Saturday, November 17, 2012

चैतन्यदायी हिवाळा

     मागील एका पोस्टमध्ये म्हणल्याप्रमाणे उन्हाळ्याचे कौतुक मला बंगलोरला आल्यावर वाटू लागले. पण हिवाळा मात्र मला लहानपणापासूनच खूप आवडतो. पहाटेची गुलाबी थंडी, नंतर कोवळ्या उन्हामुळे मिळालेली ऊब, दुपारच्या वेळी रजईत घुसून काढलेली छोटीशी झोप, संध्याकाळी थंडगार हवेतून मारलेली एक चक्कर आणि रात्री एकही फट न राहील अशा पद्धतीने पांघरूण घेऊन, अंग मांजरीसारखे चोरून घेऊन झोपेत रममाण होणे! दिवसाच्या प्रत्येका प्रहराचा आनंद घरबसल्या लुटू देणारा हिवाळा...
     तशी हिवाळा मला आवडायची इतरही करणे अनेक! माझा आणि दादाचा दोघांचा वाढदिवस आठवड्याभराच्या अंतराने डिसेंबरमध्ये येतो. त्यामुळे लहानपणी ह्या काळात घरात सतत उत्साहाचे वातवरण असायचे, जवळच्या नातेवाईकांची भेट व्हायची, आवडीचे पदार्थ खायला मिळायचे, भेटवस्तू मिळायच्या. ह्याच काळात शाळा-कॉलेजमध्ये स्नेह-संमेलन, क्रीडास्पर्धा, अल्पोपहार इत्यादी कार्यक्रम असायचे. त्यासाठीच्या तयाऱ्याही बरेच दिवस चालू असायच्या. त्यामुळे अनेक तास फ्री मिळायचे. अभ्यासाला सोयीस्करपणे विसरता यायचे. हे सगळे झाले की येणारी नाताळची सुट्टी म्हणजे हिंदीत 'सोने पे सुहागा' म्हणतात तसलीच गत!
     पुण्यातला सवाई गंधर्व महोत्सवही हिवाळ्यातलाच!  सबंध भारतातील नामवंत शास्त्रीय गायक-वादकांची कलाकारी सलग ३-४ दिवस कानांवर पडत राहण्यासारखे भाग्य ते रसिकांच्या वाट्याला आणखी कुठून यावे? फराळ-दिवे-फटाके घेऊन येणारी दिवाळी साजरी होऊन काहीच अवधी लोटल्यावर पुन्हा निरनिराळ्या रागांचा फराळ, स्वराविष्काराचे दीप आणि तानांची आतिषबाजी घेऊन येणारा सवाई गंधर्व महोत्सव म्हणजे गानरसिकांसाठी स्वरमयी दिवाळीच..
     तिळगुळ आणि गुळाच्या पोळ्यांचा खुराक घेऊन येणारी संक्रांतही हिवाळ्यातलीच...भोगीच्या दिवशी भाकरी-वांग्याची भाजी आणि खिचडी खाताना येणारी मजा न्यारीच. शेतात बसून हुरडा खाण्याची मजाही हिवाळ्यातलीच...बोरे-हरभरे-उसाचे कांडे चुरामुर्यात घालून होणारे पोरांचे बोरन्हाणही हिवाळ्यातलेच...
     हिवाळ्यात थंडीमुळे भूकही मस्त लागते. गरमा-गरम जेवणाची काही वेगळीच मजा अनुभवायला मिळते. बाजारातही एकदम ताज्या, टवटवीत भाज्या मिळतात. रसरशीत भाज्यांनी भरलेले भाजीचे दुकान पाहूनच मनाला एकदम समाधान मिळते. निरनिराळ्या फळांचीही रेलचेल असते. सफरचंदे, संत्री मोसंबी, चिकू, डाळिंबे, ताजी केळी अशा रंगीबेरंगी फळांनी फळबाजारही खुलून येतो. फ्रूट -सलाड बनवण्यासाठी सर्वोत्तम ऋतू हाच! गाभुळलेल्या चिंचा, बोरे, आवळे, हरभरे असा मेवाही हिवाळ्यातच मिळतो.
     कॉलेजमध्ये गेल्यावर फिरोदिया करंडक हिवाळ्याचा पदर धरून हजर व्हायचा. तालमी सुरु होण्याआधीच्या खुसखुशीत चर्चा, मग दिवस-दिवसभर तालमी, मग फिरोदिया तोंडावर आल्यावर सुरू होणार्या रिहर्सल्स, बॅकस्टेज-वेशभूषा ह्यांसाठी सामानाची जमवा-जमवी, त्यांसाठी मारलेल्या चकरा...आणि प्रत्यक्ष सादरीकरणाचा अविस्मरणीय अनुभव...फिरोदियानंतर अनेक दिवस कॉलेजमध्ये न माहित असलेली लोकसुद्धा येऊन 'काम आवडल्याचे' सांगून जायची. नंतरचे अनेक दिवस तालमींच्या, प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी झालेल्या गंमती-जंमतींच्या  आठवणींमध्ये रमण्यात जायचे.
     हिवाळा ऋतू हा भटकंतीसाठीही आयडियल! पाऊस नुकताच होऊन गेल्यामुळे जिकडे-तिकडे हिरवेगार असते पण पाऊस पडत नसल्याने जमीन निसरडी असण्याचीही भीती नाही. उन्हाने लाही होण्याची भीती नाही. हवेतही एक प्रकारचा तजेला असतो. दक्षिणेतल्या बर्याच पर्यटन स्थानांची प्रिफर्ड टायमिन्ग्जही सप्टेंबर ते मार्च हीच असतात.
     खाद्य, गायन-वादन-नृत्य, पर्यटन अशा चौफेर मजेचा बम्पर धमाका घेऊन येणारा हिवाळा आता सुरु होतोय. बंगलोरमध्ये गेल्या दोन वर्षांत तरी हिवाळ्यात विशेष थंडी पडली नव्हती. आता ह्यावरून मी बंगलोरचे हिवाळे जास्त थंड नसतात असा निष्कर्ष काढून तुम्हाला सांगितला तर नेमकी  ह्यावर्षीच कडाक्याची थंडी पडून मला खोट्यात पडेल. त्यापेक्षा कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड, थंडीची वाट पाहत ह्यावर्षीच्या हिवाळ्याचे मी मनापासून स्वागत करते. माझ्याप्रमाणेच हिवाळा मनापासून आवडणाऱ्या स्वर्वांना माझ्यातर्फे 'हिवाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! पुण्यात असलेल्या रसिकांना शास्त्रीय गायनाची मेजवानी मिळो, भटकायला आवडणाऱ्या लोकांना खूप भटकायला मिळो, शाळा-कॉलेजमध्ये असलेल्यांना स्नेह-संमेलनाचा भरपूर आनंद लुटता येवो, ताज्या भाज्या, फळे आणि कडकडीत भूक लागल्याने अन्नावर मारलेला ताव ह्यामुळे सर्वांचे आरोग्य सुधारो, संक्रांतीला भरपूर तिळगुळ-गुळाच्या पोळ्यांचा आनंद सर्वांना लुटता येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

Friday, October 19, 2012

मला आवडलेले काही इराणी सिनेमे



गेल्या काही दिवसांत मी काही इराणी सिनेमे पाहत होते. हे सिनेमे इतके छान होते की कुठेतरी त्यांच्याबद्दल नमूद करून ठेवावे असे मला वाटले आणि मी ही पोस्ट लिहायला बसले. आर्ट फिल्म्सची आवड असलेल्या लोकांनी हे सिनेमे जरूर पहा.

चिल्ड्रन ऑफ हेवन: ही गोष्ट आहे अली आणि झहरा  ह्या अतिशय गरीब कुटुंबातील लहान भावा-बहिणीची. अली चुकून आपल्या बहिणीचे बूट हरवतो. पण वडिलांकडे नवे मागावेत अशी त्यांची परिस्थिती नसते. तेव्हा अलीचेच बूट आलटून पालटून वापरायचे त्यांचे ठरते. झहराची शाळा सकाळची असते आणि अलीची दुपारची. शाळेतून येता येता वाटेत झहरा अलीला बूट द्यायची आणि अली ते घालून शाळेत जायचा. ह्या प्रकारच्या अरेन्जमेंटमध्ये त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते? झहाराला वेगळे बूट कधी मिळतील का की त्यांना कायमच एकाच बूटवर काम भागवावे लागणार  का? ह्या प्रश्नांची उत्तरे ही कथा अतिशय वेधक पद्धतीने देते.

कलर ऑफ पॅरडाइझ: महंमद  नावाचा एक लहान आंधळा मुलगा असतो. तो अतिशय हुशार, गुणी असतो. तो अंध मुलांच्या निवासी शाळेल शिक्षण घेत असतो. पण महंमदच्या वडिलांना आपल्या ह्या आंधळ्या मुलाची लाज वाटत असते, तो आपल्यावर ओझे बनून राहील आणि शेवटी आपल्या म्हातारपणी तसाही आपल्याला त्याचा काहीच आधार मिळणार नाही ह्या कल्पनेने ते त्याला आपल्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करीत असतात. महंमदच्या आजीचे मात्र याच्यावर फार प्रेम असते. तिला त्याच्या वडिलांनी त्याला असे दूर ठेवणे आवडत नसते. महंमद आपल्या आंधळेपणावर कशी मात करतो? आंधळा असूनही तो आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे कसा पाहतो? त्याचे वडील त्याला जवळ करतील काय? आपल्याला देवाने सगळे काही दिलेले असताना आयुष्याविषयी सतत कुरकुरणाऱ्या आपल्यासारख्या माणसांसमोर त्या निरागस मुलाच्या समस्या मांडून आपले डोळे उघडण्याचे काम हा सिनेमा करतो.

व्हेअर इज द फ्रेंड'स होम?: अहंमदच्या मित्राची गृहपाठाची वही एकदा चुकून अहंमदच्या दप्तरातून घरी येते. दुसर्या दिवशी शिक्षकांनी गृहपाठ पूर्ण करून आणायला सांगितलेला असतो. अहंमदच्या मित्राने त्याच दिवशी गृहपाठ पूर्ण केला नसल्याने परत तसे झाल्यास मित्राला शाळेतून काढून टाकण्यात येईल असे शिक्षकांनी खडसावून सांगितलेले असते. त्याची वही आपल्या घरी आल्याने उद्याही मित्र गृहपाठ पूर्ण करून देऊ शकणार नाही आणि त्यामुळे त्याला शाळेतून काढले जाईल ह्याची भीती अहंमदला वाटते. पण आपल्या मित्राचा पत्ताही त्याला माहिती नसतो. अहंमद वही परत करण्याच्या उद्देशाने घरून निघतो. त्याला मित्राचे घर सापडते का? घर शोधण्याच्या कामात काय काय अडथळे येतात? इत्यादी प्रश्नांची उत्तरे देता देता हा सिनेमा मोठ्या माणसांची लहान मुलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती, लहान मुलांशी मोठी माणसे कशी वागतात इत्यादी गोष्टी हायलाईट करतो. 'मित्राची वही त्याला कशी द्यायची?' हा अहंमदला पडलेला साधासा प्रश्न पूर्ण १-१.५ तास आपल्याला स्क्रीनसमोर खिळवून ठेवतो.

द व्हाईट बलून: सगळीकडे नववर्षाच्या स्वागताची तयारी चालू असते. बाजार विविध आकर्षक वस्तूंनी भरलेला असतो. रझियाला बाजारात गोल्ड फिश दिसतो आणि तो तिच्या मनात बसतो. गोल्ड फिश आणावा म्हणून रझिया भावाच्या मदतीने आईला कसे बसे पटवते. आई रझियाला पैसे देते. पण नुसते पैसे मिळून काही रझियाचे काम होत नाही. वाटेत बर्याच घटना घडतात. त्या पैशाचे काय होते? रझियाला गोल्ड फिश मिळतो का? विषय साधासा, पण आपल्याला सिनेमा संपल्याशिवाय जागेवरून हालावेसे वाटत नाही.

