Monday, September 19, 2011

पॉँडिचेरी-महाबलीपुरम ट्रीप

पॉँडिचेरीला जायचे आमचे तसे अचानकच ठरले. एका मित्राने "पुढे दोन दिवस सुट्टी आहे तर कुठे फिरायला जायचे का?" असे विचारले. "जायला हरकत नाही पण कुठे जायचे? आणि पुढे लॉंग वीकेंड असताना राहण्याची आणि फिरायला गाडीची सोय होईल का?" हे प्रश्न अगदी ओघानेच आले. "पाहू..झाली सोय तर जाऊ... पटापट ठिकाणे सुचव बरे.."- मित्र म्हणाला. दुसऱ्या दिवशीच निघायचे असल्याने ह्यावेळी वेगवेगळ्या जागांचा नेटवरून अभ्यास करून ठिकाण निवडत बसण्याइतका वेळ नव्हता.
"कशाप्रकारच्या ठिकाणी जायचेय? हिल-स्टेशन, समुद्र-किनारा, ..?" 
"मम... समुद्र किनार्यावर जाऊ.."
"मग मंगलोर, कोझिकोड, पॉँडिचेरी, ...?" (जी ठिकाणे तोंडाला आली ती सांगितली.)
"पॉँडिचेरी छान आहे म्हणे."
"ठीक आहे! राहण्याची आणि गाडीची सोय होतीये का पाहूया ते नाहीतर दुसरे काहीतरी शोधूया!"
संवाद रॅपिड फायरसारखे झाडले जात होते. नेटवर हॉटेलची शोधाशोध सुरु झाली. एका हॉटेलमध्ये सोय होतीये म्हणल्यावर ड्रायवरची चौकशी करायला सुरवात केली. आधी ओळखीच्या ड्रायवऱ्सशी कॉन्टॅक्ट होत नव्हता.
 बरेच प्रयत्न केल्यावर एक ड्रायवर सापडला.तोवर पाहून ठेवलेल्या हॉटेलच्या रूम्स संपल्या असे कळले. मग परत दुसरे हॉटेल शोधले. तोवर सापडलेला ड्रायवर एंगेज झाला होता. शेवटी एकदा हॉटेल, एकदा ड्रायवर, एकदा हॉटेल, एकदा ड्रायवर असे हो, नाही, हो, नाही होत संध्याकाळी ७ वाजता दोन्ही गोष्टी फायनलाईझ झाल्या. रात्री १० ला निघायचे ठरले होते. प्रवासाची तयारी, जेवण-खाण वगरे पटापट आवरले आणि गाडीत बसलो. आम्ही एकूण ३ जोडपी होतो. हसत-खेळत गप्पा मारत प्रवास सुरु झाला. पाहता पाहता तमिळनाडूची बॉर्डर आली. तिकडे टोल आणि इतर कामे करायला ड्रायवर गाडीतून उतरला. परत येऊन म्हणे "तिथे कंप्यूटरमध्ये काहीतरी बिघाड आहे, अर्धा तास लागेल दुरुस्त व्हायला,  तोवर मी झोपतो",  अन सरळ झोपून गेला. "असेल बुवा खरच" असा विचार करून महाशय उठेस्तोवर आम्ही जवळच्या टपरीवरुन  गरमा गरम चहा घेतला, थोडा टाईमपास केला. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, महाशय उठायची चिन्हे दिसेनात. अजून ५ मिनिटे वाट पाहून आम्ही उठवले तेव्हा २ मिनिटांत जावून ते कागद-पत्रे घेऊन आले. प्रवास परत सुरु झाला. २-३ तास झाले तशी ड्रायवर साहेब म्हणाले की ते २ दिवस झोपलेले नाहीत तेव्हा गाडी चालवणे त्यांना जमत नाहीये आणि ते अर्धा तास झोप घेऊ इच्छितात. आता आम्ही काय म्हणणार ह्यावर! झोपच येतीये म्हणल्यावर काय करणार. तशा अवस्थेत त्याने गाडी चालवणे आमच्या दृष्टीने धोकादायक होते. "झोप" म्हणालो आणि परत टाईमपास करत बसलो. अर्धा तास झाला- एक तास झाला महाराज उठायची चिन्हे दिसेनात तेव्हा बऱ्याच प्रयत्नांनी आम्ही त्याला उठवले. प्रवास परत सुरु झाला (असे वाटले). रस्त्याची परिस्थिती फार वाईट होती. अगदी डोके जागेवर असणाऱ्या माणसालाही गाडी चालवणे अवघड होते. ड्रायवर महाशय झोपेच्या नशेत! गाडी ५ मिनिटे चालली नसेल तो परत मध्येच थांबवत म्हणाले "नाही नाही...मला जमत नाहीये आत्ता गाडी चालवायला, मी झोपतो..."  आणि झोपले . पुढचे २ तास ड्रायवर झोपलेला आणि आम्ही अधून मधून डुलक्या खातोय, कसे बसे जागे राहण्याचा प्रयत्न करतोय अशा अवस्थेत गेले. हे रामायण घडता घडताच सकाळचे ५ वाजले. ५ वाजता मात्र ड्रायवरला परत उठवले. म्हणाला मला अजूनही झोप येतीये. आता मात्र आम्ही चिडलो. त्याला जाऊन तोंडावर पाणी मारून, चहा पिऊन यायला सांगितले आणि आम्हाला लवकर पॉँडिचेरीला पोहोचवायची धमकी दिली. ड्रायवर फ्रेश होऊन आल्यावर आमचा प्रवास परत सुरु झाला. ८.३०-९ च्या सुमारास आम्ही पॉँडिचेरीला पोहोचलो. हॉटेलवर जाऊन आवरले, नाश्ता केला आणि आता फिरायला जाणार एवढ्यात ड्रायवर साहेब गायब असल्याचे दिसले! फोनच उचलेनात. महत्कष्टांनी त्यांना शोधून काढल्यावर शेवटी आम्ही फिरायला निघालो. 
सगळ्यात आधी आम्ही गेलो Chunnambar Boat House ला. बोट हाउसहून बॅकवॉटरचे मनोरम दृष्य नजरेस पडते. निळे आकाश, हिरवीगार झाडे अन निळेशार पाणी...डोळ्यांना मेजवानीच.
 बोट हाउसला वॉटर स्पोर्टस, खाणे-पिणे, खेळणे ह्यांची सोय आहे. बॅकवॉटरमधून बोटीने पॅराडाईझ बीचला जाता येते. बोटीतून जाताना चारीही दिशांना छान दृश्य दिसते. बोट हाउसहून किनार्यावर पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो. समुद्र किनारा फारच छान , स्वच्छ आहे. आम्ही बराच वेळ समुद्रात खेळलो. परत नावेत बसून बोट हाउसला आलो.
        संध्याकाळ झाली होती. ऑरोबिंदाश्रमात जाऊन आलो. जवळच समुद्र होता. समुद्र पाहून मला मरीन ड्राईव्हची आठवण झाली. रस्ता, त्याला जोडून फुटपाथ, मग दगडांनी भरलेला किनारा अन अथांग समुद्र. फरक एवढाच की मरीन ड्राईव्हचा किनारा उंचच उंच इमारती, दिव्यांचा झगमगाट ह्यांना मिरवणारा, दिमाखदार तर इथला समुद्र साधा तरीही सुंदर! 
 अंधार पडू लागला तशी हॉटेलवर परत आलो ,जेवलो, दुसर्या दिवशीचे प्लानिंग केले आणि झोपून गेलो.
 तशा पॉँडिचेरीमध्ये पाहण्यासारख्या ऑरोविले, म्युझिअम, बोटॅनिकल गार्डन, काही मंदिरे इत्यादी बऱ्याच जागा आहेत. पण पॉँडिचेरीहून सुमारे ८० की.मी. वर असणारे महाबलीपुरमही छान आहे असे ऐकलेले होते. त्यामुळे दुसर्या दिवशी महाबलीपुरमला जायचे ठरवले. सकाळी ८ ला हॉटेल सोडले. पॉँडिचेरी ते महाबलीपुरम रस्ता फार सुंदर होता. अधून-मधून दिसणारी समुद्राची खाडी फारच सुंदर दिसत होती. दिल चाहता है, कैसी है ये ऋत की जिस मी, देखा ना हाय रे सोचा ना इत्यादी टिपिकल  पिकनिक मूडची गाणी म्हणत म्हणत महाबलीपुरमला कधी पोचलो तेच कळले नाही. 
महाबलीपुरम हा एक awesome अनुभव होता. आमची गाडी आधी थांबली ती लेण्यांजवळ. ह्या लेण्या बऱ्याच मोठ्या परिसरात पसरलेल्या आहेत. 

लेण्यांमध्ये वेगवेगळे ऐतिहासिक प्रसंग चितारलेले आहेत. सुरेख असे कोरीव काम मन मोहून टाकते.

लेण्यांच्या बाजूने समुद्राचे मोहक दर्शन घडते. थोडे पुढे जाऊन लाईट-हाउस लागते.  

 लाईट-हाउसच्या पायथ्याहून दिसणारे दृष्य अप्रतिम होते. त्या दिवशी तरी लाईट-हाउसवरती जाऊ देत नव्हते.पण पायथ्याहूनच दिसणारा देखावा इतका छान होता की वरून तर फार फार अप्रतिम दृष्य दिसत असावे एवढे नक्की!

