडे आधी सगळे बोके होते आणि ही पहिलीच मांजरी. त्यामुळे एवढ्याशा बदलावरून तिला पिल्ले होणार आहेत हे समजण्याइतके आम्ही एक्स्पर्ट झालेले नव्हतो. काही दिवसांनी तिचे पोट मोठे दिसू लागले आणि ती जास्त लाडे लाडे वागू लागली तेव्हा मात्र तिला पिल्ले होणार ह्याची खात्री झाली.
एवढेसे पिल्लू असल्यापासून सांभाळ केलेल्या आपल्या पोरीसारख्या मांजरीचे बाळंतपण म्हणजे तिचे किती लाड करू आणि किती नको असे आमच्या आईसाहेबांना झाले. तिच्या खाण्यापिण्याची आणखी काळजी घेतली जाऊ लागली. खिरीचा खुराक सुरु झाला. एकदा आमच्या घरी पाहुणे आले होते. तेव्हा आई मांजर गरोदर आहे म्हणून तिला खीर खाऊ घालतीये हे पाहून त्यांना केवढे आश्चर्य वाटले होते ते मला अजूनही आठवतेय! आधीच लाडोबा असलेल्या सोनीला आपले अजून लाड होतायत हे पाहून आणखीनच लाडे लाडे वागण्याची संधी मिळाली. आपल्याला कसेही वागले तरी कोणी फटके मारत नाही हे तिला चांगलेच कळले.
एवढेसे पिल्लू असल्यापासून सांभाळ केलेल्या आपल्या पोरीसारख्या मांजरीचे बाळंतपण म्हणजे तिचे किती लाड करू आणि किती नको असे आमच्या आईसाहेबांना झाले. तिच्या खाण्यापिण्याची आणखी काळजी घेतली जाऊ लागली. खिरीचा खुराक सुरु झाला. एकदा आमच्या घरी पाहुणे आले होते. तेव्हा आई मांजर गरोदर आहे म्हणून तिला खीर खाऊ घालतीये हे पाहून त्यांना केवढे आश्चर्य वाटले होते ते मला अजूनही आठवतेय! आधीच लाडोबा असलेल्या सोनीला आपले अजून लाड होतायत हे पाहून आणखीनच लाडे लाडे वागण्याची संधी मिळाली. आपल्याला कसेही वागले तरी कोणी फटके मारत नाही हे तिला चांगलेच कळले.
जसजशी पिल्ले व्हायची वेळ जवळ आली तसतशी सोनीची पिल्ले घालण्यासाठीच्या जागेची शोध मोहीम सुरु झाली. काही फार संशयी वृत्तीच्या मांजरी पिल्ले कुठल्यातरी अडगळीच्या ठिकाणी घालतात जेणेकरून पिल्ले कोणाच्या हाती सहज सहजी लागत नाहीत. पण सोनीचा तसा काही विचार दिसला नाही. आमच्या घरात अडगळ अशी नव्हतीच त्यामुळे तिने त्यातल्या त्यात जागेचा शोध सुरु केला. दिवाणाचे दार, किंवा कपाटांची दारे उघडी दिसली की सोनी आत जाऊन बसायची. थोड्या वेळ त्या जागेचा 'फील' घेऊन बघायची. 'पिल्ले इथे सुरक्षित राहू शकतील का?' ह्याचे बहुधा ती आडाखे बांधत असावी. थोडा वेळ झाला की आपल्या आपण बाहेर पडायची. कपाटाची तपासणी करायला मात्र तिला थोडा जास्त वेळ लागायचा. प्रत्येक कप्प्यात जाऊन निरीक्षणे करणे म्हणजे केवढे मोठे काम! सोनीची स्वारी कपड्यांच्या कप्प्याच्या दिशेने जाऊ लागली की मात्र आम्ही तिला बाहेर काढून कपाट लावून घ्यायचो.
म्हणता म्हणता पिल्ले होण्याचा दिवस आला. सोनी बेचैन दिसत होती. अधून मधून वेगवेगळ्या तर्हेचे आवाज काढत होती. आईच्या जवळ जवळ राहण्याचा प्रयत्न करत होती. तिचे हे वागणे पाहून आईला तिला लवकरच पिल्ले होणार आहेत ह्याची कल्पना आली. सोनीला काही सुचत नव्हते. एका जागी बसत नव्हती, जणू काही पिल्ले घालण्याच्या जागेच्या केलेल्या तपासाची सगळी कन्क्लुजंस ती विसरून गेली होती. त्यामुळे कुठे पिल्ले घालावीत हे तिला सुचत नव्हते. शेवटी ही अशीच फिरत राहिली तर भलतीकडेच पिल्ले घातली जातील ह्या काळजीने आईने दिवाणाच्या एका कप्प्यात मोकळी जागा केली, त्यात जुनी सुती साडी पांघरून ठेवली आणि सोनीला त्यावर बसवले. तिने जास्त हालचाल करू नये म्हणून अधून मधून तिच्या जवळ जाऊन आई तिला कुरवाळत राहिली. काही वेळाने सोनीला दोन पिल्ले झाली.
शिकारीत पैकीच्या पैकी मार्क मिळवणारी सोनी मुलांचे संगोपन ह्या विषयात मात्र अगदी ढ होती. अगदी १० पैकी २ मार्क्स देऊन नापास करावे इतकी ढ! पिल्ले जन्माला घातल्यावर मांजरी लगेच त्यांना स्वच्छ करतात. पिल्ले घातलेल्या जागी अगदी कसलाही नामोनिशाण उरत नाही इतका उरक त्यांच्यात असतो. पण आमची सोनी, पिल्ले जन्माला घालण्याच्या प्रोसेसमध्येच थकलेली. काही वेळ गेल्यावर तिला पिल्लांकडे पहायचे सुचले. बाकीचे सोपस्कार आईनेच पार पाडले.
अर्थात हा सगळा एपिसोड मी शाळेत असताना झाला आणि आईने मला तो नंतर सांगितला. मी पाहिली तेव्हा मला दिसली दोन छोटीशी पिल्ले, अगदी बोटाच्या लांबीएवढी छोटी. एक सोनीच्याच रंगाचे आणि एक सोनेरी! मिटलेले डोळे आणि इवलेसे शिम्पल्यासारखे कान. त्यांना पाहून आपल्याला छोटी छोटी भाचरंडे झाल्यासारखे वाटले. येता जाता सारखे 'पिल्ले काय करतायत? डोळे उघडले का? चालायला लागली का?' इत्यादीचे निरीक्षण करण्याची सवय लागली. पिल्लांच्या गंमती-जंमती पाहण्यात किती वेळ जायचा ते समजायचे नाही.
पिल्लांचे नामकरण, त्यांचे बालपण इत्यादीबद्दल गप्पा मारू पुढच्या पोस्टमध्ये. तोवर सायोनारा!
mast lihile ahes mugdha....kadachit me sonila pahile pan ahe class la yayche tevha....
ReplyDelete