ह्या सर्व सिनेमांमधले कॉमन फॅक्टर्स म्हणजे ते सर्व लहान मुलांशी निगडीत आहेत. सर्व मुले अप्रतिम अभिनय करतात. तशी सर्वच पात्रे सुरेख, नैसर्गिक अभिनय करतात. कोणीच वेगळा आवाज, वेगळी स्टाईल अशा कृत्रिम साधनांचा वापर करायला जात नाही. उगाच गाणी नाहीत. कुठेही भडकपणा नाही. त्यांना कमर्शिअल करायचा कुठेही प्रयत्न केलेला नाही. समाजातील विविध लोक, त्यांचे राहणीमान, त्यांचे आचारविचार, समस्या इत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी सिनेमाचा वापर माजीद माजिदी, जाफर पनाही, अब्बास कियारुस्तमी ह्या दिग्दर्शकांनी  इथे फार उत्तम प्रकारे केलाय असे मला वाटते.

Monday, September 17, 2012

चित्रकला आणि मी

नमस्कार मंडळी! लेखाच्या शीर्षकावरून जर मी माझ्या चित्रकलेतल्या वेगवेगळ्या प्रयोगांबद्दल लिहिणार आहे असा कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो मला सुरवातीलाच दूर करायला हवा. हा लेख माझ्या चित्रकलेतल्या प्रयोगांविषयी नाही तर मी चित्रकलेत लावलेल्या दिव्यांविषयी आणि चित्रकलेमुळे मला ज्या दिव्यांमधून जावे लागले त्यांविषयी आहे. कुठे ते दीपक राग आळवून महाल दिव्यांनी तेजोमय करून टाकणारे मियाँ तानसेन, आणि कुठे शाळेच्या चित्रकलेच्या वहीत दिवे लावणारी मी. असो...

तशी चित्रकलेविषयीची माझी पहिली आठवण म्हणजे मी सुमारे ४-५ वर्षांची असताना फळ्यावर काढलेली रिक्षा. हवेत उलटी लटकत असल्यासारखी ती रिक्षा पाहून आईने मला विचारले की, "ही अशी का बरे काढली आहेस?" तेव्हा मी म्हणाले की "अगं, हा फळा म्हणजे एक रस्ता आहे आणि ती रिक्षा त्यावरून खाली येते आहे. म्हणून ती अशी उलटी दिसत आहे." आता ह्यावर ती माऊली काय म्हणणार सांगा? बाकी बालवाडीतली माझी कलेची वही माझ्याकडे कित्येक वर्षे होती. ती मला खूप आवडायची. त्यातले स्प्रे पेंटिंग, ठसे काम, चिकट काम इत्यादी गोष्टींवर "छान" असा बाईंनी दिलेला शेरा पाहून मला नेहमीच मस्त वाटायचे. त्यामुळे तशी चित्रकलेविषयी भीती निर्माण होण्यासारखे अजून काही घडले नव्हते.

किंबहुना इयत्ता तिसरीत असताना "सकाळ" तर्फे घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत  "देखावा" हा विषय आला होता. नेहमीचेच ते त्रिकोणी डोंगर, त्यातून निघणारी वाकडी तिकडी नदी, पिझ्झ्याच्या कापासारखा दोन त्रिकोणी डोंगरांच्या मधून डोकावणारा तो सूर्य, एक झाड आणि एक घर असा देखावा काढण्याऐवजी जरा वेगळे काहीतरी करावे असे माझ्या अचानक डोक्यात आले. आणि मी डोंगरावर वेगवेगळी दुकाने काढून त्यांना आमच्या गल्लीतल्या पुना जनरल स्टोअर्स, मातोश्री किराणा मालाचे दुकान, श्री हार्डवेअर, सामंत खाऊवाले अशा दुकानांची नावे दिली. लहान मुलांची बाग काढून त्यात काही मुले वगरे काढली. माझ्या ह्या "आउट ऑफ द बॉक्स" थिंकींगसाठी परीक्षकांनी मला उत्तेजनार्थ बक्षीसही दिले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी असे हे गंमतशीर चित्र लोक अगदी कुतूहलाने पाहत होते. चित्रकलेसाठीचे ते पहिले बक्षीस घेताना मला स्वतःचा फारच अभिमान वाटला होता. 

बाकी इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शाळेत चित्रकला नावाचा वेगळा विषय होता की नाही ते मला आता लक्षात नाही, पण चित्रकलेचा तास आणि त्यासाठी खास नेमलेला शिक्षक हा प्रकार तरी तोवर नक्कीच नव्हता. खरी पंचाईत सुरु झाली ती पाचवीत असताना. पाचवीत चित्रकला नावाचा स्वतंत्र विषय आला आणि माझ्या आयुष्यातले कितीतरी क्षण अतिशय कष्टप्रद व्हावेत ह्याची त्याने पुरेपूर काळजी घेतली.

सुरवातीसुरवातीला मला चित्रकला या विषयाबद्दल फार उत्सुकता वाटत होती. जलरंगांची नवीन पेटी, ब्रश आणि छानशी वही, वा काय मजा आहे! पण सगळ्या रंगाचा बेरंग झाला जेव्हा चित्रकलेच्या सरांनी वहीत काढायच्या चित्रांविषयी माहिती द्यायला सुरवात केली. पहिला विषय होता रंगचक्र!  पानावर मोठेसे वर्तुळ काढून, त्यात काही ठराविक पद्धतीने एक त्रिकोण काढायचा. मग तसाच अजून एक उलटा त्रिकोण काढायचा की तयार होते एक चांदणी. तिच्या एक सोडून एक अशा तीन कोनांमध्ये मूळ रंग म्हणजे लाल, पिवळा, निळा भरायचे आणि मग उरलेल्या कोनांमध्ये ह्यातले दोन दोन रंग एकत्र केले की तयार होणारे दुय्यम रंग म्हणजेच केशरी, हिरवा आणि जांभळा भरायचे. अरे बापरे! हे कसले चित्र? आजसारखी त्या जमान्यात तोंड वर करून मनाला येतील ते प्रश्न सरांना विचारायची सोय आणि हिंमत दोन्हीही मुलांच्यात नव्हती. बरे कोणी हिम्मत करून असले प्रश्न विचारले तर त्यांची चांगलीच तासंपट्टी  व्हायची. मला मान्य आहे की ह्या रंगचक्राने कोणते रंग एकत्र मिसळले की काय होते वगरे ह्याची मुलांना ओळख होते. पण ते समजावण्याच्या लहान मुलांना आवडतील अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर तेव्हा केला जात नव्हता. मॉंटेसरी हा शब्द जरी लोकांना माहिती असला तरी मॉंटेसरीबाईंच्या शिकवण्याच्या पद्धतीचा अवलंब मात्र आपल्याकडे फारसा केला जात नसे. असो, तर हे झाले रंगचक्राबद्दल!

असाच अजून एक विषय म्हणजे स्टील लाईफ! ह्यात एका विचित्रशा रंगाचे टेबल क्लॉथ घातलेल्या टेबलावर बादली, तांब्या, सफरचंद अशा एकमेकांशी फारसा संबंध नसलेल्या वस्तू रचून ठेवलेल्या असतात आणि त्यांचे चित्र काढायचे असते. मुळात ह्या अशा वस्तू टेबलवर अशा एकत्र का ठेवायच्या? बादली आणि तांब्या हे दुसरेच काहीतरी सूचित करणाऱ्या वस्तूंसोबत सफरचंद टेबलवर ठेवल्यास आईच मुळात कशी ओरडेल? इत्यादी विचार मनात येऊन माझे मन सर काय सांगत आहेत ह्यापासून विचलित होत असे. आता ह्या स्टील लाईफसारख्या विषयातूनही ज्यांना पुढे जाऊन चांगले चित्रकार बनायचे आहे त्यांना खूप काही शिकता येते हे मी ऐकले आहे, पण ज्यांनी नुकतीच चित्रे काढायला सुरु केली आहेत अशा लहान मुलांना ह्या पद्धतीने कलेविषयी आवड निर्माण होण्यापेक्षा, घृणा निर्माण होऊ शकते ह्याचे मी हे एक जिवंत उदाहरण आहे. पुढे असेच अनेक निरस, चमत्कारिक विषय आले आणि गेले. आणि अशा प्रत्येक विषयासोबत माझी चित्रकलेविषयीची आसक्ती पार निघून गेली. नाही म्हणायला कोलाज, किंवा मनाचे चित्र असे विषय मला जरासा दिलासा द्यायचे तेवढेच काय ते. 

               चित्रकलेची वही पूर्ण करणे हा कार्यक्रम मला निबंधाची वही पूर्ण करण्याइतकाच भयंकर वाटे. वर नमूद केलेले चित्रविचित्र विषय वर्गात समजावून झाले की  ते तेव्हाच्या तेव्हा वहीत काढणे अपेक्षित असे. परंतु नावडती कामे पुढे ढकलण्याच्या मानवी प्रवृत्तीला अनुसरून, मी ती वही तपासायला द्यायची तारीख जवळ आल्याशिवाय हातातच घ्यायची नाही. किंबहुना बऱ्याचदा, वही द्यायच्या आदल्या दिवशी मनाचा हिय्या करून मी ती पूर्ण करायला बसत असे. मग त्या दिवशी शाळेतून आल्यावर काढायच्या ४-५ चित्रांची यादी, वही, रंग, ब्रश, पाणी, फडके असा पसारा मांडून बसायचे. प्रत्येक चित्र काढून, जलरंगांनी रंगवायला आणि मग ते वाळवायला, किमान दीड-दोन तास तरी लागायचे. ह्या पद्धतीने ४-५ चित्रे काढायची म्हणजे ८-१० तास तरी लागणार आणि तेवढा वेळ एका दिवसात मिळत नसतो एवढा हिशोब करायची बुद्धीही तेव्हा नव्हती.

साहजिकच एकेका चित्रानंतर, घड्याळाकडे लक्ष गेले की टेन्शनने चेहरा लाल होऊ लागायचा. आधी "अचानक हिला काय झाले?" असे वाटून घरचे चौकशी करायचे. पण मग "चित्रकलेची वही पूर्ण करायची आहे" असे सांगितल्यावर "एवढेच ना? नेहमीचेच आहे" असे म्हणून ते लक्ष काढून घ्यायचे. एखाद्या चित्राला दोनच्या जागी तीन तास लागले की धीर अजूनच खच्ची व्हायचा. तिसरे चित्र पूर्ण होईस्तोवर डोळ्यात पाणी जमा व्हायचे. समोरची वही धूसर दिसायला लागायची. डोकेही काम करायचे सोडून दुसऱ्या दिवशी वर्गात कशी बोलणी खावी लागणार ह्याविषयी विचार करू लागायचे.

दादा चित्रकलेतला चांगलाच जाणकार होता. साहजिकच उरलेल्या चित्रांसाठी मदत करण्यासाठी, त्याच्याकडे गयावया करण्यावाचून गत्यंतर उरायचे नाही. तोही भाव खात, वरती कॉटवर बसून, साहेबासारख्या सूचना देऊ लागायचा. पण त्याच्या आणि माझ्या चित्रकलेच्या आकलनात इतका फरक होता, की तो मदत करायला लागला की दिलासा वाटण्यापेक्षा, तो सांगेल त्या गोष्टी वहीत नीट न उतरवता आल्याने, जास्तच वेळ लागायला लागायचा, जास्तच ताण निर्माण व्हायचा. मग डोळ्यात उभ्या राहिलेल्या गंगा-जमुनांना वाट फुटायची. माझे आणि त्याचे कडाक्याचे भांडण व्हायचे. 'मी सांगितलेले पटत नाही तर मग येतेस कशाला माझ्याकडे रडत दरवेळी...पुढल्या वेळी अजिबात यायचे नाही माझ्याकडे!' असा पेटंट डायलॉग मारून तो दिमाखात खोलीतून निघून जायचा. मग उरलेली चित्रे कशीतरी खरडून चित्रकलेची वही रात्री उशिरा दप्तरात कोंबली जायची.

दर तपासणीच्या वेळी हा प्रसंग देजावूसारखा वारंवार घडायचा. आता ह्या सगळ्या युद्धप्रसंगांना कारणीभूत ठरणाऱ्या चित्रकलेच्या वहीला, मी फार प्रेमाने जपले असते का? नक्कीच नाही. ती माझ्या अभ्यासाच्या सामानात कशीही पडलेली असायची. त्यामुळे ती पोथीसारखी खिळखिळी व्हायची. 'सगळ्यात अव्यवस्थित वही' म्हणून सरांनी माझी वही वर्गासमोर नाचवल्याचे मला अजूनही स्मरते. अशी नामुष्कीची वेळ बाकी कोणत्याच विषयाने माझ्यावर कधीच आणली नाही. त्यामुळे चित्रकलेशी असलेल्या माझ्या वैरात भरच  पडत गेली.