लेण्यांहून निघून पुढे आम्ही समुद्र किनार्यावर गेलो...समुद्राच्या काठी सुंदर असे देऊळ आहे. समुद्राच्या पार्श्वभूमीवर छोटेसे दगडी देऊळ, त्याच्याभोवती नक्षीदार दगडी कुंपण हा एक वेगळा अनुभव होता.
त्या दिवशीसमुद्रात खेळायची इच्छा नाही झाली. दूरवर नजर टाकावी तिथे निळे पाणी, पाण्यातून अलगद डोके वर काढलेले निळे आकाश, समुद्राच्या सामर्थ्याची झलक देणाऱ्या, गरजत येणाऱ्या उसळत्या लाटा. लाटांकडे पाहून पांढऱ्या शुभ्र, तगड्या घोड्यांची फौजच कोणावर चाल करून जात आहे की काय असे वाटत होते. निसर्गाच्या ह्या आगळ्या-वेगळ्या अवताराला निरखत न्याहाळत हळू हळू किनार्यावरून चालायला सुरवात केली. गर्दीपासून दूर अशा ठिकाणी जाऊन बसलो. तपकिरी रेती, शंख-शिंपले, आपापल्या उद्योगात मग्न असलेले खेकडे, त्यांच्या चालण्याने रेतीवर तयार झालेली नक्षी, दूरवर दिसणारी हळू हळू ठिपक्यात परिवर्तीत झालेली एखादी नाव, समुद्राकडे पाहून जोर-जोरात ओरडत बसलेला कावळा, किती गोष्टी होत्या रमून जाण्यासारख्या. एका खेकड्याला च्या मागे मागे नजर परत समुद्रावर गेली. समुद्राच्या लाटांकडे पाहताना सावरकरांच्या 'सागरास' मधल्या ओळी हळू हळू नजरेतून मनात उतरू लागल्या.  
भू मातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता...
ह्या फेनमिषे हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा...
त्या लाटांच्या हालचालींना, त्यांवर येणाऱ्या फेसाला सावरकरांनी किती वेगळा अर्थ दिलाय.
'सागरास' मधील प्रत्येक ओळ त्यादिवशी समुद्रकिनार्यावर बसून मी अनुभवली. डोळ्यांतून पाणी आले. केवढे हे देशप्रेम, स्वदेशी परत जाण्याची केवढी ही तळमळ, आणि ती व्यक्त करण्याचा किती प्रभावी प्रयत्न. इंग्रजांविरुद्ध कडवी झुंज देणाऱ्या, अंदमानच्या तुरुंगात काळ्या-पाण्याच्या शिक्षेला निडरपणाने सामोर्या जाणार्या ह्या वीराचे तेच कणखर मन मातृभूमीच्या विरहाने  एवढे हळवे झालेले दिसते. सावरकरांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाबद्दल वाटणारे आश्चर्य, आदर मनात मावत नव्हता. विचार इथेच थांबले असते तर बरे झाले असते. पण देशासाठी संपूर्ण आयुष्याचे बलिदान देणाऱ्या ह्या माणसाची भारत मातेने काय किंमत केली ह्या विचारांनी मन खिन्न झाले. 
समुद्राहून निघून, जेवून चारच्या सुमारास महाबलीपुरम सोडले. भेंड्यांचा कार्यक्रम सुरु झाला. ३-४ तास सलग भेंड्या खेळत होतो. हसत-खेळत मजेत प्रवास चालला होता. १० च्या सुमारास गाडी धक्के खात खात रस्त्यात थांबली. गाडीतले पेट्रोल संपल्याची घोषणा ड्रायवर महाशयांनी  केली. कमाल माणूस होता तो! प्रवासात पेट्रोल पूर्णपणे संपून गाडी थांबेपर्यंत ह्या ड्रायवरला कळलेच नाही ही कल्पनाच मोठी आश्चर्यकारक होती! ड्रायवर महाशय गाडीतून उतरले. पुढे जाऊन पंप मारून थोडे पेट्रोल चढवले. गाडी २ मिनिटे चालून परत थांबली. जवळ पास एक चिटपाखरुही दिसत नव्हते. परत पंप मारला, परत गाडी थोडी पुढे जाऊन कुरकुरत थांबली असे ४-५ वेळा झाल्यावर शेवटी एक पेट्रोल पंप दिसला आणि आम्हाला हुश्श वाटले. कॅनमधून थोडेसे पेट्रोल आणून गाडीत भरले. समाधानाचा निश्वास टाकत गाडी पुढे निघाली. ह्या सगळ्या गोंधळात जेवण झालेच नव्हते. पुढे एक छोटे शहर लागले. जेवणासाठी हॉटेल मिळते का पाहू लागलो. खूप शोधल्यावर एक हॉटेल मिळाले. तिथे जे काही उरले-सुरलेले मिळाले ते जेवलो. पेट्रोल भरले. गाडीचे पोट भरल्यावर गाडीला तरतरी आली आणि ती सुसाट निघाली. आमच्या पोटोबाची पूजा झाल्याने आम्हाला पेंग यायला लागली. कसे-बसे डोळे उघडे ठेवत, जागे राहण्याचा प्रयत्न करत आणखी काही वेळ गेला आणि अजून काही आश्चर्यकारक घटना न घडता आम्ही बंगलोरला आलो. 
ही ट्रीप आत्तापर्यंतच्या ट्रिप्स मधली सगळ्यात कमी प्लानिंग केलेली अशी ट्रीप होती. मजा आली, पण पॉँडिचेरी, महाबलीपुरम मध्ये बघण्यासारख्या, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा इतरही जागा आहेत त्या पाहता आल्या नाहीत. ह्या जागा पाहण्यासाठी, आणि ह्या ट्रीपमध्ये पाहिलेल्या जागांविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी अजून एकदा पॉँडिचेरी-महाबलीपुरमला भेट द्यायला मला नक्की आवडेल. 
(Photography: Abhijeet)  



Sunday, June 12, 2011

शांत, सुंदर कूर्ग



कूर्गची तारीफ लोकांकडून पुष्कळदा ऐकली होती. २-३ वेळा जायचे बर्यापैकी नक्कीही केले होते. पण काही ना काही कारणाने दरवेळी कुर्गची ट्रीप रद्द होत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत अभिजीतचे आई-बाबा यायचे ठरले. आता मात्र नक्की जायचेच असे ठरवले. मॅजेस्टिक, बंगलोरहून कुर्गला बऱ्याच गाड्या असतात असे कळले. संदीपकडून 'अपना घर' ह्या होमे-स्टेची माहिती मिळाली होती. लगोलग बुकिंग्स करून टाकली.
शुक्रवारी रात्री ११च्या गाडीने कुर्गला निघालो. तिथे पहाटे ४.३० ला पोहोचलो. होमे-स्टेतर्फेच बस-स्टॅंडहून कॉम्प्लिमेंटरी पिक-अप, ड्रॉपची सोय होती. होमे-स्टेचा मालक रशीन ह्याला फोन लावला. १५ मिनिटात तो घ्यायला आला. होमे-स्टेवर जावून थोडा आराम केला. रशीननेच साईट-सीइंगसाठी गाडीची सोय आणि प्लानिंग करून दिले. नाश्त्याला गरमा-गरम पुट्टू, सांभार आणि कॉफी असा बेत होता. पुट्टू आम्ही वायनाड ट्रीपमध्येही खाल्ले होते. तांदळाचा हा पदार्थ सांभारसोबत भारी लागतो.


कॉफीही मस्तच होती. पोटोबाची पूजा सकाळी सकाळी आटोपल्यावर फिरायला बाहेर पडलो.
पहिली जागा होती Bhagamandala (मला इथल्या जागांच्या नावांचे उच्चार कधीच समजत नाहीत, त्यामुळे इंग्लीशमधूनच लिहिते). इथे कावेरी, सुज्योती आणि कनिके ह्या नद्यांचा संगम होतो. शिवाय इथे Bhagundeshwara Kshetra हे मंदिरही आहे. मंदिराच्या आवारात मुख्य देवळासोबत इतर छोटी छोटी ५-६ देवळे आहेत. देउळ दगडी आहे. आजूबाजूचा निसर्गही रम्य आहे. थोडा वेळ तिथे घालवून पुढे निघालो.


पुढचे ठिकाण होते तलकावेरी. ब्रह्मगिरी पर्वतात वसलेले असे हे ठिकाण. इथे कावेरी नदी उगम पावते. छोट्या झर्याच्या रुपात इथे जन्मास आलेली कावेरी लगेचच भूमिगत होऊन काही अंतरावर आपल्या डौलदार रुपात पुन्हा प्रकटते. ह्या जागेला विशेष धार्मिक   महत्त्व आहे. शंकराचे आणि गणपतीचे देउळ आहे. देवळाच्या बाजूने ब्रह्मगिरी पर्वताचे मोहक सौष्टव नजरेस येते. डावीकडे दरी. हिरव्यागार झाडांनी नटलेली, धुक्याची शाल ल्यालेली.


कितीतरी वेळ ह्या सौंदर्याला डोळ्यात साठवत राहिलो. पुढे सुमारे ४०० पायऱ्या वरती जाताना दिसल्या. एक-एक पायरी चढत जेव्हा वरती पोहोचलो तेव्हा एका क्षणात अंगाला आलेला क्षीण नाहीसा झाला. आम्ही ब्रह्मगिरीच्या शिखरावर होतो. चारीही दिशांनी दरी...पायथ्याच्या गावांचे मनोरम दृश्य. छोटी घरे, शेते...पलीकडे आणखी काही पर्वत. हिरवीगार जमीन. एके ठिकाणी पर्वताच्या सावलीने लीफ ग्रीन कलरचा पॅच निर्माण झाला  होता. सूर्याच्या किरणांमुळे त्याच्या मधोमध लिरील ग्रीन कलरचा आणखी एक पॅच तयार झाला होता. फारच सुरेख दृश्य होते ते. ढगात बसलोय की काय असे वाटत होते. 


काही वेळ तिथे घालवून खाली आलो. गरमा-गरम चहा प्यायला आणि पुढच्या प्रवासाला निघालो.  
पुढची जागा होती Abbi Falls. ह्या धबधब्याकडे जाणारा रस्ता एका खासगी कॉफीच्या प्लांटेशनमधून जातो. पायऱ्या उतरत खाली जाताना  आपल्या डोळ्यांना काय आनंद मिळणार आहे ह्याची पूर्ण कल्पना येत नाही. धबधबा जसा जसा जवळ येतो तसा तसा आपल्या आवाजाने आपले अस्तित्त्व जाणवून देऊ लागतो. पहिल्यांदा नजरेस पडतो तो झुलता पूल. ह्या पुलावर उभे राहून धबधब्याचे सौंदर्य न्याहाळत बसण्याचा आनंदच अवर्णनीय. समोर मोठीच्या मोठी खडकाची भिंत न तिच्या टोकावरून कोसळत खाली येणारा धबधबा. मुख्य म्हणजे धबधब्याच्या तिन्ही बाजूंना रेलिंग घातल्याने लोक दारू पिऊन धिंगाणा इथे घालून शकत नाहीत त्यामुळे निसर्गप्रेमींना येथील मनोरम दृश्याचा पुरेपूर आस्वाद घेता येतो. रस्त्यापासून दूर अशा ह्या ठिकाणी धबधब्याचा आवाजही अगदी वेगळ्या प्रकारचा अनुभव देऊन जातो. निसर्ग म्हणत असावा अशी काही काहीच तर ठिकाणे आहेत जिथे मी मोकळेपणाने बोलू शकतो आणि माझे शब्द माणसांपर्यंत पोचू शकतात. खरच हा धबधबा आपल्याशी काहीतरी बोलत आहे असे वाटते. त्याचे रूप डोळ्यात साठवत आणि आवाज कानांमध्ये ऐकत तिथेच बसून राहावे असे वाटले.