               तशी माझी चित्रकला फार वाईट नाही. बऱ्याचदा माझ्या चित्रांना सरासरीपेक्षा जास्त गुण मिळायचे. इंजिनीरिंग ग्राफिक्स ह्या अवघड समजल्या जाणाऱ्या, ड्रॉईंगशी संबंध असणाऱ्या विषयातही, माझा मी अभ्यास करून मी चांगले मार्क्सही मिळवले. तुम्हाला पिक्टोरिअल नावाचा खेळ माहितीये का? दम शेराझचा चुलत भाऊ? आलेल्या शब्दावर अभिनय करून दाखवण्याऐवजी ह्यात चित्र काढून दाखवायचे असते. तर ह्या पिक्टोरिअलमध्ये मला नेहमी चांगले पॉईंट्स मिळतात. किंवा मुले गोष्टी सांगताना माझी मला बऱ्याचदा तर्हेतर्हेच्या पात्रांची चित्रे काढून दाखवायला सांगतात. तीही त्यांना पटतील अशा पद्धतीने मला काढता येतात. इतरांनाही ती आवडतात.  ह्या चित्रांमध्ये केसरी चित्रपटातले अक्षय कुमारने केलेले पात्र हविलदार इशर सिंघ, पीटर रॅबिट हा ससा, त्याच्या मागे लागणारे मिस्टर मॅकग्रेगोर हे दुष्ट शेतकरी आजोबा, फ्रँकलिन हे कासव, शार्क्स, डायनासोर्स अशा तर्हेतर्हेच्या गोष्टींचा समावेश असतो.

पण 'रॉक ऑन' मधले 'मेरी लॉन्ड्री का इक बिल इक आधी पढी नॉवेल....टा णा णा णा णा, टा णा णा णा णाह्या गाण्याची सही न सही नक्कल करता आली म्हणजे त्या माणसास गाणे येते हे म्हणणे जितके मूर्खपणाचे ठरेल तितकेच 'मला चित्रकला येते' हे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. शास्त्रीय गाण्याचा कान नसलेल्या माणसाला किशोरीताईन्च्या किंवा भिमण्णान्च्या गाण्याला लोक इतके का मानतात हे समजत नाही. चुकून माकून हे लोक मैफिलींना आले तर गाण्याला नक्की दाद कुठे द्यावी?” हे त्यांना काळत नाही, तसेच चित्रकलेच्या बाबतीत माझे आहे.

'एम. एफ. हुसेनची चित्रे इतकी प्रसिद्ध का?' हे काही आज तागायत मला समजलेले नाही. बरे एम. एफ. हुसेन, हे काही ना काही कारणांनी सतत चर्चेत असायचे त्यामुळे तेवढ्याच एका भारतीय चित्रकाराचे नाव मला माहिती होते! मोनालिसाचे हास्य इतके प्रसिद्ध का हेही मला आजतागायत समजलेले नाही. हेही चित्र माहिती असण्याचे कारण कोणते? ते म्हणजे 'परमसुंदरी' सारख्या आयटम नंबर्समधल्या 'कभी लगे मोना लिसा, कभी कभी लगे लोलिता, और कभी जैसे कादंबरी' ह्या सारख्या मजेदार ओळींमुळे. प्रभुदेवाच्या 'मुकाबला सुभानल्ला' ह्या हिट गाण्यातल्या 'पिकासो की पेंटिंग मेरा पिछा पकड के टेक्सास पे नाचे मिलके' ह्या मला अजूनही अर्थ न कळलेल्या ओळीमुळे पिकासो हा एक चित्रकार असावा आणि त्याची पेंटिंग्स प्रसिद्ध असावीत असे मला माझ्या बालपणी कळले आणि ह्या माणसाविषयी अजूनही मला तेवढीच माहिती आहे.

असो, चित्रकलेविषयीचे माझे हे पाल्हाळ असे कितीही वेळ चालू राहू शकते. पण सांगायचा मुद्दा असा की दहावी झाली तेव्हा, पुढे विज्ञानाकडे जायचे असल्याने इतिहास, भूगोल, मराठी हे विषय सुटल्याचा मला जितका आनंद झाला होता ना, तितकाच आनंद चित्रकला सुटल्याचा झाला. पण आयुष्यातली ५-६ वर्षे कटू आठवणी देऊन गेलेला हा विषय, त्याचे तास, त्याची ती वही, मी आयुष्यात कधीच विसरणार नाही हे मात्र नक्की!

Sunday, June 24, 2012

कर्जतची वारी

    फार पूर्वीची गोष्ट आहे. १०-१२ वर्षांची असेन. माझी मावशी तेव्हा कर्जतच्या कॉलेजमध्ये शिकवत असे. कॉलेजला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की कॉलेज सुरु होईस्तोवरचे १-२ महिने तिला अधून मधून नुसती सही करायला कॉलेजला जावे लागायचे. माझ्याही सुट्ट्या चालू असल्याने ती मला कधीतरी सोबत घेऊन जायची. एक दिवस फुल टाईमपास!
    कर्जतला पहिल्यांदा जाताना मावशीने माझ्यासाठी ७ रुपयांचे ट्रेनचे तिकीट घेतल्याचे आठवते. साधे २ की.मी.वरील शाळेत जाण्यासाठी २.५-३ रुपयांचे तिकीट आणि एवढ्या लांब असलेल्या कर्जतला जायला फक्त ७ रुपयांचे हे पाहून मला तेव्हा खूपच आश्चर्य वाटले होते. तसे ट्रेनने आम्ही फार जा-ये करत नसल्याने ट्रेनची भाडी ही अंतरांच्या मानाने अशीच असतात ह्याची मला कल्पना नव्हती.
ट्रेनमध्ये बसले की गिरणी चालू व्हायची. दाणे खा, भेळ खा, सरबत प्या. कर्जतच्या ट्रेनमध्ये एक कुल्फीवाला मावशीच्या ओळखीचा होता. त्याच्याकडे फार मस्त मलई कुल्फी मिळायची. योगायोगाने तिचीही किंमत ७ रुपयेच होती (त्यामुळे अजून लक्षात आहे) आणि चव अप्रतिम होती. इतक्या वर्षांत फार कमी वेळा तशी कुल्फी खायला मिळाली आहे.
    वाटेत येणारी स्टेशने मोजत, त्यांचा क्रम लक्षात ठेवत, काहीतरी कागदावरच खेळ खेळत आमचा वेळ मस्त जायचा. मावशीला ट्रेनची रोजची सवय असल्याने ती आणि मी ट्रेनच्या दारात बसूनही बाहेरच्या देखाव्याची आणि थंडगार वाऱ्याची मजा घ्यायचो. कर्जतच्या स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या दिवाडकरांच्या वड्यावर तव मारायचो. स्टेशनाच्या दाराशीच पानांच्या द्रोणांमध्ये जांभळे, करवंदे, कैरीच्या तिखट-मीठ लावलेल्या फोडी विकणाऱ्या कातकरणी असत. जांभळे-करवंदे मिटक्या मारत खात आम्ही कॉलेजचा रस्ता पकडायचो.
रस्त्याच्या बाजूने छोटी कौलारू घरे, नारळाची झाडे, छोटे नाले, नदी असे एकेक करून पार पडत कॉलेज गाठेपर्यंत गावात मावशीच्या ओळखीचे सोबतीचे शिक्षक, विद्यार्थी, प्यून अशी कितीतरी माणसे भेटायची. मावशीला उत्सुकतेने "ही कोण?" असे विचारायची. आपल्याला अचानक भाव मिळतोय हे पाहून मलाही जरा स्पेशल वाटायचे. कॉलेजमध्ये सही करणे ह्या मुळच्या कामाला जेमतेम ५ मिनिटे लागायची. सही झाली की परत स्टेशनाची वाट धरायचो. वाटेत एक नॉव्हेल्टीचे दुकान होते. तिथून मावशी नेहमी माझ्यासाठी बांगड्या, गळ्यातली, कानातली असे काहीतरी घेऊन येत असे. ह्या ट्रीपलाही माझ्या आवडीची एखादी वस्तू खरेदी केली जात असे. अशाच एका ट्रीपला मावशीच्या मैत्रिणीने जेवायला घरी बोलावून प्रेमाने जेऊ घातल्याचे मला आठवले. ह्यावेळी खाल्लेल्या तिच्या घरच्या काजूंची चव अजूनही माझ्या ओठांवर आहे.
    कसली घाई-गडबड नाही, खर्चाची-वेळेची चिंता नाही, स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल शंका नाही. सर्व प्रकारच्या चिंता सोबतच्या मोठ्या माणसावर टाकून केवळ आयुष्य एन्जॉय करण्याचे सुख लहानपणीच मिळते नाही!

Wednesday, June 6, 2012

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला शिमोगा

     मेमध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कुठेतरी फिरायला जावे असे आमचे ठरले. "कुठे जावे?", विचार सुरु झाला. शिमोग्याबद्दल बरेच ऐकले होते. "शिमोग्यालाच जाऊया मग!", आम्ही ठरवून टाकले. शिमोगा हा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यात जोग फॉल्स, अगुंबे वगरे बरीच पर्यटन स्थळे आहेत. आमच्याकडे दोनच दिवस होते. आधीच्या होम स्टेजच्या सुखद अनुभवामुळे राहण्यासाठी होम स्टेच पहायचा हे नक्की ठरलेले होते. शिवाय फार धावपळ न करता निवांत वेळ घालवावा अशी आम्हा दोघांचीही इच्छा होती. त्यामुळे आधी जागा निवडून मग होम स्टे शोधण्याऐवजी आधी चांगलासा होम स्टे शोधून मग जागा फायनलाइझ  करूया असे ठरले.
नेहमी प्रमाणे ब्लॉग्सच्या मदतीने शिमोग्याचा अभ्यास सुरु झाला. दर, एकंदरीत सोयी, रिव्यूव्ज ह्यांची चाळणी लावून अनेक होम स्टेजपैकी ३-४ होम स्टेजना शॉर्टलिस्ट केले. त्यांच्या मालकांशी झालेल्या टेलिफोनिक इंटरव्यूतून  'कोळवारा हेरीटेज होम स्टे' ची निवड केली गेली. बुकिंग झाले. बंगलोर-कुप्पळ्ळी ह्या रात्री १०.३० ला निघणाऱ्या बसचे बुकिंगसुद्धा झाले.
    पाहता पाहता जायचा दिवस उजाडला. ऑफिसची कामे आटोपून धावत पळत घरी आलो. औक्षणाचा कार्यक्रम पार पडला. जेऊन मॅजेस्टिक गाठले. आमची बस स्लीपर होती. के. एस. आर. सी. टी. च्या इतर बसेसप्रमाणेच ही बसही कम्फर्टेबल होती. छान झोप लागली. सकाळी ६ ला कुप्पळ्ळीच्या अलीकडे असणाऱ्या गडिकलला आम्ही पोहोचलो. तिथून होम स्टेला आम्हाला न्यायला होम स्टेचा मालक निश्चल आला होता. गडिकल  ते कोळवारामध्ये साधारण ७-८ कि. मी. चे अंतर आहे. रस्ता मस्त होता. छोटासा रस्ता, दोन्ही बाजूला नारळ-सुपारीच्या बागा, साहजिकच कोकणाची आठवण झाली.
     'कोळवारा हेरीटेज होम स्टे'  ही जागा अप्रतिम होती. मुळात १०४ वर्षे जुने असलेले हे घर त्या लोकांनी छान जतन केलेले आहे. कौलारू, लाकडी वासे असलेले घर, मध्ये अंगण, बाजूला पडवी, पडवीला लागून खोल्या...पण कुठेही भिंतीला एक पोपडा गेलेला नाही. भिंती पांढऱ्या रंगाने व्यवस्थित रंगवलेल्या, वाश्यांना साजेसे पॉलिश लावलेले! विजेच्या वायर्सही भिंतीवरून  न घेता वाश्यांवरून घेऊन त्यांना वाश्यांच्याच रंगाचे पॉलिश लावलेले असल्याने घराच्या सौंदर्यात कुठेही बाधा येत नव्हती. घरात फर्निचरही जुन्या पद्धतीचे पण चांगले दणकट होते.
कोळवारा हेरीटेज होम स्टे
 