थोड्या वेळाने मन भानावर आल्यावर पुढे जायला हवेय ह्याची जाणीव झाली. परत निघालो. वर जावून ताक, तिखट लावलेली कैरी खाल्ल्यावर सिंहगडाची आठवण झाली. नॉस्टॅल्जिक वाटले.   शेवटी ''जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी|". असो. तिथून निघालो आणि 'Raja's Sit' नावाच्या ठिकाणी गेलो. इथे एक बाग होती. बागेतून आणखी आत गेल्यावर दरीचा व्ह्यू होता. थोडावेळ तिथे बसलो. ढगांनी पावसाचे काही थेंब सांडून 'चला घरी जा बरे' असे शांत आवाजात सांगितले. जोरात पाऊस पडून त्यांनी हाकलण्याची आणखी पुढची स्टेप घेण्याआधी आम्हीच तिथून पळ काढला.रूमवर परत आल्यावर रशीनने गरमा-गरम कॉफी दिली. मग आराम करून जेऊन आलो. पत्ते खेळले. झोपून गेलो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ला निघायचे होते. नाश्त्यात गरमा-गरम इडली-सांभार-कॉफी होते. त्यावर तव मारून निघालो ते एलिफंट कॅम्पकडे. गाडीतून जाताना जे दृश्य दिसत होते ते अप्रतिम होते. पावसाळी हवा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्यागार बागा कॉफीच्या, नारळाच्या, आंब्याच्या, निलगिरीच्या न आणखीही ना माहिती असलेल्या कसल्या कसल्या झाडांच्या. काही काही बागांमधली झाडे तर इतकी उंच होती की जणू काही त्यांच्यात आभाळाला टेकण्यासाठी शर्यत लागली होती. ह्याच बागांमध्ये क्वचित दिसणाऱ्या केळीच्या झाडांच्या झावळ्याही जमिनीकडे झुकलेल्या नव्हत्या...त्याही ताठ होत्या. असे वाटत होते की जणू ही झाडे हात उंचावून इतर उंच झाडांना म्हणत आहेत की 'आम्हालाही कडेवर घेऊन आभाळाला हात लावू द्या की...' असे रम्य दृष्य पाहता पाहता एलिफंट कॅम्प कधी आले तेच कळले नाही. 
एलिफंट कॅम्प हे एक नदी ओलांडून पलीकडे आहे. ९.३०-११ ह्या वेळामध्ये हत्तींना नदीच्या किनार्याशी आणून त्यांना अंघोळ घालणे, मग त्यांना खाऊ पिऊ घालणे इत्यादी कार्यक्रम केले जातात. २० रुपयात बोटने नदी पार करून हा सगळा कार्यक्रम पाहण्याची सोय फॉरेस्ट डीपार्टमेंटने लोकांना करून दिली आहे. जर हत्तीला अंघोळ घालायची असले किंवा स्वतः खाऊ घालायचे असेल तर आणखी पैसे भरून तिकीट घेता येते. 


बोटने पलीकडे गेलो. हत्तींचे शांतपणे निरीक्षण करता येईल अशी मोक्याची जागा शोधून बसलो. कॅम्पची लोक एकेक करून हत्तींना अंघोळ घालायला आणत होते. हत्तींचे चालणे, वागणे ह्यावरून हत्तींचे वय लक्षात येत होते. सगळ्यात मोठे हत्ती शांतपणे येऊन किनार्यावर पडायचे. त्यांना अंघोळ घातली की माहुताच्या आदेशाप्रमाणे निघून जायचे. थोडे मध्यमवयीन हत्ती स्वतःला वाटले तर सोंडेने अंगावर पाणी घेत होते. एक हत्तीचे पिल्लूही तिथे होते. बाकीच्या हत्तींना साखळदंड बांधलेले होते. हे पिल्लू लहान असल्याने पाहिजे ते करायला मोकळे होते.


 ते आले, पळत पळत पाण्यात शिरले. पाण्यात वेगवेगळ्या हालचाली करून मजा करू लागले. मग त्याचा कंटाळा आल्यावरइतर हत्तींना त्रास देणे त्याने सुरु केले. ह्याला धक्का दे, त्याच्या पायाशी खेळ असे खूप वेळ केल्यावर मात्र माहुताने पाठीवर एक फटका मारला. 'आता आपली जाण्याची वेळ झाली' हे पिल्लाला समजले. नाखुशीनेच आपल्या आईच्या मागे मागे जाऊ लागले. चढ आल्यावर मात्र पिल्लाला काय करावे ते कळेना. तेव्हा पाय गुडघ्यात वाकवून सोंडेचा आधार घेऊन, अडखळत कडे बसे ते चढले. ५ मिनिटांपूर्वीच अंघोळ करून स्वच्छ झालेले पिल्लू परत मळले.


पुढचा कार्यक्रम होता हत्तींच्या नाश्त्याचा. कॅम्पच्या लोकांनी त्यांना भरवायला नाचणीचे गोळे केले होते. २-२ गोळे हे लोक हत्तीच्या तोंडात भरवत होते. एक गोळा लागलीच तोंडात टाकून, न दुसरा गोळा सोंडेत झेलून हत्तींची खादाडी सुरु झाली. पुढे हत्तींची सगळी माहिती तिथल्या माणसांनी दिली. कॅम्पला तशी मजा आली. पण अंकुशाकडे पाहून मला फार वाईट वाटले. हत्तींना वठणीवर आणण्यासाठी माहूत अंकुश आणि पायाचा वापर करतात. पायाने कानावर टोचून टोचून हत्तीला सूचना देतात. अंकुशाच्या काठीने डोक्यावर मारतात. टोकदार अंकुश डोक्याला टोचतात. त्या हत्तींना सारखे तसे करून दिखात नसेल काय? आपल्याला कोणी असे केले असते तर? केवळ बुद्धी कमी म्हणून तो विशालकाय हत्ती माणसाच्या मुठीत राहतो.   
एका माणसाने दुसर्या माणसाला अशा प्रकारे वागवले तर ती गुलामगिरी न माणसाने प्राण्यांना असे वागवले तर त्याला काय म्हणायचे? असे विचार मनात चालू असताना नजर वेधली ती पलीकडच्या सुरेख दृश्याने. मस्त हिरवळ, भरपूर झाडे, त्यांमधली काही गुलमोहोराची होती..हिरवा आणि केशरी रंगांनी रंगून गेली होती.


डोळ्यांना तृप्ती मिळाली. निसर्गाचे हे वैभव डोळ्यात साठवत बोटीने परत पलीकडे गेलो. गाडीत बसलो ते 'निसर्ग धाम' ला जाण्यासाठी.
परत एकदा झुलत्या पुलाने झुलून दाखवून आमचे स्वागत केले. पूल बांधलेला आहे कावेरी नदीवर. नदीच्या पाण्यात बोटिंग करायची सोयही आहे. पूल पार करून आत गेल्यावर आपण बांबूच्या बेटावर आहोत असे वाटते. जिकडे तिकडे बांबूच्या झाडांचे पुंजके. 


आत गेल्या गेल्या एका मोठ्या कुंपण घातलेल्या जागी नांदणारे असंख्य ससे नजर वेधून घेतात. खूप वेगवेगळ्या रंगांचे नि वयाचे ससे आहेत. मी बराच वेळ त्यांचे निरीक्षण करत बसले. पुण्याच्या मांजरांची आठवण झाली. काही ससे झोपले होते. काही बसल्या बसल्या डुलक्या मारत होते तर काही मस्त पाय पसरून, एकमेकांच्या अंगावर लुडकून झोपले होते. 


काही सशांची खादाडी चालली होती. कसली घाई असते ह्या सशांना काय माहित. खातानाही तोंड ते इतके भरभर भरभर हलवत होते की दुखत कसे नाही असे वाटत होते. थोड्या वेळानंतर सशांचा खेळण्याचा कार्यक्रम सुरु झाला. सुरवात झाली ती अशी. एका सशाला अचानक काय वाटले त्याने भराभरा जाऊन दुसर्या सशाच्या अंगावर उडी मारली. खो मिळाल्यासारखा हा ससाही दुसर्या सशाच्या दिशेने पळाला. त्याचा खो मिळताच तिसर्या सशाने हेच केले. ह्या खो-खोचा कंटाळा आल्यावर परत खादाडी आणि झोपेचा प्रोग्राम सुरु झाला.
हे पाहत असतानाच खुराड्यातून अचानक छोटेसे हरणाचे पिल्लू बाहेर आले. बॅम्बीची आठवण झाली त्याला पाहून. थोडावेळ आपला गेस्ट अपिअरन्स देऊन ते परत खुराड्यात जाऊन बसले. 
'स्वीट कॉर्न' चा आस्वाद घेत घेत आत जायला निघालो. वाटेत एके ठिकाणी दिवसभर वन्य प्राण्यांवर आधारित फिल्म्स दाखवण्याची सोय केलेली दिसली. पुढे जाऊन हरणांच्या पिंजर्याला भेट दिली. भरपूर हरणे होती. त्यांचा पिंजराही मोठा होता. गरज लागेल तेव्हा हरणांना विश्रांती घेता यावी म्हणून छान अडोश्याचीही सोय होती. 
तिथेच पुढे हत्तीवर सैर करण्याची सोय होती. पण मला तो प्रकार विशेष आवडला नाही.हत्तींविषयी फारच वाईट वाटले. 


फोटोत दाखवल्याप्रमाणे त्या प्लाटफॉर्मखाली मान घालून आधी हत्तीला उभे करायचे. मग लोक त्यावर बसणार. मग हत्ती ठरलेल्या वाटेवर ५ मिनिटे हिंडवून आणणार. हे दिवसातून अनेक वेळा रिपीट झाल्यावर हत्तीला कंटाळा नसेल येत का? बर वाट फार निमुळती होती. त्यामुळे दोन हत्ती विरुद्ध दिशेने आले की जॅमचा प्रोब्लेम सोडवण्यासाठी परत हत्तींच्या कानाला अंकुश लावून त्यांना वळवले जायचे. कानामागे पायाने टोचून टोचून हत्तीला वाट दाखवली जायची. अंकुश आणि पायाचा सारखा वापर करूनच बहुदा एका हत्तीचा कान अक्षरशः फाटला होता. 
चालत चालत आणखी थोडे पुढे गेल्यावर नदी लागते पुन्हा. निसर्गधाम ही जागा बरीचशी वायनाड च्या 'kuruwa irland' सारखी आहे. तपकिरी रंगाचे पाणी, फारसे वाहते नाही. भोवताली हिरवी झाडे. आकाश दिसताच नाही. गूढ वातावरण एकदम. 


इथे एका माकडाने धुमाकूळ घातला होता. लोकांच्या पिशव्या उचकून त्यातून जर खाण्यासारखा पदार्थ बाहेर आला तर त्याचा फन्ना उडवायचा नाहीतर कपड्यांसारख्या निरुपयोगी वस्तू बाहेर आल्या तर भिरकावून द्यायच्या असा प्रकार चालला होता. २-३ माणसांनी हुसकावून लावायचा प्रयत्न केला असता ह्या माकडाने त्या माणसांच्या अंगावर धावून जायचेही कमी केले नाही. 


काही वेळ पाण्यात पाय सोडून बसलो न निघालो. आतच छोटेसे हॉटेल आहे तिथे जेऊन निसर्गाधामला अलविदा म्हणले.
पुढे गोल्डन टेम्पलला गेलो. दारातून प्रवेश केल्या केल्या स्वच्छ आणि सुंदर असे प्रांगण लागले. प्रांगणातून अजून आत गेल्यावर एक छोटी वाट लागली. दोन्ही बाजूंनी हिरवळ होती. हिरवळीवर वेगवेगळे पक्षी दिसत होते. सतत जाग असलेल्या ह्या ठिकाणीही एका बदकोबांचे मस्त डुलक्या घेणे चालले होते. 