घराच्या बाजूने कोकणासारखी नारळ-सुपार्यांची बाग. शिवाय घराभोवती असंख्य कुंड्यांतून रंगीबेरंगी फुलझाडे, शोभेची झाडे, बोन्साय कलात्मकतेने मांडलेली.  बागेत छोटी तळी, करंजी, दगडी टेबले आणि त्यांना लावलेल्या गवताने शाकारलेल्या छत्र्या..एका बाजूला जेवणासाठीचा ओपन हॉल. त्यात अनेक टेबले, टी. व्ही., वर्तमानपत्रे, कॅरम, डार्ट गेम,  लहान मुलांची खेळणी इत्यादीची सोय होती. तिथे टेबल टेनिसचीही सोय होती.
वडाचे  बोन्साय

जेवणाची जागा

 बागेत मागच्या बाजूला छोटासा नैसर्गिक तलाव आहे. पुढे जाऊन छोटा धबधबा आहे. पावसाळ्यात तलावात कोरॅकल (एका प्रकारची बोट) राईडची सोय केली जाते. बागेतच कॅम्प फायर ची सोय आहे. कोणाला रात्री तंबूत झोपायचे असेल तर तंबूही बांधून ठेवलेला आहे. अशाप्रकारे जुन्या-नव्याचा सुरेख संगम असलेला हा होम स्टे आम्हाला पाहता क्षणीच फार आवडला.
     आम्हाला मिळालेली खोलीही छान होती. छोटीशी, लाकडी दारे-खिडक्यांची, पुण्याच्या आजीच्या घराची आठवण आली. फ्रेश झाल्यावर गरमा गरम कॉफीवर तुटून पडलो. मग जवळच्याच एका छोट्याश्या टेकडीवर फिरून आलो. त्यानंतर गरमा गरम भरपेट नाश्ता झाला. मग नदीकाठी फिरून आलो. उन्हाळ्यामुळे ह्या नदीला पाणी कमी होते. त्यामुळे चक्क पायी नदीपार जाता येत होते, त्यामुळे पाण्यात न भिजता मस्त मजा घेता आली. होम स्टेवर परत येऊन थोडा वेळ कॅरम  आणि थोडा वेळ टेबल टेनिस खेळलो. आता मात्र पोटात कावळे ओरडायला लागले. परत जाऊन चविष्ट अन्नावर ताव मारला आणि तासभर मस्त झोप काढली.
     उठल्यावर कॉफी घेऊन होम स्टेच्या आजोबांसोबत बागेत एक चक्कर मारून आलो. वाटेत आमच्या जमीन किती आहे, कोणती झाडे आहेत,  बागेत किती लोक काम करतात अशा अनेक गप्पा झाल्या. आजोबांनीही घरची माणसे असल्यासारखी मोठ्या उत्साहाने सगळी माहिती दिली. चक्कर मारून अंगणात परत आलो आणि बागेतल्या टेबलावर बसून आजोबा आणि आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारल्या. मला थोडे फार कन्नड काळात असल्याचे ऐकून आजोबांना बरे वाटले. रात्री जेवण करून गाढ झोपून गेलो.

    सकाळी उठून आवरून झाल्यावर परत खादाडीची वेळ आली. कर्नाटकाच्या ह्या भागास मालनाड असे म्हणतात. त्यामुळे होम स्टेमध्ये मालनाड पद्धतीचे जेवण होते. अतिशय स्वादिष्ट आणि भरपेट असे जेऊन आम्ही अगदी तृप्त झालो. एक दिवसात डोसे, आप्पे, शाविगे (ओल्या शेवया) -नारळाचे गोड दूध, कडबू (भाताच्या गोळ्यासारखा पदार्थ), अक्की रोटी (तांदळाची भाकरी), रसम-हातसडीचा भात, मालनाड  पद्धतीची भाजी, ब्रेडचा अतिशय स्वादिष्ट असा हलवा, गुलाब जॅम, फ्रुट सलाड असे अनेक पदार्थ वात्सल्याने (निश्चलची बायको) आम्हाला प्रेमाने खाऊ घातले.
     आम्ही निघालो तेव्हा आजोबांचे डोळे भरून आले. मला पाहून त्यांच्या मुलीची त्यांना आठवण झाली असे ते म्हणाले. त्यामुळे एखाद्या मुलीची सासरी पाठवण करताना केले जाणारे सोपस्कार पार पाडून, आठवण म्हणून एक उदबत्तीचे घर देऊन त्यांनी आम्हाला निरोप दिला. आम्हालाही अतिशय जवळच्या माणसांपासून दूर जात असल्यासारखे वाटले.
     उरलेला दिवस आम्ही साईट सीइंगसाठी ठेवला होता. सगळ्यात आधी आम्ही कुवेंपू नावाच्या प्रसिद्ध कन्नड कवीच्या २५० वर्षे जुन्या घरास भेट दिली. तिथे त्यांनी वापरलेल्या वस्तूही ठेवलेल्या होत्या. नंतर कविशैल ह्या कुवेम्पुच्या स्मारकास भेट दिली. मग एका पारंपारिक दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या संग्रहालयास भेट दिली. तिथून श्रुन्गेरीच्या देवळात गेलो. नंतर अगुंबे आणि मग कुन्दाद्रीला भेट दिली. ही दोन्ही ठिकाणे सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहेत असे ऐकले होते. पण आम्ही दुपारीच्या तिथे पोहोचल्याने फारशी मजा आली नाही. मग आम्ही तीर्थहळ्ळी ह्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचलो. दुपारचे चार वाजले होते. आमची बस तिथून रात्री १० ला निघणार होती.
कविशैल
पुरातन वस्तूंचे संग्रहालय


 आधी आम्ही रसम मसाला, मालनाड पद्धतीचे कैरीचे लोणचे इत्यादी लोकल गोष्टींची खरेदी केली. मग टाईम पास म्हणून २-४ दुकानात शिरलो. एका दुकानात नारळाच्या काथ्यांच्या टोप्या, पर्सेस, बॅग्स आणि इतर कितीतरी वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या. मग एके ठिकाणी बसून मिल्क शेक प्यायले. एवढे सगळे करूनही तासभराच संपला होता. वेळ तर बराच उरला होता. "काय करावे?" असा वोचार चालू असताना वात्सल्याने इथे एक नदी आहे असे सांगितल्याचे आठवले. चालत चालत नदीकाठी गेलो. ह्या नदीत परशुरामाने आपली कुर्हाड धुतली होती अशी काहीतरी कथा ऐकायला मिळाली.
तुंगा नदीवरील सुंदर पूल
      नदीकाठी वेळ मस्त गेला. फोटो काढले, वाळूत नक्षीकाम केले, भेळ खाल्ली. ७.३० वाजता उठून बस स्थानकाकडे चालायला सुरवात केली. जेवण केले. ८.१५ च वाजले होते. मग काही वेळ स्थानकावरच गप्पा मारत बसलो. मग आईस्क्रीम खाल्ले. तरीही अजून अर्धा तास उरला होता. आता मात्र वेळ जाता जाईना. एकेक मिनिट मोजत अर्धा तास घालवल्यावर शेवटी बस आली. दिवसभर फिरून दमलेले आम्ही मस्त झोपून गेलो. आदल्या दिवशी पक्षांची किलबिल ऐकत जागे झालेलो आम्ही बंगलोरच्या गर्दीच्या, गाड्यांच्या कलकलाटाने जागे झालो. घरी येऊन परत रोजचे राहत गाडगे सुरु झाले. पोस्ट लिहिता लिहिता आठवणी ताज्या होतायत, मनात गाणे रेंगाळते आहे:
दिल ढ़ूंढता है फिर वही फुरसत के रात दिन|
बैठे रहे तसव्वुर-ए-जाना किये हुए|
दिल ढ़ूंढता है ...
(फोटोग्राफी: मी आणि अभिजीत)

Sunday, April 29, 2012

पहिला पाऊस

    अगदी परवा-तेरवापर्यन्त उकड-उकड उकडत होते. रोज ढग येत होते आणि न बरसताच परत जात होते. शेवटी "येतोय येतोय" म्हणता म्हणता काल पाऊस आला खराच. मातीचा गंध सर्वत्र दरवळू लागला, हवा थंड झाली. ओले रस्ते, ओली झाडे, हवाही ओली! नेहमीच हवाहवासा वाटणारा पाऊस बंगलोरला नेहमीप्रमाणे मेमध्येच दाखल झाला.
  सकाळी कॅबने जाताना बाहेर असेच पावसाळी वातावरण होते. खिडकीतून बाहेर पाहता पाहता मन पोचले भूतकाळात,  गेले एकदम शाळेच्या दिवसांत.
    शाळेची आणि पावसाची सुरवात तशी एकत्रच व्हायची. शाळा सुरु होंण्याआधी पुस्तके, दप्तरे, यूनिफ़ॉर्म रेनकोट वगैरेची खरेदी व्हायची. नव्या कोऱ्या वह्या-पुस्तकांचा, यूनिफ़ॉर्मचा दप्तराचा हवासा वास, पावसाने हवेला आलेला ओलसरपणा, सकाळची शाळा, शाळेत जाता जाता पावसात हलकेसे भिजल्याने वाजणारी थंडी, ओली दप्तरे, ओले बाक, उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीनंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींशी खूप दिवसांनी मारलेल्या गप्पा, सगळे काही पावसात चिंब भिजलेले.
    प्रत्येक विषयाच्या सगळ्यात पहिल्या तासाच्या सुरवातीला वहीवर नाव घालणे, श्री लिहिणे हा कार्यक्रम! वर्गशिक्षक कोण असणार, इतर विषयांना कोणते शिक्षक असणार अशा प्रश्नांनी तयार झालेला सस्पेन्स, धडे कोणते, किती अवघड असतील, काय काय शिकावे लागेल ह्याची लागलेली उत्सुकता, आजही हे सगळे जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहते. 
    प्रत्येक विषयाचे पहिले काही धडे तर जणू पावसातच भिजलेले असायचे. बाई शिकवत असायच्या आणि मागे पाऊस नेपथ्य आणि पार्श्वसंगीत द्यायचा. परीक्षेच्या वेळी अभ्यास करताना हे धडे वाचायला लागले की जणू काही आत्ताही  पाऊस पडतोय असा भास व्हायचा. किंबहुना अजूनही, काही धड्यांची, मुख्यतः मराठीच्या, आठवण आली की सोबत पावसाचा भास होतो.
    शाळेत जाता-येता पाऊस पडत असेल तर रिक्षावाले काका रिक्षेचे पडदे खाली सोडायचे. पडदे असूनही सगळ्यात कडेला बसणारी मुले ओलीच व्हायचीच . जी आत बसलेली असायची तीही बाकी भिजलेल्या मुलांमुळे, ओल्या दप्तरांमुळे ओली व्हायची. पुस्तकांनाही प्लास्टिकच्या पिशवीचा रेनकोट घालायला लागायचा. सगळे काही ओलेचिंब!
    पावसामुळे संध्याकाळी बऱ्याचदा पार्किंगमध्येच खेळायला लागल्याने भेंड्या, दम शराझ आशा बैठ्या खेळांवरच समाधान मानावे लागे. कधी कधी मात्र भर पावसात पळापळीचे खेळही   खेळायलाही मजा यायची. कधी बिल्डींगसमोर साचलेल्या डबक्यात होड्या करून सोडण्याचे उद्योग चालायचे. एकदा एका मुलाच्या काय डोक्यात आले, त्याने डबक्यातली गांडुळे पकडून बाटलीत भरून ठेवण्याचा उद्योग चालू केला. तशी सरपटणार्या प्राण्यांची मला येते किळस पण तेव्हा कसे कोण जाणे धैर्य करून एक गांडूळ मीही हातात धरून बाटलीत टाकले. एकानंतर दुसरे, दुसर्यानंतर तिसरे, म्हणता म्हणता गांडुळे पकडून बाटलीत भरून ठेवण्याचा छंदच सगळ्यांना लागला. तो प्रकार आम्हाला अगदी कंटाळा येईस्तोवर आम्ही केल्याचे मला स्मरते.
    पुढे सायकलने शाळेत जाऊ लागल्यावर मात्र आपण घरी येत-जात असताना पाऊस पडण्यापेक्षा बाकी वेळीच पडावा असे वाटायचे. रेनकोट वगरे घातले तरी भिजायला व्हायचेच, बूट मोजे हमखास  भिजायचेच. आणि मग दिवसभर तसेच भिजलेले बसायला अगदी नकोसे वाटायचे.
    असाच हा पावसाळा  चालू असताना यायचा श्रावण! श्रावण म्हणले की घरोघरी निरनिराळी व्रत-वैखाल्ये आणि पूजा चालू व्हायच्या.सणावाराला पक्वान्ने तयार व्हायची. हाताला मेहंदी लागायची. एका हातात छत्री धरून पूजेला लागणारी फुले गोळा करायचे कसरतीचे काम माझ्याकडे यायचे. अत्तर-उद्बत्यांच्या, पक्वान्नांच्या, मेहंदीच्या सुवासात मातीच्या आणि फुलांच्या सुगंधाची भर घालून पाऊसही आमच्या आनंदात शामिल व्हायचा.
    तोतापुरी आंबे, भाजलेली कणसे, गरमा-गरम भजी, वाफाळलेले सूप आणि ह्या सगळ्याच्या  पार्श्वभूमीला  पाऊस!!! कल्पनेनेच किती मस्त वाटते. एखाद्या पावसाळी संध्याकाळी, उबदार गादीवर बसून, एकीकडे पुस्तक वाचत, भुरक्या मारत प्यायलेले सूप; बाहेर धो धो पाऊस चालू असताना, अंग भिजल्याने कुडकुडत,  सिंहगडवरल्या झोपडीत बसून खाल्लेल्या झुणका-भाकरीची, आणि कांदा भाजीची चव; पाऊस पडत असताना बाल्कनीत बसून मिटक्या मारत खाल्लेल्या तोतापुरी आंब्याच्या फोडी; ह्यांनी दिलेला आनंद कितीही पैसे मोजले तरी न मिळणारा!
    पुढे कॉलेजमध्ये पावसाने मजा आणली ती कॉलेजच्या बोट-क्लबवर! लेक्चर्स संपली की मस्त बोट-क्लबवर जाऊन बसायचे. तिथल्या झाडांवरून पाणी टप-टप ओघळणारे थेंब पलीकडे वाहणाऱ्या नदीत गोलाकार नक्षी रेखताना पाहून मन प्रसन्न व्हायचे. अशा चिंब वातावरणात चहा-कॉफी पीत, गप्पा मारत तास-दोन तास कसे सरायचे कळायचे नाही.
    पुढे आय. आय. टी. त गेल्यावर पावसाचे वेगळे रूप पाहिले. डोक्यावर बादली ओतल्यासारखा पाऊस अक्षरशः कोसळत असायचा. एकदा आला की जायचे नाव नाही, २-३ दिवस सलग पडत राहायचा. छत्री फक्त शोसाठी म्हणून न्यायची. तिचा उपयोग शून्य होता. पावसात डिपार्टमेंटला जाताना निम्मे शरीर भिजायचेच. तसेच अर्धवट भिजून लेक्चरला जाऊन बसायचे, मग कामासाठी lab मध्येही तसेच ओले बसायचे. सगळी नुसती चिक-चिक! पण cafe shack च्या समोरच्या पायऱ्यांवर बसून गरमा-गरम maggi noodles आणि सूप खायला जी काही मजा यायची त्याला काही तोड नाही! पाऊस पडत असताना लक्ष्मीत बसून आधी मंचाव सूप, मसाला पापड आणि नंतर डाल-खिचडी खायला मस्त वाटायचे.
   बंगलोरमध्ये पाऊस आल्हाददायक.. खूप धो-धो वगरे पडत नाही. पण साधारणपणे वर्षातील दहा महिने सतत पडत राहिल्याने "अतिपरिचयात् अवज्ञा" अशी तऱ्हा होते. पण सध्या बोलायचे तर इतर ठिकाणी कडकडीत उन्हाळा चालू असताना बंगलोरमध्ये मात्र मस्त हवामान आहे, एकदम रोमॅंटिक म्हणतात ना तसे! रिमझिम पावसात मस्त सूप, भजी, किंवा गरमा-गरम पॉप कॉर्न खात बाल्कनीत खुर्ची टाकून बाहेर बघत बसावे असे. तेव्हा आता बोलण्यात  जास्त वेळ  न दवडता  पावसाची मजा घेण्यासाठी तुमची रजा घेते. हा पावसाळा सर्वांना मजेचा, गरम-गरम चहा, कॉफ़ी आणि भज्यांचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

Monday, March 26, 2012

अ वॉक टू रिमेंबर

    शनिवारचा दिवस होता. आदल्या दिवशी झोपायला उशीर झाला होता. घडाळ्यात सातचा अलार्म लावला होता. सात वाजले, घड्याळ आरवले, आळस देत देत आम्ही उठलो.  "ए वॉकला जाऊया?", मी अभिजीतला विचारले. आश्चर्यकारकरित्या तोही लगेच "हो" म्हणाला. १५-२० मिनिटात आवरून घराबाहेर पडलो. लेकला जायचे म्हणले तर बर्यापैकी उशीर झालेला होता. मागच्याच गल्लीतून निघून गोल चक्कर मारून येता येता  भाजी घेऊन येऊ असे ठरले.
   सूर्य केव्हाच उठून तयार होऊन बसला होता. त्यामुळे रस्त्यावरून चालणे काही विशेष रिफ्रेशिंग वाटणार नव्हते. पण आळसात सकाळ घालवण्यापेक्षा नावाला का होई ना जरा फिरून आलेले बरे म्हणून निघालो  होतो एवढेच! चालता चालता घराजवळच्या एका बेकरीजवळ पोचलो. सहज बेकरीच्या टेबलाखाली नजर गेली तर तिथे एक मांजरीचे पिल्लू बसलेले दिसले. बेकरीच्या पायरीजवळच बसलेले एक कुत्रे ह्या पिल्लाकडे रोखून पाहत होते. पिल्लू कुत्रे अंगावर आलेच तर कुठे पळायचे ह्याचा कानोसा घेत होते. पावले आपोआप बेकरीकडे वळली. आम्ही बेकरीशी जाऊन आधी कुत्र्याला पळवले. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी तोंडाने च-च आवाज काढत पिल्लाला हाक मारायला सुरवात केली. अपेक्षेप्रमाणे पिल्लाने माझ्यापासून 'सुरक्षित अंतर ठेवण्याचे' धोरण अवलंबले. दुसरे एखादे मांजर असते तर मीही ते लांब पळतेय म्हणाल्यावर नाद सोडून दिला असता. पण हे पिल्लू फार गोड होते आणि दुसरे  म्हणजे मी बेकरीसमोर उभी होते त्यामुळे बिस्किटाची लाच दाखवून पिल्लाला जवळ यायला लावायचा प्रयत्न करून बघायला काही हरकत नव्हती. शक्यतो दुकानदार मांजरांना थारा देत नाहीत. त्यांच्या दुकानात मांजरांशी खेळलेलेही त्यांना आवडत नाही. पण ते पिल्लू बहुदा त्या बेकरीवाल्याने पाळलेले असावे. मी पिल्लाला हाक मारल्याबद्दल बेकरीवाल्याने कोणतीही नापसंती दर्शवली नाही. मी बेकरीतून रुपयाचे बिस्कीट घेतले आणि पिल्लापुढे धरून त्याला परत हाक मारली.
    जुन्या मुवीमध्ये मुलीला पाहायला लोक आलेले असताना ती जशी घाबरत, लाजत पुढे यायची तसे ते पिल्लू "जाऊ की नको, जाऊ की नको" असा विचार करत दबकत दबकत पुढे येऊ लागले. पण पहिल्याच दमात माझ्या एकदम जवळ यायची तर हिम्मत त्याच्यात नव्हती. मग मी बिस्किटाचा छोटा तुकडा पायरीवर ठेवला. बिस्किटाचा खमंग वास आल्यावर मात्र त्याच्याने रहावले नाही आणि ते पुढे येऊन बिस्कीट खाऊ लागले. त्याला बरीच भूक लागल्याचे दिसत होते. दुष्काळातून आलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याची जी तऱ्हा होईल तसे ते भराभरा बिस्कीट खाऊ लागले. तुकडा संपत आला की तोंडात बिस्कीट असतानाच ते "अजून बिस्कीट दे" असे म्हणत आवाज काढत होते. अर्धे बिस्कीट संपवल्यावर मात्र ते जरा शांत झाले. मग पुढला तुकडा त्याने शांतपणे खाल्ला. त्याच्या पुढचा तुकडा मी हातात धरल्यावर तो तोंडात घेण्याऐवजी जेव्हा ते पंजाने त्याच्याशी खेळू लागले तेव्हा मात्र त्याची भूक भागल्याची मला खात्री झाली.
   लहान मुलांना आवडतीचा खाऊ दिला की कशी ती सगळी भीती सोडून, नवखेपणा विसरून ती जवळ येतात तसेच ह्या पिल्लाचे झाले. ते एकदम ओळखीच्या माणसासारखे अभिजीतच्या मांडीवर जाऊन बसले आणि  तिथून माझ्याकडे पाहू लागले. दोन मिनिटे माझे निरीक्षण केल्यावर "आपल्याला खाऊ घालणारी ही नक्की कोण आहे?" असा प्रश्न त्याला बहुतेक पडला. ते माझ्या तोंडाकडे पाहून प्रश्नार्थक स्वरात ओरडू लागले. मी "काय..काय?" असे विचारल्यावर अभिजीतच्या मांडीवरून उतरून माझ्याजवळ आले. माझ्याशी दोन मिनिटे  खेळले, परत अभिजीतकडे गेले. "ही अचानक आलेली माणसे नक्की कोण आहेत? ती कुठून आली आहेत? आता आपण ह्यांच्यासोबत काय करणे अपेक्षित आहे?" असे प्रश्न त्याला बहुदा पडलेले असावेत. ५-१० मिनिटे अशीच इकडून तिकडे करण्यात गेली. मध्येच ते मगाचचे कुत्रे परत आले. तेव्हा हे पिल्लू आमच्या दोघांच्या मधोमध अगदी विश्वासाने बसले. थोडा वेळ वाट पाहून कुत्र्यालाही कंटाळा आला, ते परत निघून गेले. पिल्लू परत खेळायला लागले. पिल्लाचा खाणे-ओरडणे-खेळणे इत्यादी कार्यक्रम पूर्ण झाला. आम्हालाही घरी लवकर जायचे असल्याने आम्ही निघायचे ठरवले. पिल्लू मागे येऊ लागले पण दुकानाच्या शेवटच्या पायरीवरून मात्र ते आपल्या मालकाकडे परत गेले.
    मला मांजरे फार आवडतात.  पण आमच्या बिल्डींगवर "Pets Strongly Discouraged" अशी पाटी लावलेली आहे. भाड्याने राहत असल्याने उगाच कोणाच्या भानगडीत पडायला नको म्हणून आम्हीही ह्या डिस्करेजमेंटला विरोध करायला जात नाही. त्यामुळे मांजर पाळणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे "तू दर शनिवारी इथेच बसत जा. आम्ही तुला बिस्कीट द्यायला आणि तुझ्याशी खेळायला दर शनिवारी इकडे येत जाऊ", असे डील त्याच्याशी करून आम्ही त्याला बाय केले.
   पाऊण बिस्किटातच पिल्लाचे पोट भरल्याने उरलेला पाव तुकडा अजून माझ्या हातातच होता. वाटेत एखादे कुत्रे दिसले तर त्याला घालू असे आम्ही ठरवले. एके ठिकाणी एकदम तीन कुत्री दिसली. त्यांच्यापैकी एकाला हा तुकडा दिला तर एवढ्याश्या तुकड्यासाठी त्यांच्यात भांडाभांडी होईल आणि ज्यांना तुकडा नाही मिळाला त्यांचा हिरमोड होईल असा विचार करून आम्ही बिस्कीट न देता पुढे गेलो. पुढच्याच चौकात गेल्याच शनिवारी दिसलेले एक काळ्या रंगाचे ढोले, बुटके कुत्रे दिसले. मागच्या शनिवारी त्याला हक मारून जवळ बोलावल्यावर ते फार आशेने माझ्याकडे आले होते, शेपटी हलवत हलवत! पण माझ्याकडे त्याला द्यायला काहीच नव्हते. दोन मिनिटे वाट पाहून ते निराशेने निघून गेले होते. आज त्याला बोलावल्यावर ते अजूनच उत्साहात संपूर्ण अंग हालवत हालवत माझ्याजवळ आले. मी पटकन हातातला तुकडा त्याला दिला. ते इतके उत्साहात होते की तो तुकडा चावायच्या नादात जमिनीवर पडला. ते वास घेत घेत जमिनीवरचा तुकडा शोधायला लागले. आपण फार काळ इथे उभे राहिलो तर हे "अजून खाऊ दे" म्हणून नक्की आपल्या मागे लागेल असा विचार डोक्यात क्लिक झाल्यावर मी क्षणाचाही वेळ न दवडता तिकडून कल्टी मारली. कुत्रेही आधी तुकडा शोधण्यात आणि  मग तो खाण्यात बिझी झाल्याने, मी निघाले आहे ह्याकडे त्याचे लक्ष गेले नाही.एका मिनिटात आटोपलेल्या ह्या प्रोग्राममध्ये इतकी मजा आली की काही विचारू नका.
   आम्ही घराकडे परत निघालो. भाजी घेतली. जाताना बेकरी परत लागली. साहजिकच नजर माऊला परत शोधू लागली. माऊ तिकडे दिसत नव्हते. मनातल्या मनात "पुढच्या शनिवारी माऊची भेट नक्की होऊ देत" अशी इच्छा व्यक्त करत, माऊसोबत घालवलेल्या १५-२० मिनिटातल्या आठवणींना मनात साठवत आम्ही घरी गेलो.