मुख्य मंदिर बंद दिसले. आणखी आत गेले असता "Padmasambhava Buddhist Vihara" नावाची मंदिरासारखीच जागा दिसली. आत गेलो तर एका वेगळ्याच दुनियेत असल्यासारखे वाटले. मोठाच्या मोठा हॉल. समोर बुद्ध देवतांच्या तीन प्रचंड मोठ्या मूर्ती होत्या. हॉलच्या भिंतींवर बौद्ध इतिहासावर आधारित काही चित्र होती. खांबांना आणि छपराला पाच रंगांच्या कापडांच्या झालरींनी सजवलेले होते.


त्या मूर्ती, सजावट आणि शांतता ह्यांमुळे नकळतच जमिनीवर बसून ध्यानमग्न व्हावे अशी इच्छा झाली. ५ मिनिटे डोळे मिटून बसल्यावर शांतीचा अनुभव आला. डोळे उघडवेसेच वाटेना. काही वेळानी बळेच डोळे उघडले. शांतपणे मंदिराबाहेर पावले टाकली. प्रांगणाच्या बाहेर पावले टाकू इतक्यात मुसळधार पाऊस आला. पळत पळत एका हॉटेलात जाऊन बसलो. गरमागरम चहाने रंगत वाढवली. कसे बसे गाडीत बसलो आणि होम-स्टे वर पळालो. 

रशीनने परत गरमागरम कॉफी आणून दिली. कॉफीचा आस्वाद घेत घेत पत्ते खेळलो. होम-स्टेतच गॅस आणि भांड्यांची सोय असल्याने तिथेच सूप, नूडल्स, सॅन्डविचेस तयार करून त्याचा फन्ना उडवला. परत पत्ते खेळलो. अभिजीतच्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता दुसर्या दिवशी. रात्री १२ ला केक कापून त्यांना सरप्राईझ द्यायचे ठरवले होते. रशीनला सांगून केक मागवून ठेवला होता. पत्ते खेळता खेळता ११.३० वाजले सगळ्यांना झोप आली होती. सगळे आपापल्या रूम्सवर गेलो. मधल्या काळात केक आणि ग्रीटिंग कार्ड काढून ठेवले. १२ वाजता जाऊन आई-बाबांचे दर वाजवले. घाबरतच त्यांनी दर उघडले. अशा नवीन ठिकाणी केकचे सरप्राईझ मिळण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. एकदम खुश झाले. थोड्या वेळ गप्पा मारून झोपलो. 
दुसर्या दिवशी नाश्त्यात रशीनने उपमा दिला होता. त्यावर तव मारून झाल्यावर रशीनने स्टेशनवर सोडले. गाडी वेळेवर आली. गाडी निघाली आणि पुन्हा सुंदर रस्त्यावरून पळायला लागली. पण २-३ दिवसांच्या धावपळीमुळे आता मात्र डोळे मिटू लागले. स्वप्नातही नारळाच्या बागा येऊ लागल्या. गाडी बंगलोरला आल्यावर मात्र जाग आली. आधी भराभर अंतर कापणारी गाडी आता मात्र गोगलगायीच्या वेगाने चालू लागली. कसे बसे मॅजेस्टिक आले. तिथून पकडलेली घरासाठीची बस जॅममधून वाट काढत काढत कशीबशी स्टेशनच्या दाराशी पोचेस्तोवर बंद पडली. परत आतपर्यंत चालत जाऊन दुसरी बस पकडली. पुन्हा तिकीट काढावे लागले. ट्रीपच्या शेवटी  मनस्तापाचा काळा तीट लागल्याने इतक्या सुरेख झालेल्या ट्रीपला आपलीच नजर लागायची भीती गेली. घरी येऊन खिचडी करून खाल्ली आणि झोपून गेलो. 
२-३ दिवसांची ही ट्रीप इतकी रेफ्रेशिंग होती की तिने पुढले अनेक दिवस बंगलोरमधल्या धावपळीला तोंड देण्यासाठीचे इंधन पुरवले....
(Photos By: Abhijeet and Me)

Friday, May 20, 2011

७०-८० च्या दशकातील निवडक हिंदी गाणी

    दररोजप्रमाणे सकाळी घरात धावपळ करून ऑफिसमध्ये आले. सवयीनुसार फेसबुक उघडले. कलीगशी डिस्कशन केल्याशिवाय काम पुढे जाणार नव्हते आणि तो आला नव्हता. त्यामुळे हातात रिकामा वेळ होता. फेसबुकवर रेंगाळायाला सुरवात झाली. रेंगाळणे हे क्रियापद वापरायचे कारण म्हणजे कोणताही माणूस काही विशेष उद्देशाने फेसबुक उघडत असेल असे मला नाही वाटत. कोणाची वाट पाहत असू किंवा एखाद्या शोला भरपूर वेळ उरला असेल तर जसे आपण जवळपासच्या रस्त्यावर रेंगाळत बसतो तसेच फेसबुकचे मला वाटते. रेंगाळताना कोणी भेटले, किंवा काही आवडीचे सापडले तर ठीकच नाहीतर हात-पाय हलवण्याची खरोखर वेळ यायची वाट पाहत इकडे तिकडे बघत बसायचे नुसते. असो असेच रेंगाळत असताना मला 'कहाँ से आए बदरा' ह्या गाण्याची लिंक मिळाली. फेसबुकवर रेंगाळणे बंद होवून एक से एक सुंदर अशा गाण्यांच्या दुनियेकडे पावले वळली. अर्थात ह्याही प्रवासात यु-ट्यूबची साथ मिळाली. यू-ट्यूबवर येत जाणार्या सजेशन्समुळे सध्या चालू असलेल्या गाण्याच्या ढंगाची गाणी एका पाठोपाठ एक मिळत गेली न कलीग येईस्तोवारचा वेळ तर एकदम मस्त गेलाच, मूड फ्रेश झाला आणि शिवाय नंतरही कामे करताना मध्ये ब्रेक घेतले त्यात छान छान गाणी ऐकायला मिळाली. प्ले केलेले प्रत्येक गाणे हे माझ्या इतके आवडीचे होते की मी लिस्ट करत गेले आणि एक छोटीशी  गाण्यांची प्ले-लिस्ट तयार झाली. ती अशी:

कहाँ से आए बदरा (चश्म-ए-बद्दूर)
तू जो मेरे सुर में (चितचोर)
ना जाने क्यों, होता है यूँ जिंदगी के साथ (छोटीसी बात)
रिम-झिम गिरे सावन (मंज़िल)
तेरे बिना जिया जाये ना (घर)
तुम्हे हो ना हो (घरोंदा)
दो दीवाने शहर में (घरोंदा)
गोरी तेरा गांव बड़ा प्यारा (चितचोर)
आने वाला पल (गोलमाल)
उठे सबके कदम (बातों बातों में)
थोडा है थोड़े की ज़रूरत है (खट्टा मीठा)
ना बोले तुम ना मैंने कुछ कहा (बातों बातों में)
कहते सुनते बातों बातों में प्यार हो जायेगा (बातों बातों में)

लिस्ट हरवून जायला नको म्हणून ब्लॉगवर लिहून ठेवायचे ठरवले. ज्यांना ही गाणी आवडत असतील त्यांनी एखादे गाणे यु-ट्यूबवर लावले की पुढची गाणी आपोआप मिळत जातील.
ह्या सगळ्या गाण्यांमध्ये मला आवडते अशी गोष्ट ही की ती गाणी खूप साधी-सरळ आहेत. अर्थात नीट पाहायला गेले तर ती म्हणायला कठीण आहेत. पण त्यांचे शब्द असे आहेत की आपल्या दैनंदिन जीवनातील विचार-घटनाच ते कथन करत आहेत की काय असे वाटते. पिक्चरायझेषन पहिले तर आपल्यासारखीच मध्यमवर्गीय माणसे आपण घालू शकतो त्या पोशाखात आणि आपण करू शकतो अशा आचारात समोर वावरताना दिसतात. संगीतात कुठेही लाउडनेस नाही. त्यामुळे ही गाणी ऐकताना त्यांच्याबरोबर समरस झाल्याचा प्रत्यय मला येतो.
     ह्या गाण्यांच्या चित्रपटांपैकी घर सोडून इतर सिनेमे माझे अनेकदा पाहून झालेत. ह्या गाण्यांसारखेच हे सिनेमेही मला खूप आवडतात. ज्यांना ही गाणी आवडली असतील पण सिनेमे पाहिले नसतील त्यांनी जरूर पहा.
    प्रत्येकाची आवड-निवड वेगळी, पार्श्वभूमी वेगळी, गाणी ऐकण्यामागचा हेतूही वेगवेगळा...त्यामुळे ह्या लिस्टमध्ये विशेष काय आहे असे वाटून काही लोकांना पोस्ट वाचून कंटाळाही आला असेल. त्यांना सॉरी. @बाकीचे पब्लिक: एन्जॉय!!

Friday, April 15, 2011

आजीचे घर

   परवा आजोबांकडे गेले होते. खूप वर्षांनी गेले. ज्या घरात माझे सगळे बालपण गेले त्या घरात कॉलेज, आय. आय. टी. अन मग लग्न ह्या गोष्टींमुळे कित्येक वर्षात पाऊलच ठेवता आले नव्हते. नानांना खूप आनंद झाला होता मी गेल्यामुळे... पण मी मात्र जुन्या आठवणींनी घायाळ झाले..
    हेच घर..नाना-आजी रिटायर व्हायला आल्यावर त्यांनी हे घर घेतले. आधी भाड्याची अनेक घरे, मग २ खोल्यांचे छोटेसे घर असा प्रवास करत करत पेशाने शिक्षक असलेले नाना-आजी आज रिटायर झाल्यावर स्वतःच्या सुटसुटीत अशा तीन खोल्यांच्या घरात आले. मुळातच आहे त्यात मजेत राहण्याचा स्वभाव असलेल्या आजीने आता रिटायर होणार म्हणल्यावर तर आणखीच वेगवेगळे प्लान बनवले. घर छान सजवले. संध्याकाळी बाल्कनीत बसून मोकळ्या हवेचा आस्वाद घेण्यासाठी झोपाळा बांधून घेतला. घरात मांजरे पाळली.
    ह्याआधीही आजीकडे काही कमी मजा असायची असे नाही. २ च खोल्यांचे घर होते पण आनंदाने पूर्ण भरलेले. शनिवारी शाळा सुटली की घरी येऊन जेवायचे न कपड्यांचे बोचके बांधून सायकलवर बसून सुसाट वेगाने आजीकडे जायचे. एकदा आजीकडे गेले की काहीही करा, कसेही वागा, कोणी ओरडायला नाही की काही नाही. 
   दुपारी आजोबा सगळ्या दारे-खिडक्या-पडदे बंद करून झोपायला जायचे. त्यांच्या घोरण्याचा आवाज एकदा सुरु झाला की आम्ही आमचे उद्योग करायला मोकळे. आजी, मावश्या, मी अन असेल तर दादा असे ओळीने पांघरूण  घेऊन आडवे व्हायचो. थोड्या वेळाने आजी झोपली की आमची हळू आवाजात बडबड सुरु व्हायची. फालतू विनोद, पाचकळ गप्पा- गोष्टींना ऊत यायचा. कधी कधी खिदळणे कंट्रोल न झाल्याने हसण्याचा मोठा आवाज ऐकून आजोबांची झोपमोड व्हायची. "झोपा की रे आता का मारू दोन फटके..." असे उगाचच ऐकवून ते परत झोपी जायचे. आमचे उद्योग परत चालू व्हायचे. डोक्यावर पांघरूण ओढून रिमोट कंट्रोलची वेगवेगळी बटणे दाबत लाल दिवा कसा लुकलुकतोय ते पाहत बसणे, एकमेकांना चिमटे काढणे, कागदावर खेळ खेळणे ह्यात अख्खी दुपार निघून जायची. मध्येच भूक लागली की फ्रीजमध्ये डोके खुपसून डोळ्यांना दिसेल तो खाऊ खायचा. आजीच्या फ्रीजमध्ये सरबते, काजुकंद, चॉकलेट्स ह्यांची रेलचेल असायची. अशा पद्धतीने दुपार घालवल्यावर आजी-आजोबांची उठायची वेळ व्हायची. मग उठल्यावर आजी मस्त चहा करायची. मग मावशीने straw ची बाहुली बनवण्यासाठी आणलेल्या straw ढापून त्यांनी चहा पिणे, बशीत चहा ओतून मांजरीसारखे चाटत चाटत दूध पिणे आदि प्रकार निवांतपणे चालत राहायचे.
    संध्याकाळ झाली की आजीचा ठराविक प्रोग्राम सुरु होई. आधी आजी स्वच्छ हात-पाय-धुवायची. मग खुर्चीत बसून आधी चेहऱ्यावर, मानेवर पावडर चोपडायची. मग केसांना काजळ लावून त्यांना काळा रंग आणायची. मग मस्त पेपर-पुस्तके वाचत बसायची. तिचा हा कार्यक्रम चालू झाल्यावर आम्ही खेळायला जायचो. परत येऊन हात-पाय धुवून, शुभंकरोती म्हणेस्तोवर जेवायची वेळ यायची. आजीची आमटी मस्त असायची. सर्व पदार्थ स्वैपाकघरातून हॉल मध्ये आणायचे, ताटे-वाट्या-भांडी घ्यायचे न मग जेवायला बसायचे. हसत-खेळत-गप्पा मारत जेवण व्हायचे. मग झोपायची तयारी... गाद्या घालायच्या  न लोळायला लागायचे. दिवे मालवले की आजी भुताच्या गोष्टी सांगू लागायची. भीती वाटून मावशीच्या कुशीत डोके खुपसून लपून बसल्यावर कधी झोप लागायची ते कळायचे नाही.
    आजीकडे सकाळी लवकर उठायचे वगरे काही नियम नव्हते. तेव्हा लवकर जाग आली की लोळत पडायला भरपूर वाव होता. मुळात जाग यायची तीच आजोबांच्या "राजी-मंजी उठा आता...किती वाजले पहा जरा!" (राजी-मंजी ही माझ्या मावश्यांची टोपण नावे)...आजोबा ही वाक्ये अनेक वेळा त्याच आवाजात रिपीट करत राहायचे कारण ज्याला त्याला मनापासून इच्छा झाल्याशिवाय कोणीही उठणार नाही ह्याची त्यांना खात्री होती. पण अमुक एक वेळ झाली तरी गजर करायचे काम जसे घड्याळ   करते तसे हे वाक्य म्हणण्याचे काम आजोबा दिवसें-दिवस, वर्षानुवर्षे करीत असत.
    झोपेतून उठले की आवारा-आवर, स्वैपाक सुरु व्हायचे. Background ला जुनी गाणी, बहुधा गीता दत्तची, चालू असायची. सैया मिलने आना रे, बाबूजी धीरे चलना, मूड मूड के ना देख इत्यादी गाणी ऐकली की अजूनही माझ्या डोळ्यासमोर तेव्हाचे वातावरण उभे राहते. अशा प्रकारे हसत-खेळत-कामे करत पुढचा दिवस सुरु व्हायचा.
    नंतर नानी-नाना नव्या घरी आले. तिकडे आधी म्हणाले तसा झोपाळाही होता. मांजरे होती. नवनवीन मित्र-मैत्रिणी होते. मजाच मजा. नानी ही एक फार रसिक व्यक्ती होती. तिला नाटक-सिनेमे ह्यांची भयंकर आवड होती. अनेक नाटक-सिनेमांच्या कॅसेटस तिच्याकडे होत्या. ते पहायलाही मजा यायची. तिच्या ह्या रसिकतेला काळाची मर्यादा नव्हती. जुने सिनेमे, जुनी गाणी, जुने डान्स जेवढे तिला आवडायचे तेवढेच नवेही. मला आठवतंय तिला प्रभू देवाचा डान्स फार आवडायचा म्हणून मावश्या, नानी-नाना, मी, दादा आणि आई-बाबा असे डेक्कन थेटरला जावून "हमसे हे मुकाबला" हा पिक्चरही पहिला होता....
    आजोळी अशीच मजा करत गेलो. मधल्या काळात माझ्या एका मावशीचे लग्न झाले. तिला मुलगा (अमित) झाला. तिचे बाळंतपण आजीकडेच झाले. घरात भरपूर खेळणी आली. अमितचे कौतुक करण्यात आणि काळजी घेण्यात काही काळ गेला. खूप आनंदात दिवस चालले होते.
    पण सगळेच छान होत राहिले तर ते आयुष्य कसले. तापाचे निमित्त होऊन तब्येतीने एकदम व्यवस्थित असलेली आजी पंधरा दिवसात गेली. आजोबांचा धीर पूर्ण खचला. घरात आजोबा न धाकटी मावशी असे दोघेच जण उरले. ज्या घरात लाड करून घेण्यासाठी जात होते तिथे आजीचे मरणोत्तर संस्कार करण्यासाठी न नंतर मावशी-आजोबांना मानसिक आधार द्यायला म्हणून राहायला जाण्याची वेळ आली. नंतर धाकट्या मावशीचेही   लग्न झाले. घरात आजोबा एकटे राहू लागले. घरातली एकेक वस्तू घराबाहेरची वाट धरू लागली. शो-केस मध्ये तोर्यात मिरवणाऱ्या वस्तूंवर धुळीचे थर  बसू लागले. घर सुने वाटू लागले.
    आजोबांच्या घरी परवा पाउल टाकल्यावर एवढा सगळा काळ डोळ्यासमोरून झरझर येऊन गेला. गळा दाटून आला, डोळ्यातले पाणी कधी एकदा बाहेर यायला मिळते याची वाट पाहू लागले. लग्न झाल्यावर सासरी जाताना रडायचे नाही असे मनाशी पक्के केले होते तेव्हा ह्या अश्रूंना बांध घालण्याची कला अवगत झाली ती  आज कमी पडली. हसत-हसत आजोबांना निरोप देऊन बाहेर पडले तशी मात्र डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आत्ता मस्त मजेत असलेल्या हिला एकदम झाले तरी काय हे मात्र अभिजीतला कळले नाही...