Monday, March 5, 2012

सोनी: अंतिम चरण

    मागे म्हटल्यानुसार सोनीची पिल्ले हळू हळू मोठी होऊ लागली. योग्य वेळ आली तशी ब्लॅकी व्यवस्थित चालू लागली. पण चॉकीच्या पायांत मात्र काहीतरी दोष होता. त्याच्या मागच्या पायांत जीवच नव्हता. त्याचे मागचे पाय मांजरांचा म्हणून जो आपण गुढघा म्हणू शकतो तिथून सरळ दुमडलेच जात नसत. त्यामुळे बेडूक पाण्यात पोहताना जसा दिसतो ना तसा तो पुढल्या दोन पायांवर सरपटत जायचा, मागचे पाय सरळच्या सरळ ओढत. त्याची ही केविलवाणी अवस्था पाहून आम्हाला फार वाईट वाटायचे. आईने त्याचे पाय बरे होण्यासाठी कॉडलिव्हर  ऑईलच्या गोळ्यांमधल्या तेलाने त्याच्या  पायांना मालिश करायला सुरवात केली. आईचा हा उपचार कामी आला आणि हळू हळू चॉकीचे पाय बरे झाले.
    पिल्लांचा दंगा आधी दिवाणातल्या दिवाणात मस्ती करणे, मग दिवाणावर चढून खाली उड्या मारणे, परत चढणे, परत उड्या मारणे, मग खोलीभर धावपळ करणे, मग घरभर धुमाकूळ घालणे ह्या पद्धतीने वाढत गेला. आमच्या घरात दिवसाच्या काही ठराविक वेळी, म्हणजेच सकाळ आणि रात्री जणू मांजरांचे ऑलिम्पिक चालू असायचे. कुस्ती, धावण्याची शर्यत, अडथळ्यांची शर्यत, लांब-उंच उडी, कागदाच्या बोळ्याचा  फुटबॉल, टी पॉय आणि सोफ्यावरचे जिम्नास्टिक्स, रिले इत्यादी खेळांचा आनंद आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळायचा. शिवाय प्रत्यक्ष ऑलिम्पिकमध्ये न पाहता येणारे लपा छापी, पकडा पकडी इत्यादी खेळही त्यांच्या ह्या ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होते. पिल्लांचे हे खेळ पाहून सोनीलाही कधी कधी त्यांच्यात खेळण्याची हुक्की येई. दोन पोरांची ही ढोली आई मोठ्या उत्साहाने त्यांच्या खेळात भाग घेई खरे, पण थोड्याच वेळ थकून भागून प्रेक्षकांत सामील होई.
    पिल्ले लहान असताना सोनी त्यांच्यासाठी वेगवेगळी शिकार घेऊन यायची. कधी उंदीर, कधी पोपट, कधी चिमणी, कधी आणखी काही! आमच्या घराला जाळीचे दर होते. लहानपणी त्याच्या जाळीतून सहजपणे ये-जा करणाऱ्या सोनीला आता त्यात मावत नसल्याने सहज आत येता येत नव्हते. घरातून बाहेर जाताना आणि येताना ती दारासमोर म्याव, म्याव करत बसायची. तिचे येणे-जाणे आमच्या दार उघडण्यावर अवलंबून होते. शिकार तोंडात धरून आणली की मात्र तिला नीट ओरडता यायचे नाही. तोंडात शिकार असताना ती दार उघडण्यासाठी ओरडली की तिचा आवाज वेगळाच यायचा. तिचा तो आवाज आला की पिल्लांना आईने आज आपल्यासाठी काहीतरी खाऊ आणलाय ह्याची कल्पना यायची आणि ती दाराच्या दिशेने धावत सुटायची. पिल्लांपासून शिकार वाचवत सोनी कशीबशी आतल्या खोलीपर्यंत घेऊन यायची आणि दिवाणाखाली जाऊन जमिनीवर ठेवायची. पुढचा अर्धा-एक तास दिवाणाखालून पिल्लांचे एकमेकांवर गुरगुरण्याचे आवाज येत राहायचे. चॉकी बोका असल्याने त्याच्यात जास्त शक्ती होती, त्यामुळे शिकारीतला जास्त वाटा तो फस्त करायचा.
    काही महिन्यांतच पिल्लेही मोठी झाली, वयात आली. त्यांचे आपापले उद्योग सुरु झाले. सोनीलाही आणखी एक-दोनदा पिल्ले झाली. आता मात्र लोकसंख्या नियंत्रणाची मोहीम हाती घ्यायला हवी ह्याची आईला जाणीव झाली. आईने सोनीचे ऑपरेशन करून आणले. हे ऑपरेशन मात्र सोनीला मानवले नाही. ऑपरेशन नंतर तिच्यात एकप्रकारचा सुस्तपणा आला. एकदा तर ती आमच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून खाली पडली. त्यामुळे ती एका पायाने लंगडू लागली. नंतर एकदा डॉक्टरला दाखवले असता तिच्या पोटात सिस्ट झाले असल्याचे कळले. ऑपरेशन करून ते काढावे लागले. एक दिवस नेहमीसारखी घरातून बाहेर पडलेली सोनी कधी घरी परतून आली नाही. खूप शोधाशोध करूनही ती सापडली नाही.
    सोनीच्या पिल्लांची जागा आता  ब्लॅकीच्या पिल्लांनी घेतली. ब्लॅकीच्या बाळंतपणात मात्र तिला एक वाईट सवय लागली. प्रतार्विधींसाठी तिसर्या मजल्यावरून खालपर्यंत जायचे तिच्याने होईना तेव्हा ती आमच्या खालच्या मजल्यावरच्या घरात जाऊन हा कार्यक्रम आटोपू लागली. त्या घरात विद्यार्थी राहत होते. ते दिवसभर घरी नसत. त्यामुळे त्यांच्याकडे हा कार्यक्रम आटपणे ब्लॅकीला सोयीचे वाटू लागले. कुत्र्यासारख्या प्राण्यांना आपण आटोक्यात तरी ठेऊ शकतो, पण मांजराचे काय करायचे? ती हट्टी असतात, त्यांना बांधूनही ठेवता येत नाही. आम्ही वेगवेगळे प्रयत्न करूनही ब्लॅकीने त्यांच्या घरी जायचे सोडले नाही तेव्हा मात्र तिला लांब सोडण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिला नाही. एक दिवस गाडी काढून तिला बावधनजवळ सोडून आलो तेव्हा झालेले सगळ्यांचे खिन्न-हताश चेहरे माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहेत. मध्यंतरी ब्लॅकीची पिल्ले एकेक करून पाळण्यासाठी लोक घेऊन गेले.
   पुढे आम्ही आमचे आनंद नगरचे घर सोडून रामबाग कॉलनीत  राहायला गेलो. चॉकी तेव्हा साधारण दीड वर्षांचा होता. आम्ही चॉकीला ह्या नव्या घरी नेण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न केले. रिक्षातून जाताना आमच्या हातात त्याला धरले तर तो इतकी झटापट करायचा की हातातून सुटून पळून जायचा. एकदा भाजीच्या बास्केटमध्ये ठेवून नेण्याचाही प्रयत्न केला. नखांनी, तोंडानी, नाकाने बास्केटचे झाकण उघडायचा प्रयत्न केल्याने त्याचे हात, तोंड रक्तबंबाळ झाले. अशाच परीस्थित कसेबसे घरापर्यंत नेले. दमलेला चॉकी झोपला, उठून दूध प्यायला आणि शेवटी जाळीच्या दारातून उडी मारून परत निघून गेला. आता मात्र आणखी प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही ह्याची आम्हाला चांगलीच जाणीव झाली. नंतर आनंद नगरमधून येत-जात असताना चॉकी आम्हाला बर्याचदा दिसायचा. हाक मारली की ओळखायचा, जवळ यायचा, थोडा  वेळ आमच्यासोबत घालवून निघून जायचा.
    अशाप्रकारे सोनीच्या वंशाच्या तीन पिढ्या आम्ही पाहिल्या. सोनी, ब्लॅकी, चॉकी आमच्या घरातून एकेक करत बाहेर पडले. सोनीची आमच्या घरातील वंशावळ संपली.  तरी एखाद्या मांजरीच्या पिढ्या न पिढ्या आमच्या घरात नांदण्याची ही काही अखेर नव्हती. ही तर खरी सुरवात होती. बापटांच्या घरातील मांजरांच्या इतिहासात पुढे ३-४ मांजरींनी आपल्या २-२, ३-३ पिढ्यांची भर घातली. प्रत्येक पिढीतली बाळंतपणे, नामकरण सोहळे, पराक्रम आणि मृत्यू इत्यादी घटनांच्या आठवणींच्या रुपात हा इतिहास आम्ही आमच्या मनात जपून ठेवला आहे.

  