Friday, April 8, 2011

वल्ली अशी व्यक्ती

    सेल्वी: वय ३५, उंची ५ फूट, काळा रंग, सडपातळ बांधा..वर्णन "आपण ह्यांना पाहिलात का?" मधील एखाद्या हरवलेल्या व्यक्तीचे नसून माझ्याकडे कामाला येणाऱ्या बाईचे आहे. ह्या वर्णनात काही विशेष नाही पण ते वाचून तुमच्या डोळ्यासमोर जी वक्ती उभी राहू शकते त्यापेक्षा सेल्वी खूप वेगळी आहे. आजपर्यंत अनेक कामवाल्या बायका मी पाहिल्या पण सेल्वीसारखा नमुना सापडणे ही अशक्य गोष्ट आहे. असे काय वेगळे आहे सेल्वीमध्ये? वाचा म्हणजे समजेल.
    पहिला दिवस. समोरच्या दुकानदाराला सांगून ठेवले होते की एखादी कामवाली बाई ओळखीची असेल तर पाठवून दे. संध्याकाळी बेल वाजली. दार  उघडले. समोर कोणी दिसेना. बाहेर मान काढून आजूबाजूला पहिले तर नवीन जागी गेल्यावर लहान मुले जशी बावरून उभी असतात तशी सेल्वी उभी होती. आत बोलावले. काम काय आहे, पैसे, वेळ वगैरे ठरले. मी ऐकले होते की बंगलोरमध्ये नीट बोलणारी बाई मिळणे अवघड आहे. इथे कामवाल्या बायकांना भयंकर भाव असल्याने त्यांचे कामाचे भावही तितकेच जास्त असतात आणि वागणे म्हणजे चितळ्यांकडे काम करणाऱ्या माणसांहूनही तुसडेपणाचे असते. (चितळ्यान्चा वारंवार उद्धार करण्यासाठी मी तुमचीच माफी मागते पण दरवेळी पुण्याला गेल्यावर ते एक नवी हिट देऊन मला त्यांचा विसर पडू नये ह्याची ते पुरेपूर काळजी घेतात त्यामुळे त्यांची आठवण काढल्याशिवाय मलाही चैन पडत नाही. असो.) तर बंगलोरमधल्या बायकांची अशी प्रतिमा माझ्या मनात असताना सेल्वीला भेटून मला जरा बरे वाटले. पण प्रथमदर्शनी ही व्यक्ती माझ्या पोस्टचा विषय बनेल असे काही मला वाटले नाही.
सेल्वी रोज कामाला येते आणि रोज नवनवीन कारनामे करते किंवा ऐकवते. त्यामुळे तिचे किस्से सांगायला एक पोस्ट नक्कीच पुरे पडणार नाही पण 'निवडक सेल्वी' मला ह्या पोस्टमधून कॅप्चर करता येतीये का ते पाहते. किस्से वाचताना सेल्वीचे वय ३५ आहे हे लक्षात घेऊन वाचल्यास किस्से आणखी रंगतदार वाटतील.
हा किस्सा मला अभिजितने सांगितला. सांजवेळ झाली होती. लाईट गेले होते. मी कामाहून यायची होते. अभिजित घरात एकटा होता. हॉलमध्ये फक्त एक मेणबत्ती लावलेली होती. सेल्वी पायाचा आवाज न करता वर आली. बाहेर थंडी असल्याने तिने फरचा कोट घातलेला होता. अभिजीतला घाबरवण्यासाठी म्हणून सेल्वी भूतासारखा आवाज करत घरात शिरली. फरच्या कोटमुले मेणबत्तीच्या प्रकाशात खरच एखाद्या विचित्र प्राण्यासारखी दिसत होती. न आमच्या आसपास लहान मूल कोणी नसल्याने (आणि मोठ्या माणसांनी असे वागणे अपेक्षित नसल्याने) तिचे ते रूप पाहून अभिजीत खरच दचकला. न तो दचकलेला पाहून सेल्वी हसत सुटली. मी घरी आल्यावर भैयाची कशी मजा केळी ह्याची स्टोरी सेल्वीने छान मसाला लावून मला सांगितली. नंतरचे काम सेल्वीने एका हातात मेणबत्तीन धरून दुसऱ्या हातात फडके-झाडू धरून पूर्ण केले. तिचा स्वभाव गंमतीशीर नसता तर तिचे ते भयंकर स्वरूप पाहून मला नक्की भीती वाटली असती.
बंगलोरमधील बायकांना हिंदीतून बोलता येत नाही (ते अपेक्षितही नाही). पण सेल्वीला मात्र बऱ्यापैकी चांगले हिंदी येते. केवळ हिंदीतून बोलणेच नाही ८०-९०च्या दशकातल्या सिनेमातील गाणीही सेल्वीला चांगलीच माहित आहेत. अभिजीत घरी नसेल की नामी संधी पाहून तर सप्तकात सेल्वी 'मुझे नींद न आये, परदेसी परदेसी, देखा ही पेहली बार ' इत्यादी गाणी गात असते. ह्या तिच्या कालाकारीबद्दल मी तिला दाद देणेही तिला अपेक्षित असते. त्यासाठी प्रत्येक गाणे संपले की टी माझ्याकडे लाजून पाहते अगदी कविता म्हणून दाखवली की लहान मुले लाजतात तशी.
    एकदा संध्याकाळी मी कामावरून येत होते. ६.४५ वाजले होते. सेल्वी आमच्याकडे यायची वेळ आहे ७.३०. सेल्वी जनरल रस्त्यातून हिंडत होती. मला पाहून म्हणे चाल आज मी तुझ्याकडे लवकर येते. म्हणले चल. आमच्या घराच्या खालचे फाटक उघडेपर्यंत सेल्वी माझ्याबरोबर चालली. घराचा जिना आल्यावर पाळायला लागली. म्हणले कसली घाई आहे. म्हणे भर भर जाते न भैयाची मजा करते. पळत पळत गेली न रोजच्या सवयीनुसार गेल्या गेल्या ओरडली 'म्याडम किधर ही?'  अभिजीत म्हणाला आली नाही अजून. सेल्वी मुद्दाम भीतीचे नाटक करत म्हणे "७.३० बाज के हो गया म्याडम नी आयी अब तक?" आता ६.३० ची वेळ. बाहेर उजेड होता. अभिजीतला कळले की ती मजा करत आहे. तो म्हणाला अभी टीम नही हुआ ना, आयेगी. तरी हिचे घाबरण्याचे नाटक चालूच. शेवटी मी वर पोचल्यावर आणखी एकदा भैयाला आपण कसे फसवले ह्याचे स्वतःच समाधान वाटून घेऊन, हसत-हसत बाईसाहेब कामाला लागल्या.
    सेल्वी अतिशय भोळी आहे. तिच्या सांगण्याप्रमाणे तिच्या आई-वडिलांनी तिला खऱ्या जगाचा अनुभवच घेऊ दिलेला नाही. आमच्या गल्लीपलीकडे तिने कधी पुन टाकलेले नाही. लग्नानंतर तमिळनाडूतील कोणत्याश्या गावी नवर्यासोबत गेली. आधी २ मुली झाल्या. मुलगा पाहिजेच ह्या सासूच्या आग्रहाखातर अजून एक पोर जन्माला घातले. ह्यावेळी नशिबाने (?) मुलगा झाला. काही काळ बरे चालले. नंतर नवरा दारूच्या आहारी गेला. सेल्वीला, मुलांना मारू लागला, कसेही वागू लागला. तेव्हा मुलांना घेऊन सेल्वी आपल्या आई-वडिलांकडे निघून आली. डोक्याला छप्पर, खायला अन्न न मुलांचा सांभाळ ह्यासाठी सेल्वी आई-बाबांना ३००० रुपये देते. सेल्वीची अशी परिस्थिती पाहता काही लोक सेल्विच्या मुलांची फी भरतात. परंतू त्याबदल्यात सेल्वीकडून कितीही काम करून घेतात. सेल्वीही काही कमी नाही. ती मुलांसाठी रोज प्रत्येकी एक पर्लेजीचा पुडा, पाव-पाव लिटर दूध घेऊन जाते. समोरच्या दुकानदाराला ती महिन्याचे १ हजार रुपये देते. त्यात हा सगळा खुराक, शाम्पू, साबण इत्यादी गोष्टी नेते. सेल्वीकडे चंद्रमुखीचा ब्लाउज (असेही काही असते हे तिच्याकडूनच कळले), अमक्या स्टाईलची साडी, तमक्या स्टाईलची टिकली अशा वस्तू असतात. सेल्वी पार्लरमधून हेयर-कट करून घेते. काळजीपोटी एकदा तू काही सेव्हिंग करतेस की नाही असे विचारले असता ती शून्य सेव्हिंग करते असे कळले. "तुझा नवरा सोबत नाही. दोन मुली आहेत त्यांची लग्ने कशी करशील?" असे विचारले असता मुलगा (जो आत्ता ५ वर्षांचा आहे) करून देईल ना असे म्हणाली. असे विचार करून चालणार नाही हे समजावून दिले असता ५ मिनिटांसाठी थोडे विचारात पडली पण बहुधा आयुष्य हे असल्या  गोष्टींची काळजी करण्याइतके स्वस्त नाही असा विचार करून पुन्हा मूळ पदावर आली. कधी कधी ह्या भोळेपणामुळे तिची काळजी वाटते.
   लोकही साधे नसतात. एका गाण्याचे क्लास घेणाऱ्या बाईंकडे ही कामाला जाते. त्यांनी हिच्या डोक्यात घालून ठेवले की "मुलांना गाणे शिकव म्हणजे शाळेत बक्षिसे मिळायला लागतील, पुढे मोठी होऊन खूप कमावतील. दुसर्यांकडून मी महिन्याला ४५० रुपये घेते तुझ्याकडून मात्र प्रत्येकी २५० घेईन." झाले हिच्या डोक्यात भूत बसले. रोजच्याप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा सांगायला सुरवात केल्यावर तिने मला हे सांगितले. मला तिला नित समजवावे लागले की असे काही करण्यापेक्षा पैसे साठवून ठेव थोडे. काही दिवसांनी परत बाईसाहेब मला विचारत होत्या "कम्प्युटरची किंमत काय असते? विचार करतीये मुलांसाठी एक घ्यावा!" धन्य! काय बोलावे मला कळेना. मुलगा आहे इंग्लिश मिडीयमला. मुली कन्नड मिडीयम मध्ये. तिघेही क्लासला जातात. शिवाय मुलींना इंल्गीश यावे ह्यासाठी बाई स्पेशल इंग्लिशची  ट्यूशन शोधात आहेत. अंथरून पाहून पाय पसरावेत पण हे सेल्वीला कसे कळणार. मुलांना इंग्लिश शिकवले की त्यांना आपोआप छान नोकरी लागेल अशी तिची धारणा कोण दूर करणार? मुलांना रोज बिस्किटे खायला घालून खुश ठेवण्यापेक्षा स्वतः त्यांना थोडा वेळ दिला तर त्यांना जास्त आनंद मिळेल हे तिला केव्हा कळणार? खूप समजावले तरी सेल्वी तशीच.
कधी कधी असे वाटते की ही माणसे काही नसताना किती सुखी असतात...आपणच सगळे असून दुःख शोधून काढत असतो बहुधा. घर-गाडी-करियर-म्हातारपणासाठी सेव्हिंग करता करता आहे ते सुख खर्च करत राहतो... उद्याची चिंता ना करता हाती येणारा प्रत्येक क्षण मनाला येईल तसा उपभोगून स्वछंदीपणे जगणारी सेल्वी बरोबर की उद्याची काळजी करत, प्रत्येक पाउल जपून, मोजून-मापून टाकण्यात हाती असलेले अनेक क्षण खर्ची घालणारे आपण बरोबर?
(सेल्वीबद्दल लिहिण्यासारखे पुष्कळ आहे पण वेळेअभावी जेवढे जमले तेवढे लिहिले...सेल्वीचे नाव-नवीन प्रताप पाहता माझ्या इतरही पोस्ट्स मध्ये तिचा रेफरन्स येताच राहील...)
  