Saturday, February 18, 2012

सोनी आणि तिची पिल्ले

    गेल्या पोस्टमध्ये सांगितल्यानुसार सोनीला दोन गोंडस पिल्ले झाली. जन्मतः  ह्या पिल्लांचे डोळे बंद असतात, त्यांना चालता येत नसते. तेव्हा पिल्लांचे डोळे कधी उघडणार, ती चालायला कधी लागणार ह्याविषयी आम्हाला भयंकर उत्सुकता लागलेली असायची. दर तासाला पिल्ले काय करतायत हे पाहण्यासाठी पिल्ले असलेल्या दिवाणाकडे आमच्या चकरा सुरु असायच्या. मांजरी कोणालाही पिल्लांजवळ येऊ देत नाहीत, जवळ जायचा प्रयत्न केल्यास गुराकावतात, नखे मारतात असे आम्ही ऐकले होते. पण सोनीचे तसे काहीच नव्हते. उलट आम्ही पिल्लांना पाहतोय, त्यांना हातात घेतोय ह्याचे तिला कौतुक वाटायचे. किंबहुना ह्यांच्या उपस्थितीत थोडा वेळ तरी आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागणार नाही, थोडा आराम करता येईल ह्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसायचे. पिल्लांना पाहायला गेले की पिल्ले तीनच स्थितींत दिसायची: झोपलेली, दूध पिणारी किंवा भूक लागलीये म्हणून आईला शोधणारी!
    बाकी डोळे बंद असले तरी छोटी पिल्ले जात्याच स्मार्ट असतात, चौकस असतात. नाकाने वास घेऊन, आणि कानाने आवाज ऐकत ती सतत आपल्या आजूबाजूला नव्याने आलेल्या गोष्टीचा वेध घेत असतात. आपल्या आजूबाजूला कोणतीही संशयास्पद हालचाल होत असल्याचे त्यांना वाटले किंवा नवीन गोष्टीचा वास आला की ती फिस्कारतात. सोनीची पिल्ले ह्या बाबतीत एक्स्ट्रा स्मार्ट होती. आम्ही दिवाणाजवळ गेलो की ती आमच्या दिशेने तोंड करून काही वेळ भलते सलते आवाज काढत, उद्देश? आम्हाला घाबरवून. शेवटी त्या प्रकाराने ती दमली की परत तोंड वळवून आम्ही येण्याआधी जे त्यांचे चालू असे ते पुन्हा सुरु करायची. डोळे न उघडलेली पिल्ले आईला शोधण्यासाठी काढत असलेले वेगवेगळे आवाज ऐकणे, चालता येत नसतानाही नाकाने वास घेत आई कुठे असेल  ह्याचा वेध घेत, तिच्यापर्यंत कसे बसे सरपटत सरपटत जाणाऱ्या त्या पिल्लांना पाहणे हे आमच्यासाठी नवीन अनुभव होते.
    अजूनही दिवाणातील सोनी आणि तिच्या पिल्लांची काही दृश्ये रेकॉर्डेड फिल्मसारखी माझ्या डोळ्यासमोर येतात. सोनी कोपर्यात बसलीये. पिल्ले झोपलीयेत. अचानक एखाद्या पिल्लाला जाग येते. झोपेतून नुकतेच उठेलेले बाळ जसे कुरकुरते तसे हे पिल्लू क्षीण आवाजात आईला हाक मारण्याचा प्रयत्न करते. त्याचा आवाज ऐकून बाकीची पिल्लेही जागी होतात. सगळ्यांनाच एकदम आईची आठवण होते. सगळीच आईला हाक मारू लागतात. पिल्ले शांतपणे झोपलेली पाहून आपणही आराम करावा म्हणून थोडी डुलकी काढत असलेली आई ह्या गडबडीने जागी होते. सगळी पिल्ले कशी बशी धडपडत, सरपटत, वास घेत घेत आईपर्यंत पोहोचायच्या प्रयत्नात असतात. आपण बाळांनी  रांगायला लागण्याची जशी वाटत पाहत असतो तशीच ही आई पिल्ले चालायला लागण्याची वाट पाहत असते. त्यामुळे पिल्लांची इतकी धडपड पाहूनही ती स्वतःहून त्यांच्या जवळ जात नाही, पिल्ले तिच्यापर्यंत पोहोचायची आतुरतेने वाट पाहत राहते. शेवटी कशी बशी पिल्ले आईपर्यंत पोहोचतात. आईच्या पोटात डोके खुपसून त्यांचा दूध पिण्याचा कार्यक्रम सुरु होतो. पोटे भरली की तशीच एकेक एकेक करत आईच्या पोटात डोके खुपसून झोपून जातात. शेवटी दमलेली आई हाताच्या एका रेट्यात सगळ्या पिल्लांना आपल्या कुशीत ओढून घेते आणि त्यांच्या भोवती स्वतःला गुरफटून झोपून जाते. हा कार्यक्रम कितीही वेळा पाहिला तरी त्याचा आम्हाला कंटाळा यायचा नाही, उलट छानच वाटायचे.
    ही सगळी गंमत अनुभवत पिल्ले डोळे कधी उघडणार, कधी चालायला लागणार ह्याची वाट आम्ही पाहू लागलो. आधी पिल्लांचे डोळे नुसतेच काळ्या फटीसारखे दिसायला लागले. मग ते आणखी थोडे उघडले. थोडे, थोडे करत दहाव्या दिवशी पिल्लांचे डोळे पूर्ण उघडले. आता त्यांच्या पायातही थोडी ताकद आली होती. नुकतेच चालायला शिकलेले पाय आणि इतक्यातच पाहायला शिकलेले डोळे अशा परिस्थितीत त्यांना जमिनीच्या उंचीचा अंदाज येत नसे. पाहतायत कुठेतरी, जायचेय कुठेतरी, पावले भलतीकडेच पडतायत असा प्रकार. नुकतेच चालायला लागलेले बाळ पाहायला जितकी मजा येते तितकीच मजा आम्हाला त्यांच्या त्या गोंडस हालचाली पाहण्यात यायची. सोनेरी पिलाच्या डोळ्यांचा रंग होता निळा आणि तो बोका होता. सोनेरी रंग आणि निळे डोळे असलेला हा बोका फारच गोंडस दिसायचा. त्याच्या रंगावरून आम्ही त्याचे नाव चॉकी (चॉकलेटसारख्या रंगावरून )  ठेवले. दुसरे पिल्लू सोनीच्याच रंगाचे, हिरव्या डोळ्यांचे होते. ती मांजरी होती. तिचे नाव आम्ही ब्लॅकी ठेवले.
    मांजरी पिल्लांची जागा सात वेळा बदलतात असे म्हणतात. त्यांना पिल्लांची जागा बदलण्याची निसर्गतः सवय असते. त्या दर काही काळाने नवी जागा शोधतात आणि एकेका पिल्लाला पटापट तोंडात पकडून नवीन जागी घेऊन जातात. पण आधी म्हटल्याप्रमाणे सोनी बालसंगोपनात ढ असल्यामुळे तिला पिल्ले हालविण्याची इच्छा झाली तरी ती कृतीत उतरवता येत नसे. कितीतरी वेळ तर तिला पहिल्या पिल्लाला तोंडात पकडण्यासाठी लागायचा. खूप प्रयासांनंतर पिल्लाला तोंडात पकडले की सोनी कसे बसे १० पावले चालायची की ते पिल्लू तिच्या तोंडातून सुटून खाली पडायचे. बिचारे कावरे बावरे होऊन इकडे तिकडे पाहू लागायचे, " मैं कहाँ हूँ?" स्टाईल मध्ये! हा सगळा प्रकार पाहून आई सोनी पिल्लाला कुठे न्यायचा प्रयत्न करतीये ते पाहायची. त्या ठिकाणी जागा करायची, पिल्लांसाठी जुन्या जागी अंथरलेली साडी त्या जागी नेऊन पसरायची आणि स्वतःच पिल्लांना तिकडे नेऊन ठेवायची. ह्या सगळ्या कार्यक्रमाने थकलेली सोनी पिल्लांना घट्ट मिठी मारून झोपून जायची.
    असे करता करता सोनीची पिल्ले मोठी होऊ लागली. छान चालू लागली. भयंकर दंगा करू लागली. मायेने साद घालून बोलावणाऱ्या सोनीचे ती अजिबात ऐकेनाशी झाली, मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष करू लागली. आता आमच्या घरात पाचाच्या जागी सात प्राणी (मनुष्य हाही प्राणीच आहे ह्याला अनुसरून) नांदू लागले. सोनी, चॉकी आणि ब्लॅकीचे पुढचे किस्से पुढच्या पोस्टमध्ये पाहू. तोवर टाटा!


Monday, February 13, 2012

सोनीचे बाळंतपण

    मागील पोस्टमध्ये म्हटल्यानुसार सोनीने तारुण्यात पदार्पण केले आणि आमच्या घरासमोर बोक्यांच्या फेऱ्या चालू झाल्या. दिवसभर आमच्या मागे मागे करणारी सोनी घराबाहेर जास्त वेळ रमू लागली. काही काळातच सोनीच्या हालचालीत एकप्रकारचा मंदपणा जाणवू लागला. पण आमच्याकडे आधी सगळे बोके होते आणि ही पहिलीच मांजरी. त्यामुळे एवढ्याशा बदलावरून तिला पिल्ले होणार आहेत हे समजण्याइतके आम्ही एक्स्पर्ट झालेले नव्हतो. काही दिवसांनी तिचे पोट मोठे दिसू लागले आणि ती जास्त लाडे लाडे वागू लागली तेव्हा मात्र तिला पिल्ले होणार ह्याची खात्री झाली.
    एवढेसे पिल्लू असल्यापासून सांभाळ केलेल्या आपल्या पोरीसारख्या मांजरीचे बाळंतपण म्हणजे तिचे किती लाड करू आणि किती नको असे आमच्या आईसाहेबांना झाले. तिच्या खाण्यापिण्याची आणखी काळजी घेतली जाऊ लागली. खिरीचा खुराक सुरु झाला. एकदा आमच्या घरी पाहुणे आले होते. तेव्हा आई मांजर गरोदर आहे म्हणून तिला खीर खाऊ घालतीये हे पाहून त्यांना केवढे आश्चर्य वाटले होते ते मला अजूनही आठवतेय! आधीच लाडोबा असलेल्या सोनीला आपले अजून लाड होतायत हे पाहून आणखीनच लाडे लाडे वागण्याची संधी मिळाली. आपल्याला कसेही वागले तरी कोणी फटके मारत नाही हे तिला चांगलेच कळले. 
   जसजशी पिल्ले व्हायची वेळ जवळ आली तसतशी सोनीची पिल्ले घालण्यासाठीच्या जागेची शोध मोहीम सुरु झाली. काही फार संशयी वृत्तीच्या मांजरी  पिल्ले कुठल्यातरी अडगळीच्या ठिकाणी घालतात जेणेकरून पिल्ले कोणाच्या हाती सहज सहजी लागत नाहीत. पण सोनीचा तसा काही विचार दिसला नाही. आमच्या घरात अडगळ अशी नव्हतीच त्यामुळे तिने त्यातल्या त्यात जागेचा शोध सुरु केला. दिवाणाचे दार, किंवा कपाटांची  दारे उघडी दिसली की सोनी आत जाऊन बसायची. थोड्या वेळ त्या जागेचा 'फील' घेऊन बघायची. 'पिल्ले इथे सुरक्षित राहू शकतील का?' ह्याचे बहुधा ती आडाखे बांधत असावी. थोडा वेळ झाला की आपल्या आपण बाहेर पडायची. कपाटाची तपासणी करायला मात्र तिला थोडा जास्त वेळ लागायचा. प्रत्येक कप्प्यात जाऊन निरीक्षणे करणे म्हणजे केवढे मोठे काम! सोनीची स्वारी कपड्यांच्या कप्प्याच्या दिशेने जाऊ लागली की मात्र आम्ही तिला बाहेर काढून कपाट लावून घ्यायचो.
     म्हणता म्हणता पिल्ले होण्याचा दिवस आला. सोनी बेचैन दिसत होती. अधून मधून वेगवेगळ्या तर्हेचे आवाज काढत होती. आईच्या जवळ जवळ राहण्याचा प्रयत्न करत होती. तिचे हे वागणे पाहून आईला तिला लवकरच पिल्ले होणार आहेत ह्याची कल्पना आली. सोनीला काही सुचत नव्हते. एका जागी बसत नव्हती, जणू काही पिल्ले घालण्याच्या जागेच्या केलेल्या तपासाची सगळी कन्क्लुजंस ती विसरून गेली होती. त्यामुळे कुठे पिल्ले घालावीत हे तिला सुचत नव्हते. शेवटी ही अशीच फिरत राहिली तर भलतीकडेच पिल्ले घातली जातील ह्या काळजीने आईने दिवाणाच्या एका कप्प्यात मोकळी जागा केली, त्यात जुनी सुती साडी पांघरून ठेवली आणि सोनीला त्यावर बसवले. तिने जास्त हालचाल करू नये म्हणून अधून मधून तिच्या जवळ जाऊन आई तिला कुरवाळत राहिली. काही वेळाने सोनीला दोन पिल्ले झाली. 
    शिकारीत पैकीच्या पैकी मार्क मिळवणारी सोनी मुलांचे संगोपन ह्या विषयात मात्र अगदी ढ होती. अगदी १० पैकी २ मार्क्स देऊन नापास करावे इतकी ढ! पिल्ले जन्माला घातल्यावर मांजरी लगेच त्यांना स्वच्छ करतात. पिल्ले घातलेल्या जागी अगदी कसलाही नामोनिशाण उरत नाही इतका उरक त्यांच्यात असतो. पण आमची सोनी, पिल्ले जन्माला घालण्याच्या प्रोसेसमध्येच थकलेली. काही  वेळ गेल्यावर तिला पिल्लांकडे पहायचे सुचले. बाकीचे सोपस्कार आईनेच पार पाडले.
    अर्थात हा सगळा एपिसोड मी शाळेत असताना झाला आणि आईने मला तो नंतर सांगितला. मी पाहिली तेव्हा मला दिसली दोन छोटीशी पिल्ले, अगदी बोटाच्या लांबीएवढी छोटी. एक सोनीच्याच रंगाचे आणि एक सोनेरी! मिटलेले डोळे आणि इवलेसे शिम्पल्यासारखे कान.  त्यांना पाहून आपल्याला छोटी छोटी भाचरंडे झाल्यासारखे वाटले. येता जाता सारखे 'पिल्ले काय करतायत? डोळे उघडले का? चालायला लागली का?' इत्यादीचे निरीक्षण करण्याची सवय लागली. पिल्लांच्या गंमती-जंमती पाहण्यात किती वेळ जायचा ते समजायचे नाही. 
पिल्लांचे नामकरण, त्यांचे बालपण इत्यादीबद्दल गप्पा मारू पुढच्या पोस्टमध्ये. तोवर सायोनारा!

 



Thursday, February 9, 2012

सोनी रीलोडेड

    आधीच्या पोस्टमध्ये सांगितल्यानुसार हाताच्या पंजावर मावणारी एवढीशी सोनी दिसामासाने अंग धरू लागली. काळ्या लोकरीच्या गुंड्या सारख्या दिसणाऱ्या तिच्या अंगावर हळू हळू सोनेरी, पांढऱ्या छटा दिसू लागल्या. सोनीच्या फरवरील केस इतर मांजरांच्या केसांहून जास्त मुलायम आणि लांब होते. शेपटी मस्त झुबकेदार होती. माझ्या मैत्रिणीकडे मांजरांचे एक कॅलेंडर होते. ते एकदा तिने दाखवले. त्यात डिट्टो  सोनीसारखी दिसणारी मांजर होती. त्यावरून सोनी अमेरिकन मांजरांच्या जातीतील होती असे कळले.
    सामान्यतः मांजरी जरा खत्रूड, माणसांच्या जास्त वाटेला न जाणाऱ्या आणि बोके प्रेमळ,  माणसांशी जास्त जवळीक ठेवणारे असे असतात. पण सोनीला आमचा सहवास आवडायचा. जेव्हा तिचे खेळणे संपायचे तेव्हा ती कोणाच्या तरी मांडीत जाऊन बसायची, नाहीतर पायापायात करत राहायची. आई सकाळी गच्चीत फेऱ्या मारायला जायची तेव्हा सोनीपण तिच्यासोबत जायची. किंबहुना आईची गच्चीवर जायची वेळ झाली आणि लोखंडी दार उघडताना कडी वाजली की  कडीचा आवाज ऐकून सोनी जिथे असेल तिथून धावत पळत यायची. दार उघडले की भराभरा पायऱ्या चढून गच्चीसमोर जाऊन बसायची. गच्चीचे दार उघडून आत पाऊल टाकेस्तोवर तर बाईसाहेब गच्चीच्या कठड्यावर जाऊन बसलेल्या असायच्या. मलाही गच्चीत अभ्यासाला जायला आवडायचे. अशा वेळी सोनी काही वेळ स्वतःशी खेळायची आणि दमली की मांडीवर येऊन बसायची. खेळणे आणि दमल्यावर मांडीवर येऊन बसणे  आलटून पालटून चालू राहायचे. 
    सुरवातीचे सोनीचे गच्चीवरचे खेळ म्हणजे छोटे छोटे किडे, फुलपाखरे ह्यांच्या मागे लागणे, त्यांना पकडून त्यांच्याशी खेळत बसणे आणि शेवटी ते खाणे. काही वेळा कठड्यावर किंवा टी. व्ही. च्या antenna वर बसलेल्या पक्ष्यांना पकडायचा प्रयत्नही  चालू असायचा. पण अजून नेम धरण्याचा तितकासा अंदाज नसल्याने त्यात तिला यश मिळायचे नाही. परंतु इतर पिल्लांना आईकडून मिळणारे शिकारीचे शिक्षण सोनीला न मिळताही तिने लवकरच त्यातही प्राविण्य मिळवले. इतर वेळी गळ्यातली मोत्याची माळ मिरवत फिरणारी गोंडस सोनी शिकार करू लागली की मात्र एकदम उग्र दिसायची. तोंडाने वेगवेगळे आवाज काढत, गुरकावत, डोळे शिकारीवर रोखून सोनी आधी दाबा धरायची आणि योग्य वेळ येताच भक्ष्यावर झेप घेऊन त्याला पायाशी लोळवायची.   
    लहान लहान म्हणता म्हणता सोनीने तारुण्यात कधी पदार्पण केले ते कळले नाही.दिसायला गोड, अंगावर असलेल्या लांब केसांच्या फरमुळे जराशी गुबगुबीत वाटणारी सोनी जवळपासच्या बोक्यांना 'सुबक, ठेंगणी..' ह्या जुन्या मराठी गाण्यात वर्णन केलेल्या तरुणीसारखी वाटत असणार ह्यात शंका नाही. आमच्या घराबाहेर नवनवीन बोक्यांच्या चकरा चालू  झाल्या. परिणाम? आमच्या घराची लोकसंख्या वाढली. सोनीचे बाळंतपण, त्या वेळचे तिचे नखरे, नंतर सोनीच्या पिल्लांचा घरातील वावर ह्यांनी आमच्या घराचे वातावरण आणखी बदलले. त्याविषयी पुढच्या पोस्टमध्ये गप्पा मारू. 
    (सोनीचा फोटो पुण्याच्या घरी असल्याने तो काही मी इथे पोस्ट करू शकत नाही. पण सोनीची छबी तुमच्या डोळ्यासमोर उभी राहावी म्हणून एक लिंक इथे देते आहे: http://pusscats.com/Siberian_Cats.htm. ह्या लिन्कवरचा फोटो आणि मांजरीचे वर्णन सोनीशी अगदी मिळते जुळते आहे. त्यावरून ती सायबेरीअन जातीची असायला हवी. पण आधी म्हणल्याप्रमाणे मैत्रिणीने लहानपणी दाखविलेल्या कॅलेंडरनुसार ती अमेरिकन जातीची होती अशी आमची समजूत झाली होती.  निष्कर्ष? काही नाही. शेवटी जातीत काय आहे? असे म्हणून सोडून देऊ.)




Sunday, February 5, 2012

सोनी

   परवाच 'Marley and Me' वाचून झाले. मार्ली ह्या खोडकर, खट्याळ (मार्लीच्या मालकाच्या भाषेत वाया गेलेल्या) कुत्र्याची आणि त्याच्या मालकाची ही गोष्ट अतिशयच रंजक आहे. पुस्तक अतिशय वेधक होते, वाचताना मी मार्लीच्या गोष्टीत पूर्णपणे रंगून गेले. पण पुस्तक संपले आणि मन मार्लीतून बाहेर आले, सोनीच्या आठवणींत  शिरले. सोनी, माझी लाडकी मांजरी!
   संध्याकाळची वेळ होती. दाराची बेल वाजली. आईने दार उघडले. पाहते तर काय, दारासमोर बिल्डींगमधली समस्त बच्चेकंपनी हजर होती. "काकू काकू, पार्किंगमध्ये ना आम्हाला मांजराचे छोटेसे पिल्लू सापडले आहे. तुम्ही त्याला सांभाळाल?", डायलॉग पाठ केल्यासारखी एका सुरात पोरे म्हणाली.
    ह्याआधी मांजराची ३-४ छोटी पिल्ले आम्ही पाळली होती. पण कधी कुत्री मागे लागून, कधी काही आजाराच्या  निमित्ताने अशी अगदी लहान असतानाच ती मेलेली होती. प्रत्येक पिल्लाचे घरी येणे, त्याची आम्ही काळजी घेणे, त्याच्या घरातील वावराची आम्हाला सवय होणे आणि त्याच्या मृत्यूने घरास रिकामपण येणे, अवघड होत असे. आणखी मांजरे न पाळायचे आम्ही ठरवले होते. त्यामुळे आईने "नको रे! आता नाही पाळत आम्ही मांजरे!" असे सांगून टाकले. "काकू पिल्लू खूप छोटे आहे. आणि ते फारच  घाबरल्यासारखे दिसते आहे. त्याची आईही दिसत नाहीये कुठे! तुम्ही नाही पाळलेत तर कुठे जाईल ते?" मुले म्हणाली. एवढेसे पिल्लू, तसेच पार्किंगमध्ये राहू दिले तर कुत्री तरी मारतील नाहीतर गाडीखाली येऊन तरी मारेल. ही कल्पना सहन न होऊन "घेऊन या त्याला, बघू काय करायचे ते!", असे आई पोरांना म्हणाली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन पोरे लगेच पिल्लाला घरी घेऊन आली.
   थोड्याच वेळात हाताच्या ओंजळीत मावणारा, मिचमिच्या डोळ्यांचा, करड्या रंगाचा, 'फर'चा एक गोळा आमच्या दिवाणखान्यातल्या सोफ्याखाली स्थानापन्न झाला होता. मांजरी आहे पाहून आईने पिल्लाचे नाव सोनी ठेवले. सोनी १-२ दिवसात आमच्या घरात रुळली. दिवसभर जमिनीवर पडलेल्या छोट्या वस्तूंशी तसेच स्वतःच्याच शेपटीशी खेळणे,  घरभर धावपळ करणे असल्या कसरतींनी दमलेली सोनी रात्री आमच्या पायात किंवा उशाशी येऊन बसायची. तिथे बसून तिचे छोटे-मोठे चाळे चालूच असायचे. तरी आम्हाला ते हवेहवेसे वाटायचे. 
   मांजरांना सुकी मच्छी खाऊ घातली की ती मस्त गुटगुटीत राहतात असा कोणीतरी दिलेला सल्ला ऐकून आईने सोनीला मच्छी खाऊ घालायला सुरवात केली. सकाळी आणि संध्याकाळी ठराविक  वेळी सोनीला आम्ही मच्छी देत असू. तिलाही लवकरच हे लक्षात आले. सकाळी आणि दुपारी आई झोपून उठली की सोनी आरडा ओरडा करून "लवकर मच्छी  दे", अशी डिमांड करू लागली.
   सोनीला खाऊ पिऊ घालणे, तिच्याशी खेळणे सगळ्यांनाच हवेहवेसे वाटे. शाळेतून आल्या आल्या दप्तर जागेवर ठेऊन सोनी कुठेय ते शोधणे आणि तिच्याशी खेळणे हा आमच्या दैनंदिनीतला एक  महत्त्वाचा कार्यक्रम झाला होता. दोरीच्या टोकाला कागदाचा बोळा बांधून तो जमिनीवर सोडायचा आणि गाडीसारखे बोळा ओढत घरभर धावायचे. सोनी बोळा पकडायला मागे धावायची. आमची ही अशी पकडा  पकडी कित्येकदा चालू असायची. रात्री झोपण्याआधी आई-बाबा शतपावली करू लागले की त्यांच्या पायापायात करणे हा सोनीचा एक आवडता टाईमपास होता.
   इतर मांजरांप्रमाणेच कानामागे, गळ्याला खाजवलेले सोनीला  खूप आवडायचे.अंग चाटून पुसून स्वच्छ करायचे आणि कोवळ्या उन्हात जाऊन बसायचे हा तिचा आवडता कार्यक्रम दिवसातून २-३ वेळा होत असे. अंघोळ करायची, उन्ह खायचे आणि सोफ्यावर किंवा दिसेल त्याच्या मांडीत जाऊन झोपून जायचे! अभ्यास करताना सोनी जवळ बसलेली असली की छान वाटायचे, सोबत वाटायची. पण कधी कधी हात पाय ताणून देऊन मस्त झोप काढणऱ्या सोनीला पाहून तिचा फार हेवाही वाटायचा. "खायचे, प्यायचे, लाड करून घ्यायचे आणि झोपायचे, काय मस्त आयुष्य आहे,असे आयुष्य पाहिजे!" असे वाटायचे.
   मिचमिच्या डोळ्यांच्या त्या फरच्या गोळ्याचे काही महिन्यातच एका सुंदर, रुबाबदार मांजरीत रुपांतर झाले. काही काळाने तिला पिल्ले झाली. आमच्या कुटुंबात दोन मेम्बर्सची भर पडली. सोनी आणि तिच्या पिल्लांच्या तुम्हाला सांगाव्यात अशा अनेक आठवणी माझ्या माझ्या मनात रंग लावून उभ्या आहेत. तुमच्याशी त्या शेअर करण्यासाठी लवकरच मी पुढची पोस्ट लिहीन. तोवर अलविदा!  
(टीप:  Marley and Ме हे पुस्तक प्राणी आवडणाऱ्या लोकांनी जरूर वाचा. तुम्हाला नक्की आवडेल.)