Thursday, March 17, 2011

वायनाड (केरळ) ट्रीप

    ऑक्टोबरचा लाँग वीकेंड जवळ येत होता. रोजच्या रुटीन मधून ब्रेक हवा होता. "आपण कुठेतरी फिरायला जाऊया मस्त!", अभिजीतला सुचवले. तोही लगेच तयार झाला. वेगवेगळ्या जागांची माहिती काढणे सुरु झाले. कूर्गबद्दल खूप लोकांकडून ऐकलेले असल्याने त्याच्याबद्दल सर्च करायला लागलो. दक्षिण भारतातील हिल-स्टेशन्सवर राहण्यासाठी "होम-स्टे" हा उत्तम पर्याय असतो. त्या ठिकाणचे लोक आपल्या घरीच राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय करतात, उत्तम पाहुणचार करतात. फायदा असा की ह्यामुळे जिथे जाऊ त्या ठिकाणाची राहणी, खान-पान, घरे इत्यादीन्बद्दलही कल्पना येते. आम्ही कूर्गमधील होम-स्टेजना कॉल करू लागलो. दसरा जवळ आला होता. ह्या काळात कूर्गमध्ये जत्र भरते. त्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते. असंख्य कॉल्स केले. सगळे होम-स्टेज बुक झालेले होते. त्यातच एका मित्राने सांगितले की त्या जत्रेमुळे कूर्ग ही आत्ता जाण्यासाठी योग्य जागा नाही. आमचा कूर्गविषयीचा सगळा अभ्यास वाया गेला. बर... मग आता कुठे जायचे हा प्रश्न होताच. http://www.mustseeindia.com/places-around-bangalore  ही एक अतीशय माहितीपूर्ण साईट मिळाली. अनेक जागांविषयी चर्चा करता करता गाडी वायनाडला पोहोचली. वायनाड- केरळ मधील एक पर्यटनासाठी प्रसिद्ध असा जिल्हा. कसे जावे, कुठे राहावे परत शोध सुरु झाला.
    हल्ली travelogs, tourism-related sites वरचे हॉटेल्सविषयींचे रिव्ह्यूज ह्यांमुळे ट्रिपचे प्लानिंग करणे फार सोप्पे झाले आहे. अनेक ठिकाणी 'Tropical Forrest' ह्या होम-स्टे विषयी चांगले रिव्ह्यूज लिहिलेले दिसले. त्यांना फोन केल्यावर एका बंगल्यात जागा आहे असेही कळले. आम्ही फार विचार न करता बुकिंग करून टाकले. बुकिंग केल्यावर प्रवास कसा करावा ह्याचा विचार सुरु झाला. दोन माणसांसाठी स्वतंत्र गाडी करणे हा पर्याय खर्चिक आणि कंटाळवाणा वाटला. कोणत्यातरी न आठवणार्या कारणाने बसने जायचाही पर्याय रद्द केला. "बाईकने जावे का?", अभिजीतने योग्य वेळ पाहून हळूच पिल्लू सोडले. आम्ही आधी मुन्नारला गेलो होतो तेव्हा तिथल्या कॉफी-इस्टेट्स पाहून तशा रस्त्यांवर गाडी चालवायला मिळाली तर किती मजा येईल असे अभिजीतने म्हणाल्याचेही मला आठवले. माझ्या तोंडातून पटकन हो निघाले.
     त्यावेळी काही जाणवले नाही. पण आम्हाला ३०० की.मी.चे अंतर कापायचे होते. मी कधी बाईक वरून इतक्या लांब गेलेली नव्हते. शिवाय आम्ही दोघाच जाणार होतो. तेव्हा काही झाले तर सोबत कोणीच असणार नव्हते. मला जरा भीती वाटायला लागली. बस मिळू शकेल का त्याची चौकशीही केली. पण लाँग वीकेंड सुरु व्हायला एकाच दिवस उरला असल्याने बुकिंग फूल झाले होते. पर्यायाच नाही म्हणल्यावर भगवान-भरोसे बाईक-ट्रीप करूनच पाहू असे ठरवले.
     सकाळी ५ ला घरून निघालो. तासा-दीड तासाचे ब्रेक घेत घेत अंतर कापू लागलो. दर वेळी ब्रेअक घेतला की पुढच्या स्ट्रेचमध्ये किती वेळात कुठे पोहोचायला हवे ते ठरवायचो. जस-जसे पुढे जाउ लागलो तस-तसा माझाही कॉन्फिडन्स वाढून भीती नाहीशी झाली. मजा यायला लागली. वार्याच्या आवाजात आवाज मिळवून अनेक गाणी म्हणाली.
यूं ही चला चाल राही, यूं ही चला चाल राही..कितनी हसीन ही ये दुनिया...
भूल सारे झमेले देख फुलों के मेलें, बाडी रंगीन ही ये दुनिया...
   वातावरण अगदी हे गाणे आठवावे असे होते. निमा-पाऊण प्रवास एकदमच मस्त झाला. रस्ता एकदमच मस्त होता. वरुणराजाची कृपा म्हणून पाऊसही पडत नव्हता. पण मध्येच एका स्ट्रेचमध्ये रस्ता अस्तीशय वाईट होता."रस्त्यात खड्डा, की खड्ड्यात रस्ता" अशी परिस्थिती होती. कंबरडे पार मोडले. बराच वेळ प्रवास झाल्याने दुखणे जास्तच तीव्र वाटत होते. आधी आम्ही १-१ गाव मागे टाकण्यासाठी झुंजत होतो न आता १-१ १-१ की.मी पार पाडण्यासाठी झुन्जतोय असे वाटू लागले. एवढा केलेला प्रवास पाहता डेस्टीनेशन तसे जवळ आले होते, पण आता आम्हाला जास्त विचारात विचारात जायला लागत असल्याने जास्त वेळ लागत होता. तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. वाटेत थांबून रेन-कोट घालण्याचा कार्यक्रम आटपायला लागला. दमलेले आम्ही, पाऊस अशा परिस्थितीत आमची गाडी कशी-बशी पुढे सरकू लागली. "Tropical ForRest" हे ठिकाण पहायला आपले प्राण तरी शिल्लक राहणार आहेत का?" असले बालिश विचार मनात यायला लागले. एवढ्यात "Tropical ForRest" च्या पाट्या दिसू लागल्या. आमच्या जिवात जीव आला. चहाचे मळे लागले. जिवाला आणखी छान वाटले आणि असे छान वाटत असतानाच "Tropical ForRest" सापडले. तिथला व्यवस्थापक साजी ह्याला फोन केला. होम-स्टे छोटीशी टेकडी चढून गेल्यावर होता. पाऊस पडत होता. तरी साजी आम्हाला घ्यायला आला. साजीने आमचे छानसे स्वागत केले. टपरीवर चहा पाजला. पाऊस थांबताच आम्ही वरती गेलो.
वायनाडला पावसाळ्यात थोडा लवकर अंधार पडतो, धुकेही पडते. त्यामुळे सर्व हालचाल बंद होते. चार वाजले होते. त्यामुळे कुठेही न जाता तिथेच थोडे इकडे तिकडे फिरून मग आराम करायचा निर्णय घेतला.
    घराच्या आजूबाजूला चालायला सुरवात केली. थोडासा चढ चढून गेलो न वरून मस्त दृश्य दिसत होते. हलकेसे धुके, वळणं-वळणांचा रस्ता, त्यापलीकडे दरी! परत येताना आजूबाजूच्या झाडांकडे लक्ष गेले. रानफुले उत्साहाने डुलत होती. जिकडे तिकडे भरपूर लाजाळूची झाडे उगवलेली होती. एका लाजाळूच्या पानांना हात लावून लावून त्याला इतके लाजवले की बिचार्याने स्वतःला जमिनीवर झोकुनच दिले. फोटो-बिटो काढले.


आता मात्र थकवा जाणवू लागला. मस्त कट्ट्यावर बसलो. पत्ते खेळलो. अंधार झाला तशी आत गेलो. साजीने मस्त गरमा-गरम जेवण आणले. त्यात काही पदार्थ आपले नेहमीचे अन काही केरळी पद्धतीचे होते. केरळी पदार्थांमध्ये नारळ बर्याच प्रमाणात वापरतात असे कुठेतरी वाचलेले प्रत्ययास आले. हवा थंड होती. दिवसभराचा थकवा, पाऊस, थंडी, गरम चहा, पत्ते, गरम जेवण..मस्त झोपेसाठी अजून चांगले औषध ते काय असणार? पांघरुणात डोके खुपसून मस्त झोपून गेलो.
     येऊन-जाऊन ६०० की,मी, असा बाईकचा प्रवास खूप होणार होता. त्यामुळे त्यादिवशीच्या साईट-सीइंगसाठी जीप केली. सकाळी लवकर निघालो. आम्ही केरळला दोनदा गेलोय. दोन्हीवेळा आम्हाला हॉटेल आणि ड्रायव्हरचा अनुभव छान आलेला आहे. समोरच्या माणसाची ट्रीप जमेल तेवढी सोयीची, आनंददायक करावी हा त्यांचा हेतू त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सतत प्रत्ययास आला. साजीने सकाळी मस्त ब्रेकफास्ट आणून दिला. ब्रेकफास्टमध्ये चहा-कॉफी, पुट्टू, सांबार न केळी होती. पुट्टू हा केरळातील ब्रेकफास्ट स्पेशल आयटम आहे. तिखट आवडत असेल तर साम्बारासोबत खावा. गोड आवडत असेल तर केळी आणि साखर घालून खावा. ब्रेकफास्टने ट्रीपच्या मजेत भर घातली.  
     पहिली भेट दिली Banasura Sagar Dam ला. नाव मराठीत लिहिणे अशक्य आहे कारण त्यांचे खरे उच्चार काही आम्हाला कळले नाहीत. हा भारतातील सर्वात मोठा आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा earthen dam आहे असे कळले. बाहेर गाड्यांवर तिखट-मीठ लावलेला अननस, कैरीच्या फोडी, आवळे अशा गोष्टी दिसल्या. त्यांचा आस्वाद घेत घेत धरणाच्या दिशेने चालू लागलो. तिथे पोहोचल्यावर जे दृश्य दिसले ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट येते. हिरवी जमीन, निळे पाणी, पलीकडे डोंगर..पाण्यामध्ये patch-work करावे तसे क्चोते-छोटे हिरवेगार जमिनीचे तुकडे..छोटी बेटेच जणू. ह्या बेटांची शोभा वाढवली होती ती त्यांवर हिंडणार्या बगळ्यांनी. पाण्यात बदके पोहत होती. आहाहा. शेजारीच एक छोटीशी हट होती. तिथे काही काळ नुसते हे दृश्य पाहत बसलो. पलीकडे छोटीशी बाग होती. उंच झोके झाडाला बांधले होते. काही काळ झोका घेतला. न निसर्गाची शोभा पाहत पाहत तिथून Kuruva Dweep पाहण्यासाठी निघालो.



केरळ टूरिझमच्या चिन्हाखाली "Gods own country" असे वाक्य लिहिलेले आहे. केरळच्या रस्त्यांवरून जायला लागले की ह्या वाक्यात किती तथ्य आहे ते प्रत्ययास येते. चांगले रस्ते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला चहा-कॉफीच्या किंवा नारळांच्या बागा. सीझनमध्ये गेल्यास मस्त हवा...कोणत्याही ठिकाणाला भेट न देता नुसती भटकंती केली तरी डोळ्यांना सुख आणि जीवाला समाधान मिळते. बराचसा रस्ता असाच गेला. "कुरुवा द्वीप" कडे जाणारा रस्ता मात्र भयंकर होता. भूकंप होतोय की काय असे वाटावे तशी गाडी हलत होती. १०-१५ मिनिटांचा असा भयंकर प्रवास झाल्यावर कुरुवा द्वीपला पोहोचलो. ही जागा एकदम रहस्यमय किंवा भूत-खेतांच्या सिनेमात शोभून दिसावी अशी होती. हे एक छोटेसे बेत आहे. ह्या बेटाच्या चारीही बाजूंना चॉकलेटी रंगाचे पाणी आहे! बेटावर चित्र-विचित्र आकारांची  झाडे आहेत. उंच बांबूंची झुडुपे आहेत. बाम्बूतून वाहणार्या वार्याचा गंभीर आवाज येत असतो. हिरवा रंग असा नजरेसाच येत नाही. पाणी चॉकलेटी, जमीन चॉकलेटी,  गूढ दिसणारी झाडे! बेटाच्या एका बाजूने चालत निघायचे न बेटाच्या काठाने संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करायची. एका वेगळ्याच वातावरणाचा अनुभव आला.

      तिथून आम्ही निघालो Poolot Lake ला. आता मला ह्याचाही उच्चार माहित नाही. ही जागाही छान होती. तलाव,  त्याच्या बाजूने चक्कर मारायला वाट केलेली होती. बाजूला झाडे. आम्ही संध्याकाळी ५ च्या सुमारास तिकडे पोचलो. अंधार पडत आला होता. किंचितसा पाऊसही होता. त्यामुळे इथेही एक गूढ-गंभीर असे वातावरण अनुभवास आले.

     दिवसभर मस्त फिरणे झाले. तसे वायनाड पूर्ण फिरायला २-३ दिवस लागतात. ठिकाणे लांब लांब आहेत. पण एक दिवसात ह्या तीन ठिकाणी जाता आले आणि फार मजा आली.
घरी परतलो. थोडा आराम, खेळ, गरमा-गरम जेवण आणि मग मस्त झोप असा दिवस म्हणता म्हणता संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो. आता रस्त्याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे कुठे कुठे विश्रांतीला थांबायचे ते आधीच ठरवले. त्यामुळे प्रवास सुखकर झाला.
येता येता चिन्नपट्टणंला मुद्दाम ब्रेक घेतला. बेंगलोरजवळील हे गाव रंगीत लाकडी खेळणी आणि वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. एका दुकानाला भेट दिली. रंगीत खेळण्यांच्या दुनियेत अक्षरशः हरवून गेल्यासारखे वाटले. थोडी खरेदी करून निघालो. बंगलोर गाठले.
     केरळचा हिरवागार निसर्ग, जेवण, पाहुणचार आणि बाईक..कॉम्बीनेशन मस्त होते. ट्रीप अविस्मरणीय होती. सहा महिन्यांनी मी तिच्यावर पोस्ट लिहू शकत आहे त्यातच सगळे आले.

Saturday, February 5, 2011

ನಮ್ಮಬೆಂಗಳೂರು (नम्म बेंगळूरू), अर्थात आमचे बेंगळूरू


(टीप: बेंगळूरू इथे  नीट लिहिता येत नसल्याने मी पोस्टमध्ये बेंगलोर असे लिहिणार आहे...)
    मला बेंगलोरमध्ये येऊन आता सहा महिने होऊन गेले आणि ह्या सहा महिन्यांमध्ये बेंगलोरने मला अनेक रंगीबेरंगी आठवणी दिल्या. ह्या रंगांनी बेंगलोरचे रंगतदार चित्र तुमच्यासमोर उभे करावे असे आज वाटले...
सगळ्यात आधी मी बेंगलोरला आले ते लग्नानंतर अभिजीतला भेटायला २-३ दिवसांसाठी. बस स्टॉप वर उतरल्या उतरल्या बेंगलोरने मला सुखद धक्का दिला. मी एका फ्रूट-प्लेट घेतली, त्या माणसाने अतिशय आपुलकीने "फ्रूट-प्लेट आवडली का?" असे मला हावभावांनी, खाणा-खुणान्नी विचारले. एकतर ती फ्रूट-प्लेट होती, वाईट लागायचा विशेष प्रश्नच येत नाही तरी त्याने विचारले. दुसरे म्हणजे एखाद्या दुकानदाराने आपल्याशी आपुलकीने बोलण्याची सवयच पुणेकर असल्याने राहिली नाहीये. कोणत्याही ठिकाणी आलेला पाहिला अनुभव त्या ठिकाणाबद्दलचे इम्प्रेशन मनात सोडून जातो. बेंगलोर मला पहिल्याच काही भेटीत आवडले. त्या ट्रीपमध्ये अजून एक गोष्ट लक्षात राहिली ती "सेट डोसा" आणि "चाउ-चाउ बाथ"...उडुपी उपहार मध्ये खाल्लेला सेट डोसा अविस्मरणीय होता..३ छोटे डोसे...वरून तूप...सांबार...चटणी...खल्लास...५ मिनिटात डोश्याचा फन्ना उडालेला होता. दुसरा नंबर चाऊ-चाऊ बाथचा. नावावरून एखादा चायनीज पदार्थ  आहे असे जर तुम्हाला वाटले असेल तर तुम्ही चुकलेले आहात. चाऊ-चाऊ बाथ म्हणजे १ मूद उपमा आणि एक मूद शिरा. शिऱ्यासारख्या असणार्या पदार्थांना इथे बाथ म्हणजे भात असे म्हणतात. जो शिरा होता तो होता केसरी बाथ. केसरी बाथ हा मी आजपर्यंत असंख्य वेळा खाऊनही त्याचा मला कंटाळा आलेला नाही...हा तुपातला शिरा असतो ज्यात लवंग घातलेली असते, कधी कधी अननस...आहाहा...बेंगलोर कधी आलात तर ना विसरता केसरी बाथ खाऊन पहा (मी नेहमी उडुपी उपहार, कोरमंगला इथे हा खाल्लेला आहे, इतर ठिकाणी कसा मिळतो मला कल्पना नाही.) तर एकदा खायला छान मिळतेय म्हणल्यावर 'मेरा दिल खुश हुवा...' इथे जागो-जागी फ्रूट-डिशेस आणि जुसेस च्या गाड्या आणि दुकाने असतात. कॉर्नर-हाउसचे आईस-क्रीम युनिक असते. भुट्टे आणि शहाळ्यांची रेलचेल असते. पाणी-पुरीच्या गाड्याही दिसतात. बेंगलोरमध्ये काही चटक-मटक खायची इच्छा झाली तर फक्त पाणी-पुरीवालेच तुमच्या कामी येऊ शकतात. पाणी-पुरी बरी असते. बाकी भेळ वगरे स्वतःच खून अनुभव घ्यावा. इथे भेळेत चिंचेचे पाणी वगरे घालायची भानगड नसते. लिंबाचा रस आणि चाट मसाला हेच काय ते चवीला घालतात. बाकी काकडी आणि गाजर हे  भेळेतले  महत्त्वाचे पदार्थ आहेत असे बेंगलोरमध्ये जन्मास आलेल्या प्रत्येक माणसाचे ठाम मत असणार कारण भेळेत काकडी-गाजर नाही असे पाहायला मिळणे अशक्य आहे. तेही काही वाईट लागत नाही. पण भेळेसारख्या चटकदार पदार्थात काकडी-गाजरासारखे सभ्य-गुणी सदस्य शोभूनच दिसत नाहीत. असो. बेंगलोरमध्ये पाव-भाजी, सामोसा, वडा-पाव असले चमचमीत पदार्थ मिळण्याची अपेक्षा जिभेने अजिबात ठेऊ नये...हे पदार्थ घेतलेच तर ते इतके पथेटिक लागतात की का घेतले असे वाटते.
    बेंगलोरला माझ्या मते दोनच ऋतू असतात पावसाळा किंवा अ-पावसाळा. बाकी इथे प्रत्येक दिवशी थंडी आणि उन्ह ह्यांचा खेळ चालू असतो. वर्षाचे अनेक महिने पाऊस थोडा-थोडा पडत असतो. आत्ता सूर्य दिसतोय, जरा उबदार वाटतंय तर ५ मिनिटांनीही तसेच वाटत असेल ह्याची खात्री नाही. हवामान असे आहे की पंखा तसा इथे लागतच नाही पण इकडे सर्दी-खोकला-ताप हे चारी ठाव पाव्हणे असतात.
     बेंगलोरची तारीफ करण्यासारखी गोष्ट म्हणजे इथली बस सेवा. वेल-कनेक्टेड, वेल-ऑर्गनाईझ्ड! प्रत्येक रूटवर एस-टी, एशिआड, शिवनेरी वगरेसारख्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बसेस धावत असतात. तुमच्या गरजेनुसार, तुमच्या खिश्याला परवडेल अशी बस निवडण्याची सोय तुम्हाला मिळते (पुण्यात गर्दी-उशीर ह्यांमुळे असंख्य लोक बसने जाण्याची हिम्मतच करत नाहीत). 
    पण   पुण्याचे ट्राफिक काय असे बेंगलोरचे ट्राफिक आहे. काही सिग्नल्स मध्ये लोकांना अर्धा अर्धा तास अडवून ठेवण्याची क्षमता आहे. आमच्याच घराच्या इथला सिग्नल एकदा लागला की तो सुटेपर्यंत गाड्या एकामागे एक थांबत जातात त्या पार पाव किलोमीटर पर्यंत उभ्या असतात. १० किलोमीटरचे अंतर पार करायलाही माणसाला १-१.५-२ तास लागू शकतात. शहराच्या आतून पुण्याला जायला बस निघाली की ती किमान २-२.५ तास आधी बेंगलोरमध्येच असते! भरीस बेंगलोरच अवाढव्य आकार. केवढे मोठे आहे बेंगलोर. बेंगलोरसमोर पुणे म्हणजे मला हत्तीसमोर उंदीर वाटायला लागले आहे. बेंगलोरचा  मध्य पकडला तर किमान २५ किलोमीटर त्रिज्येवर (रेडिअस) सर्व बाजूंनी बेंगलोर पसरलेले दिसेल. पुण्याची व्यास (डायमीटर) तरी एवढी आहे का? त्यामुळे बेंगलोरच्या उत्तरेकडील भागात जायचे म्हणजे पुण्याहून मुंबईला जाण्यासारखे होते.
     बेंगलोरला गार्डन सिटी म्हणतात. बेंगलोर हे नाव अगदी सार्थ ठरवते. इथे जागो-जागी छोट्या-मोठ्या बागा आहेत, छान मेंटेन केलेल्या, सुंदर...झाडांचीही संख्याही बरी आहे. गार्डन सिटी बरोबरच बेंगलोरला लेक (तलाव) सिटी म्हणायला हवे. गूगल वरून नकाशा पहा बेंगलोरचा असंख्य तलाव दिसतील तुम्हाला.
     बेंगलोरमध्ये लोकांना मिठाईसाठी वेगळी दुकाने काढणे परवडत नाही बहुतेक. मिठाई ही बेंगलोरमध्ये बेकरीत किंवा फार तर फार हॉटेलमध्ये मिळण्याची गोष्ट आहे. तसेच इथे डेअरीज (जिथे ताजे ताजे दुधाचे पदार्थ मिळतात)  पण फार दिसत नाहीत. एक नंदिनी नावाची कात्रज सारखी मोठ्ठी डेअरी आहे. त्यांचे packed पदार्थ मिळतात. म्हणजे खावा, लोणी वगरे सगळा packed घ्यायचे. एखाद्या मॉलमध्ये कधीतरी एखादी ताजे दुधाचे पदार्थ विकणारी डेअरी सापडते. चक्का तर इथे बहुधा तयार होत नाही. पाव-भाजीचा पाव ही इथे दुर्मिळ गोष्ट आहे. लोकांना पाव-भाजी खायला बोलवायचे असेल तर गणपतीसाठी पत्री गोळा करत हिंडावे तसे वेगवेगळ्या दुकानांतून एक-एक, दोन-दोन पाव लाद्या गोळा करत फिरावे लागते. दूध मसाला आहे का (एवरेस्ट कंपनीचा दूध मसाला महाराष्ट्रात सगळीकडे मिळतो) विचारल्यास मसाला दूध हवे आहे का असे उत्तर मिळते. केशर, मटकीसारख्या गोष्टी आणायला मॉल मध्ये जावे लागते. 
     बेंगलोरमध्ये इंग्लिशमधून शिक्षणाची इतकी क्रेझ आहे की जास्तीत जास्त लोक मुलांना इंग्लिश मिदिम मध्येच घालतात. आमच्या बाईचेच इदाहरण घ्या. नवर्याने सोडलेली, ३ मुलांची आई असलेली न वडलांनी घरात आसरा दिलेली बाई...कसे-भासे पोटभरीला पैसे मिळतात, पण मुलगा इंग्लिश मिडीअम मध्ये शिकतो. मुली कन्नड मिडीअम मध्ये आहेत पण त्यांना स्पेशल क्लास लावलेला आहे इंग्लिशसाठी!
इथले  रस्ते पुण्यासारखेच घाणेरडे आहेत, corruption हे पुण्याच्या थोबाडीत मारेल एवढे जास्त आहे. काही दुकानदारांना चितळ्यानएवढाच माज आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या ही पुण्यापेक्षा कितीअरी जास्त आहे (प्युरीफायर वाल्यांचा धंदा उत्तम चालतो.)
     आधीच म्हणल्याप्रमाणे बेंगलोर हे पुण्याचेच एक मोठे version आहे. त्यामुळे, आपली मराठी, आपली माणसे, आपला वडा-पाव सोडले तर पुण्याला फारसे मिस करायची वेळ येत नाही...म्हणूनच इथून आलेल्या माणसांनाही बेंगलोरला 'नम्म बेंगळूरू:आमचे बेंगळूरू' म्हणावेसे वाटल्यास नवल नाही.